उत्तर प्रदेश, बिहार इथल्या जातवास्तवाचे भेदक दर्शन घडवणाऱ्या अनेक कविता, कथा, कादंबऱ्या आढळतात. त्यात ‘मुर्दहिया’चं वेगळेपण अनेक अंगाने अनेकांनी सांगितलेलं आहे.
‘मुर्दहिया’ ही गावातल्या एका बाजूला असलेली अशी जागा जिथं गुरांना चारण्यापासून ते गावातल्या माणसांच्या अंत्यसंस्कारापर्यंत सगळी कामं केली जायची. मुलांना शाळेत जायचं असो अथवा मोठ्यांना मंदिर किंवा बाजारात जायचं असो, इतकंच नाही तर गाव सोडून मजुरी करण्यासाठी रेल्वेने जायचं असलं तरी या ‘मुर्दहिया’ला ओलांडूनच जावं लागायचं. जगण्यापासून ते मरण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी या जागेतच जणू सामावल्या होत्या. बरं ही अशी जागा की ती माणूस आणि पशू यांच्यात फरक करत नाही.
दोघांसाठी ही जमीन म्हणजे मुक्तिदाताच ! मेलेल्या जनावरांची कातडी सोलण्यासाठी हीच जागा होती. अशा जनावरांचं मांस खाण्यासाठी गिधाडांच्या झुंडीच्या झुंडी इथं असायच्या. जोडीला असंख्य कुत्रे. रात्री या सगळ्यांच्या चित्र- विचित्र आवाजाने शांतता भंग व्हायची. गावकुसाबाहेरची अनेक माणसं आपलं दु:ख, वेदना तसंच दाबून या जागेतच विलीन झालेली. लेखकाने म्हटलंय, त्यांच्यापैकी कोणीही आत्मकथा लिहिली असती तरी तिचं नाव ‘मुर्दहिया’ हेच राहिलं असतं. ‘मुर्दहिया’ हे गावकुसाबाहेरच्या एका माणसाचं आत्मकथन. ते हिंदी भाषेत आलं तेव्हा सगळीकडेच त्याची जोरदार चर्चा झाली होती.
डॉ. तुलसीराम यांनी ज्या पद्धतीने लिहिलं ते अतिशय प्रामाणिक आणि नितळ. ही केवळ एका व्यक्तीची कहाणी नव्हती तर एका समाजजीवनाचा तो कालपट होता. सामाजिक विषमतेची किंमत मोजणाऱ्या तळाच्या वर्गाचं चित्रण जणू हिंदी भाषेत पहिल्यांदाच इतक्या सामर्थ्याने व्यक्त झालं अशी जाणकारांची भावना होती. हिंदीतले प्रसिद्ध समीक्षक डॉ. नामवर सिंह यांनी तर ‘मुर्दहिया’मध्ये ज्या प्रकारचं ग्रामीण आणि लोकजीवन आलं आहे ते प्रेमचंद यांच्या लेखनातही दिसत नाही अशी प्रतिक्रिया नोंदवली होती. यावरून या आत्मकथेचं मोल लक्षात यावं. अर्थात या आत्मकथेच्याही आधी मराठीत आलेल्या आत्मकथनांनी अवघ्या भारतीय साहित्याचं लक्ष वेधून घेतलेलं होतं.
उत्तर भारतातल्या साहित्यात सामाजिक विषमतेचे चित्रण करणाऱ्या अनेक कलाकृती आहेत. ओमप्रकाश वाल्मीकी यांच्या ‘जूठन’चाही त्यासंदर्भात उल्लेख करावा लागेल. त्यापेक्षाही त्यांची छोटीच कविता पण एकूण वर्गभान आणि वर्गसंघर्षाचे चरित्र सांगणारी आहे. चुल्हा मिट्टी का/ मिट्टी तालाब की/तालाब ठाकूर का/ भूख रोटी की/ रोटी बाजरे की/ बाजरा खेत का/ खेत ठाकूर का/ हल की मुठ पर हथेली अपनी/ फसल ठाकूर की/ कुंवा ठाकूर का/ पानी ठाकूर का/ खेत खलीहान ठाकूर के/ फिर अपना क्या ? गांव ? शहर ? देश ? यासारख्या कवितांमधून ही विषमता येत राहते.
