भाषेच्या अस्मितेचा मुद्दा फक्त महाराष्ट्रात गाजतोय असं नाही. पश्चिम बंगालमध्येही तो तितकाच तीव्र झालेला आहे. तृणमूल काँग्रेस भाषेच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेला आहे. संसदेमध्ये बंगाली भाषेतच बोलायचं असं या पक्षाच्या सदस्यांनी ठरवलेलं आहे. राज्यसभेत निवृत्त झालेल्या सहा सदस्यांना निरोप देण्यात आला. अशा वेळी सभागृहात निवृत्त होणाऱ्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाते. त्यांच्याबद्दल इतर सहकारीही बोलतात. राज्यसभेतील निरोप समारंभात तृणमूल काँग्रेसचे गटनेते डेरेक ओब्रायन जाणीवपूर्वक बंगालीत बोलले. खरंतर निवृत्त होणारे सर्व खासदार तमिळनाडूमधील होते. त्यामुळं ओब्रायन यांना इंग्रजीत बोलता आलं असतं. पण, त्यांनी बंगालीमधून भाषण केलं. ओब्रायन यांचं भाषण संपल्यावर तृणमूल काँग्रेसमधील सहकारी त्यांचं कौतुक करताना दिसले. इतर राज्यांतून विशेषत: ओदिशा, बिहार, पूर्व भारतातून बंगाली भाषिक बांगलादेशातील घुसखोर असल्याचा शिक्का मारून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. त्याविरोधात बंगाली अस्मिता टोकदार झाली आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये ‘एमडीएमके’चे प्रमुख वायको यांचाही समावेश होता. वायको अत्यंत आक्रमक बोलतात, भाषेच्या मुद्द्यावरून तर ते सातत्याने संसदेत बोलत आले आहेत. हिंदीला विरोध करणाऱ्या दक्षिणेतील खासदारांमध्ये वायको आघाडीवर असत. निरोपाचं भाषणदेखील आक्रमकच होतं. हे पाहून इतर सदस्य गमतीने म्हणाले, वायको निवृत्त होण्याचं हे वय नाही… आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी द्रमुकच्या निवृत्त खासदारांचं कौतुक केलं. तुमच्या-आमच्यामध्ये भाषेचा फरक जरूर आहे. पण, ‘एनडीए’विरोधात लढण्यासाठी आपली मनं जुळलेली आहेत… निरोपाच्या भाषणात भाषेचा मुद्दा प्रखर ठरला!
विद्यापीठातील शांतता!
जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) छत्रपती शिवाजी महाराज आणि कुसुमाग्रज यांच्या नावे दोन अध्यासन केंद्रांचं उद्घाटन झालं. त्यानिमित्त विद्यापीठातील शांततेवर मिश्कील टीका-टिप्पणी झाली. सन्माननीय वक्त्यांच्या भाषणांमध्ये शांततेचा मुद्दा आला कारण, हे उद्घाटन होत असताना सभागृहाच्या बाहेर ‘जेएनयू’मधील विद्यार्थी निदर्शनं करत होते. या अध्यासनांना विद्यार्थ्यांचा विरोध असल्याचा अर्थ काहींनी घेतला. पण, वास्तविक, विद्यार्थ्यांचे आंदोलन वेगळ्याच कारणांसाठी होते. त्यांची निदर्शनं राज्य सरकारविरोधात होती हे खरं पण, त्याचा अध्यासनांशी सुतराम संबंध नव्हता. राज्यामध्ये संमत झालेल्या जनसुरक्षा विधेयकाला प्रामुख्याने हे विद्यार्थी विरोध करत होते. या कायद्यातून शहरी नक्षलींचा बंदोबस्त केला जाईल, अशी राज्यातील सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे. ‘जेएनयू’मधील उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळं या विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली. बाहेर विद्यार्थ्यांची घोषणाबाजी सुरू होती, सभागृहात कार्यक्रम सुरू होता. या घटनेवर मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मिश्कील टिप्पणी केली. ते म्हणाले की, ‘मी दोन महिन्यांपूर्वी ‘जेएनयू’मध्ये आलो होतो. हा परिसर अतिशय शांत होता. इथला कॅम्पस शांतताप्रिय आहे. कुठंही काही गोंधळ झालेला दिसत नाही. ‘जेएनयू’ तर शांत आहे पण, कुलगुरू माझ्याशी कसा संवाद साधतील असं मला वाटत होतं. विद्यापीठाच्या परिसरात शांतता होती, तशी कुलगुरूही शांत असतील असं माझा समज होता… अध्यासन केंद्रासाठी त्या पाठपुरावा करत होत्या, तेव्हा त्या कधी कधी शांतपणे विचारायच्या तर, कधी कधी दम देऊन विचारायच्या…’ सामंत यांच्या भाषणातील धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला आत्ताच कळलं की सामंतांवर कुलगुरू रागावल्या. गुरूंना रागवण्याचा अधिकार आहे… कुलगुरू शांतिश्री आल्यापासून इथं जी शांती निर्माण झाली आहे, ती आम्ही पाहिली आहे… त्या येण्याआधी ‘जेएनयू’मधील ‘शांती’ आम्ही पाहिली होती, असं म्हणत फडणवीस यांनी कुलगुरूंचं कौतुक केलं. कुलगुरू शांतिश्री पंडित यांनी भाषणामध्ये मराठी विद्यार्थ्यांनी ‘जेएनयू’चा अधिकाधिक उपयोग करून घेण्याचं आवाहन केलं. ज्यांना आर्थिकदृष्ट्या भरमसाट शुल्क भरणं शक्य नसतं अशा बुद्धिवान-होतकरू मराठी विद्यार्थ्यांनी ‘जेएनयू’मध्ये प्रवेश घेतला पाहिजे. हे विद्यापीठ देशातील पहिल्या क्रमांकाचं विद्यापीठ आहे. या केंद्रीय विद्यापीठाच्या शैक्षणिक दर्जा व क्षमतेचा उपयोग करून घेतला पाहिजे, असं कुलगुरू शांतिश्री पंडित यांचं म्हणणं होतं.
