जे. ब्रॅडफोर्ड डिलाँग (अर्थशास्त्राचे प्राध्यापक, कॅलिफोर्निया विद्यापीठ)
डॅन वांग माझे मित्र आहेत, पण ते मित्र नसते, तरी माझी त्यांच्याविषयीची मते वेगळी असण्याची शक्यता नव्हती. वांग सात वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब चीनच्या र्नैऋत्येकडील युनान येथून स्थलांतरित झाले. पुढे ते विविध देशांत राहिले आणि आजही त्यांचे स्थलांतर सुरूच आहे. त्यामुळेच चीन असो, कॅनडा वा अमेरिका वांग एकाच वेळी ‘आतले’ आणि ‘बाहेरचे’ ठरतात. त्यांना चीन आणि अमेरिका हे दोन्ही देश झपाटलेले आणि विक्षिप्तही वाटतात. दोन्ही देशांत प्रवास केलात, तर तुम्हाला अशी अनेक ठिकाणे दिसतील जी भ्रमिष्ट भासतील, असे वांग म्हणतात. हे म्हणताना, त्यात टीकेचा सूर मात्र नसतो. कॅनडात जी शांततेची अनुभूती येते ती चीन आणि अमेरिकेत येत नाही, असे त्यांचे मत आहे. त्यांना हे दोन देश जागतिक बदलांच्या इंजिनांचे प्रतिनिधी वाटतात.

‘ब्रेकनेक’मध्ये ते म्हणतात, चीन हा हातोडा चालवणाऱ्यांचा देश आहे, तर अमेरिकेत न्यायालयाचा हातोडा (न्यायाधीशांचा दंडक) चालतो. चीनचे तज्ज्ञ अभियंते काँक्रीट, स्टील वापरून समस्या सोडवतात. तिथे त्यांचे यश रस्ते, पूल, वीजनिर्मिती प्रकल्प आणि अन्य अजस्रा पायाभूत सुविधांत मोजले जाते. आणि त्याच वेगाने समाजातही बदल व्हावेत, असा आग्रह धरला जातो. त्यांचे एकल अपत्य धोरण, तिबेटी आणि झिनजियांगमधील लोकांवरील अत्याचार ही त्याचीच उदाहरणे! चीनमधील तंत्रशाही शिस्त, नियंत्रण आणि दृश्य कामगिरीला महत्त्व देते.

पण अमेरिका आणि चीनमध्ये काही मूलभूत साम्यस्थळे आहेत. – चिनी लोकांची तुलना जपानी आणि कोरियन लोकांशी किंवा अमेरिकन लोकांची कॅनेडियन आणि युरोपीय लोकांशी केली तर हे लक्षात येते. दोन्हीकडे लोक अस्वस्थ आहेत आणि नावीन्याच्या शोधात आहेत. दोन्हीकडे उद्याोजकांविषयीचे कौतुक आणि निष्ठुर भौतिकवाद याची सरमिसळ झालेली दिसते. दोन्हीकडे लोक अरसिकता सहन करू शकतात, त्यांना स्पर्धा आवडते, ते व्यावहारिक आहेत आणि अनेकदा ते काम पूर्ण करून घेण्याच्या घाईत असतात. दोन्ही देशांत झटपट तंदुरुस्ती आणि सहज श्रीमंतीचे मार्ग सुचवणाऱ्यांना तोटा नाही. दोन्ही देश तांत्रज्ञानाच्या प्रेमात आहेत आणि आपल्या मर्यादा ओलांडणारे अजस्रा प्रकल्प त्यांना आकर्षित करतात. दोन्ही देशांतील उच्चभ्रूंमध्ये देशाभिमानाची भावना आहे.

अमेरिका असो वा चीन पूर्वी लावली जाणारी ‘समाजवादी’, ‘लोकशाही’, ‘नवउदारमतवादी’ ही जुनी बिरुदे आता त्यांना शोभेनाशी झाली आहेत. चीन वेगाने भौतिक प्रगती करत आहे, मात्र त्यासाठी मानवी हक्कांची किंमत मोजण्यात आली आहे. तेथील लेनिनवादी तंत्रशाही समाजव्यवस्थेत प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करणारी आहे. अमेरिका मानवी हक्कांच्या निश्चितीत आणि ते सिद्ध करण्यात प्रमाणाबाहेर वेळ घालवते. त्यामुळे ती कोर्टकचेरीत प्रचंड अडकून पडलेली नाकाराधिकारशाही होऊ लागली आहे.

मानवाधिकारांचा अधिक आदर केल्यास चीनला फायदा होईल. असे असले तरी, डोनाल्ड ट्रम्प यांना क्षी जिनपिंग यांच्या वरचे स्थान देणारी कोणतीही व्यवस्था चीनमधील उच्चभ्रूंच्या पसंतीस उतरत नाही. अमेरिकेने विशेषत: एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात अभियांत्रिकीच्या क्षेत्रात महत्त्वाकांक्षी काम केले होते, आता त्यांना तेच स्थान पुन्हा मिळवण्याची गरज आहे. सिलिकॉन व्हॅलीत शोधांना महत्त्व असल्याचे दावे केले जातात, मात्र तिथे शोधांच्या वाटेत कायद्यांच्या साहाय्याने अनेक खंदक खोदून ठेवण्यात आले आहेत. सिलिकॉन व्हॅली किंवा पर्ल रिव्हर डेल्टाने (हाँगकाँमधील तंत्रज्ञान आणि उत्पादनाचे केंद्र) अभियांत्रिकी आणि कायदेशीर हक्कांत समतोल साधल्यास त्यांच्या प्रगतीला सीमा राहणार नाहीत.

‘ब्रेकनेक’ खास ठरते, ते त्यातील सिद्धांत, आर्थिक विदा, समाजशास्त्र आणि वैयक्तिक निरीक्षणे यांच्या मिलाफामुळे. चीनविषयी आज ज्या चर्चा सुरू आहेत त्या हस्ते परहस्ते मिळालेल्या ऐकीव माहितीवर आधारलेल्या आहेत. पण वांग यांनी हे सारे घडताना पाहिले आणि अनुभवले आहे. ते स्वत:च त्या कथेतील एक पात्र आहेत. चीन, अमेरिका आणि कॅनडामधील खाद्यासंस्कृती, तेथील रस्ते, शहरे आणि राजकारणाची त्यांना माहिती आहे. त्यामुळेच त्यांच्या लेखनात ‘आतले’ स्थानिक आणि ‘बाहेरचे’ स्थलांतरित अशा दोन्ही वर्गांचा अनुभव आणि दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो.

एकविसाव्या शतकातील जगातील सर्वांत तातडीचे आणि आव्हानात्मक काम म्हणजे चीन आणि अमेरिकेतील सर्वोत्तम गोष्टी एकत्र आणणे आणि दोन्ही देशांतील सर्वांत वाईट गोष्टी टाळणे. ‘ब्रेकनेक’ जितके युक्तिवादासाठी महत्त्वाचे आहे तितकेच या दोन्ही देशांतील वास्तवाधारित बातमीदारीसाठी, संयमी मांडणीसाठी, बांधकामाच्या हातोड्याप्रमाणेच न्यायालयाच्याही हातोड्याचे परिणाम जाणून घेण्यासाठी आणि या परिणामांवरील चिंतनासाठीही…

हा लेख ‘प्रोजेक्ट सिंडिकेट’च्या सौजन्याने. कॉपीराइट : http://www.project-syndicate.org