पंकज भोसले

बालकादंबरिकेसारख्या नादमय भाषेतून ‘काळ’विषयक तत्त्वज्ञान ८७ वर्षांचा लेखक मांडतो आहे..

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
IPL 2024 Lucknow Super Gitans vs Gurajat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: चित्त्याच्या चपळाईने बिश्नोईने टिपला झेल, सारेच झाले अवाक; पाहा व्हीडिओ
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

यंदा बुकरच्या लघुयादीत आकाराने सर्वात लहान मानल्या जाणाऱ्या (११६ पाने) ‘क्लीअर कीगन’ यांच्या ‘स्मॉल थिंग्ज लाइक दीज’ या कादंबरीपेक्षा अ‍ॅलन गार्नर यांच्या ‘ट्रिकल वॉकर’ची पाने अधिक (१६०) असली तरीही बालपुस्तकांसारख्या केलेल्या मोठय़ा शब्दरचनेमुळे त्याचे वाचन एका बैठकीचे आहे. केवळ दीड-पावणेदोन तासात संपणारे. पण त्यात योजलेल्या शब्दसामग्रीचा, खमक्या-यमकांनी संपृक्त संवादाचा, ब्रिटिश मिथक -लोककथांचा-संस्कृती संदर्भाचा आणि ‘क्वांटम फिजिक्स’च्या सिद्धांताचा वापर पुस्तक आकळून घेण्यासाठी कैक प्रकारच्या पूरक वाचनाला निमंत्रण देणारा आहे. त्यामुळे आपापल्या शोधवकुबानुसार ‘ट्रिकल वॉकर’चा आस्वाद घेता येऊ शकतो.

गेली साठ-सत्तर वर्षे लहान मुलांसाठी लेखन करणारे अ‍ॅलन गार्नर हे ब्रिटनमधील खूप गाजके बालसाहित्यिक आहेत. १९५७ साली त्यांचे पहिले बालपुस्तक प्रकाशित झाले. सत्तरीच्या दशकापर्यंत तिथे ते बालकांचे लाडके लेखक बनले होते. हे लाडकेपण मराठी बालवाचन संस्कृती दालनाच्या तुलनेत मोजायचे, तर ‘भा. रा. भागवत’ यांच्याइतके. मराठी बाल-कुमार वाचकांसाठी भागवतांनी जे स्वतंत्र आणि जगभरच्या लोककथा- बोधकथा- रहस्यकथा-  विज्ञानकथांचे दालन उघडले. तसलेच काहीसे अ‍ॅलन गार्नर यांनी ब्रिटिश बालवाचकांसाठी करून ठेवले. चेशर या आपल्या वायव्य इंग्लंडमधील प्रांताच्या निसर्गाला- तेथे राहणाऱ्या व्यक्तिसमूहांना- त्यांच्या जगण्याला- त्यांच्या भाषेला ब्रिटिश लोककथांची- मिथकांची पुनर्रचना करून त्यांनी गोष्टीरूपात मांडले. त्यांच्या एका कादंबरीत त्रयीतील पहिली कादंबरी ‘वीअर्डस्टोन ऑफ ब्रिसिंगामेन’ (१९६०), दुसरी ‘द मून ऑफ गोमरा’ (१९६३) आणि तिसरी ‘बोनलॅण्ड’ (२०१२) विचित्र काळ अंतराने आली आहे. ब्रिटिश परिकथांच्या, लोककथांच्या आणि मिथककथांच्या संकलनाचे भरीव कामही त्यांनी करून ठेवले आहे. बुकरच्या दीर्घ यादीमध्ये जेव्हा ‘ट्रिकल वॉकर’चा समावेश झाला, तेव्हा ८७ वर्षांच्या, वयाने सर्वात ज्येष्ठ बालसाहित्यिकाच्या समावेशाने ग्रंथवर्तुळाला आणि अर्थात पुस्तकांवर सट्टेबाजी करणाऱ्या वाचकगणंगांना धक्का बसला. लघुयादीमध्ये देखील हे पुस्तक विराजमान झाले, तेव्हा त्यांचा गोंधळभार आणखी वाढला.

