गिरीश कुबेर

डझनभर नातेवाईकांच्या बोट दुर्घटनेतील मृत्यूची बातमी कळल्यावरही अंगावरचे कपडे काढून ठेवावेत, तसं त्यानं दु:ख बाजूला ठेवलं आणि तो पुढचा महत्त्वाचा सामना खेळायला गेला.. दु:ख व्यक्त करायची चैन त्याला परवडणारी नव्हती.

MS Dhone fan buys 64000 tickets
मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले
Mayank Yadav Reveals About Fitness
IPL 2024 : सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य काय? त्यानंच सांगितलं तो काय करतो?
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs PBKS: विराटला मैदानात भेटण्यासाठी सुरक्षारक्षकांचा डोळा चुकवून पोहोचला चाहता, पाया पडून मारली मिठी; व्हीडिओ व्हायरल
IPL 2024, DC vs PBKS Match Updates in marathi
Abhishek Porel : कोण आहे अभिषेक पोरेल? ज्याने पंजाबविरुद्ध शेवटच्या षटकात पाडला षटकार-चौकारांचा पाऊस

त्या सगळय़ा आधुनिक, फॅशनेबल, चकचकीत-झगझगीत ब्रँडेड कपडे घातलेल्या, लक्षवेधींत हा अगदी वेगळाच. बाकीच्यांचा आरडाओरडाही केव्हढा असतो. जणू काही थेट जगण्या-मरण्याचाच प्रश्न. अशा काही सूचना देत असतात की जसं काही समोरचे त्यांचं ऐकतायत. त्या तुलनेत हा तसा अगदीच शांत. नुसता पाहात असतो. एकटक. आपल्या चेल्यांना काही यश आलं की तेव्हढा जोश दिसून येतो त्याच्यात. एरवी तसा निर्विकार. दिसणंही तसं अगदीच साधं. जणू शेतात किंवा बांधावर किंवा अगदी रस्ते उभारणीच्या कामातनं याला कोणी उचलून आणलाय. दमला-भागलेला. घामानं निथळणारा. पण याची वागणूक कायमच तशी. चेहऱ्यावरनं काही कळणारच नाही काय चाललंय त्याच्या मनात ते.

त्या दिवशीही तसाच होता तो. प्रशिक्षणाला सुरुवात झाली, तसा तो सगळय़ांच्यात सामीलही झाला. नेहमीसारखाच. आपल्या सहकाऱ्यांकडून नेहमीचे व्यायाम प्रकारही त्यानं तसेच करून घेतले. स्वत:ही केले. मग सर्वाच्या बरोबर संघाच्या बसमध्ये शिरला. सामन्याच्या ठिकाणी पोहोचला. महत्त्वाचा दिवस होता तो त्याच्या संघासाठी. हरलो तर थेट स्पर्धेबाहेर. तसं झालं असतं तर त्याच्या संघालाही ते परवडलं नसतं. आणि परत त्यालाही. नुकतीच कुठे त्याच्या कारकीर्दीची सुरुवात होत होती. आणि हाही नुकताच आपला मायदेश सोडून या नव्या देशात आला होता. घरची गरिबी , पण ती सार्वत्रिक. म्हणजे सगळेच गरीब. या गरिबीतनं आलेली कुरूपता वातावरणात भरून राहिलेली. उत्साह वाटेल असं काहीच नाही आसपास. त्यामानानं ही त्याची नवीन कर्मभूमी म्हणजे नंदनवनच म्हणायची. तिसऱ्या जगातनं थेट असं पहिल्या जगात येणं भान हरपून टाकणारं असतं. आपला मायदेश नकोसा वाटायला लागतो लवकरच. तिथल्या दारिद्र्याच्या उग्र दर्पाची जागा या नव्या वातावरणातल्या तरल सुगंधानं घेतलेली असते. त्यामुळे आपली जुनी वेस आणि वास दोन्हीही नकोसे वाटू लागतात. दारिद्य्रात जीव लावावं असं काहीच कधी नसतं. तेव्हा जमेल तितका लवकरात लवकर आपला दरिद्री भूतकाळ विसरायचा प्रयत्न असतो सर्वाचा. हाही काही त्याला अपवाद नाही. या नव्या जगात तो आता रुळू पाहात होता.

