आयुष्यात ज्ञान मिळवण्यासाठी आणि समाजाचं वाचन करण्यासाठी केलेली भ्रमंती याशिवाय अनुवादित, संपादित आणि स्वत: लिहिलेल्या ग्रंथांची ४४ हजार एवढी पृष्ठसंख्या हे राहुल सांकृत्यायन यांचं कार्य अगाध असंच आहे.

घराच्या भिंतीत जीव घुसमटतो, भवताल तुरुंग वाटू लागतो. तेव्हा दाही दिशा खुणावत असतात. स्थावर, जंगम अशा गोष्टींत अडकून पडण्यापेक्षा नवनवे मुलूख पायाखाली घालायचे, वेगवेगळ्या भाषा शिकायच्या, भिन्न संस्कृतीच्या माणसांमध्ये राहायचं, इतर भाषांमधील ज्ञान आत्मसात करायचं; भटकत राहायचं, तेही निरुद्देश नाही तर ज्ञानाच्या, जिज्ञासेच्या ओढीने. असं आयुष्य अनेकांना जगावंही वाटत असेल पण जागोजागी असलेले पिंजरे, सापळे आड येतात. असं मुक्त, ज्ञानमार्गी जगण्याच्या अनेकांच्या इच्छाही आयुष्याच्या रहाटगाडग्यात विरून जात असतील, जागच्या जागीच कोमेजून जात असतील.

एके ठिकाणी न थांबता प्रवाहासारखं वाहत राहावं, वाटा- वळणं घेत पुढे पुढे जात राहावं, सारी बंधने झुगारून मोकळा श्वास घ्यावा, नवनवी क्षितिजे धुंडाळत भटकत राहावं, नित्य नवे सूर्योदय, नवा सूर्यास्त, नवा परिसर, नवा भूगोल याचा शोध घेत राहावा. सूर्य उगवण्याची आणि मावळण्याची दिशा भलेही ठरलेली असेल पण या भटकंतीत परिसर तर बदललेला असतो. सगळ्या मर्यादांच्या रेषा पुसून टाकाव्यात. या भटकण्याचाही एक धर्म आहेच. राहुल सांकृत्यायन यांनी त्याला ‘घुमक्कड धर्म’ असं नाव दिलं आहे. असा धर्म जो आकाशासारखा विराट आणि समुद्रासारखा अथांग. एकसुरी आयुष्यात दमून जाणारेच बहुतेक जण असतात पण एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं जगणारं असं एखादंच उदाहरण असतं. अशा भटकण्याला साधनं हवीच असतात पण त्याहूनही महत्त्वाची असते ती जबर अशी आकांक्षा… या भटकण्याची प्रेरणा कोणती? पाठ्यपुस्तकात एक शेर वाचण्यात येतो.

सैर कर दुनिया की,

गाफील जिंदगानी फिर कहाँ,

जिंदगी गर कुछ रही, तो नौजवानी फिर कहाँ

वेड्या जीवा, दुनियेत भटकंती करायलाच हवी. पुन्हा आयुष्य मिळणार नाही आणि मिळालंच तरी हातून निसटलेलं तारुण्य पुन्हा कुठून आणणार? आणि मग सुरू होतो ज्ञानाच्या दिशेनं एक अथक असा प्रवास. काश्मीर, लडाख, नेपाळ, श्रीलंका, तिबेट, जपान, कोरिया, रशिया अशा कितीतरी ठिकाणी. प्रवासही साधा सोपा नाही. काही ठिकाणी जीवावर बेतणारा, दुर्गम अशा भागातून अडखळत्या रस्त्यांवरून दमवणारा. या गोष्टी ज्ञान मिळवण्याच्या अफाट ऊर्मीशिवाय शक्यच नाही.