अ‍ॅलन गार्नर यांच्या ‘व्हेअर शॉल वी रन टू’ या पाच वर्षांपूर्वी आलेल्या आत्मचरित्राचे रूपही बालपणीच्या स्मृतिकप्प्यांचे उत्खनन करणारे आहे. त्यात चतुर पकडण्यापासून पक्ष्यांची अंडी पळविण्यापर्यंत आणि विविध प्रकारच्या- रंगांच्या गोटय़ा जमवण्यापासून चित्रांबऱ्या (कॉमिक बुक्स) वाचनापर्यंतचे आणि त्यातून अद्भुतात प्रवेश करणाऱ्या जगाचे संदर्भ आहेत. ‘ट्रिकल वॉकर’ ही कादंबरीदेखील काळाला गोठविलेल्या त्यांच्या आत्मानुभवांचा कोलाज आहे. ज्यात कल्पनारम्यता आहेच पण ‘काळ’ या संकल्पनेचे अजब तत्त्वज्ञान आहे.

कार्लो रोवेली या भौतिकशास्त्रज्ञाच्या ‘ऑर्डर ऑफ टाइम’ या ग्रंथातील तिसऱ्या विभागात ‘टाइम इज इग्नोरन्स’(काल हा अज्ञेय आहे.) या प्रकरणात आपले घडय़ाळ जो घटक मोजते ती ‘काळ’ ही संकल्पना म्हणजे काय, काळ हा नेहमी पुढेच का जातो- पाठीमागे का वळत नाही, यावर विस्ताराने सैद्धान्तिक चर्चा केली आहे. रोवेलीच्या या प्रकरणशीर्षकाचा वापर गार्नर यांनी आपल्या पुस्तकाच्या आरंभी दिला आहे. लहानपणी तीन वेळा मृत्यूच्या दाढेत गेलेल्या गार्नर यांनी ‘टाइम इज इग्नोरन्स’ ही संकल्पना मी आयुष्यभर जगत असल्याचे एका मुलाखतीत म्हटले आहे. मृत्यूनजीकच्या आजारपणात, त्या गोठलेल्या काळात भोवताली घडत असलेल्या घटनांचे जाणीव- नेणिवेच्या पातळीवरचे आकलन म्हणजे गार्नर यांनी कादंबरीतून उकललेला ‘ट्रिकल वॉकर’ आहे.

‘ट्रिकल वॉकर’चा नायक आहे जोसेफ कोपॉक हा लहानगा. त्याचा एक डोळा शक्तिहीन आहे. या अशक्त डोळय़ात बळ यावे म्हणून दुसरा डोळा झापड लावून बंद करण्यात आला आहे. त्याचे पालक नाहीत, तो राहात असलेल्या घरात आणि गावातही निर्जनता व्यापलेली आहे. प्रत्येक दुपारी खिडकीतून दिसणाऱ्या खोऱ्यातून एका बाजूलाच आग ओकत जाणारी रेल्वे त्याला दिसते. ती एकाच बाजूला जाते, उलटय़ा बाजूने जाताना का दिसत नाही, हा प्रश्न सुरुवातीला त्याला पडत नाही. कादंबरीला सुरुवात होते ती ‘ट्रिकल वॉकर’ नामक वस्तू-विनियमात व्यवहार करणाऱ्या व्यक्तीच्या आगमनानंतर. जुन्या कपडय़ांच्या मोबदल्यात भांडी-वस्तू देणाऱ्या बोहारणीसारखे याचे स्वरूप. हातगाडीवरून वस्तूंच्या बदल्यात दुसरी वस्तू देण्याची जाहिरात करत फिरणारा हा ‘बोहारडा’ निर्जन गावात जोसेफचे लक्ष वेधून घेतो. जोसेफने दिलेल्या फाटक्या कपडय़ांचे जोड आणि कोकराच्या हाडाच्या मोबदल्यात औषधाने भरलेली बरणी आणि फरशी घासण्याचा दगड (डाँकीस्टोन) ट्रिकल वॉकर त्याला सुपूर्द करतो. त्यानंतर सुरू होतो अद्भुताचा प्रवास. या प्रवासात ‘ट्रिकल वॉकर’ सातत्याने जोसेफला भेटायला येत राहतो. संवादाची यमकी आणि चमत्कृतीपूर्ण मांडणी करीत राहतो.

