ब्रिटनवर मनापासून प्रेम करणारे, एकोणिसाव्या शतकापासूनच्या ब्रिटिश इतिहासाचे अनेक तपशील योग्य वेळी सहज आठवून सांगणारे आणि तरीही ‘भारतमित्र’ म्हणूनच आपल्याकडे परिचित असणारे इयान जॅक आता नाहीत. ते मूळचे स्कॉटलंडचे, तिथेच वयाच्या विशीपर्यंत ते शिकले आणि त्याच प्रदेशातील पेसली या गावी २८ ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी लिहिलेल्या चार पुस्तकांपैकी तीन पुस्तकेही ब्रिटनबद्दलच. पण ३० ऑक्टोबरपासून त्यांची निधनवार्ता भारतात हळूहळू पसरू लागली, तेव्हा अनेक भारतीय लेखक, भारतातले अनेक साहित्यप्रेमी त्यांच्या जाण्याने हळहळले. असे काय होते त्यांच्यात?

भारताबद्दलचे कुतूहल तर अनेकांकडे असतेच (आपण आहोतच तसे!) पण इयान जॅक यांच्याकडे कुतूहलाचे प्राथमिक पापुद्रे खरवडून, देश-काळाच्या पलीकडला मानवी स्वभाव आणि मानवी जीवन पाहण्याचे कौशल्य होते. हे कौशल्य एरवी अभिजात कादंबरीकारांकडेही असते, पण इयान जॅक काही कादंबरीकार वगैरे नव्हते.. काल्पनिका लिहिण्याच्या वाटेला ते गेले नाहीत. ‘काळाचे बंधन ओलांडणारे’ अशा अर्थाने अभिजात मात्र ते होते. बिहारमधल्या (आता झारखंड) खाणींच्या प्रदेशात फिरताना, कोलकात्यात, दिल्लीत, एकंदर पूर्व, मध्य आणि उत्तर भारतात खेडोपाडी फिरताना आलेले अनेक अनुभव २०१३ सालच्या ‘मुफस्सिल जंक्शन’ या पुस्तकात त्यांनी नोंदवलेले आहेत. बंगाली महिलेशी १९७९ ते १९९२ या काळात त्यांनी केलेला संसार हे त्यांच्या भारतप्रेमाचे एक कारण, पण मुळात मानवी जीवनप्रवाहाकडे पाहण्याची असोशी आणि वसाहतकालीन ब्रिटिश इतिहासाची जाण हे भारताविषयी ओढ वाटण्याचे अन्य महत्त्वाचे पैलू. हे गुण ‘मुफस्सिल जंक्शन’मध्येही दिसतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पौगंडावस्थेत इयान जॅक यांना साहित्यिकच व्हायचे होते.. पण कशावर लिहायचे, काय लिहायचे कळत नव्हते. म्हणून म्हणे एकदा ते, स्कॉटलंडमधल्या कुठल्याशा रेल्वे स्थानकावर तासभर बसले आणि ४०० शब्द त्यांनी खरडले.. पण त्या वेळच्या त्यांच्या ‘वाचकां’ना, अनुभवसिद्ध वर्णनिका किंवा ‘रिपोर्ताज’ हाही साहित्यप्रकार असू शकतो हे माहीतच नसल्यामुळे.. ‘हँ: काहीतरी घडलं पाहिजे लिखाणात!’ असे सल्ले त्यांना मिळाले.. अनुभवसिद्ध वर्णनिकेचे इंगित खुद्द लेखकालाही माहीत नसल्याने ती वाटच सोडून तो ग्रंथपाल झाला.. पण काहीच महिने! लिखाणाच्या ऊर्मीने विशीतल्या इयान जॅक यांना ‘ग्लासगो हेराल्ड’ या वृत्तपत्रात काम मिळवून दिले. तिथून लंडनच्या ‘द टाइम्स’मध्ये जाईस्तोवर मात्र पस्तिशी गाठावी लागली. आणि या वृत्तपत्राच्या साप्ताहिक पुरवणीत लेख लिहिण्यासाठी भारतात येण्याचा योग आला तो चाळिशीनंतर! आणीबाणीत होणाऱ्या भूमिगत आंदोलनांचा कानोसा घेण्यासाठी आले होते ते.. पण ते आले आणि निवडणूक जाहीर झाली. मग ‘तिथेच राहा- काय होते पाहा’ असा साक्षात हॅरोल्ड इव्हान्स यांचा आदेश आला. इव्हान्स हे पुढे ‘गुड टाइम्स- बॅड टाइम्स’ या पत्रकारितेवरल्या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक म्हणून जगभर दोन पिढय़ांना माहीत झाले, पण ब्रिटनमध्ये आजही त्यांची ओळख ‘उत्कृष्ट संपादक’ अशीच आहे. भारताच्या कुठल्याही वैशिष्टय़ाचे वस्तूकरण न करता, निकोपपणे पाहण्याचा त्यांचा गुण ते ‘ग्रॅण्टा’चे संपादक (१९९५ ते २००७) असताना त्यांनी काढलेल्या ‘इंडिया :  गोल्डन ज्युबिली’ (१९९७) आणि पुढे २०१५ सालचा ‘इंडिया’ या दोन अंकांतील लेख-निवडीतूनही दिसला होता. त्यांच्या जाण्याने भारतीयांनी एक ‘अक्षर-दूत’ गमावला आहे.