..तर ती बातमी आली. तो आपल्या हॉस्टेलमधल्या खोलीत टीव्ही पाहात बसला होता. इथला दिवस संपता संपता आपल्या तिथल्या जुन्या दरिद्री जगात काय चाललंय ते पाहायचं आणि आपल्या नशिबाचे आभार मानत झोपायला जायचं हा त्याचा दिनक्रम. तसंच त्या दिवशी सुरू होतं. पण एका बातमीनं तो हादरला. भीतीची एक दणदणीत लाट त्याच्या पायापासनं डोक्यापर्यंत त्याला धक्का देऊन गेली. बातमी होती एका बोटीच्या उलटण्याची. त्या बोटीची क्षमता तशी ५८० जणांचीच. पण तिसऱ्या जगातल्या देशांत हा असा क्षमता वगैरे काही विचार केला जात नाही. जवळपास त्याच्या पाचपट प्रवासी त्या बोटीत त्या दिवशी होते. निघाली ती बंदरावरनं व्यवस्थित. पण प्रवासात ऐन मध्यावर नेमकं वादळं घोंघावू लागलं आणि वजन न पेलवणारी ही बोट डुचमळायला लागली. वाऱ्यावर जोर चांगलाच वाढला. लाटा उचंबळायला लागल्या. पाणी आत शिरलं आणि ही बोट थेट उलटलीच. एखादी बशी पालथी पडावी तशी ही बोट वरचं खाली आणि खालचं वर अशी झाली.

वाईट वाटलं त्याला हे बघून. आपला देश कधी सुधारणार? नियमांची पायमल्ली करणं आपण कधी थांबवणार? इकडे या जगात नियमपालनाचा सोस आणि तिकडे आपल्या देशात ते मोडण्याचा अतिरेक. नियम पाळणं म्हणजे तसा कमीपणाच त्याच्या देशात. कोणत्याही तिसऱ्या देशात असते तशीच ही परिस्थिती. तिच्या नावानं त्यानं सुस्कारा सोडला आणि टीव्ही बंद करून स्वत:च्या देशाविषयी सहानुभूती दाटलेल्या अवस्थेत तो झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी सकाळी आलेल्या फोननं त्याची झोप आणि शांतता दोन्हींचाही भंग झाला.

त्या बोटीच्या अपघातात याच्या घरचे चक्क १२ जण बुडून गेले होते. त्याची लाडकी सख्खी बहीण, भाचरं, मावशी, तिचा नवरा, काका, काही चुलतभाऊ अशा एकूण डझनभर जवळच्या नातेवाईकांना त्यात जलसमाधी मिळाली. बातमी उद्ध्वस्त करणारीच. एकंदर १८६३ जण या अपघातात बुडून गेले. जगप्रसिद्ध ‘टायटॅनिक’ बुडीपेक्षाही जास्त जण या अपघातात गेले. टायटॅनिकच्या १९१२ सालच्या अपघातात सगळे धनाढय़ होते. या अपघातातले बरेचसे दरिद्रीच.

या बातमीनं सुन्न झाला तो. साहजिकच होतं ते.  २६ वर्षांचाही नव्हता तो. त्यात परदेश. खूप मोठय़ांदा रडावं असं वाटलं त्याला. तसं केलं असतं तर खोलीतल्या जोडीदारानं विचारलं असतं काय झालं वगैरे. मग सगळं सांगावंच लागलं असतं. असं रडगाणं गायचा स्वभाव नव्हता त्याचा. आपलं दु:ख आपल्याबरोबर. इतरांत ते का वाटा, असं त्याचं म्हणणं. आणि दुसरं असं की दु:ख करायला वेळही नव्हता. थोडय़ा वेळातच त्याला तयार व्हायचं होतं. आणखी एका महत्त्वाच्या सामन्यात खेळायचं होतं. अंगावरचे कपडे काढून ठेवावेत तसं त्यानं आपल्या दु:खाला बाजूला ठेवलं आणि सामन्यात खेळायला गेला.

