प्रदीप रावत

या सदरातील हा समारोप-लेख उत्क्रांतीच्या टीकाकारांचा समाचार घेणारा आणि ‘निव्वळ गणितामुळे विज्ञान कधीच उभे राहात नाही. तसे असते तर कुंडली मांडणारे जातक-गणित विज्ञान ठरले असते,’ हेही स्पष्टपणे सांगणारा..

Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti offer cash reward for predict correctly voting
कंगना, गडकरी, राहूलना मते किती मिळतील ते अचूक सांगा, २१ लाख रुपये बक्षिस मिळवा – अंनिसचे ज्योतिषांना आव्हान
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?

‘बोलाफुलाला गाठ पडणे..’ असा मराठीत वाक्प्रचार आहे. त्याची प्रचीती यावी, अशी घटना वर्षांअखेरीस या सदराला विराम देण्यापूर्वी घडली आहे. ‘उत्क्रांती विज्ञान: एक वैज्ञानिक अंधश्रद्धा’ असे शीर्षक असलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारने विज्ञान ग्रंथाचे पारितोषिक बहाल केले आहे. ही निवड आणि शिफारस करणारे तज्ज्ञ कोण हे अजून गुपित आहे. परंतु त्याबद्दलच्या प्रतिक्रिया मोठय़ा शोचनीय आहेत! ज्यांना विज्ञानाची फारशी ओळखदेख नाही त्यांना या पुस्तकातील युक्तिवाद हीदेखील एक वैज्ञानिक शक्यता आहे असा भाबडा भास होतो आहे. याउलट ज्यांना हा निव्वळ छद्म युक्तिवाद आहे आणि वैज्ञानिक मतभेदाचा नमुना नाही हे पक्के माहीत आहे, अशा अनेक विचारवंतांनी याबद्दल अळीमिळी गुपचिळी पवित्रा घेतला आहे.. त्याची कारणे तेच जाणोत. परंतु निदान चौकस जागरूक वाचकांच्या माहितीकरिता या छद्म विज्ञानाचा परिचय आणि समाचार या सदरातील या अखेरच्या लेखातून घेणे निकडीचे आहे.

वैज्ञानिक सत्याला पत्करणे ही सहजी पेलणारी आणि पचनी पडणारी गोष्ट नाही. एखादे प्रमेय/ कल्पना सुचणे, त्यासाठी उचित अशा व्याख्या, गृहीतके, अगोदर सिद्ध किंवा असिद्ध ठरलेली कल्पना किंवा उपपत्ती, नव्या उपपत्तीचा पडताळा घेणारे प्रयोग आणि पुरावे, ते अनुमान आणि निष्कर्षांसाठी हाताळण्याची तार्किक वाटचाल ही सगळी प्रक्रिया मोठी कष्टप्रद असते. त्याची स्वत:ची अशी एक शिस्त आहे! ती सहजी अंगवळणी नसते. अगोदरच्या प्रचलित समजुतीचे गडद सावट असते. नवा विचार अव्हेरण्याचा कल प्रबळ असतो. आजमितीलादेखील पृथ्वी गोल नसून पाटय़ासारखी सपाट आहे असा विश्वास बाळगणाऱ्या लोकांच्या संघटना आहेत.

डार्विनने उत्क्रांती सिद्धांत मांडला तेव्हा विश्व आणि जीवसृष्टीच्या निर्मिती आणि वाटचालीबद्दल पाश्चात्त्य जगात भलत्या सुलभ कल्पना होत्या. युरोप- अमेरिकेत ख्रिश्चन धर्माचे पायाभूत पुस्तक म्हणजे बायबल. त्याचे अगदी आरंभीचे प्रकरण ईश्वराने जग कसे निर्माण केले याच्या कथनानेच होते. या कथनानुसार जीवसृष्टीचे वयदेखील जेमतेम सहा-आठ हजार वर्षांचे असा रूढ समज होता. भूशास्त्र आणि भूगर्भशास्त्रामुळे पृथ्वीचे वय भलतेच मोठे म्हणजे अब्जावधी वर्षे निघाले! तिच्या पृष्ठभागांवरील थरात आढळणारे सांगाडे आणि जीवाश्म जीवसृष्टीचा निराळा इतिहास सांगू लागले. त्यातून हाती लागणाऱ्या पुराव्यांचा मागोवा घेत डार्विनने जीवसृष्टी कशी आणि कशामुळे बदलत गेली? वैविध्याने का बहरत गेली? त्यात काही सूत्र आढळते का? काही जीव तगतात तर काही नष्ट पावतात; त्याची कारणपरंपरा काय असावी? अशा अनेक संलग्न प्रश्नांचा मोठय़ा चिकाटीने वेध घेतला. नैसर्गिक निवड आणि जीव प्रकारांच्या वंशावळीने तगण्याचा संबंध जीव अवतरण्याच्या क्रमांमध्ये कसा दिसतो, हे त्याने मोठय़ा कल्पकपणाने विशद केले! तेव्हापासूनच देवाच्या निर्मितीवर- आखणीवर बेहद्द श्रद्धा असणाऱ्यांनी उत्क्रांती विचाराचा प्रतिवाद आरंभला आहे! त्यांचा या उत्क्रांती कल्पनेविरुद्धचा युक्तिवाद खरे तर अगदी सोपा आहे.

