एकाच घरातल्या तिघी बहिणींची व्यक्तिमत्त्वे निरनिराळी, पुढे काहीएक योगायोगाने त्यांची ताटातूट आणि त्यांचे जगणेही भिन्न.. हे कथासूत्र कदाचित परिचयाचे वाटेल. पण चित्रा बॅनर्जी दिवाकरूनी यांनी त्यात जे रंग भरले आहेत, ते पाहाता यंदाच्या जागतिक महिलादिनी स्त्रियांविषयीच्या त्यांच्या ‘इंडिपेन्डन्स’ या कादंबरीची चर्चा अधिक होणे स्वाभाविक आहे. दिवाकरूनी यांची याआधीची कथानके महाकाव्यांमधील सीता, द्रौपदी यांच्यावर आधारलेली किंवा इतिहासातून सामग्री घेऊन कल्पिताचा साज चढवलेली असत. त्यापेक्षा ‘इंडिपेन्डन्स’ अगदी निराळी कथा. देशाच्या फाळणीपूर्वी पूर्व बंगालमध्ये राहणाऱ्या तिघा बहिणींची. यापैकी एकीने मुस्लिमाशी लग्न केले, म्हणून आईवडील वा नातेवाईकांनी तिच्याशी बोलणे टाकले आहे. पण बहिणी तिची विचारपूस करतात. फाळणीनंतर मात्र सारेच बदलते. दोघी भारतात, एक ‘पूर्व पाकिस्ताना’त. यापैकी एक बहीण परदेशातही जाते.
तिघींचीही आयुष्ये पूर्णत: भिन्न होऊनही, एकमेकींबद्दल वर्षांनुवर्षे काही माहितीसुद्धा नसूनही अखेर या बहिणींपैकी एकीला ‘स्वातंत्र्या’चा अर्थ गवसतो आणि ती बदलते, अन्य बहिणींचाही ठाव शोधू लागते.. ही कथा १९४६ ते १९५४ एवढय़ाच काळात घडणारी. त्यामुळे या कादंबरीत सरोजिनी नायडू हेही पात्र येते. ‘भारताची नायटिंगेल’ म्हणून परिचित असलेल्या कवयित्री सरोजिनी नायडू या तिघींपैकी प्रियाला भेटतात. तिला गाण्याची प्रेरणा देतात.. रेडिओवरही प्रिया गाते. बहिणींचे आयुष्य इतके सार्थ असेल का, याचा शोध घेते.. पुढे काय होते, याची ही कथा!