ट्रिकल वॉकरच्या भेटीनंतरच घरापाठच्या दलदलीत जोसेफला थिन अर्मेन नामक तत्त्वचिंतकाच्या थाटात बोलणारा वस्त्रशून्य मानव दिसतो. जोसेफच्या सशक्त आणि बंद केलेल्या डोळय़ाने दिसू शकणारे वास्तव जग आणि उघडय़ा असलेल्या दुर्बल डोळय़ातून दिसणारे धूसर पण कल्पित जग यांच्या वर्णनांची ही मालिका आहे. त्यामुळे खिडकीतून दुपारी इंजिनातून धूर ओकणारी एकाच बाजूने जाणारी रेल्वे आहे की सूर्य, याचा शोध वाचकाला घ्यावासा वाटतो. हा जोसेफ खूप साऱ्या ‘नॉकआऊट’ कॉमिक बुक्समध्ये रमणारा लहानगा आहे. ज्याचा खरा पिंड पक्ष्यांची अंडी पळविण्याचा आणि जंगलात बेचकीत गोटय़ा धरून शिकार करण्याचा आहे. त्याच्याकडे पानेरीपासून विविध रंगांच्या गोटय़ा आहेत. तोंडात एखादी गोटी घेऊन गरगर फिरवण्याचा (गेल्या कैकपिढय़ांतील) गोटीबाजांचा जागतिक चक्रमपणा आहे. शिवाय प्रत्येक गोटीबाजाकडे असते, तशी एखादी खास टप्पू, डप्पर गोटीसारखी सर्वोत्तम गोटीदेखील आहे. लहान असताना हे खेळप्रकार करणाऱ्या आणि गोष्टीची चित्तचक्षु चमत्कारिक पुस्तके वाचणाऱ्या वाचकांना जोसेफची कथा अधिक आपलीशी वाटेल. कॉमिक बुकमधील कहाणीतला भाग जोसेफच्या धाडसांशी जोडलेला दाखवताना अ‍ॅलन गार्नर यांनी खूप गमती केल्यात. कुण्या काळी कॉमिक बुक वाचणाऱ्यांना इथल्या कथेमध्ये चालणाऱ्या भागातील उत्कंठावर्धक कॉमिकबुकीय भाषेच्या शैलीशी जुळवता येईल. डोळे तपासणीसाठी शब्द जाणून घेण्याचा एक विनोदी प्रकार आणि अक्षराचा टंकाकार (फॉण्ट) बदलून दिलेला वाचन परिणामही कळला तर खूप आवडून जाण्यासारखा. इतरांना कितीतरी संदर्भासाठी ‘गूगल’ हे विश्वकोशासारखे वापरणे भाग पडेल.

‘इराम, बिराम, ब्रॅण्डन बो,

व्हेअर डिड ऑल द चिल्ड्रन गो?

दे वेण्ट टू इस्ट, दे वेण्ट टू द वेस्ट.

दे वेण्ट व्हेअर द ककू हॅज इट्स नेस्ट’

यासारखी ट्रिकल वॉकरची ब्रिटिश लोककथांमधून आणलेली स्वगते कादंबरीभर गार्नर यांनी पेरलेली आहेत. ‘टिकटीबू’ (उत्तम-भारी), ‘वाँकी’ (वाकडय़ा), ‘स्क्विफी’ (भुरकट-अस्पष्ट नजरेसाठी वापरला जाणारा) ‘डाफ्ट’ (मूर्खोत्तम) अशा बालकथांमध्ये येणाऱ्या शब्दांची पखरण आहे. ती वाचताना बालपुस्तके भाषावहनासाठी किती उपयुक्त असतात, याचा प्रत्यय वेळोवेळी येत राहतो (अभिजात मराठी बालसाहित्याचे वाचन जवळ-जवळ संपत चाललेल्या दोन दशकांच्या कालावधीतही जे सजग पालक आपल्या मुलांना इथल्या मातीतील पुस्तके वाचायला लावत आहेत, ती अल्पसंख्यक प्रमाणातली वाचकपिढीच इथल्या मूळ भाषिक संस्कृतीच्या वहनाची प्रक्रिया पुढे नेऊ शकणार आहेत. याची जाणीवही हे वाचताना येत राहते.).

कादंबरीची संदर्भ जुळवणी आणि पूरक वाचन म्हणून ‘व्हेअर श्ॉल वी रन टू’ या आत्मचरित्राचा आधार घेतला, तर ‘ट्रिकल वॉकर’च्या रूपात गार्नर यांनी १९४० सालातील आपल्या बालपणीतला गोठलेला भवताल पुन्हा जिवंत केल्याचे लक्षात येईल. ‘ट्रिकल वॉकर’ बुकरच्या स्पर्धेत यंदा विजेते ठरले, तर गार्नर यांनी या बालकथेतून मांडलेल्या प्रयोगांचा तो सन्मान असेल. पण ते प्रयोग समजून घेण्यासाठी साधारण वाचकांना गार्नर यांच्या लेखनटप्प्यांचे भरपूर संशोधन करावे लागेल. ही प्रकिया टाळली, तर ‘ट्रिकल वॉकर’ हे एक अवघड वाचन बनण्याची शक्यता अधिक.