अविभाजित आसामचं भिन्नतापूर्ण लोकजीवन, लोककथा, लोकलढे हे बीरेंद्र कुमार यांच्या कादंबऱ्यांत येतं. सामाजिक चळवळीतल्या सहभागाचे, ध्येयनिष्ठ पत्रकारितेचे संस्कार असलेल्या या लेखकाचं ‘असमाधान’, त्याची हुरहुर हीच मग सत्याला सुंदर करण्याचा मार्ग दाखवते…
तांगखुल नागा जमातीचे प्रभावक्षेत्र असलेला अविभाजित आसाम मधला एक भूभाग. त्यातलेच उखरुल नावाचे एक गाव. दुर्गम अशा भागातली भारतातली ही एक जमात. त्या काळात उखरुल परिसराचा उर्वरित भारताशी फारसा संपर्क नव्हता. दळणवळणाची कोणतीही साधने नव्हती. मणिपूर संस्थानची राजधानी इम्फाळ आणि उखरुल यांना जोडणारा केवळ एकच रस्ता होता. त्याचीही अवस्था वाईटच होती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी मित्रराष्ट्रांच्या सैन्याने बांधलेला हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता. इम्फाळच्या गाजलेल्या लढाईमुळे उखरुल आणि आसपासच्या डोंगराळ भूभागावर जे आघात केले त्याच्या खाणाखुणा अद्यापही कायम होत्या. लोकांनी शारीरिक आणि मानसिकही वेदना भोगल्या होत्या. १९५० ते ६० च्या दशकात शेवटच्या दोन वर्षांत बीरेंद्र कुमार भट्टाचार्य मणिपूर संस्थानातल्या एका हायस्कुलात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्याच काळात त्यांनी तेथील काही नागा मित्र जोडले. एकेकाळचे मणिपूरचे मुख्यमंत्री रिशांग केइशांग आणि रामयो या नावाचे एक नागा पुढारी यांच्याशी बीरेंद्र कुमार यांचे संबंध होते. त्यांच्यामुळेच नागा लोकांच्या या भूमीत त्यांना प्रवेश मिळवता आला. बीरेंद्र कुमार नागा वस्तीतल्या अगदी अंतर्गत भागातही हिंडले. त्यांच्या सण- उत्सवांत भाग घेतला. तिथल्या जीवनाशी सर्वार्थाने एकरूप झाले. तांगखुल भागातल्या नागा स्त्री-पुरुषांचं जीवन त्यांनी जवळून बघितलं. हे लोक त्यावेळी धुमसत्या कालखंडाला सामोरे जात होते. त्यांच्या असंख्य कहाण्यांच्या आधारेच बीरेंद्र कुमार यांची ‘इयारुइंगम’ ही कादंबरी आकाराला आली. ‘इयारुइंगम’ म्हणजे जनतेचे राज्य. मराठीत शांता शेळके यांनी ‘लोकांचे राज्य’ या नावाने या कादंबरीचा अनुवाद केला आहे.
या कादंबरीच्या निमित्ताने त्यांनी असे नमूद केले आहे की जेव्हा नागा समूहात राहात होतो, त्यादरम्यान मी त्यांच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न केला. एक कवी आणि कथाकार म्हणून त्यांच्या जीवनात बारकाईने डोकावण्याचे काम केले. माझ्यासाठी हे काम एखाद्या कातळकड्याला हलवण्यासारखे होते. जणू सगळी शक्ती पणाला लावूनही तिळाएवढा सुद्धा न हलणारा कातळकडा. पण मन मात्र कशाने तरी आकर्षित झाले होते. हे आकर्षण वरवरचं नव्हते. मानवी जीवनाचा शोध घेण्याची लालसा त्यात होती. एका भिन्न परिवेशात गेल्यानंतर तिथले प्रसंग आणि प्रश्नही बदललेले असतात पण जीवनाच्या सार्थकतेशी जोडलेले शाश्वत प्रश्न मात्र तेच राहतात. सर्जक मनाला याच गोष्टी शोध घ्यायला भाग पाडतात.
