कृत्रिमपणा आणि नैसर्गिकपणाची सीमारेषाच लेखिका पुसून टाकते. त्या पुसलेल्या सीमारेषेच्या धुळीतूनच वाचकाला कथानकाची, वाचक म्हणून केलेल्या निरीक्षणांची वाट काढावी लागते आणि वाचकही ते करतो. नायिकेचंच नायिकेशी आणि पर्यायाने कुणाचंही स्वत:शी आपलंच आपल्याशी असलेलं नातं तरी नैसर्गिक राहिलं आहे का, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या पुस्तकाविषयी…
‘बुकर पारितोषिका’च्या यंदाच्या लघुयादीतल्या ‘ऑडिशन’ या कादंबरीच्या लेखिका केटी किटामुरा या कलासमीक्षकही आहेत, हा एरवी अवांतर ठरणारा उल्लेख ही कादंबरी वाचताना/ वाचण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. याआधीच्या दोन कादंबऱ्यांनी (अ सेपरेशन- २०१७ आणि इन्टिमसीज्- २०२१) किटामुरा यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. त्या कादंबऱ्यांशी ‘ऑडिशन’चा काय संबंध आहे, याबद्दल कुठे कुठे वाचता येईलच; पण नुसतं वाचण्यापेक्षा इथं सोबतचं चित्र नीट पाहा.

हे चित्र १९३१ सालचं आहे. रोजच्या जगण्याशी संबंधित विषय चित्रांमध्ये आणण्याचं श्रेय ज्या काळातल्या डच चित्रकारांना पाश्चात्त्य कलेतिहास देतो, त्याच काळातल्या डच चित्रकर्तीनं – ज्युडिथ लेस्टर यांनी रंगवलेलं हे ‘अ प्रपोझिशन’ नावाचं चित्र. त्यात शिवणकाम करणारी एक स्त्री बसली आहे, तिच्या मागे उभा असलेला वयस्कर पुरुष तिला त्याच्या हातातली नाणी दाखवतो आहे आणि बहुधा तिच्याशी काही तरी बोलतोयसुद्धा. पण तिचं त्याच्याकडे फार लक्ष नसावं. असं का आहे हे चित्र? काय प्रसंग घडतोय त्या चित्रात? तिचं लक्ष त्याच्याकडे नाही, कारण त्यांच्यातला हा रोजचाच संवाद आहे म्हणून? की तो पुरुष तिला पैसे दाखवून जे काही बोलतोय ते रोजचं नाही- उलट ‘भलतंसलतं’ आहे- म्हणून ती स्वत:ची सभ्यतेची पातळी राखून दुर्लक्ष करतेय त्याच्याकडे? तो तिचा बाप असेल किंवा गावातून तिच्यासाठी शिवणटिपणाची कामं आणून देणारा कुणी काकामामा असेल; किंवा कुणी लंपट पुरुषही असेल. हे चित्र विकिमीडिया कॉमन्सवर मोठ्ठं करून पाहता येतं. तिला पैसे दाखवण्यासाठी त्यानं उघडलेला हात, त्याच्या चेहऱ्यावरले भाव, तिची खालमानेनं स्वत:च्या शिवणकामाकडेच नजर… हे सगळं नीट दिसतं. पण त्या दोघांमधल्या नात्याचा पक्का अंदाज काही केल्या बांधता येत नाही. त्यामुळे एका चित्राचे दोन्ही ‘अर्थ’ खरे असतील, असं मानावं लागतं; किंवा मला जाणवलेला अर्थच माझ्यासाठी खरा, असं तरी मानावं लागतं.

हेच ‘परफॉर्मन्स’बद्दल खरं असतं. जे काही समोर सादर होतंय ते प्रेक्षक कसं ग्रहण करतात हाच सादरीकरणाचा आत्मा ठरतो, असं केटी किटामुरा यांनी ‘ऑडिशन’च्या पहिल्या भागात ओघानं म्हटलंय. तशाच प्रकारे ओघाओघात ‘ऑडिशन’मध्ये नायिका/ निवेदिका तरुण असताना पॅरिसमध्ये बऱ्याच काळानं तिच्या वडिलांना एका रेस्तराँमध्ये भेटते, वडील आस्थेनं तिची चौकशी करतात, तिला एक दागिनाही देतात – त्या रेस्तराँचा वाढपी (वेटर) या साऱ्याचा मूक साक्षीदार असला तरी त्याच्या डोळ्यामध्ये ‘बऱ्या गटतात पोरी थेरड्याला, पैसा! दुसरं काय?’ असे काहीसे भाव आहेत, असं नायिकेला वाटतं! याचाही ज्युडिथ लेस्टरच्या त्या (१६३१ सालच्या) चित्राशी संबंध आहेच.

