ऑपरेशन सिंदूर पार पडले. त्याच्या समर्पकतेच्या, प्राप्तीच्या, संचिताच्या चर्चा झडत राहतील. मात्र लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाचा युद्धक्षेत्रात वाढलेला प्रचंड वावर! युद्धपट बघताना सैनिक, रणगाडे, तोफा यांची जी रेलचेल दिसायची त्याच्या विरुद्ध चित्र यावेळी पाहायला मिळाले. केवळ यंत्रे कार्यरत आहेत आणि मनुष्य सहभाग पडद्याच्या पलीकडे आहे. या लेखमालेतील काही लेखात आपण तंत्रज्ञानाबरोबर बदललेले स्वरूप इस्रायल-पॅलेस्टाइन, रशिया-युक्रेन आदी संघर्षातून पहिले. ड्रोन युद्धनीती, मानवोत्तर युद्धे, दूरस्थ नियंत्रणामुळे युद्धांचे झालेले व्हिडीओ गेमीकरण, दुर्हेतूक माहितीचा पूर आदी आपल्याला प्रत्यक्ष अंगणात दिसतात तेव्हा त्याचे तांत्रिक बाजूने अवलोकन अत्यावश्यक ठरते.
ऑपरेशन सिंदूरने १९७१ नंतरच्या काळात भारताच्या लष्करी भूमिकेला एक नवे परिमाण दिले आहे. उरी (२०१६) आणि बालाकोट (२०१९) मधील मागील हल्ले त्वरित आणि लक्ष्यित स्वरूपाचे होते, तर सिंदूर ही व्यापक, बहुआयामी, उच्च-तंत्रज्ञानावर आधारित आक्रमक कारवाई आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, उरी जमिनीवरील रणनीतीत्मक मोहीम होती, बालाकोट १९७१ नंतरची सीमेपलीकडील पहिली हवाई कारवाई तर ऑपरेशन सिंदूरमध्ये हवाई शक्ती, तोफखाना आणि मानवरहित प्रणालींचा समन्वित स्वरूपात दीर्घकालीन हल्ल्यासाठी वापर करण्यात आला. मर्यादित लक्ष्यावर अचूकतेने विद्याुतगतीने हल्ला करणे हे सर्जिकल स्ट्राइकचे वैशिष्ट्य! तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय हे हल्ले करणे दुरापास्तच!
तंत्र तणाव
भारताने राफेल, मिराज वगैरे लढाऊ विमाने आणि स्काल्प (SCALP), हॅमर (HAMMER) सारखी क्षेपणास्त्रे वापरून लक्ष्यित हल्ला केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने भारतीय हवाई हद्दीवर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. सरकारच्या माहितीनुसार, पाकिस्तानने भारतीय वायुसेनेच्या चार प्रमुख तळांवर (उधमपूर, पठाणकोट, आदमपूर, भुज) क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले, ज्यामुळे मर्यादित नुकसान झाले. प्रत्युत्तर म्हणून भारताने हवाई हल्ले केले. भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या सहा वायुसेना तळांवर (रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कूर, चुनिया) अचूक आणि नेमके हल्ले चढवले. आधी हवाई युद्धामध्ये लक्ष्य करण्यासाठी एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ले होत (लंडन १९४०). आता अचूकतेवर भर असतो. पाकिस्तानने पंजाबमधील एका वायुसेना तळावर अतिवेगवान क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि मानवरहित विमानांचा वापर केला, तर भारताने सुखोई-३० आणि मिराज लढाऊ विमानांतून मार्गदर्शित बॉम्ब्सचा वापर करून पाकिस्तानची रडार सुविधा आणि कमांड सेंटर्स नष्ट केली.
पाकिस्तानने खुलेआम चीनमध्ये बनवलेली युद्धसामग्री वापरली. त्यांच्या वायुसेनेने जेएफ-१७ थंडर आणि जे-१०सी लढाऊ विमानांच्या वापराच्या दृश्यफिती जाहीर केल्या. इस्लामाबादने दावा केला की त्यांच्या जेएफ-१७ विमानांनी हायपरसोनिक क्षेपणास्त्रे डागून भारताची एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली, तर फतह-२ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी भारताच्या किमान एक क्षेपणास्त्र साठा डेपो आणि दोन वायुसेना तळांवर हल्ले केले. पाकिस्तानने तुर्कीमधील अकिन्सी आणि बायराक्टार ड्रोन्सचा वापर केल्याचेही सांगितले, तसेच अनेक भारतीय मानवरहित विमाने (यूएव्ही) पाडली. (यातील बहुतांशी दावे खोटे असल्याचे सिद्ध झाले). भारतीय वायुसेनेने लाँग-रेंज ब्राम्होस क्रूज क्षेपणास्त्रे (३०० किमी पल्ला) आणि पृथ्वी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, तर लष्कराने रशियन एस-४०० आणि एस-२०० हवाई संरक्षण प्रणाली वापरून पाकिस्तानी ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे पाडली.
