Cogito ergo sum.
– René Descartes
सपाट पृष्ठभागावर काल्पनिक आडव्या -उभ्या रेषांच्या आधारे एखाद्या बिंदूचं स्थान निश्चित करण्याच्या ‘कार्टेशियन कोऑर्डिनेटस्’ प्रणालीचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ‘कार्टेशियन’ हा शब्द माहीत असतो. पण हा शब्द मुळात ‘देकार्त’ या शब्दाचं विशेषणरूप आहे. फ्रेंच तत्त्वज्ञ रने देकार्त (१५९६- १६५०) यानं ही प्रणाली प्रकाशित केली, म्हणून ती त्याच्या नावानं ओळखली जाते. देकार्तनं गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, प्रकाशशास्त्र सारख्या क्षेत्रातही सिद्धांत मांडले. पण तत्त्वज्ञानात ऐतिहासिक योगदानामुळे आधुनिक चर्चाविश्वाच्या केंद्रभागी त्याला स्थान मिळालं. आज ‘कार्टेशियन’ हा शब्द आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. आधुनिकतेच्या प्रकल्पाला ‘कार्टेशियन प्रकल्प’ म्हटलं जातं.
खरं तर, १७ व्या शतकात देकार्तसह गॅलिलिओ, गॅसन्डी व थॉमस हॉब्ससारखे अनेक विचारवंत होऊन गेले. त्यांच्याशी देकार्तचा विपुल पत्रव्यवहार होता. त्याचा समग्रलक्ष्यी महत्त्वाकांक्षी प्रकल्प मात्र मानवी व्यवहाराच्या प्रत्येक क्षेत्राचं अधिष्ठान, स्वरूप आणि प्रयोजन बदलून टाकणारा आकृतीबंध ठरला. प्रबोधनयुगातले (१८ व्या शतकातले) रूसो, व्होल्टेर, दिदरोसारखे विचारवंत फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक समजले जातात; तर रने देकार्त पितामह ठरतो. कारण फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे राजकीय पटलावर झालेला कार्टेशियन ‘ताबुला राझा’चा (पाटी कोरी करून नव्यानं सुरुवात) ऐतिहासिक प्रयोग! त्यामुळे १९व्या शतकातला प्रख्यात राजकीय विचारवंत आलेक्सी द तोकव्हिल लिहितो की फ्रेंच राज्यक्रांती घडवून आणणारे फ्रेंच जॅकोबिन हे ‘देकार्तचे अनुयायी’च होते!

प्राचीन ग्रीक परंपरेतल्या सॉक्रेटिस- प्लेटो- अॅरिस्टॉटल या त्रयीनंतर २००० वर्षांनी रने देकार्तनं क्रांतिकारक ज्ञानमीमांसा करून स्वयंभू मानवतावाद ही संकल्पना विशद केल्यामुळे तो आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून मान्यता पावला. रनेसॉन्सच्या शेवटानंतर, १७ व्या शतकारंभी देकार्तनं मृतप्राय तत्त्वज्ञानाला ठोस आधुनिक अधिष्ठान दिलं. कार्टेशियन तत्त्वज्ञानाचा समग्रपणे परामर्श इथं घेणं अशक्य असलं तरी ‘Omnibus dubitandum’ आणि ‘Cogito ergo sum’ या दोन मूलभूत कार्टेशियन तत्त्वांच्या आधारे त्याच्या वैचारिक हस्तक्षेपाचं ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करता येतं. Omnibus dubitandum अर्थात ‘सगळंच प्रश्नांकित केलं पाहिजे!’ कारण ‘शंकाच खऱ्या ज्ञानाची जननी’ या ज्ञानमीमांसाक तत्त्वाचा अवलंब करून देकार्तने अंतर्विरोधांनी भरलेल्या तत्कालीन ज्ञानव्यवहाराची साफसफाई केली. या जहाल पण अत्यावश्यक ‘ताबुला राझा’च्या कृतीनंतर देकार्त तत्त्वज्ञानाची कोनशिला ठरलेल्या Cogito ergo sum म्हणजे ‘मी विचारशील आहे म्हणून मी आहे’ या आधारभूत तत्त्वापर्यंत टप्प्याटप्प्यानं आला.