कोणतेही विज्ञान स्वत:ला परिपूर्ण मानत नाही. उलट अनुत्तरित प्रश्न हे तर विज्ञानाचे खरे जीवदायी कुरण! खुद्द डार्विनला मातापितांचे गुणावगुण आनुवंशिकतेने कसे वाहतात? किती प्रमाणात बदलतात? हे अनाकलनीय होते. पिढय़ान् पिढय़ांमध्ये होणाऱ्या बदलांचे सातत्य किती आणि फारकत करणारे वैविध्य किती, ते कसे उपजते, याची पुरेशी जाण डार्विनला नव्हतीच. मेंडेलच्या प्रयोगाने आणि त्याभोवती तरारून आलेल्या संख्याशास्त्रामुळे हे कोडे उलगडले! पण एक कोडे सुटले की पुढे आणखी वेगळी कोडी हात जोडून किंवा दंड थोपटून उभी राहतातच! अगोदरच्या धारणा आणि कल्पनांना मुरड घातली जाते. प्रयोग व निरीक्षणांशी सुसंगत फेरमांडणी केली जाते. या सगळय़ाचे प्रयोग-प्रमाण तर्क-प्रमाण यांनी घडलेले स्वयं-अनुशासन असते. कोणत्या गोष्टी सिद्ध? कोणत्या व्याख्या तात्पुरत्या? कोणती बाब अधिक काटेकोर पारखायला पाहिजे याची वहिवाट असते.

उदा. न्यूटनच्या सिद्धान्तातली काल-अवकाश कल्पना फेटाळतच सापेक्षता सिद्धांत उभा राहिला. र्सवकष सापेक्षतेच्या चौकटीत गुरुत्वाकर्षण विद्युतचुंबकीय इत्यादी शक्तींचे अति-लघुकण पातळीच्या अनिश्चिततेशी कसे लग्न लावायचे हा प्रश्न अनुत्तरित आहे. म्हणून भौतिकविज्ञान खोटे ठरते असे कोणी म्हणत नाही. कुणी तसे हट्टाने म्हणले तर त्याला वैज्ञानिक युक्तिवाद म्हणत नाहीत. उत्क्रांती विज्ञानात जाती-प्रजातींच्या मधल्या पुनरुत्पादन होण्याच्या हद्दी कशा ठरतात किंवा बदलतात? जनुकीय बदल जीवांच्या वैयक्तिक बदलापुरते सीमित असतात की त्यांच्या मोठय़ा समूहावर लागू असतात? किंवा पेशी नावाचा मूलभूत घटक कसा उद्भवला? कसा पैदा झाला? अशा किती तरी समस्यांबद्दल वैज्ञानिकांमध्ये वादप्रवाद आहेत.

पण हे सारे पचनी न पडणाऱ्या श्रद्धावंतांचे याविरुद्धचे तर्कट मोठे अजब आहे! त्या तर्कटाला ‘बुद्धिपुरस्सर योजना’ (इंग्रजीत ‘इंटेलिजन्ट डिझाईन’) असे संबोधले जाते! ‘जीवांची रचना क्लिष्ट आहे, म्हणजेच ती कुणी अतिशक्तिमान अतिकल्पक कारागिराखेरीज तयारच कशी होईल?’ पण हा निव्वळ प्रश्न आहे. समजा असा चलाख योजक आहे; तर त्याने ही योजना कशी साकारली? तशीच का साकारली? एका प्रकाराने साकारल्यावर अन्य प्रकाराने पुन्हा का साकारली? याचे उत्तर त्या युक्तिवादात मुदलातच नसते! तात्पर्य कुणी चलाख योजक आहे असे मानल्याने प्रश्नाचा उलगडा होत नाही! या अर्थाने बुद्धिपुरस्सर योजना हा मुळात युक्तिवादच नाही! विज्ञान पद्धती सोडून उत्तर शोधावे अशी शोध पद्धती मुदलातच नाही. उलटपक्षी ते अगदीच बेंगरुळ, अवसान गळालेले असे हताशा बुद्धीचे लक्षण आहे. काही उमज पडेना झाले की ‘देवाची करणी नारळात पाणी’ म्हणायचे! अशा पोकळ, निर्बुद्ध सांत्वनाला वैज्ञानिक तर सोडा, तार्किक युक्तिवाददेखील म्हणता येत नाही.