‘इयारुइंगम’ही कादंबरी लिहिण्यापूर्वीची बीरेंद्र कुमार यांची मन:स्थिती ही अशी होती. भारतीय भाषांमध्ये आपापला भूभाग तळहाताच्या रेषांसारखा परिचित असणारे अनेक कादंबरीकार आहेत. त्यातलेच बीरेंद्र कुमार हे प्रख्यात आसामी कादंबरीकार.
‘मृत्युंजय’ ही त्यांची आणखी एक महत्त्वाची कादंबरी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाची पार्श्वभूमी असलेली आहे. आसाममध्ये या आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसाचारात होरपळत असलेली सामाजिक परिस्थिती हा या कादंबरीचा विषय आहे. बीरेंद्र कुमार यांनी ही कादंबरी लिहिली ती या उठावाच्या तब्बल अडीच दशकानंतर. तोवर आंदोलनाची त्या वेळची धग शांत झाली होती पण त्या आंदोलनाच्या आत्म्याचा श्वास जणू अजूनही चालूच होता. उठाव करणाऱ्या बंडखोर जनतेचे मानस या कादंबरीत चित्रित करण्यात आले आहे. महात्मा गांधींनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाला सोडून हिंसेचा मार्ग कसा स्वीकारायचा असा त्यावेळी समाजातल्या भोळ्या- भाबड्या लोकांच्या मनात पडलेला प्रश्न हाच या कादंबरीचा कळीचा मुद्दा. त्याहूनही आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एवढी हिंसा आणि रक्तपात झाल्यानंतरचं जीवन हे खरोखरच मानवी जीवन असेल काय ?
‘पाखी घोडा’ या त्यांच्या कादंबरीची पार्श्वभूमीसुद्धा आसामचीच. आधीचा अविभाजित आसाम आणि त्यानंतरचा काही कालखंड. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडापासून ते भारत स्वतंत्र होण्याचा काळ असा या कादंबरीचा पट आहे. ‘एक राजकुमार पंख असलेल्या घोड्यावर बसून आपल्या प्रेयसीसाठी असंख्य अडथळे पार करत निघाला…’ ही कल्पना एका आसामी लोककथेतली. ‘पाखी घोडा’ ही एका आदर्शवादाचे सूचन करणारी कादंबरी आहे. ‘दिक् आणि काल हे जणू माझ्या पाठीशी भुतासारखे लागलेले असतात. मी अजूनही आणखी एका निवेदनशैलीच्या शोधात आहे, जी मला अधिक अनुकूल असेल. मला आशा आहे की पुढची कादंबरी लिहिताना मी त्यात यशस्वी होईन. ही कादंबरी लिहिताना भारत मला जेवढा उमगला होता आता त्याहून तो अधिक आकळला आहे’ असं त्यांनी या स्वत:च्या कादंबरीबद्दल म्हटलं आहे.
प्रत्यक्ष सामाजिक चळवळींमध्ये असलेला सहभाग, अगदी तरुण वयापासून पत्रकारितेशी असलेला संबंध, वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये, वृत्तपत्रात केलेली नोकरी, महात्मा गांधी, राम मनोहर लोहिया यांचा वैचारिक प्रभाव असे बीरेंद्र कुमार भट्टाचार्य यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. ‘इयारुइंगम’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तर, ‘मृत्युंजय’ या कादंबरीला ज्ञानपीठ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. वयाच्या अवघ्या ५६व्या वर्षी ते ज्ञानपीठाने सन्मानित झाले होते.