पहिल्या चिकित्सक अभावरूप बिंदूपासून दुसऱ्या रचनात्मक बिंदूपर्यंत देकार्त कसा पोहोचला, या ज्ञानमीमांसात्मक प्रयोगाची परिणती कशा प्रकारे कार्टेशियन मानवतावादात झाली आणि हा स्वयंभू विवेकी मानवतावाद कशाप्रकारे आधुनिकतेचा आधारस्तंभ बनला, याची चर्चा प्रस्तुत लेखात करू. पण आधी देकार्तविषयी थोडं : देकार्तचं युगप्रवर्तक लिखाण ओघवत्या स्वकथनात्मक शैलीत, प्रामुख्यानं फ्रेंच भाषेत आहे. बर्ट्रांड रसेल लिहितो की, देकार्तनं तत्त्वज्ञानाची मांडणी अतिशय वाचनीय आणि संवादी पद्धतीनं केली आहे. त्यात तो भूतकाळातील संदर्भांचा दाखला देताना दिसत नाही. जणू सगळं नव्यानं रचत असावा!

देकार्तचा जन्म १५९६ मध्ये उमराव वर्गात फ्रान्सच्या ब्रिटनी प्रांतात झाला. एक वर्षाचा असतानाच आई वारली. वडिलांनी दुसरं लग्न केलं, देकार्तचं बालपण आजोळी गेलं. लहानपणापासूनच शरीरानं अशक्त देकार्त बुद्धीनं मात्र सशक्त होता. चिंतनशील स्वभाव असल्यानं त्याला le petit philosophe म्हटलं जाई. त्याच्या अभिजात शिक्षणाची सुरुवात ला-फ्लेश येथील जेजुइट कॉलेजमध्ये झाली. नाजूक प्रकृतीमुळे त्याला कडक नियमांपासून सूट होती. इतर विद्यार्थ्यांसारखं पहाटेच उठण्याऐवजी देकार्त ११/१२पर्यंत अंथरुणातच चिंतन करत आणि स्वप्नं पाहात असे. त्याच्या विलक्षण प्रतिभेविषयी म्हटलं जातं की कॉलेजमध्ये गणितातल्या एखाद्या अवघड प्रश्नाचं उत्तर सापडत नसे तेव्हा उशिरापर्यंत झोपा काढणाऱ्या देकार्तकडे विद्यार्थ्यांना पाठवलं जायचं. इथं आठ वर्षं अभिजात शिक्षण घेतल्यानंतर मात्र देकार्तला प्राचीन ग्रीक आणि रोमन परंपरांत त्रुटी आढळून आल्या. मध्ययुगीन स्कोलॅस्टिक भाष्यकार तर रटाळच वाटले. गणित मात्र त्याचा आवडीचा प्रांत होता. गणित म्हणजे मानवी बुद्धीचं शुद्धरूप! काही काळ त्याने कायद्याचा अभ्यासही केला. पुस्तकी शिक्षण असमाधानकारक वाटल्यानं शेवटी त्यानं थेट ‘जगाच्या पुस्तकाचा’ अनुभव घ्यायचं ठरवलं. त्यासाठी देकार्त पुढली दहा वर्षं वडिलोपार्जित संपत्तीवर, युरोपभर भटकंतीचं जीवन जगला. प्रवास आणि एकांत या दोन आवडत्या गोष्टींशी देकार्तने आयुष्यभर कधी तडजोड केली नाही. पॅरिसच्या समाजजीवनाचा त्याला वैताग असल्यानं त्यानं १६२९ मध्ये हॉलंडमध्ये बस्तान हलवण्याचा निर्णय घेतला. त्याला कल्पना होती की त्याच्या डोक्यात चालणारे क्रांतिकारक विचार कॅथोलिक पॅरिस खपवून घेणार नाही. त्याच दरम्यान गॅलिलिओचा खटला तो जवळून अनुभवत होता.