नातं कोणाचंही कोणाशीही कसंही असो. ते नातं पाहणाऱ्याच्या नजरेत बदलू शकतं. किंवा खरोखरच नात्यामुळे माणसं बदलू शकतात. ‘ऑडिशन’मधला झेवियर हा तरुण नायिका/ निवेदिकेला सांगतो- ‘एक संसारी, बालबच्चेवाला गृहस्थ असतो. बायकोवर आपलं अज्जिबात प्रेम नाही, याचा मनातून त्रास झाल्यानं सल्ला केंद्रात जातो. तिथं त्याला सांगतात की, तिच्याशी प्रेमानं वागल्यासारखाच वागत राहा- बघ नात्यात फरक पडेल. खरंच झालं की तसं!’

तर ही कादंबरी नात्यांचा टिकाऊपणा, नात्यांमधलं ‘सादरीकरण’ किंवा ‘अभिनय’, नाती बदलत जाणं- त्या बदलत्या नात्यांमुळे माणसंही आतून बदलणं यांबद्दल विचार करायला लावणारी आहे. तिची गोष्ट अतिसंक्षिप्त स्वरूपात ‘विवाहित, मध्यमवयीन, निपुत्रिक अभिनेत्रीला एक तरुण भेटतो. मलाच तुझा मुलगा मान, अशी गळ घालतो. ती त्याला झिडकारतेच, पण नाटकाच्या दिग्दर्शिकेचा सहायक म्हणून हा तरुण नायिकेसमोर अटळपणे असतोच. त्यांची बोलचालही वाढते. तिच्या नवऱ्याचीही त्याच्याशी ओळख होते वगैरे. मग या नवराबायकोला तो तरुण सरळच विचारतो, तुमच्याच घरात राहायला येऊ? काही दिवस? नायिकेचा नवरा तिला ‘हो’ म्हणायला उद्याुक्त करतो.’ हा कादंबरीचा पहिला भाग आणि ‘हा तरुण जणू आपला मुलगाच होता, असं मानणारी नायिका आणि तरुणानं ‘मोठ्ठं काचेचं रायटिंग टेबल आणूयात’ म्हटलं की लगेच ते मागवून बापाचं कर्तव्य निभावणारा तिचा नवरा. पण हा तरुण त्याच्या मैत्रिणीलाही आणतो. बापसदृश मध्यमवयीन घरमालकावरच ‘शॅम्पेन ओतलीस? आता चिप्स आण बघू पटकन आतून आमच्यासाठी…’ असं गुरकावू लागतो. नायिकेचा नवरा स्वत:चं घरमालकपण विसरून, त्या दोघांच्या भजनी लागून येडे चाळे करू लागतो. हे नायिकाच थांबवते. पुन्हा नवराबायको दोघंच राहू लागतात. तो तरुण पुन्हा त्यांना भेटायला येतो, पण त्यानं लिहिलेल्या नाटकाची संहिता घेऊन!’

आपण मराठी वाचक लोक ‘अनेक अकल्पनीय प्रसंगांतून उलगडत जाणारं कथानक’ वगैरे वाचून गब्बर झालेलो असल्यानं आपल्याला पहिल्या घासात ही कादंबरी कदाचित मिळमिळीत वाटेल, युरोपातल्या कच्च्या सॅलडसारखी. या कादंबरीत ‘नात्यांची गुंतागुंत’ तर अजिबातच नाही- आहे ती सगळी मनाचीच गुंतागुंत. तीही एकट्या नायिका- निवेदिकेच्या मनाची. या कादंबरीतल्या त्या तरुणाचं नाव झेवियर, नवऱ्याचं थॉमस, दिग्दर्शिकेचं नाव अॅना आणि झेवियरची मैत्रीण हाना ही सगळीच नावं, आपल्याकडे जशी नावातून पिढी कळते किंवा ‘दगडू आणि वसंतराव’ हे अनुक्रमे कुठल्या जातीचे, काय आर्थिक परिस्थितीतले असणार याचा अंदाज येतो, तसंही काहीच होत नाही. पण तरीही या नावांतून एक फट राहते- अॅना आणि हाना या नावांमधलं उच्चारसाम्य. आपल्या घरामध्ये हाना ही तरुणी आलीय, हाच मुळात नायिकेला झालेला भास असेल का? कारण, झेवियर हा सहायक म्हणून अॅनाच्या कसा भजनी लागलाय हे नायिकेला डाचतंय, पहिल्या भागात. नायिकेचं घर ‘वेस्ट व्हिलेज’मध्ये असल्यामुळे ते शहर बहुधा न्यू यॉर्क असावं. पण या अख्ख्या कादंबरीतून शहर अजिबात जिवंतबिवंत होत नाही. बरेच प्रसंग ज्या घरात घडतात, त्याचंही वर्णन जेवढ्यास तेवढं येतं. अत्यंत नेमके शब्द लेखिका वापरते, मात्र ते सारे शब्द नायिका/ निवेदिकेच्या मन:स्थितीची जाणीवच या ना त्या प्रकारे वाचकाला देणारे असतात. नायिका अभिनेत्री असल्यामुळे त्या चौकटीत ती विचार करणार, हेही लेखिका वाचकाला स्वीकारायला लावते. ‘झेवियरनं अॅनासाठी आणलेला कॉफीचा कागदी कप ज्याप्रकारे धरला होता, त्यातून अॅनाशी त्याचं नातं व्यक्त होत होतं’ अशी वाचकाला स्वाध्याय करायला लावणारी वाक्यंही भरपूर येतात.

