अभिजित ताम्हणे
‘सूर्य आग ओकतो आहे’ अशी परिेस्थिती मराठीजन अनुभवत आहेत आणि ‘यंदाचा उन्हाळा अधिक कडक’ हा दरवर्षी निघणारा निष्कर्ष यंदा नव्या जोमानं निघतो आहे. त्याची कारणं ‘वातावरणीय बदल- क्लायमेट चेंज’पर्यंत भिडतात हे सर्वांना माहीत आहे आणि पर्यावरण-संधारण हा त्यावरचा उपाय असल्याची कल्पनाही सगळ्यांना असणारच. पण चाळीसेक वर्षांपूर्वी जेव्हा क्लायमेट चेंज, पर्यावरण-रक्षण वगैरे चर्चा ही ‘पाश्चात्त्य खुळं’ मानली गेली असतील (तसा रीतीरिवाजच आहे आपला!), तेव्हा – म्हणजे १९८२ मध्ये तिकडच्या पश्चिम जर्मनी नामक देशात, कासेल नावाच्या शहरात ‘डॉक्युमेण्टा’ या नावानं दृश्यकलेचं जे काही पंचवार्षिक महाप्रदर्शन भरायचं, तिथं घडलेली ही गोष्ट. त्या गोष्टीला अंत नाही आणि या अंतहीन गोष्टीची प्रचीती प्रस्तुत लेखकाला २००७, २०१३ आणि २०१७ साली आलेली आहे. ही प्रचीती ‘कलात्मक’ आहे का याचा निर्णय वाचकांनी घ्यायचा आहे. तर गोष्ट अशी…

जोसेफ बॉइस हा मूळचा जर्मन, पण युद्धानंतर अमेरिकेत राहू लागलेला प्रख्यात दृश्यकलावंत. ‘डॉक्युमेण्टा’ या १९५५ सालापासनं दर पाच वर्षांनंतर भरणाऱ्या महाप्रदर्शनासाठी या जोसेफ बॉइसला खास निमंत्रण देण्यात आलं- ‘आपली कलाकृती आमचे येथे प्रदर्शित करून आम्हांस उपकृत करावे’ वगैरे अगदी औपचारिक. यानंही औपचारिकपणेच कळवलं… ‘‘हे महाप्रदर्शन जेथे भरते, त्या कासेल शहरात मी झाडे लावू इच्छितो. प्रत्येक झाडाच्या शेजारी गुडघाभर उंचीचा एक दगडी चिराही असेल. अशी ७००० (अक्षरी सात हजार मात्र) झाडे लावण्याचे प्रयोजन हीच माझी कलाकृती, असे मी मानतो. शहरभर पुढल्या पाच वर्षांत ही झाडे लावण्याचे काम पूर्ण व्हावे आणि ‘डॉक्युमेण्टा’च्या पुढल्या खेपेला, (१९८७ सालचा आठवा ‘डॉक्युमेण्टा’) माझी कलाकृती संपूर्ण तयार असेल. कळावे’’

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art climate environment documenta environmental protection amy
First published on: 25-05-2024 at 04:31 IST