कार्टेशियन डाउट

भटकंती, एकांत आणि उत्कट चिंतनाच्या काळात पुस्तकी शिक्षणाची कठोर चिकित्सा केल्यावर त्याची खात्री पटली होती की अभिजात शिक्षण घेऊनही वास्तवात त्याला काहीही ज्ञात नव्हतं. ज्ञान म्हणून त्याने जे काही अवगत केलं होतं ते अंतर्विरोधात्मक, भ्रामक, संशयास्पद वाटत होतं. अशा मन:स्थितीत वयाच्या ३३व्या वर्षी देकार्त समग्र ज्ञानाला Omnibus dubitandum ची कसोटी लावून आधुनिक ज्ञानाच्या पायाभरणीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतो. हॉलंडमध्ये राहून (१६२९ ते १६४९) विविध विषयांवर लेखन करतो. त्याची ज्ञानमीमांसा ‘डिस्कोर्स ऑन द मेथड’, ‘मेडिटेशन ऑन फर्स्ट फिलॉसफी’ आणि ‘प्रिन्सिपल्स ऑफ फिलॉसफी’ या तीन पुस्तकांतून विशद होते.

मनुष्य हा सभोवतालच्या निसर्गाचा अविभाज्य भाग असतो. मात्र मनुष्याची निसर्गातीतता म्हणजे मनुष्य आणि सभोवतालचं जग यातलं अंतर. या अंतरातच मनुष्याच्या माणूसपणाचा कस लागतो! ज्ञान वा ज्ञानाच्या नावानं स्वीकारलेल्या धारणांच्या आधारे मनुष्य हे अंतर कापून जगाशी नातं जोडत असतो. जगाविषयीच्या ज्ञानाच्या गुणवत्तेवर मनुष्य आणि जगातील नात्याची सुदृढता अवलंबून असते. देकार्तला जग आणि मनुष्य यांतला तत्कालीन ज्ञानात्मक दुवा संशयास्पद वाटला.

कार्टेशियन कोजितो

कार्टेशियन असणं म्हणजे तार्किक, स्पष्ट, नेमकं काटेकोर असणं! साध्या गोष्टींकडून क्लिष्ट गोष्टींकडे टप्प्याटप्प्यानं घेऊन जाणारं देकार्तचं पद्धतीशास्त्र हा तर्कशास्त्राचा वस्तुपाठ मानला जातो. मांडणी करताना एखादा मुद्दा उपस्थित केल्यावर देकार्त संभाव्य आक्षेपांचं निरसन करून कल्पित वाचकांची संमती घेतल्याशिवाय पुढे सरकत नाही. उदा.- ज्ञानाच्या नावानं स्वीकारलेल्या अनेक धारणा खोट्या आढळून येतात. मग खरं काय आणि खोटं काय यात भेद करणं कठीण असतं, ही गोष्ट सर्वमान्य आहे. अशा स्थितीत सगळंच ज्ञान म्हणून स्वीकारायचं की सगळंच नाकारायचं? देकार्तला दोन्ही भूमिका सोप्या आणि अयोग्य वाटतात. बुद्धीच्या कसोटीवर तपासून जे टिकेल तेवढ्याचाच ज्ञान म्हणून स्वीकार करायचा, या तिसऱ्या भूमिकेचा तो त्याच्या ‘डिस्कोर्स ऑन द मेथड’ मध्ये पुरस्कार करतो. पण जोवर ज्ञानाची कसोटी पूर्ण होत नाही तोवर ज्ञानाला संशयास्पदच मानलं पाहिजे. देकार्त हेही नमूद करतो की खात्रीशीर ज्ञान हाती लागत नाही तोवर हाती असलेल्या ‘संशयास्पद’ कामचलाऊ ज्ञानाचा (la morale provisoire) वापर करावा.

