हिनाकौसर खान
आपल्यापैकी बहुतेकांनी कृष्णाच्या वेशातला मुलगा आणि बुरख्यातली मुस्लीम आई हे फोटो पाहिले असणार. काही वेळा मुलाऐवजी मुलगीही दिसते, राधेच्या वेशात. अशा फोटोंवर हमखास लिहिलेलं असतं – ‘इनक्रेडिबल इंडिया’, ‘अद्भुत भारत’, ‘हा माझा भारत देश!’ अशा फोटोस्टोरीमुळे बहुतेकांच्या भावना उचंबळून येतात. पाहणाऱ्याचा राष्ट्राभिमान जागा होतो (म्हणे). आता समजा, कृष्णाच्या जागी, ख्रिस्त किंवा प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या वेशातील मुलगा आणि आईच्या जागी मुस्लीम स्त्रीऐवजी हिंदू, ख्रिश्चन, शीख किंवा इतर कुणी स्त्री असती तर? आपण तेव्हाही जाऊ ना तितकंच भारावून? करूयात का यावर थोडा विचार? हाही विचार करूयात की असे फोटो का दिसत नाहीत?
दरवर्षी वारीत, ‘वारकऱ्यांना पाणी/खाऊ वाटणारे ‘मुस्लीम’ बांधव’ किंवा ‘वारकऱ्यांसाठी मुस्लीम बांधवांनी मशीद केली खुली’ अशा मथळय़ांसह प्रसिद्ध होणारे फोटो आणि बातम्या आपण पाहतो. कोविड-१९ च्या काळात ‘प्लाझ्मा डोनेट करून मुस्लीम बांधवानं वाचवले प्राण’ या टायपाच्या बातम्या आल्या. कधीतरी अधनंमधनं ‘अमुक मुस्लीम बांधवानं तमुक हिंदू व्यक्तीला दिली किडनी/डोळे/हृदय’ इत्यादी बातम्या येतात. अशा बातम्यांचा उद्देश सौहार्द दाखवणं आणि मुस्लीम समूहाचं सकारात्मक चित्रण करण्याचा असतो (म्हणे).
वरच्या परिच्छेदात एका शब्दाची पुनरावृत्ती आहे. बांधव! मुस्लीम समाजाविषयीच्या बातम्यांमध्ये ‘बांधव’ शब्द का असतो? माध्यमांना इतर जाती-धर्माविषयीच्या बातम्या देताना बंधुत्वाची भावना का नाही आठवत? बातम्यांमध्ये अन्य जाती-धर्माचा उल्लेख समाज म्हणून केला जातो किंवा केलाही जात नाही. मग मुस्लीम धर्मालाच असं अधोरेखित करून का मांडलं जातं? हा भेदभाव कशासाठी? वर उदाहरणादाखल उल्लेख केलेल्या या घटना ‘बातम्या’ कशा होऊ शकतात हा मला नेहमी पडणारा प्रश्न. या बातम्यांमधून धर्म वजा केल्यास त्यांचं बातमीमूल्य संपुष्टात येतं, पण ते लक्षात कोण घेणार?
आपल्या गावबांधावरून चालत निघालेल्या वाटाडय़ांच्या तहान-भूक, निवासाची काळजी करणं ही हे माणुसकीचं मूल्य आहे. कुणा आजारी माणसाच्या कामी येणं हा अतिशय चांगुलपणाचा भाव आहे. याचा आणि धर्माचा संबंध कुठं येतो? नीतिमत्तेच्या, मूल्यव्यवस्थेच्या बातम्या देताना धर्मावर इतका प्रकाशझोत कशासाठी टाकावा लागतो? नीतिमूल्य ही विशिष्ट धर्माची मक्तेदारी मुळीच नाही. (की आहे?) उलटपक्षी नीतिव्यवस्था ही सर्वच धर्माचा आधारस्तंभ आहे. खोटं बोलू नये, फसवू नये, हिंसा करू नये, कुणाशी वाईट वागू नये इत्यादी साधी ती नीतिमूल्ये. नीतिमत्तेचं धर्माशिवाय काही अडत नाही, पण धर्मसंस्थेला नीतिमूल्यांचा प्रचार करूनच स्वत:चा खुट्टा बळकट करावा लागतो. म्हणून तर सगळेच धर्म मुळात चांगले असतात (म्हणे). एकमेकांना मदत करणं, परस्परांच्या कामी येणं, अडचणी सोडवणं हा माणसाचा सहजभाव आहे. मग ते विशिष्ट समाजासाठी ठळक का करावं लागतं? की तसं केल्यानंतरच जगाला मुस्लीम व्यक्ती ‘माणसं’ आहेत, त्यांच्याकडेदेखील माणुसकी आणि चांगुलपणा आहे याची खात्री पटणार आहे?