उत्तर प्रदेश, बिहार इथल्या जातवास्तवाचे भेदक दर्शन घडवणाऱ्या अनेक कविता, कथा, कादंबऱ्या आढळतात. ‘मुर्दहिया’चं वेगळेपण अनेक अंगाने अनेकांनी सांगितलेलं आहे. या निवेदनाचा स्तर चढा नाही. वर्षानुवर्षे जखडून असलेल्या जातव्यवस्थेचं तितकंच संयत तरीही भीषण वास्तव ‘मुर्दहिया’मध्ये आलेलं आहे. एका लहान मुलाच्या वाट्याला आलेलं जग. ज्यात प्रस्थापित समाज व्यवस्थेने केलेली टोकाची अवहेलना आहे, विषमतेचे चटके आहेत, उपेक्षेच्या खातेऱ्यात जगत दहावीपर्यंत शिकल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी गाव सोडावं लागतं. घरातून पळून जावं लागतं. इथपर्यंतचं वर्णन या पुस्तकात येतं.
गाव सोडताना ‘मुर्दहिया’ ही जागा मागे सुटत चाललेली असते. लहानपणी एका आजारात एक डोळा निकामी झालेला असतो. गावातले लोक पाहताच या मुलाला अशुभ मानतात. दिसताच रस्ता बदलून चालायला लागतात. असं लक्षात येतं की ज्या डोळ्यांनी दिसतं त्यातून जेवढे अश्रू ओघळत आहेत तेवढेच त्या अंध डोळ्यातूनही ओघळत आहेत. गावातल्या अनेक व्यक्तिरेखांनी मनात फेर धरलेला आहे. इथं ही कथा संपते. शालेय जीवन, त्या काळात पडलेला दुष्काळ, हा दुष्काळ अनुभवणारे बालमन, गावातल्या प्रचंड अंधश्रद्धा, दंतकथांनी भारलेलं जीवन.
जातव्यवस्थेतल्या सर्व जातींची उतरंड आणि त्या उतरंडीच्या बुडाशी वेटोळे करून असलेला थंड परंतु पाशवी ताकद असणारा अजगर… गावातल्या अनुभवांचा बालपणातला हा लेखाजोखा या आत्मकथेत आला आहे. पुढे तुलसीराम यांच्या आत्मकथेचा दुसरा टप्पा ‘मणिकर्णिका’ या नावाने आला. ‘मुर्दहिया’मधल्या जीवनाचा पुढचा भाग या आत्मकथेत आहे पण सर्वाधिक चर्चा झाली ती पहिल्या भागाची. केवळ एका व्यक्तीची कथा म्हणून नव्हे तर समाजजीवनाचा अभ्यास म्हणूनही तो महत्त्वाचा आहे.
एखाद्याला सरळसरळ जात विचारणं, जातीवरून हिनवणं या बाबी बिहार वगैरेसारख्या राज्यात अजिबात आश्चर्यकारक मानल्या जात नाहीत. ‘कौन जात हो भाई ?’ यासारखा प्रश्न अगदी तुमचं गाव कोणतं किंवा तुमचं शिक्षण किती झालं याप्रमाणे विचारला जातो. ‘कौन जात हो भाई ?’ या नावाची बच्चा लाल उन्मेष या कवीची कविता प्रसिद्धच आहे. तुम्ही कोण आहात म्हणजे तुम्ही कोणात मोडता ? काय खाता, काय पिता, यासारखे प्रश्न विचारल्याच्या नंतर या प्रश्नांची जी उत्तरे पिचलेल्या माणसाकडून मिळतात ती अंतर्मुख करणारी आहेत.
शेवटी जेव्हा तुम्हाला काय मिळालंय असा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याचंही उत्तर असंख्य प्रश्नांना जन्माला घालणारं असतं. एरवी या दबलेल्या माणसाची गिनती होते ती केवळ निवडणुकीतच. हा एकच असा प्रसंग आहे की जिथे तो दखलपात्र असतो. त्यामुळे या कवितेत फिरून फिरून निवडणूक येते. शेवटी जेव्हा प्रश्न विचारला जातो, ‘‘क्या किया है भाई ?’’ उत्तर मिळतं, ‘‘जो दलित करता है साब ! सौ दिन तालाब में काम किया/ पसीने से तर सुबह को शाम किया/और आते जाते ठाकुरों को सलाम किया साब ! मुझे लगा कोई बड़ा काम किया ! किया है न साब! आपके चुनाव का प्रचार !’’ आता बिहारमधल्या निवडणुकांच्या हंगामात ही कविता सतत आठवण व्हावी अशी आहे.