या छद्मी विज्ञानाची आणखी एक खासियत म्हणजे गणित आणि संख्याशास्त्राचा सजावटी वापर! बऱ्याच अजाण सामान्यांना गणिती समीकरण रूपाने नटविलेले लिखाण वैज्ञानिक वाटते! रॉबर्ट गोडार्डने प्रत्यक्ष रॉकेट उडवून दाखवीपर्यंत रॉकेट उडविणे कसे अशक्य आहे असे गणिताने सिद्ध करणारे शोधनिबंध प्रसिद्ध होतच होते! मूळ तर्क आणि अनुमान सदोष असेल तर गणिती चिन्हांचे घोंगडे त्यातली तार्किक गफलतीचा निरास करू शकत नाही.

‘एकाच वेळी इतक्या परस्परपूरक गोष्टी योजक असल्याखेरीज अपघाताने घडणारच नाहीत’ हे त्यांचे लाडके पालुपद असते. पण ‘एकाच वेळी’ या शब्दाचा अर्थ काही शे-वर्षे असला तर असे घडण्याची संभाव्यता शून्य नसते! फार काय शून्यवत् म्हणजे शून्य नव्हे हे सोपे गणिती सत्य त्यांना कळत नाही. खरे तर कळले तरी त्यांच्या हेतूपोटी वळत नाही. निव्वळ गणितामुळे विज्ञान कधीच उभे राहात नाही. तसे असते तर कुंडली मांडणारे जातक-गणित विज्ञान ठरले असते.

तरीही अशा तर्कहताश स्थितीला पर्यायी सिद्धांत म्हणावे अशी अनेक विज्ञानविरोधकांची मागणी असते. ‘‘अमेरिकेत उत्क्रांती सिद्धांत शिकवूच नये, शिकविला तर त्याच्या बरोबरीने चलाख योजना सिद्धांतासारखे युक्तिवाद विज्ञान म्हणून शिकवावे,’’ अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका अमेरिकेतील न्यायालयात केल्या गेल्या. पण न्यायालयांनी ‘बुद्धिपुरस्सर योजना’ हे विज्ञान नाही तर छद्मविज्ञान आहे असे सांगून ते फेटाळले!

अन्य प्रकारचे तर्कदोष

अनेक वैज्ञानिकदेखील या तर्कदोषांतून सुटत नाहीत. अशा कुणी अधिकारी व्यक्तींनी हताश ‘बुद्धिपुरस्सर योजने’चा पुरस्कार केला की त्याचा उदोउदो करणे हा उत्क्रांती विज्ञानाच्या टीकाकारांचा हातखंडा मार्ग असतो. ‘अमुक एक अधिकारी व्यक्तीदेखील असे म्हणते’ म्हणून (आणि केवळ म्हणून) एखादी उपपत्ती खरी वा खोटी ठरविणे हा उघड तर्कदुष्टपणा असतो. पण ज्ञान आणि माहितीत दुबळे असणाऱ्या सामान्याचे चित्त त्यामुळे हेलावते! अशा अनेक क्लृप्तय़ा वापरून उत्क्रांती विज्ञान कसे खोटे आहे आणि ‘बुद्धिपुरस्सर योजना’ ऊर्फ ईश्वरी किमया कशी सत्य आहे हे ठसविण्यासाठी अनेक धार्मिक आणि गडगंज आर्थिक पाठबळ असणाऱ्या धर्मवादी संस्था आहेत. उदा. ‘डिस्कव्हरी इन्स्टिटय़ूट’! या इन्स्टिटय़ूटचे उत्क्रांतीविरोधी विचारप्रसाराचे स्वतंत्र प्रशिक्षण व तंत्र-पुस्तक (मॅन्युअल) आहे. सामान्यांचा उत्क्रांती विज्ञानविरोधी बुद्धिभेद कसा करायचा, कोणते वाङ्मय वापरायचे याचे त्यात मोठे तपशीलवार वर्णन आहे.  करोना विषाणू त्याचे बदलते रूप आणि त्याला आळा घालणारी लस हे उत्क्रांती  विज्ञानाचे ‘वरदानदायी पुरावे’ आहेत. हे संकट कोसळले तेव्हा उत्क्रांतीच्या टीकाकारांना  फक्त हीनदीन हतबुद्धपणे बघण्यापलीकडे काही सुचले? की हीदेखील ‘देवाची करणी’?

(समाप्त)

लेखक माजी खासदार आणि ‘‘रावत’स नेचर अ‍ॅकॅडमीचे संस्थापक आहेत.

pradiprawat55@gmail.com