थोडक्यात, कार्टेशियन डाऊट एक पद्धतीशास्त्रीय हत्यार आहे. देकार्तला कल्पना असते की अस्तित्वात असलेलं समग्र ज्ञान तपासणं अशक्य आहे. त्यामुळे तो मनुष्याचं ज्ञान कुठून येतं सरळ त्या उगमस्थानांना रॅडिकल डाऊटची कसोटी लावतो. त्यात परंपरा, धर्मशास्त्रं बाद ठरतात! नंतर तो मानवी इंद्रियांच्या ज्ञानक्षमतेकडे वळतो कारण दैनंदिन जीवनात इंद्रियांद्वारेच मनुष्य अर्थ लावत जगत असतो. देकार्त दाखवून देतो की ही इंद्रियं अनेकदा फसवतात. उदा.- पाण्यात बुडालेल्या काठीचा बुडलेला भाग वाकडा दिसतो. आजारी माणसाच्या जिभेला चव कळत नाही… असं असेल तर, आपलं संपूर्ण अस्तित्वच संशयाच्या गर्तेत सापडतं! आपण जागे आहोत, की झोपलेले, की जीवनच एक दीर्घ स्वप्न आहे, हे कळण्याचा खात्रीशीर मार्ग उरत नाही! अशा प्रकारे तत्कालीन ज्ञानाच्या चिकित्सेपासून सुरू झालेला रॅडिकल कार्टेशियन डाऊटचा प्रवास जहाल रूप धारण करत जगाच्या आणि प्रश्न उपस्थित करणाऱ्या देकार्तच्या अस्तित्वापर्यंत येऊन ठेपतो! देकार्त त्याच्या अज्ञेयवादी सॉक्रेटिक क्षणाविषयी लिहितो, ‘मला आश्चर्याचा इतका धक्का बसला की जणूकाही पायाखालची जमीन सरकल्यामुळे पाय टेकणं अशक्य झालं. अशात, पोहून स्वत:ला तरगंत ठेवण्यासाठीही आधारच नव्हता.’

हा वैचारिक प्रयोग करताना देकार्तला जाणवतं की तो सगळ्या गोष्टींच्या अस्तित्वाविषयी शंका उपस्थित करू शकतो. मात्र शंका उपस्थित करताच येत नाही अशी एक बाब उरते ती म्हणजे, शंका उपस्थित करण्याची कृती! कारण शंका उपस्थित करण्याच्या कृतीवरची शंकासुद्धा शेवटी शंकाच ठरते. लॅटिन cogito या संकल्पनेत शंका उपस्थित करणं, चिंतन, विचार करणं इ. बौद्धिक कृतींचा अंतर्भाव होतो. थोडक्यात, कार्टेशियन डाऊट वाटेतल्या सर्व तकलादू गोष्टींची पाटी कोरी करून ‘कोजितो’ अर्थात मानवी विचारशीलतेपर्यंत येऊन पोहोचतो. हा निष्कर्ष म्हणजे cogito ergo sum.

देकार्त बौद्धिक तत्त्व (res cogitans) आणि भौतिक तत्त्व (res extensa) अशी विभागणी करून भौतिक तत्त्वाला संशयास्पद ठरवतो. मानवी विचारशीलतेला ज्ञानमीमांसेचा अंतिम आधार बनवतो. स्वभान असलेला स्वायत्त विवेकी ज्ञाता आणि कर्ता मानव हाच आधुनिकतेचं एकक ठरतो. कार्टेशियन प्रकल्पातले व्यक्तिवादाची संकल्पना, बुद्धिवाद, माइंड/मॅटर यांची फारकत हे भाग दूरगामी (दुष्)परिणाम करणारेच ठरले. त्यामुळे परंपरावाद, मार्क्सवाद, स्त्रीवाद, पर्यावरणवाद वा उत्तर आधुनिकतेतले अनेक वाद कार्टेशियन प्रकल्पाला धारेवर धरतात. त्याविषयी पुढल्या लेखात.