बिहारमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दोन आठवड्यांची ‘व्होटर अधिकार यात्रा’ काढली होती, तिचा प्रमुख उद्देश मतदारांना जागृत करण्याचा होता. देशभरामध्ये भाजप निष्पक्ष निवडणुका होऊ देत नाही, भाजपच्या या कथित कट-कारस्थानामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग सर्व प्रकारची मदत करत आहे. निवडणुकांवर डल्ला मारला जात आहे, त्यामध्ये भाजप आणि निवडणूक आयोग दोन्ही हातात हात घालून काम करत आहेत. हे दोघे लोकशाहीचे गुन्हेगार असून त्यांच्यामुळे काँग्रेस वा इतर विरोधी पक्षांना राज्यांमध्ये वा केंद्रात निवडणुका जिंकता येत नाहीत. आता बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक आहे, तिथे भाजप व निवडणूक आयोग यांच्या संगनमताने होत असलेले कारस्थान धुळीला मिळवा, असा संदेश राहुल गांधींनी यात्रेमध्ये दिला.
हा संदेश देण्यासाठी त्यांनी बिहारमध्ये झालेल्या मतदार फेरतपासणी मोहिमेचा (एसआयआर) आधार घेतला होता. बिहारमध्ये दलित, मुस्लीम, गरीब लोकांची नावे मतदार यादीतून काढून टाकली गेली आहेत. त्यांच्याकडे नागरिकत्वाचा पुरावा मागितला जात आहे. हा पुरावा दिला नाही तर ते देशाचे नागरिक नाहीत असे घोषित केले जाईल. मग, या देश नसलेल्या लोकांना भारतात राहण्याचा अधिकार नसेल, त्यांना रेशन दिले जाणार नाही, सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, त्यांचे अस्तित्व मिटेल, असे दावे यात्रेमध्ये काँग्रेस व महागठबंधनच्या राष्ट्रीय जनता दल, भाकप-माले, विकासशील इन्साफ पार्टी (व्हीआयपी) आदी घटक पक्षांच्या नेत्यांनी वेळोवेळी भाषणांमधून केले.
हे यश कुणामुळे?
विरोधी नेत्यांच्या या आक्रमक आरोपांमुळे बिहारमध्ये मतांची चोरी केली जात असल्याचा मुद्दा जोरकसपणे ठसवला गेला. या यात्रेमुळे लोकांना कळले की, मतदार यादीतून आपली नावे काढली गेली असू शकतात, आपल्याला कदाचित मतदान करता येणार नाही, आपण मतदान करू शकलो नाही तर आपल्याला योजनांचा लाभ मिळणार नाही… मतचोरीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यात काँग्रेसच्या यात्रेला यश मिळाले असे मानता येईल.
केवळ संदेश पोहोचवून निवडणूक जिंकता येत नसते हे सगळ्यांना माहीत असते. तरीही काँग्रेसने यात्रा काढली. अगदीच मरणासन्न झालेल्या बिहारमधील पक्षाच्या संघटनेमध्ये थोडीफार चेतना निर्माण करता येऊ शकते हेच त्यामागील एकमेव कारण होते. इतर राज्यांमध्ये काँग्रेसची संघटना जितकी कमकुवत आहे तितकीच ती बिहारमध्ये आहे. राहुल गांधींची ही यात्रा फक्त एकट्या काँग्रेसच्या जिवावर काढली गेली असती तर कदाचित इतके यश मिळाले नसते. ही यात्रा लक्षवेधी होण्यामागे राष्ट्रीय जनता दलाचा मोठा हात होता. शिवाय, भाकप-मालेचे वर्चस्व असलेल्या काही भागांतून ही यात्रा गेली. तिथे या पक्षाचे कट्टर समर्थक यात्रेत सहभागी झाले होते. पश्चिम-दक्षिण बिहारच्या सासाराममधून ही यात्रा निघाली तेव्हा मोठा प्रतिसाद लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांचाही होता. काँग्रेसच्या हातापेक्षा लालूंच्या पक्षाचे हिरवे झेंडे अधिक दिसत होते. एक प्रकारे लालूंच्या खांद्यावर बसून काँग्रेस पुढे पुढे निघाल्याचे चित्र निर्माण झाले होते. हे चित्र कमी-अधिक प्रमाणात यात्राभर कायम होते. तरीही, या यात्रेतून काँग्रेसला काहीच मिळाले नाही असे नव्हे. कदाचित राहुल गांधींच्या यात्रेत तेजस्वी यादव यांची दररोज असणारी उपस्थिती ‘महागठबंधन’च्याच ताकदीचे दर्शन घडवत असेल; पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झोपेतून जागे करण्यासाठी ही यात्रा उपयुक्त होती असे म्हणता येईल.