प्रसंग मोजकेच आणि काही वेळा फार तपशील देणारे आहेत. मग त्या तपशिलांवर विचार करताकरताच वाचावं लागतं. हळूहळू त्याची सवय होते. उदाहरणार्थ, अॅनाशी नातं व्यक्त करण्यासाठीच जणू कप विशिष्ट पद्धतीनं धरून झेवियर आणि नायिका हे दोघे, नाटकाची तालीम जिथं सुरू आहे त्या थिएटरच्या दारापाशी जातात. मग ते मोठं दार नायिका उघडून धरते. कारण झेवियरच्या दुसऱ्या हातात स्वत:चा कप आहे. दोघेही अॅनाच्या दिशेनं येतात, अॅना म्हणते, ‘अगदी मायलेकच दिसता गं तुम्ही’ – याबद्दल, ‘कदाचित तिलाही, आम्ही एका वंशाचे (जपानी) आहोत म्हणून आमचं सरसकटीकरण केल्याची जाणीव हे वाक्य उच्चारल्यानंतर झाली असेल’ अशा शब्दांत वाचकांना नायिका जाणीव करून देते की : (१) अॅनाला हे मनापासून म्हणायचं नव्हतंच, असं नायिकेला वाटतंय; (२) झेवियरनं आपल्याशी आई-मुलाचं नातं मागितलं तेव्हा आपण ते झिडकारलं खरं, पण आपण दिसायलाही आईमुलासारखे आहोतच की, याची जाणीव लेखिकेला झालीय; (३) अॅना उगाच फक्त वांशिक साम्यावर बोट ठेवून बोलते आहे, अशी समजून करून घेऊन लेखिका झेवियरला (आई होण्यासाठी) दिलेला नकार मनोमन टिकवण्याचा प्रयत्न करत असली, तरी तिचा निर्धार फारसा पक्का दिसत नाही.

हे असं, पानोपानी – वाक्योवाक्यी करायचं. बरं ते आपणच करूनसवरून, दाद मात्र लेखिकेला द्यायची. कारण तिनंच आपणा वाचकांना, ‘हे तर तुम्हालाही सुचू शकेल’ अशी सूचक उत्प्रेरणा (मानसशास्त्राच्या भाषेत ‘अपर्याप्त उद्दीपन’ – इंग्रजीत इनअॅडिक्वेट स्टिम्युलस) दिलेली असते. गोष्ट साधीच आहे. मिळमिळीतही वाटू शकते. पण ‘मध्यमवयीन बाईला एक तरुण दुपारच्या जेवणासाठी बोलावतो’ अशा, पार ऑस्कर वाइल्डच्या ‘द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे’मध्येही आलेल्या प्रसंगापासून ही कादंबरी सुरू होते तेव्हा, अनिच्छेनं ती इथं आलीय- पण मग इच्छा नसताना का आली, इथपासून या कादंबरीतली अपर्याप्त उद्दीपनं वाचकाला चाळवत राहतात. याच पहिल्या प्रसंगात तिचा नवरा त्या रेस्तराँमध्ये येतो. त्यानं या दोघांना पाहिलंय आणि तो निघून गेलाय. त्यानंतरच्या, घरच्या प्रसंगात मात्र ‘तू पुन्हा फसवत नाहीयेस ना मला?’ हे वाक्य नवरा अगदी प्रेमानं उच्चारतो, नायिका अजिबात प्रतिक्रियाच देत नाही किंवा नंतरही झेवियर माझ्याकडे आईचं नातं मागत होता वगैरे कोणताही खुलासा करत नाही. — हे सगळं वाचणारे कोणत्याही संस्कृतीतले असोत, त्यांना विचित्रच वाटेल, पण नवराबायकोतलं हे असं वागणं आजच्या काळात शक्य आहे, हे मान्य होईल.