निर्मितीच्या अनुषंगाने त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेले चिंतन हे खरोखरच एका भारतीय लेखकाच्या लेखनाचे मर्म सांगणारे आहे. ‘मी का लिहितो, कोणासाठी लिहितो, लिहिण्यासारखं खरंच माझ्याजवळ काही आहे का असे प्रश्न माझ्या लेखणीला कंपित करतात. अर्थात हे खरंच की, लिहिण्यासाठी कुठलं ना कुठलं प्रयोजन असतंच असा माझा अनुभव आहे. अंत:करणातल्या सत्याला सुंदरता प्रदान करून हे सत्य बाह्य जगतासमोर सादर करण्याच्या कामी मी आजही स्वत:ला समर्थ मानत नाही. या अनुभूतीतूनच एक असमाधानाची भावना माझ्या मनाला हळवेपण देते आणि मी स्वत:ला असहाय समजू लागतो; पण त्याचबरोबर मी ज्या लोकांसाठी लिहितो त्या लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी माझं मन आतुर झालेलं असतं. जेव्हा त्या लोकांची प्रतिक्रिया मी जाणून घेईन तेव्हा मला कळेल की सत्याला सुंदरता प्रदान करण्याची शक्ती माझ्यात किती आहे. आता तरी असं वाटतं की ती शक्ती माझ्यात नाहीय…’ या त्यांच्या विवेचनात कोणताही अभिनिवेश नसलेली सहजता आहे.
हीच सहजता त्यांच्या अनेक विधानांमधून दिसून येते. ‘माझ्या प्रमुख कादंबऱ्यांमधल्या ज्या मुख्य व्यक्तिरेखा आहेत त्यांत एकही अशी नसेल की त्या व्यक्तिरेखेच्या अंतर्मनात एका सुंदर आणि सुखी समाजाच्या परिकल्पनेचा अंकुर नसेल.’ किंवा ‘कधी कधी असं होतं की अनेक पात्रं वर्षानुवर्ष जणू अर्धमिटल्या डोळ्यांनी चेतनेच्या अवकाशात पडून असतात पण सृजनप्रक्रियेच्या वेळी त्यातलंच कोणतंही पात्र खाडकन जागं होतं आणि कथानकात शिरून आपापली भूमिका धारण करू लागतं. ‘इयारुइंगम’, ‘प्रतिपद’, ‘मृत्युंजय’ या कादंबऱ्या लिहिताना मी त्याचा अनुभव घेतला आहे’.
बीरेंद्र कुमार यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांमुळे अविभाजित आसाम आणि पुढचाही काही काळ आपल्याला समजून घेता येतो. नागा जमातीसह तिथले लोकजीवन समजून घेण्यासाठी त्यांच्या कादंबऱ्या उपयुक्त ठरतात. अर्थात ते समाज वास्तवाचे जसेच्या तसे चित्रण करत नाहीत. त्यांच्या कादंबरीत विचार, भावना या गोष्टींनाही तेवढेच महत्त्व असते. भाषा अतिशय साधी, प्रसंगी ओबडधोबड. त्यातूनच त्यांच्या कादंबऱ्या नैसर्गिक आकार घेतात. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे ‘वास्तव हा एक भ्रामक शब्द आहे. माझ्या कादंबरीत वास्तवाची निर्मिती असते, प्रतिकृती नाही’. ‘लेखकात एक समीक्षक दडलेला असतोच. एखाद्या साहित्यकृतीवर जेव्हा मी काम करू लागतो तेव्हा माझ्यातली अतिरेकी समीक्षादृष्टी उत्स्फूर्ततेत अडथळे निर्माण करू लागते,’ असेही एक निरीक्षण त्यांनी नोंदवून ठेवले आहे. अर्थात ‘पाखी घोडा’सारखी कादंबरी लिहिताना मात्र असा अनुभव आला नाही असे ते सांगतात.
निर्मितीच्या बुडाशी असलेले असमाधान हे अनेक लेखकांनी वेगवेगळ्या प्रकारे सांगितले आहे. खुद्द बीरेंद्र कुमार भट्टाचार्य यांना जेव्हा तुमच्या मते तुमची श्रेष्ठ कादंबरी कोणती असा प्रश्न एका मुलाखतीत विचारला गेला तेव्हा ते म्हणाले होते, ‘प्रत्येक साहित्यकृतीबाबत आपापला दृष्टिकोन भिन्न असतो आणि श्रेष्ठतेचे निकषही प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. माझ्या दृष्टीने श्रेष्ठ कादंबरी ती, जी मला अजून लिहायची आहे… अद्याप लिहिणे बाकी असलेली रचनाच मला श्रेष्ठ वाटते.’
aasaramlomte@gmail.com
लेखक साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आहेत.