व्होटर अधिकार यात्रेची सांगता पाटणामधील गांधी मैदानावर झाली, हे मैदान शिवाजी पार्क पेक्षाही मोठे आहे, किमान दीड लाख श्रोते आरामात बसू शकतील. तिथे मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांची जमलेली गर्दी महागठबंधनच्या इतर घटक पक्षांच्या प्रामुख्याने राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांच्या तोडीसतोड होती. पाटणाच्या आसपासच्या भागांमधील यादव समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या भागांतून कुठल्याही वेळी २०-३० हजार यादव कार्यकर्ते गोळा करण्याची क्षमता पप्पू यादव यांच्याकडे आहे, त्यांनीच ही गर्दी गोळा केली होती असेही म्हटले जात होते. पप्पू यादव यांची सक्रियता काँग्रेससाठी मोठी बाब ठरते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात लोकसभेच्या कॅण्टीनसमोर असलेल्या लॉबीमध्ये पप्पू यादव भेटले. त्यांना विचारले की, राहुल गांधींची यात्रा लक्ष वेधून घेत आहे. त्यावर, ‘काँग्रेस समझ तो जाए…’, इतकेच ते म्हणाले. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता की, काँग्रेसची संघटना कमकुवत आहे, त्यांच्यासारख्या लोकांमध्ये ऊठबस असलेल्या आणि गर्दी जमा करण्याची क्षमता असलेल्या नेत्याला काँग्रेस फार काळ दूर ठेवू शकत नाही, ही बाब काँग्रेसला समजली पाहिजे!
यादवांचा मताधार
ही यात्रा सुरू होण्यापूर्वी जुलैमध्ये ‘एसआयआर’ विरोधात ‘इंडिया’ आघाडीने बिहार बंदचा नारा दिला होता. त्या वेळी राहुल गांधी, तेजस्वी यादव वगैरे नेत्यांनी खुल्या गाडीत बसून पाटणामध्ये निदर्शने केली होती. या गाडीमध्ये पप्पू यादव आणि कन्हैया कुमार यांना चढू दिले गेले नाही. ही घटना काँग्रेससाठी अत्यंत लाजिरवाणी होती. यादव आणि कन्हैया हे काँग्रेसचे दोन्ही नेते बिहारमधील तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वासाठी अडचणीचे ठरतील असे मानले जाते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जाते. राहुल गांधींच्या यात्रेमध्ये हे दोन्ही नेते सहभागी झाले होते. बिहारमध्ये कन्हैया कुमार यांच्यापेक्षा पप्पू यादव हेच अधिक महत्त्वाचे ठरतात. कन्हैया कुमार हे भूमिहार आहेत, ते उच्च जातीतील आहेत. आत्ताचे काँग्रेसचे राजकारण ओबीसी आणि अतिपिछडा जातींभोवती फिरते. त्यामुळे खरेतर बिहारमध्ये कन्हैया कुमार यांचा किती फायदा पक्षाला होईल हे माहीत नाही. या उलट पप्पू यादव हे पूर्ण बिहारमध्ये प्रभावी ठरतात. ते यादव समाजातील आहेत, त्यांचा स्वत:चा काँग्रेसला फायदा करून देणारा मताधार आहे हे नाकारता येत नाही. बिहारमध्ये पक्ष संघटना कमकुवत असताना पप्पू यादव यांच्यासारखे नेते कदाचित पक्षाला अधिक मदत करू शकतील असेही मानले जाऊ लागले आहे.
मुस्लीम-यादव हा परंपरागत ‘एम-वाय’ मतदार या वेळी भक्कमपणे महागठबंधन बरोबर असल्याचे या यात्रेत दिसले. दलितांमधील चमार काही प्रमाणात काँग्रेसबरोबर येऊ शकतो असे मानले जाते. ‘भाकप-माले’ची ताकद असलेल्या पट्ट्यामध्ये दलित, अतिपिछडा मतदार महागठबंधनला फायदेशीर ठरू शकतील. ओबीसींमधील बिगरयादव म्हणजे कोयरी (कुशवाह) व इतर जातींपर्यंत पोहोचण्याचा महागठबंधनचा प्रयत्न आहे. महागठबंधनमधील मुकेश साहनी यांच्या ‘व्हीआयपी’ पक्षाचा मूळ आधार अतिपिछडा समाज असल्याने तीन-चार टक्के मतांची भर पडेल असे गणित मांडले जाते. पण हा पक्ष निवडणुकीनंतर भाजपच्या आघाडीत जाण्याचा धोका असल्याने या जागावाटपामध्ये किती स्थान मिळेल हे सांगता येत नाही. तसे झाले तर मतांचे गणित फसू शकते. अशी ही महागठबंधनमध्ये जातीच्या गणिताची गुंतागुंत आहे. त्यामध्ये काँग्रेसला कोणता जातीचा आधार असू शकतो असे विचारता येऊ शकते.
महागठबंधनमध्ये घटक पक्षांकडे जातींचे आधार दिसू शकतात तसा कोणताही भक्कम जातींचा आधार काँग्रेसकडे नाही. त्यांना घटक पक्षांच्या मदतीने जातींचा आधार मिळवावा लागणार आहे. राहुल गांधींच्या यात्रेतून काँग्रेसने बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एक टप्पा पूर्ण केला आहे. पुढच्या टप्प्यामध्ये मतचोरीचा मुद्दा कदाचित विरून जाऊ शकतो. ही बाब पूर्णियाचे खासदार पप्पू यादव म्हणतात त्याप्रमाणे, ‘काँग्रेस समझ तो जाए…’!