दोन्ही बाजूंनी ड्रोन-विरोधी आणि क्षेपणास्त्र-प्रतिबंधक प्रणालींचा मोठ्या प्रमाणात वापर केला. बोफोर्स एल-७० आणि झेडयू-२३ मिमी तोफा, सोव्हिएत ‘शिल्का’ २३ मिमी तोफा, आधुनिक एस-४०० बॅटरीज, आणि विशेष काउंटर-यूएव्ही (सी-यूएव्ही) जॅमर्स आणि सेन्सर्स यांच्या साहाय्याने भारतीय सेनेने एकत्रित हवाई संरक्षण व्यवस्था उभारली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या स्तरित संरक्षणाने पाकिस्तानच्या ड्रोन आक्रमणाला परतून लावले. पाकिस्तानी सैन्यानेही एचक्यू-९ ही जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे (रशियन एस-३००ची चीनी प्रत) वापरली आणि थर्मल रडारच्या मदतीने हल्ले करणाऱ्या ड्रोन्सना पाडले. पाकिस्तानने रात्रीच्या वेळी छोट्या ड्रोन्सच्या झुंडी (हेरगिरी आणि बॉम्बहल्ल्यांसाठी) भारतीय हवाई हद्दीत प्रक्षेपित केल्या, तर भारताने कृत्रिम बुद्धिमत्ताचलित डिटेक्शन नेटवर्क्स आणि जॅमर्सचा वापर करून त्यांना अडवले. ड्रोन्सच्या वापराच्या तीव्रतेमुळे-विशेषत: ‘कामिकाझे’ आत्मघाती ड्रोन्समुळे संघर्ष तांत्रिक बाबतीत उठावदार ठरला.
जागतिक सहभाग
वरवर पाहता देशांतर्गत विकसित केलेल्या आणि मित्रराष्ट्रांकडून मिळविलेल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर हा संघर्ष व्यापक झाला असे वाटत असले तरी दोन्ही बाजूंकडील अनेक वर्षांचे राजनैतिक प्रयत्न हे तंत्रज्ञान आणि शस्त्रांची जमवाजमव करण्यामागे कारणीभूत होते. या संघर्षाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चीनच्या लढाऊ विमानाचा प्रत्यक्ष संघर्षात पहिल्यांदाच वापर! हा संघर्ष भौगोलिकदृष्ट्या दक्षिण आशियातील दोन देशांच्या सीमारेषांच्या आसपास मर्यादित असला तरी तांत्रिकदृष्ट्या अमेरिका आणि चीन या अघोषित भू-राजकीय गटातील तांत्रिक कौशल्याची ही कसोटी होती. पाकिस्तानने भारताचे राफेल विमान पाडले हा दावा केला तेव्हा तज्ज्ञांकडून चीनच्या सामर्थ्याची पाश्चिमात्य तंत्रज्ञानावर सरशी असे जागतिक पातळीवर पाहायला गेले. याचमुळे हा दावा अधिकाधिक जटिल होऊन आजदेखील दोन्ही बाजूंकडून याबद्दल खात्रीशीर स्पष्टीकरण मिळालेले नाही. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अझरबैजान-आर्मेनिया युद्धात तुर्कियेच्या ड्रोन्सनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि संरक्षण बाजारात तुर्कियेची पत सुधारली. तीच गोष्ट स्वयंचलित शस्त्रांच्या बाबतीत इस्रायलची! त्यामुळे चीनच्या विमानाच्या कामगिरीवर पुढचे अर्थकारण बदलू शकते. त्याच वेळी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण कार्यपद्धतीतील (MTCR) भारताच्या समावेशामुळे परकीय तंत्रज्ञान हस्तगत करणे भारताला पाकिस्तानच्या तुलनेने सोपे झाले आहे. भू-राजकीय परिस्थितीमुळे भारताने पाश्चिमात्य देश आणि रशिया दोघांकडून उच्च दर्जाचे तंत्रज्ञान मिळवून यशस्वी मुत्सद्देगिरी केली.
