हादरे देणारे सुरुंग अनंतमूर्ती यांच्या लेखनात जागोजागी पेरलेले आहेत. एखादा सामाजिक प्रश्न साहित्यातून मांडणे एवढेच त्यांच्या लेखनाचे प्रयोजन नाही, तर त्याकडे मानवीय दृष्टिकोनातून पाहण्याची त्यांची स्वत:ची विशेष अशी नजर आहे आणि तिला करुणेचा स्पर्श आहे.

‘‘लेखकानं स्वत:ला ‘सेलिब्रिटी’ होण्यापासून वाचवलं पाहिजे अन्यथा तो केवळ आपल्या चाहत्यांच्या आशा- आकांक्षांचा गुलाम होऊन जाईल. जर प्रत्येक नव्या पुस्तकागणिक आम्ही आमचे काही चाहते गमावले नाहीत, तर लेखक म्हणून आमच्या असण्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे असं मानावं लागेल’’ हे डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांचं अवतरण अनेक ठिकाणी अधोरेखित केलं जातं. तसं हे विधान सरळसोट नाही. लेखक म्हणून गोंजारणारं नाही. लिहिणं ही काहीतरी प्रातिभ अशी भव्यदिव्य गोष्ट आहे असं म्हणत स्वत:च्या लेखनाबद्दल गौरवीकरण करणारं नाही. लिहिणं ही गोष्ट लौकिकाशी जोडण्याचा धोरणीपणा यात नाही. वाचकांचा अनुनय करण्यापेक्षा त्यांच्या धारणांना धक्का देणं या अवतरणात अनुस्यूत आहे. आपले चाहते वाढवण्याच्या नादात भलेभले लिहिणारे ‘आपुली आपण, करा भलावण’ या पद्धतीने सर्व प्रकारची तंत्रे अवलंबतात तेव्हा तर हे अवतरण अगदीच वेगळं वाटण्याची शक्यता आहे.

कन्नड कथा- कादंबरीकार यू. आर. अनंतमूर्ती यांनी त्यांच्या कथा- कादंबऱ्यांमधून सातत्याने हेच धक्का देण्याचं काम केलं. त्यांच्या कथात्म लेखनात केवळ वर्णन नसते. घटना- प्रसंगांची मांडामांड नसते. दृश्य अशा वास्तवाचे पापुद्रे सोलत थेट गाभ्यापर्यंत जाण्याचा शोध घेणं आणि परंपरेने जी पुटं धारण केली आहेत त्यांना खरवडून काढणं या गोष्टी त्यांच्या लेखनात वारंवार दिसून येतात. या लेखनात रूढ अशी चौकट मोडण्याचा बंडखोरपणा आहे. धर्म, जात, लिंग या आधारे मानली जाणारी श्रेष्ठ, कनिष्ठता धुडकावण्याचंच काम त्यांनी लेखनातून केलं. सर्व प्रकारच्या विषमतेविरुद्ध सुरुंग पेरणारी आशयसूत्रं हेच त्यांच्या लेखनातलं वेगळेपण आहे. कन्नड भाषेत कुवेंपू म्हणजेच के. व्ही. पुटप्पा आणि शिवराम कारंत यांनी जी वाट निर्माण केली त्याच वाटेवर आधुनिकतेचा संदर्भ देत अनंतमूर्ती यांनी स्वत:ची नाममुद्रा कोरली.