‘मुर्दहिया’ आत्मकथेत जातीच्या नावाने वारंवार उल्लेख करून अपमानित केला जाणारा मुलगा आहे. बालवयात त्याला पाण्याची इतकी वेगवेगळी रूपे दिसतात की पाणी पिणे हीच विराट अशी समस्या आहे असे त्याला वाटू लागते. गावातल्या एखाद्या पाणवठ्याला स्पर्श करायला जमायचं नाही. कुणीतरी पाणी वाढल्यानंतरच ते प्यावं लागायचं. लेखक एक अनुभव लिहितो, ‘‘खाली वाकून ओंजळ तोंडाला लावावी लागायची. वरतून कुणीतरी पाणी ओतणार. ते ओंजळीत पाणी कमी टाकायचे पण डोक्यावर जास्त टाकायचे. त्यामुळे खूप वाईट पद्धतीने आम्ही भिजायचो. त्यांच्यासाठी हा मनोरंजनाचा खेळ होता.’’ केवळ एकच नव्हे तर पाण्याचे असे अनेक संदर्भ या आत्मकथेत आहेत. असंख्य स्वास्थ्यहारक प्रसंग या आत्मकथेत आहेत पण सर्वात अजोड आहे ती या लेखनाची शैली.
‘मुर्दहिया’ वाचताना नामदेव ढसाळ यांच्या ‘हाडकी हाडवळा’ या कादंबरीची आठवण होते. कादंबरीच्या शीर्षकाचे स्पष्टीकरण ढसाळांनी दिलेले आहे. ‘हाडकी हाडवळा’ म्हणजे महारांना मिळालेली सामूहिक इनामी जमीन. या इनामाची मुळे थेट निजामशाहीच्या अमलापर्यंत पोचतात. या कादंबरीत गावगाड्याबाहेर राहणारा समाज, या समाजाच्या चालीरीती, परंपरा, गावकुसाबाहेरील समाजाचे अन्य जातींशी असलेले संबंध उजागर करत ही कादंबरी एका लोकजीवनाचा आलेख मांडते. आपले बालपणाचे अनुभव निरागस अशा नजरेतून या कादंबरीत ढसाळ यांनी टिपलेले आहेत.
बदलांच्या खाणाखुणा निर्माण होण्यापूर्वीचा गावगाडा कसा होता याचे दर्शन या कादंबरीतून घडते. बायजा आणि सावळा या माय लेकराची ही कहाणी आहे. ‘हाडकी हाडवळा’मधून आलेले लोकजीवन समृद्ध आहे. विविध प्रकारचे सण उत्सव, परंपरा यांची जोड या जीवनाला आहे. गावची लक्ष्मीआई, कनेरसरची यमाई, पाबळचा पीर, केंदूरची बगाडे, गाव शिवांच्या जत्रा खेत्रा, बैलगाड्यांच्या शर्यती, नाचगाणी, तमाशा, हजेरी कुस्त्यांचा फड अशा अनेक गोष्टींनी हे लोकजीवन समृद्ध झाले आहे.
किशोरवयीन सावळाच्या निरागस नजरेतून आलेलं आणि बायजाच्या जगण्याच्या संघर्षातून रसरसलेलं वेदना आणि कारुण्य याचं विणकाम म्हणजे हाडकी हाडवळा कादंबरी. ‘मुर्दहिया’चा नायकही गावात १६-१७ वर्षापर्यंत जगलेला एक मुलगाच आहे. या आत्मकथेत अनेक जाती समूहांमध्ये म्हटली जाणारी लोकगीतं आहेत. पण सर्वाधिक लक्षात राहत होते या आत्मकथेचं स्वच्छ प्रवाहासारखं निवेदन. एखादं भीषण, धारदार सत्य किती सहजपणे सांगता येऊ शकत याचं उदाहरण म्हणजे ही आत्मकथा. आजही जेव्हा जेव्हा देशभरात जातीय विद्वेषातून जेव्हा कुठे ना कुठे काही घटना घडतात तेव्हा ‘मुर्दहिया’ पुन्हा पुन्हा आठवत राहते.
aasaramlomte@gmail.com
आसाराम लोमटे लेखक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आहेत.