कथात्म साहित्यापासून ते इतिहास, धर्मचिंतन यावर भाष्य करणारे तत्त्वचिंतक, समाजसुधारक, शेतकऱ्यांचे नेते, महापंडित आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचे भाष्यकार अशा अनेक रूपांत राहुल सांकृत्यायन यांचं व्यक्तिमत्त्व विभागलेलं होतं. उत्तर प्रदेशातल्या आजमगड जिल्ह्यातल्या एका गावात जन्मलेल्या केदारनाथ पांडे या नावाच्या मुलाचा महापंडित राहुल सांकृत्यायन होण्यापर्यंतचा प्रवाससुद्धा तितकाच थक्क करणारा आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी घरातून कलकत्त्याला पळून गेलेला मुलगा. ज्याच्या खिशात त्या काळचे फक्त आठ आणे होते. या प्रसंगाने दिलं काय? तर एक आत्मभान. स्वत:च्या बळावर कुठेही भटकू शकतो, नवा मुलूख पायाखाली घालू शकतो असा जबर आत्मविश्वास.

बिहारमधल्या एका मठात स्वदेशीचं व्रत स्वीकारून वैष्णव साधू होण्यापासून सुरू झालेला प्रवास पुढे आर्य समाजी प्रचारक, बुंदेलखंड भागात घालवलेला काही काळ, पुढे शेतकऱ्यांच्या आंदोलनांमधला सक्रिय सहभाग, सव्वा वर्षांची तिबेट यात्रा, तिथून खेचरांवर आणलेले हस्तलिखितांचे बाड, त्यानंतरचा युरोपचा प्रवास असं सगळंच आयुष्य थरारक आहे. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात वैविध्यपूर्ण अशा अनुभूतीचा, सखोल ज्ञानाचा, व्यापक जीवनदृष्टीचा प्रत्यय येतोच.

एकीकडे ही ज्ञानमार्गाची वाटचाल आणि दुसरीकडे थेट समाजजीवनाशी विविध चळवळी, आंदोलने यांच्या माध्यमातून आलेला संपर्क असं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं अद्वितीय रसायन केवळ अपवादभूत मानावं लागतं. भारतीय भाषांसह फ्रेंच, इंग्रजी, रशियन अशा भाषांचा त्यांचा अभ्यास; अरबी, पर्शियन, तिबेटी या भाषांचं त्यांना असलेलं उत्तम ज्ञान यातूनच झालेली वेगवेगळ्या ग्रंथांची निर्मिती असं सगळं पाहिलं म्हणजे एका आयुष्यात ही माणसं किती आयुष्य जगली या कल्पनेनेही आपण विस्मयचकित होऊन जातो.

‘वोल्गा से गंगा’सारखं रोचक पुस्तक एकाच वेळी तुम्हाला धर्म, संस्कृती, इतिहास अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत फिरवून आणतं. २० प्रकरणांचं हे पुस्तक हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं उत्खनन करत काळाच्या टप्प्यांचा वेध घेतं. आर्यांपासून ते मुघल सत्ता, इंग्रजी आमदानीचा काळ आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा संघर्ष. एकाच पुस्तकात एवढे सगळे पैलू, केवळ इतिहासाचे टप्पे उलगडणं एवढाच या पुस्तकाचा हेतू नाही. त्या काळातल्या लोकांची स्वप्नं, विचार, धारणा या गोष्टी वाचकांसमोर येत राहतात. साम्राज्यांचा उदय कसा होतो आणि ती लयाला कशी जातात, विचारधारा कशा जन्माला येतात, माणूस काळानुरूप कसा बदलत जातो? बदलांना तो सामोरं कसं जातो याचा शोध म्हणूनही या पुस्तकाकडे पाहिलं जातं.

पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणात एक नवी संस्कृती, विचारप्रणाली यांचा परिचय वाचकांना होत राहतो. ख्रिास्तपूर्व काळापासून ते विसाव्या शतकाच्या आरंभीची काही दशकं असा विशाल पट घेऊन मानवी समाजाच्या प्रगतीचं ललित कथांच्या अंगाने त्यांनी केलेलं चित्रण हे विलक्षण लेखनसामर्थ्याचं उदाहरण आहे. माणूस आज जिथं आहे तिथं पोहोचण्यापर्यंतचा त्याचा प्रवास, संघर्ष आणि मानवी समाजाच्या प्रगतीचं तात्त्विक विवेचन या अंगाने हा ग्रंथ आजही तेवढाच महत्त्वाचा मानला जातो.