‘संस्कार’ ही त्यांची कादंबरी १९६५ साली पहिल्यांदा कन्नडमध्ये प्रसिद्ध झाली आणि तिने प्रस्थापित वाङ्मयविश्वाला मोठा हादरा दिला. या कादंबरीचे भारतीय तसेच विदेशी भाषांमध्येही अनुवाद झाले. दक्षिण भारतातील एका गावात या कादंबरीचं कथानक घडतं. कादंबरीत प्राणेशाचार्य हे पात्र आदर्श आचरणाचे उदाहरण म्हणून आहे आणि नारायणप्पा हे कथित धर्मद्रोही अशा विचारांचे. अर्थात दोघेही एकाच व्यवस्थेतून निपजले आहेत मात्र परस्परविरोधी तत्त्वांच्या या व्यक्तिरेखांच्या संघर्षातून अनंतमूर्ती ‘संस्कार’ या कादंबरीला वेगळं परिमाण मिळवून देतात. धर्म काय आहे, धर्मशास्त्रे काय सांगतात, प्रत्यक्षातला वर्तन व्यवहार काय असतो, रुढी- परंपरांना व्यक्तीच्या स्वातंत्र्यात काय स्थान असतं असे अनेक प्रश्न या कादंबरीत चर्चिले जातात. गिरीश कर्नाड यांची भूमिका असलेला ‘संस्कार’ याच नावाचा सिनेमाही या कादंबरीवर बेतलेला आहे.

‘भारतीपूर’ ही अनंतमूर्ती यांची दुसरी कादंबरी. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेलेला जगन्नाथ ‘भारतीपूर’ या आपल्या मूळ गावी परततो. नवी जाणीव घेऊन आलेल्या जगन्नाथला आपल्या परिसराशी जोडून घ्यायचं आहे. सुधारणावादी दृष्टिकोनातून त्याला तिथे काही बदल घडवायचे आहेत. मात्र त्याच्या या बंडाच्या पवित्र्याने तिथल्या स्थितिशील जीवनात मोठी खळबळ उडते. आपल्या श्रद्धांवर आघात होत असल्याचे तिथल्या लोकांना वाटू लागते. पण या परिसरातले सगळे वातावरण ढवळून काढण्यात जगन्नाथला काही प्रमाणात यश येते. इथल्या जीवनात काहीच घडत नाही, सर्व काही गोठून गेलं आहे, इथे काहीच प्रवाहित होत नसल्याने आपण सडतो आहोत. इथल्या माणसांना नवे नवे मार्ग दाखवता येतील. या भागातल्या शेतीत नवे काही करता येईल. सामाजिकदृष्ट्या तळाशी असलेल्या माणसांच्या मदतीनेच हे काम होईल. त्यांना या प्रक्रियेपासून बाजूला ठेवता येणार नाही. त्यासाठी समाजाच्या प्रस्थापित धारणांना धक्का दिल्याशिवाय पर्याय नाही, या ध्येयानं जगन्नाथ झपाटला आहे.

अनंतमूर्ती यांच्या लेखनात हादरे देणारे सुरुंग जागोजागी पेरलेले आहेत हे त्यांच्या ‘संस्कार’, ‘भारतीपूर’ या कादंबऱ्या आणि ‘घटश्राद्ध’सारख्या कथेतून दिसून येते. ‘घटश्राद्ध’ या कथेवरही सिनेमा तयार झाला आहे. एखाद्या सामाजिक प्रश्नाला साहित्यातून मांडणे एवढेच त्यांच्या लेखनाचे प्रयोजन नाही तर त्याकडे मानवीय दृष्टिकोनातून पाहण्याची त्यांची स्वत:ची विशेष अशी नजर आहे आणि तिला करुणेचा स्पर्श आहे. ‘अवस्था’ ही त्यांची तिसरी कादंबरी. या कादंबरीत राजकारण, चळवळ, आंदोलन असं सगळं काही आहे. तत्त्व आणि व्यवहार यातल्या गफलती आहेत. पण जागोजागी जाणवतात ते लखलखीत असे विचार. जे वाचकाला स्तिमित करतात. एका पत्रात कादंबरीचा नायक कृष्णाप्पा लिहितो, आपल्या उत्कटतेचा गळा घोटण्यासाठी आत आणि बाहेर जी षड्यंत्रं रचली जातात त्यामुळे आपल्याला सदैव सजग राहावं लागतं. आपलं असं सावधपण काही भल्या माणसांना अहंकारही वाटू शकतो पण तसं असणं आवश्यक आहे. मोहाला बळी न पडणारा आपला टोकदार निग्रह हा एका अर्थाने अशा प्रकारची सावधगिरीच आहे.