१२ ऑगस्टला काय होणार?
सध्या संसदेच्या आवारात दोन विषयांवर गटागटाने चर्चा होतेय. एक- जगदीप धनखडांनी नेमकं काय केलं की ज्यामुळं त्यांची इतकी वाईट अवस्था व्हावी? दोन- १२ ऑगस्टला काय होणार? ही तारीखदेखील संसदेशी निगडित आहे. या दिवशी संसदेच्या समोर असलेल्या कॉन्स्टिट्युशन क्लबची निवडणूक होणार आहे. इतर क्लब असतात तसाच हा क्लब आहे, फरक इतकाच की, या क्लबचे सदस्य होण्यासाठी तुम्ही संसदेचे आजी-माजी सदस्य असणं आवश्यक असतं. इथंही इतर क्लबचं पैसे देऊन सदस्यत्व घ्यावं लागतं. त्यासाठी वार्षिक शुल्क भरावं लागतं. क्लबच्या संचालक मंडळासाठी निवडणूक होते. लोकसभाध्यक्ष हे कॉन्स्टिट्युशन क्लबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. १२ ऑगस्टचं महत्त्व असं की, २५ वर्षांत पहिल्यांदाच या क्लबमध्ये लढत होणार आहे, तेही दोन भाजप नेत्यांमध्ये. राजीव प्रताप रुडी आणि संजीव बालियान. गेल्या २५ वर्षांपासून रुडी क्लबचे सचिव आहेत. दरवेळी निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये रुडी यशस्वी होतात. या वेळी त्यांना बालियान यांनी आव्हान दिलेलं आहे. रुडी ठाकूर आहेत, तर बालियान जाट. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमधील ठाकूर विरुद्ध जाट असा अंतर्गत संघर्षदेखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंनी प्रचंड लॉबिंग सुरू आहे. या क्लबचे १२०० आजी-माजी खासदार सदस्य आहेत. त्यात मोदी, शहा, खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी असा सगळ्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. ११ सदस्यीय संचालक मंडळातील ४ पदांवर बिनविरोध निवड झालेली आहे. चुरस आहे ती, सचिवपदासाठी. दोन दशकांहून अधिक काळ सचिवपदी असलेल्या रुडींनी पायउतार व्हावं असं बालियान यांना समर्थन देणाऱ्या भाजप खासदारांचं म्हणणं आहे. रुडींनी प्रयत्न करूनदेखील बालियान यांनी माघार घेतली नाही याचा अर्थ बालियान यांच्यामागं मोठी ताकद उभी असल्याची चर्चा केली जात आहे. रुडी आणि बालियान संसदेत खासदारांशी संवाद साधताना दिसले. बालियान विद्यामान लोकसभेचे सदस्य नाहीत. पण, ते बहुधा प्रचारासाठी संसदेत आले असावेत. नव्या संसद भवनामध्ये ते भाजपच्या नेत्यांना भेटण्यासाठी आल्याचे पाहायला मिळाले. २०२४ मध्ये रुडींना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता नव्हती. रुडींच्या जागी बिहारमधील सारण मतदारसंघात नवा उमेदवार देण्याचा विचार केला गेला होता पण, अखेर रुडींना उमेदवारी दिली गेली. कॉन्स्टिट्युशन क्लबच्या निवडणुकीतून रुडींनी राजकीय करिअर पणाला लावलं आहे. त्यानिमित्ताने भाजपमध्ये ठाकूर अधिक ताकदवान की, जाट हेही समजू शकेल. या अर्थाने १२ ऑगस्टला होणारं मतदान महत्त्वाचं असेल.
भेट कोणाची?
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांचा गेल्या आठवड्यात वाढदिवस होता. जुन्या संसद भवनातील काँग्रेसच्या कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा केला गेला. कार्यालयात वेगवेगळे तीन केक आणले गेले होते. त्यातील एक खास खजूर घालून केलेला केक प्रियंका गांधी-वाड्रा यांनी बनवून आणला होता. संध्याकाळी खरगेंच्या घरी पत्रकारांच्या अनौपचारिक गप्पांमध्येही खरगे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. खरगेंच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली होती. खरगे पत्रकारांशी संवाद साधत असताना अनेक कार्यकर्ते मध्ये येऊन शुभेच्छा देऊन जात होते. एका कार्यकर्त्याने भेट आणून दिली. कुठल्याशा ठिकाणावरून भेट आणल्याचं त्याने सांगितलं पण, खरगेंनी ही भेट घ्यायला नकार दिला. मग, त्याने कर्मचाऱ्यांकडून तुमच्यासाठी ही भेट आहे, असं सांगितल्यावर मात्र खरगेंनी आनंदाने ही भेट घेतली. सहा दशकं राजकारणात राहून विचारांशी एकनिष्ठ असलेले खरगे हे अपवादात्मक नेते आहेत असं म्हणता येईल.