लेखिकेला सामाजिक निरीक्षणं नोंदवण्याचा सोस नाही. तिला एकंदर पुरुषांबद्दल, एकंदर स्त्रियांबद्दल- नवराबायकोच्या किंवा आईमुलाच्या नात्याबद्दल काहीही ठोस म्हणायचं नाही. तरीही काही निरीक्षणं उरतात. नाटकाची दिग्दर्शिका, लेखिका आणि अभिनेत्री यांचं नातं नियमबद्ध असतं, त्या नात्यांना गृहीत धरूनच नायिका/ निवेदिका वावरत असली तरी एक अभिनेत्री म्हणून तिनं दिग्दर्शिकेकडे आणि लेखिकेकडे कसं पाहिलं आहे, हे दोनतीन प्रसंगांतून वाचकांपर्यंत पोहोचतं. हेही प्रसंग साधेच. दिग्दर्शिका अॅना स्टेजवर चढते आणि टाळी वाजवते. नाटकातला महत्त्वाचा प्रवेश (सीन या अर्थानं) साकारणं नायिकेला पुरेसं जमत नसतं तेव्हा, लेखिका तिच्याशी समजावणीच्या सुरात बोलू पाहते. या तिघीही स्त्रियाच. त्यांच्यातला सत्ता-संबंध नायिकेला मान्य करावा लागतोय. ते ती करते आहे. पण झेवियर जेव्हा तिच्या घरात येऊन राहू लागतो तेव्हा, ती आणि तिचा नवरा हे दोघेही त्याच्या वेळा, त्यानं पाडलेला पसारा हे सारं सहन करत राहतात तेव्हाही तो ‘कोणाची गरज कोणाला आहे’ इतक्या सरळ स्वरूपातला सत्ता-संबंधच असतो का, हाही प्रश्न वाचकाला पडेल.

कादंबरी छापील दोनेकशे पानांचीच असली तरी नायिकेला काय वाटत आहे हेच सांगणारं निवेदन बहुतेक पानांवर वाचावं लागतं. ‘काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई’मध्ये दिवंगत लेखिका कमल देसाई म्हणतात तसं, ‘मला सारखं काही तरी वाटत तरी असे किंवा मी वाटवून तरी घेत असे’- अशा प्रकारची निवेदनं वाचताना नायिकेशी सहानुभूतीचं नातं असल्यास फार बरं पडतं. पण लेखिका अशी की, नायिकेबद्दल वाचकाला सहानुभूतीही वाटू देत नाही. नायिकेचे रागलोभादि षड्रिपू, तिचा स्खलनशीलपणा हे सगळं वाचकाला पुरेपूर समजलेलं असल्यावर काय बाळगणार सहानुभूती? पण ‘सहानुभूतिपात्रता’ या गुणाऐवजी या नायिकेकडे ‘नेहमीपेक्षा निराळेपणा’ ही किमान पात्रता असल्यामुळे आपण ती कादंबरी वाचताना कंटाळत नाही. शब्दांची निवड, चपखलपणा यांसाठी लेखिका काय करते हे कुणी तरी तिला मुलाखतीत विचारावं- आणि ‘एआय’ वगैरे असेल तरी तिनंही त्या प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे द्यावं, इतकी प्रभावी शब्दकळा या लिखाणात आहे.

पण अखेर ही कादंबरी वाचकाला काय देते? दोन परस्परविरोधी शक्यता हे तर कथानकाचं सार. ते पहिल्या भागाच्या अखेरीस आणि दुसऱ्या भागाच्या सुरुवातीला उमगतंच. पण नात्यातल्या कृत्रिमपणा आणि नैसर्गिकपणाची सीमारेषाच लेखिका पुसून टाकते आहे, त्या पुसलेल्या सीमारेषेच्या धुळीतूनच वाचकाला कथानकाची, वाचक म्हणून केलेल्या निरीक्षणांची वाट काढावी लागते आहे आणि वाचकही ते करत आहे. याचा अर्थ असा की, एकटेपणा हाच स्थायी असतो, सर्वच नाती मानलं तर कृत्रिम आणि मानल्यास नैसर्गिक वगैरे असतात, हे वाचकालाही मान्य आहे. हे असं, एकटेपणाच्याच लोलकातून जगाकडे पाहणं यापूर्वीही अस्तित्ववादी लेखकमंडळींनी केलं आहे. पण त्या मंडळींनी किमान काहीएक वैश्विकता दाखवण्याचा प्रयत्न तरी केला. इथं ‘ऑडिशन’मध्ये हे पार साध्या जगण्यापर्यंत आलंय.

अशा साध्या जगण्याला स्वत:तून न्याहाळणाऱ्या या कादंबरीतून इतकाच प्रश्न उरतो की, नायिकेचंच नायिकेशी आणि पर्यायानं कुणाचंही स्वत:शी- आपलंच आपल्याशी- असलेलं नातं तरी नैसर्गिक राहिलं आहे का?