साधारण आठवडाभरानं कळलं त्याच्या सहकाऱ्यांना काय घडलंय ते. बोलता बोलता त्याच्या देशातल्या अपघाताची बातमी गप्पांत आली आणि कोणी तरी विचारलं त्याला. तर तो थंडपणे म्हणाला.. हो, आमच्या गावाजवळच हा अपघात झाला.. माझे १२ नातेवाईक त्यात मारले गेले.

त्याचे सहकारी हादरलेच. ते ज्या संस्कृतीतून येत होते तीत असा काही अपघात झाला असता तर लोकांनी काय केलं असतं? अगदी सरकारच्या राजीनाम्यापर्यंत वेळ आली असती. या अशा सुस्थित संस्कृतीत छोटंसं दु:खही साजरं केलं जातं. हळुवारपणे त्यावर फुंकर घातली जाते. आणि इथे हा..! आपले डझनभर नातेवाईक अपघातात गमावूनही शांतपणे जणू काही घडलंच नाही, असा वागणारा.

त्याला पर्याय नव्हता. कारण त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या त्याच्या देशाच्या. ही बोट दुर्घटना घडायच्या आधी त्याच्या सहभागानं त्याच्या देशानं इतिहास घडवला होता. कधी नव्हे ते त्याच्या देशाला या स्पर्धेत इतकी मोठी झेप घेता आली. त्यामुळे आताही तसंच त्यानं खेळावं अशी त्याच्या देशवासीयांची अपेक्षा होती. आणि दरिद्री देशांत देशभावना वगैरे किती तीव्र असते ते त्यानं अनुभवलेलं होतं. या देशवासीयांना त्यानं गमावलेल्या नातेवाईकांशी, त्याच्या वियोगाशी काही देणं-घेणं असण्याची शक्यता नव्हती. रक्ताला चटावलेले प्राणी कसे असतात.. सतत रक्ताच्या शोधात. तसे त्याचे देशवासीय होते. सतत विजय हवा होता त्यांना. जणू त्यांच्या देशातल्या सर्व दरिद्रदु:खावर विजय हाच एक इलाज होता. घरातला, दिव्याखालचाही अंधार या अशा विजयाच्या झगमगाटात त्याचे देशवासीय विसरून जायचे. आपल्या शत्रुदेशास वास्तवात नाही तरी असं खेळात हरवणं त्यांच्या अहंकाराला गोंजारणारं होतं. त्यामुळे त्यानं खेळणं.. जिवाच्या आकांतानं, वैयक्तिक वेदना बाजूला ठेवून खेळणं आवश्यक होतं.

तो खेळला. आपल्या देशाला, नंतर आपल्या क्लबलाही विजयात त्यानं मदत केली. नंतर तो आपल्या मायदेशी परत गेला. आपल्यासारख्याच खेळाडूंना आपण मदत करायला हवी या भावनेनं. आज तो त्याच्या देशाच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. आणि त्याचा संघ?

फिफा विश्वचषक स्पर्धेत अंतिम १६ संघांत निवडला गेलाय. जर्मनीसारखा बलाढय़ देश विश्वविजेता स्पर्धेबाहेर फेकला जात असताना या संघाचं १६ जणांच्या बाद फेरीत प्रवेश मिळवणं फारच कौतुकास्पद म्हणायला हवं.

उद्या रविवारी त्याचा सेनेगल हा देश त्याला ज्या देशानं आसरा दिला त्या इंग्लंडच्या संघाशी खेळेल. आणि आलीऔ सिसे तसाच कडेला उभं राहून आपल्या संघाचा खेळ पाहात असेल. कोणताही आरडाओरडा न करता.

यंदा या स्पर्धेत सर्व संघांत मिळून १८० हून अधिक आफ्रिकी स्थलांतरित खेळाडू आहेत. त्या त्या देशांना जिंकण्यासाठी मदत करतायत.. आपल्या मायदेशी ‘आफ्रिकी वंशाचे’ वगैरे म्हणून त्यांचं कौतुक केलं जातंय.

सिसे मात्र आपल्याच देशाच्या संघाला घेऊन आपल्याच देशासाठी स्पर्धेत उतरलाय. लढायचं असतंच सर्वाना.. पण कोण कोणासाठी कोणाविरोधात लढतंय याचं मोल असतंच शेवटी.

girish.kuber@expressindia.com

girishkuber