अस्तनीतले निखारे
या संघर्षातील तांत्रिक पातळीवरील महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुर्हेतुक, बनावट माहितीचा सुळसुळाट! तंत्रज्ञान अचूक माहिती पोहोचविण्यासाठी मदत करत असते त्याच वेळी काही महाभाग त्याचा गैरवापरही करतात. बऱ्याचदा तो रणनीतीचा भाग असतो. मात्र तंत्रज्ञानाच्या गैरवापरापेक्षा मानवी विवेकाचे स्खलन अधिक चिंताजनक आहे. भारताने अधिकृतरीत्या हा हल्ला मर्यादित स्वरूपातील तसेच दहशतवादी केंद्रित आहे असे सांगितले होते तेव्हा ताळतंत्र सोडलेल्या वृत्तवाहिन्यांनी एका रात्रीत अर्धा पाकिस्तान बेचिराख करून विश्वासार्हतेची लक्तरे वेशीला टांगली. समाजमाध्यमांच्या युगात पहिलाच द्विपक्षीय संघर्ष अनुभवणाऱ्या कीबोर्ड योद्ध्यांनी युद्धखोरीला प्रोत्साहन दिले. आपल्या अल्प आकलनाला सर्वोच्च मानून कहर करणाऱ्या या टोळ्यांनी शांततेची भाषा करणाऱ्या कोणालाही सोडले नाही. मग ते दहशतवादी हल्ल्यातील पीडित असोत वा भारताचे परराष्ट्र सचिव! संघर्षामध्ये शस्त्रांचे आणि परकीय शक्तींचे कामच असते वास्तव विकृत करणे. महाभारतात कृष्णाची द्वारका बुडण्यामागे गांधारीचा शाप परकीय होता मात्र सात्यकीने नशेमध्ये आततायी पद्धतीने केलेला कृतवर्म्याचा वध यादवांमध्ये ठिणगी पडण्यास कारणीभूत ठरला. समाजमाध्यमांवरील हे विकृतीकरण करण्याचा कैफ आपल्याच नागरिकांना चढतो तेव्हा हा सात्यकी वेळीच रोखण्याचे धाडस करायला हवे.
विंदा करंदीकर ‘उंट’ या कवितेत खडतर आयुष्याचा प्रवास करीत जीवनाचे अंतिम सत्य म्हणजेच निळा पिरॅमिड शोधणाऱ्या माणसाचे वर्णन करतात. ते म्हणतात ‘निळा पिरॅमिड दिसतो ज्याला, तोच पिरॅमिड बनतो आधी’. माहितीच्या आधुनिक रणांगणावर, सत्य आणि कल्पितातील रेषा धूसर झाली आहे. जसे कवितेतील प्रवासी मृगजळाचा पाठलाग करतो, तसेच आपणही डिजिटल भ्रमात अडकलो आहोत. या भ्रमयुगात प्रत्येकजण जे स्वत:चे आकलन म्हणजेच सत्य मानत चालला आहे. आधी सत्याची जाणीव अनुभवाने, ज्ञानाने व्हायची! आता ती उतावळ्या की-बोर्ड योद्ध्यांच्या व्यूहात फसल्याने होत आहे. तंत्रयुगात सीमेबाहेरून येणाऱ्या क्षेपणास्त्राला रोखण्यासाठी एस–४०० तैनात आहे. गरज आहे ती अस्तनीतल्या निखाऱ्यांना रोखण्याची! हाच ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने धडा!
निर्माता देश – तंत्रज्ञान
भारत ब्राह्मोस, पृथ्वी, डी-४ (ड्रोन डिटेक्ट-डिटर-डिस्ट्रॉय यंत्रणा), अल्फा आत्मघाती ड्रोन्स
रशिया सुखोई ३०, मिग २९, एस -४०० संरक्षण यंत्रणा, शिलका २३ मिमी तोफा.
फ्रान्स मिराज २००० लढाऊ विमाने, राफेल, स्काल्प क्रूझ क्षेपणास्त्रे
अमेरिका एमक्यू-९ बी ड्रोन, एजीएम-८८ क्षेपणास्त्र
इस्रायल हेरॉन ड्रोन, हॅरॉप कामीकाझे आत्मघाती क्षेपणास्त्र, स्पाइस बॉम्ब
पंकज फणसे
तंत्रज्ञान आणि राजकारण यांच्या अंत:संबंधाचे विद्यापीठीय संशोधक
phanasepankaj@gmail.com