राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या गटाचे नेते अजित पवार यांनी दिल्लीत दिवाळी साजरी केली. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच दिवाळी आहे. नव्या घरात संसार थाटल्यावर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे लागतात. त्यांचा मान राखला नाही तर तिजोरीच्या चाव्या मिळत नाहीत. त्यामुळं दादा चाव्या मिळवण्यासाठी आशीर्वाद मागायला आले होते असं म्हणतात. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पक्षासंदर्भात सुनावणी असल्यामुळं त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आधीच दिल्लीला आले होते. दादांसोबत त्यांचे सहकारी प्रफुल पटेल होते. तेव्हाही प्रफुलभाई शरद पवारांसोबत सगळीकडे जात असत. त्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाच्या भेटीगाठींचाही समावेश असे. आताही प्रफुलभाई त्यांच्या भेटगाठी घेत आहेत पण, दादांसोबत. व्यक्ती बदलली इतकंच. उपमुख्यमंत्री झाल्यापासून दादांची ही तिसरी दिल्लीवारी होती. प्रत्येक वेळी ते एकटेच आले. राज्याला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या एकत्रित दिल्लीवारीची सवय होती. आता दोन उपमुख्यमंत्री झाले असले तरी तिघे कधी एकत्र दिल्लीला आलेले दिसले नाही. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी मोदी-शहांशी वेगळी चर्चा केली. उपमुख्यमंत्री झाल्यावर आभार मानण्यासाठी दादा दिल्लीत येऊन अमित शहांना भेटून गेले होते. त्यानंतर एनडीएच्या बैठकीसाठी दादा आले होते. तेव्हा त्यांनी मोदी-शहा-नड्डांशी अशोका हॉटेलमध्येच वेगळी भेट घेतली होती. ऐन दिवाळीत दादा तिसऱ्यांदा दिल्लीला आले. अमित शहांशी झालेल्या भेटीची दोन छायाचित्रे दादांच्या गटाकडून प्रसिद्ध केली गेली. दुसऱ्या छायाचित्रामध्ये शहांच्या घरी प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि त्यानंतर अजित पवार बसलेले दिसतात. शहांच्या शेजारी प्रफुल पटेल बसलेले होते. दादा मात्र शहांपासून थोडं अंतर राखून बसलेले होते. छायाचित्रामध्ये प्रफुल पटेल, तटकरे यांचं स्मितहास्य करत असताना दादा मात्र गंभीरच दिसत होते. दादांना डेंग्यू झाला होता, ते आजारातून बरे होत आहेत. कदाचित थोडा थकवाही जाणवत असेल. ते काहीही असो दादांच्या दिल्लीवारीमुळं राज्यातील राजकीय दिवाळी तेजोमय झाली हे खरं.

देवांशी नातं..

कुठल्याही निवडणुकीत जोडली गेली नसतील इतकी देवांची नावं यावेळी काँग्रेसशी जोडली जात आहेत. मध्य प्रदेशात कमलनाथ यांनी बजरंगबलीचं नाव घेतलं होतं. आपण हनुमानाचे भक्त असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. छत्तीसगढमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महादेव अ‍ॅपवरून टीका केली. बघेलांनी महादेवालाही सोडलं नाही असा टोमणा त्यांना मारला. काँग्रेसने मध्य प्रदेशातील महाकालेश्वर मंदिरावरून भाजपवर हल्लाबोल केला. या मंदिरातील सप्तऋषींची मूर्तीभंग झाल्यावरून वाद रंगला होता. काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी वेगवेगळय़ा मंदिरांमध्ये जात आहेत. ते शंकराचे भक्त असल्याने ते केदारनाथ मंदिरात गेले होते. प्रियंका गांधी-वाड्रादेखील मंदिरांमध्ये जाऊन आशीर्वाद घेत आहेत. उत्तरेच्या राजकारणात भाजपप्रमाणं काँग्रेसलाही देवांशी नातं जोडावं लागत आहे.

chavadi political situation in maharashtra ahead of lok sabha election diwali organized by political leaders
‘सत्ता खूप वाईट, नंतर कुणी चहा सुद्धा पाजत नाही’, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत
Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…

अखेरचा गोंधळ

संसदेचं हिवाळी अधिवेशन आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी होणारं अखेरचं पूर्ण कालावधीचं अधिवेशन असेल. फेब्रुवारीत होणाऱ्या हंगामी अधिवेशनात लेखानुदान सादर होईल. निवडणुकीनंतर जून २०२४ मध्ये पावसाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन एकत्रित घेतलं जाईल. नव्या सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाईल. मोदी सरकारच्या दुसऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील अधिवेशनाची अखेर आणखी एका खासदाराच्या निलंबनाने होण्याची शक्यता दिसते. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राहुल गांधींनी अदानी समूहाच्या आर्थिक व्यवहारांवर लोकसभेत टिप्पणी केली होती. त्यानंतर मानहानीच्या खटल्यात ते दोषी ठरल्यामुळं त्यांची खासदारकी रद्द झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाची संधी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना मिळणार नाही. नीतिमत्ता समितीने त्यांच्या बडतर्फीची शिफारस केलेली असल्याने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या वा दुसऱ्या दिवशी तसा प्रस्ताव मांडला जाईल, तो बहुमताने संमतही केला जाऊ शकतो.  प्रस्तावाच्या वेळी विरोधक किती गोंधळ घालतात हे बघायचं. त्यामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार लोकसभेत महुआ मोईत्रा यांच्या बाजूने उभे असतील की, अलिप्त राहतील हेही दिसेल. तृणमूल काँग्रेसने मोईत्रा यांच्याशी फारकत घेतली तर त्यांना काँग्रेसचा आधार मिळेल का, हेदेखील सभागृहात दिसू शकेल.

छोटी-छोटी बातें..

एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची केंद्रीय निवडणूक आयोगासमोर लढाई सुरू आहे. दुसऱ्या बाजूला, पवार कुटुंबीयांच्या स्नेहसंमेलनात दोन्ही गटांतील पवार सदस्य एकत्रही आलेले दिसले. ते एकमेकांवर थेट आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी करत नाहीत. तर एकमेकांच्या शिलेदारांना टोमणे मारतात. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व लोकसभेतील खासदार सुनील तटकरे संसदेत महिला विधेयक मांडलं गेलं, तेव्हा गैरहजर होते. या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तटकरेंवर टीका केली. तटकरेंचं नाव न घेता ही टीका केल्यामुळं तटकरेही टीका करताना सुप्रिया सुळेंचं नाव घेत नाहीत. दिल्लीत पत्रकार परिषदेत या मुद्दय़ावर सुप्रिया सुळेंवर टीका करताना आता विषय संपला असं तटकरे म्हणाले. पण, सुप्रिया सुळेंचा उल्लेख त्यांनी ‘संसदरत्न’ असा केला. सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून सुळेंचा सन्मान झालेला असल्यानं त्यांनी तसा उल्लेख केला असावा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये अशी छोटी-छोटी लढाईही पाहायला मिळते. शरद पवार हे सर्वासाठी आदरस्थान असल्यानं ते समोरून आलेले दिसले तरी आपोआप एक पाऊल मागं जातं. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी झाली तेव्हा शरद पवार उपस्थित राहिले होते. त्यानंतर गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळीही ते आलेले होते. अजित पवार गटाच्या नेत्यांचा ताफाही तिथं होता. पण, आयोगाच्या कार्यालयातून शरद पवार बाहेर पडल्यानंतर सगळं लक्ष त्यांच्याकडं वेधलं गेलं. एकमेकांवरील टीका-टिप्पणी हवेत विरून गेली.