भूतकाळाचं उत्खनन करत असताना हे पुस्तक वाचकाला नवं काही देऊन जातं हे त्याचं यश. ‘मेरी जीवनयात्रा’ हे त्यांच्या आत्मकथेला असलेलं नाव अन्वर्थक असंच आहे. एके ठिकाणी ते लिहितात, ‘‘व्यक्तिपूजेविरुद्ध विद्रोह करताना माझं मन अगदी त्याच लहान मुलासारखं खोडकर असतं, जे मातीची भांडी पाहिल्यानंतर हातात दगड घेऊन त्यांना फोडू इच्छितं. समाजातलं ढोंग मला चीड आणतं. मला वाटतं एक तर हे ढोंग शिल्लक राहील किंवा समाज तरी…’’

राहुल सांकृत्यायन यांनी आपल्या जीवनयात्रेत जे वर्णन केलंय ते निसर्गापेक्षा माणसांचं आहे. माणूस हाच त्यांच्या शोधाचा, आकर्षणाचा आणि कुतूहलाचा विषय आहे. ही जीवनयात्रा केवळ घटना, प्रसंगांची जंत्री रचत नाही तर त्यातून एक कथात्म अशी कलावस्तू साकारते. हे आयुष्य सरळ रेषेतलं नाही. असंख्य चढउतार या आयुष्यात आहेत. एवढ्या विपुल ग्रंथसंपदेतले काही ग्रंथ कुठे कुठे लिहिले असतील, कोणत्या भूमीवर लिहिले असतील त्याच्या कथाही उल्लेखनीय आहेत. १९२३ या वर्षी पाटणा इथं त्यांनी एक जहाल भाषण केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध वॉरंट निघालं, पण अटकेआधीच ते नेपाळला निघून गेले होते. त्यांनी तिथं दीड वर्ष अध्ययन केलं. त्यानंतर ते इथं परत आले तेव्हा त्यांना वॉरंटची बातमी समजली. ते स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाले. त्यांना दोन वर्षांची शिक्षा दिली गेली. हजारीबाग तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. याच कारावासात त्यांनी ‘बाईसवी सदी’ हे पुस्तक पूर्ण केलं.

१९३९ च्या मार्च महिन्यात राहुल सांकृत्यायन आणि नागार्जुन हे एका शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करत असताना त्यांना अटक करण्यात आली. छपरा इथं त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. नागार्जुन यांचा हा पहिलाच अनुभव होता. राहुल सांकृत्यायन हे तोपर्यंत अनेकदा तुरुंगातून जाऊन आलेले होते. तुरुंगातल्या वेळेचा उपयोग ते आपल्या लिहिण्यासाठी करत. बऱ्याचदा ते लिहिण्याऐवजी डिक्टेशन द्यायचे. याच तुरुंगवासाच्या काळात त्यांनी ‘जीने के लिए’ ही कादंबरी लिहिली. नागार्जुन यांना कादंबरी लेखनाची प्रेरणा ही त्यातूनच मिळाली अशीही एक नोंद आहे.

आयुष्यात ज्ञान मिळवण्यासाठी आणि समाजाचं वाचन करण्यासाठी केलेली भ्रमंती याशिवाय अनुवादित, संपादित आणि स्वत: लिहिलेल्या ग्रंथांची ४४ हजार एवढी पृष्ठसंख्या हे कार्य अगाध असंच आहे. जेव्हा जेव्हा चाकोरीतल्या रूढ जगण्याचा कंटाळा येतो, श्वास गुदमरू लागतो तेव्हा तेव्हा चहूदिशा हाकारू लागतात, नवा परिसर खुणावू लागतो, पावलं उंबरठा ओलांडण्यासाठी अधीर झालेली असतात, डोळ्यातलं कुतूहल जागं झालेलं असतं, ‘जिंदगानी फिर कहाँ’ असं म्हणण्यातली बेफिकिरी आणि अर्थपूर्णताही नव्याने उमगू लागते…

aasaramlomte@gmail.com