‘संस्कार’, ‘भारतीपूर’, ‘अवस्थे’ (मराठीतून अवस्था) या त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये एक समान सूत्र आहे. अनंतमूर्ती यांच्या लेखनातला विचार समजून घेण्यासाठी ही कादंबरीत्रयी महत्त्वाची आहे. तशा या कादंबऱ्या भिन्न नाहीतच. जणू एकाच कलाकृतीचे तीन टप्पे आहेत. समाजवास्तव आणि धर्मचिकित्सेचा विचार त्यात आहे. सरधोपट असे चित्रण करण्यापेक्षा त्यांच्यातला समाजशास्त्रज्ञ विविध विचारव्यूहांचा संघर्ष यानिमित्ताने मांडतो. हा संघर्ष समजून घेताना वाचकालाही कमालीचं सजग राहावं लागतं. त्यांच्या कादंबऱ्यात प्रचंड असा कालपट नसतो किंवा बृहत् आराखडा असलेलं कथानक नसतं. महाकादंबरीसारख्या मोठा कॅनव्हास असलेल्या या कादंबऱ्या नाहीत.

पृष्ठसंख्येने त्या आटोपशीर आहेत, पण त्यातली गुंतागुंत आणि तीक्ष्ण अशी बौद्धिकता वेगवेगळ्या विचारप्रवाहांमध्ये असणाऱ्या संघर्षाचे दर्शन घडवते. ‘भव’ किंवा ‘बारा’ या त्यांच्या लघुकादंबऱ्याही आकाराने अतिशय छोट्या पण संपन्न असा आशय सामावून घेणाऱ्या आहेत. ‘बारा’ ही तर जणू एक कथाच. आपल्याकडे दुष्काळावरच्या अनेक कथा, कादंबऱ्या वाचायला मिळतात. पण ‘बारा’सारखी दीर्घकथा पूर्णपणे वेगळी आहे. तिला खास अनंतमूर्ती यांच्या दृष्टिकोनाचा स्पर्श झालेला आहे.

अवघ्या ६५ पानांची ही दीर्घकथा. जिल्हाधिकारी असलेला सतीश हा तिचा नायक. जिल्ह्यात दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळाची पाहणी करत फिरत असताना तो एका वृद्ध स्त्रीला पाणी मागतो पण ती त्याला पाणी देत नाही. अन्नधान्य वितरण केंद्रावर त्याला मोठमोठ्या रांगा दिसतात. या रांगा दिसण्याचे कारण म्हणजे आपण त्या रांगेत नाही हेही एक आहे असं त्याला वाटतं. ही दाहकता पाहून तो घरी हताश होऊन परततो. टबमध्ये अंगावर पाणी घेत पडून राहतो. बाथरूममधून बाहेर जाणाऱ्या सांडपाण्यावर कसं गवत उगवलंय आणि फुलझाडे बहरली आहेत असं समाधान त्याच्या बायकोला वाटतं हे पुन्हा आणखीच वेगळं.

सतीशला बाहेर जाणवणाऱ्या दुष्काळाच्या झळा आणि घरी परतल्यानंतर डोळ्यात सलणारं, बंगल्याला सुशोभित करणारं मुगलशैलीतलं संगमरवरी काम. अशा एकात एक कितीतरी विसंगती या कथानकात दिसून येतात. अनंतमूर्ती कथेचं जे शिल्प निर्माण करतात त्यातले बारकावे वाचकाला असे जाणवत राहतात. बेसावध राहून त्यांचं लेखन वाचताच येत नाही. त्यांचं सर्वच लेखन आपण वाचतो तेव्हा या लेखनात विद्रोहाची जाणीव ठासून भरली आहे असं वाटतं. पण तो विद्रोह आक्रस्ताळा, कर्कश, एकसुरी नाही. जीर्ण आणि रुढीबाज गोष्टींना नकार देत असतानाच नवं उभं करण्याची क्षमता बाळगून असलेला कणखरपणा त्यात आहे. थोडक्यात ही लिपी संयत अशा विद्रोहाची आहे.

लेखक साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

aasaramlomte @gmail.com