वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असल्याचे अनुच्छेद ५१ (क) मध्ये नमूद आहे. ‘‘माझ्या मुलांनो, आज माझ्यासोबत आहेत प्रसिद्ध शास्त्रज्ञ विक्रम साराभाई. त्यांना अवकाश संशोधनासाठी आपल्या चर्चची जागा आहे. माझ्या मुलांनो, विज्ञान सत्यशोधनाचा प्रयत्न करतं आणि त्यातून मानवी जगणं अधिक समृद्ध होतं. धर्माचं उन्नत रूप म्हणजे अध्यात्म. माझ्यासारखे धर्मगुरू सर्वशक्तिमान ईश्वराचा धावा करतात आणि शांतता निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न करतात. मानवी मन आणि शरीर या दोहोंची उन्नती साधणं हेच विज्ञान आणि अध्यात्म यांचं उद्दिष्ट आहे. थोडक्यात, मी आणि विक्रम एकच काम करतो आहोत. आपण आपलं हे चर्च, आपल्या ईश्वराचं घर, तुमचं माझं घर विज्ञानाच्या मोहिमेसाठी देऊ या ना?’’, थुंबामधल्या चर्चचे फादर (पुढे बिशप झालेले) पीटर बर्नार्ड परेरा यांनी रविवारच्या सभेत हा प्रश्न उपस्थित केला. भारताच्या पहिल्यावहिल्या अग्निबाण प्रक्षेपणासाठी डॉ. होमी भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई यांनी केरळमधील तिरुअनंतपुरमच्या जवळची थुंबा ही जागा निवडली होती. तिथे नेमके चर्च होते म्हणूनच फादरनी हे भाषण केले. काही क्षण चर्चमध्ये शांतता पसरली आणि समोर बसलेले ख्रिाश्चनधर्मीय लोक म्हणाले, ‘‘आमीन !’’ इतक्या सहजपणे पहिल्या अग्निबाण प्रक्षेपणासाठी जागा दिली गेली. हे आमच्या श्रद्धेचं ठिकाण आहे, म्हणून विरोध केला गेला नाही. अवकाशात भरारी घ्यायची तर जमिनीवरच्या लोकांकडे धर्म आणि विज्ञानाची जाण असावी लागते. किंवा, वैज्ञानिक दृष्टिकोन असावा लागतो. हेही वाचा >>> व्यक्तिवेध : लुइस लॅपम धर्म आणि विज्ञान यांच्यात अनेकदा झगडा झालेला आहे. पृथ्वी सपाट नसून गोल आहे आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे सत्य सांगण्यासाठी गॅलिलिओ आणि कोपर्निकसला जन्मठेप सहन करावी लागली; पण त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करत प्रश्न विचारला. हा वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे, हे पं. नेहरूंनी अनेकदा सांगितले. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात त्यांनी प्रश्न उपस्थित करणे, चिकित्सेने शोध घेणे या बाबींचे महत्त्व अधोरेखित केले. का, हा प्रश्न विचारत जाण्यातून हा वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो. त्या प्रश्नाचे विवेकी, तर्काधारित पद्धतीने उत्तर शोधणे गरजेचे असते. १९२१ साली भूमध्य समुद्रातून प्रवास करत असताना समुद्राचे पाणी निळे कसे काय आहे, असा प्रश्न सी.व्ही. रामन यांना पडला. ग्लासमधले पाणी निळे दिसत नाही मग समुद्राचे पाणी निळे कसे काय, असा प्रश्न त्यांना पडला. त्याचं उत्तर शोधताना प्रकाश विकिरण (स्कॅटरिंग) सिद्धांत रामन यांनी मांडला जो आज ‘रामन इफेक्ट’ नावाने ओळखला जातो. याचसाठी त्यांना नोबेल पुरस्कारही मिळाला. झाडावरून सफरचंद जमिनीवर पडते, हे गृहीतकासारखे सर्वांनी स्वीकारले होते. न्यूटनने त्यावर प्रश्न उपस्थित केला आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. समुद्राच्या पाण्याचा निळा रंग किंवा वस्तू जमिनीवर पडणे हे त्याआधी कुणी पाहिले नव्हते असे नाही; पण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करत त्याचा शोध घेतल्यावर त्यांना अनोखे सत्य गवसले. चार्वाकाने ‘प्रत्यक्ष प्रमाण’ अर्थात अनुभवातून येणाऱ्या सत्याचा, ज्याचा पडताळा घेता येऊ शकतो, अशा सत्याचा पुरस्कार केला. दररोजच्या जगण्यातील साध्या साध्या बाबींना प्रश्न विचारत राहिले की आपल्याला सत्य समजू शकते. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी याच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार केला. त्यामुळेच २० ऑगस्ट हा दिवस ‘वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले गेले. मुळात भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ५१ (क) मध्ये सांगितले आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. आपण हे कर्तव्य नीट पार पाडले तर आपल्याला नवी जीवनदृष्टी लाभू शकते.