मी हेच प्रश्न उद्विग्नपणे एका परिचिताला विचारले, तर तो ‘हो’ म्हणाला. मी बुचकळय़ात. तो म्हणाला, ‘‘अशा पद्धतीच्या फोटो/बातम्या मी सोशल मीडियावर तात्काळ शेअर करतो. हे सकारात्मक चित्र लोकांमध्ये जायला पाहिजे. त्यामुळे मुस्लीम कट्टर नसतात, ती चांगली माणसं असतात हे आमच्यातल्या लोकांपर्यंत (त्याला हिंदू म्हणायचं असतं) पोहोचतं. मग त्यातले काही जण मुस्लिमांची ‘ही’ बाजूदेखील समजली अशी कबुलीही देतात.’’ त्याचं हे स्पष्टीकरण. ‘ही’ बाजू म्हणजे काय? माणसासारखं असणारं वर्तन किंवा चांगुलपणा बातम्यामधून किंवा पोस्ट लिहून ‘सिद्ध’च करावी लागणार आहेत का? कमाल आहे! नाहीतर मुस्लीम समाज हा कट्टर, हिंसक, दुष्ट, अन्यायी आणि दहशतवादी याच समजाच्या चक्रव्यूहात फसलेला रहाणार!
परिचिताच्या भावना खूप प्रांजळ होत्या तरी हे स्पष्टीकरण ऐकल्यानंतर भयग्रस्त अस्वस्थता दाटून आली. आणि त्याच वेळी पुन्हा एकदा प्रकर्षांनं जाणवलं की सातत्यानं मुस्लिमांविरुद्ध जहर ओकणाऱ्या या काळात आपण स्वत:च्या एकूणच प्रतिमांविषयी खूप सजग असायला हवं आणि मुस्लिमेतरांनी जागरूक. सुरुवातीला उल्लेख केलेली फोटोस्टोरी पाहिली की पाहणाऱ्याला बरं वाटतं. सरमिसळ झालेल्या आणि उभेआडवे सांस्कृतिक छेद देणाऱ्या भारताचं चित्र नफरतींच्या वाळवंटातलं ओअॅसिस भासतं. समाधानाच्या शोधात असणारा आपला जीव अशा प्रकारच्या कथनांनी काही क्षणांसाठी शांतावतो. पण त्या बातम्यांकडे बारकाईनं पाहिलं तर त्या अलगतावादाला बळकटी देतात हे दिसून येतं. तसं नसेल तर यापुढे प्रत्येक पत्रकाराने अशा ‘चांगुलपणाच्या कहाण्या’ सांगताना प्रत्येक व्यक्तीची जात आणि धर्म विचारावा आणि तो तसाच नमूद करावा.
मागील वर्षी बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आली. बऱ्याच गावांमध्ये बकरी ईद एकादशीच्या दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचा निर्णय झाला. मुस्लीम समाजाचा हा निर्णय समंजस, शहाणपणाचा आणि सौहार्द टिकवून ठेवणारा असल्याचं बातम्यांमधून सांगितलं गेलं. (पुन्हा एकदा ‘ऐसा देस है मेरा..’ अशी टेप आळवली गेली. खरंतर संविधानाने प्रत्येकाला आपापला धर्म, सण साजरा करण्याची मुभा दिलेली आहे याचा आपल्याला सोईस्कर विसर पडतो. असो!) यंदा, हे दोन सण पुन्हा एकाच दिवशी आले. या वर्षी बहुसंख्यांना सौहार्द, समंजसपणा दाखवण्याची संधी होती. तसं घडलं नाही. मुळात बहुसंख्याक संख्येने जास्त आहेत म्हणजे त्यांच्याकडे शहाणपणाचं प्रमाणही अधिक असणार. सहिष्णुतेची आणि सुज्ञपणाची परंपरा पाळण्याचा ‘दबाव’ याच विशिष्ट समाजावर का येतो? अशा वेळी आपले बहुसंख्याक समाजातील बांधव पुढाकार का घेत नाहीत? या वर्षी बहुसंख्याकांनी त्यांचा सण साजरा करण्याचा दिवस मागेपुढं केला असता किंवा मुस्लिमांनी ईदचा दिवस बदलण्याची आवश्यकता नाही अशी भूमिका घेतली असती तर खरोखरच भारत हा अद्भुत देश आहे याची प्रचीती आली असती. आणि धर्म मध्यवर्ती ठेवूनच बातम्या होणार असतील तर कधी बहुसंख्याक समाजाने सणवाराचा किंवा अन्य कशाचा त्याग असो वा मुस्लीम समुदायाच्या कार्यक्रमात सामील झाल्याच्या बातम्या येत नाहीत (की प्रत्यक्ष तसं घडत नाही!)
बऱ्याचदा मुस्लिमेतर वस्त्यांमध्ये मुस्लिमांना घरं मिळत नाहीत. तसे घरं नाकारणारे परिसर जाहीर केले पाहिजेत. म्हणजे मुस्लिमांचे घेट्टो का होतात, याची काळजी वाहणाऱ्यांकडेच सर्वसमावेश परिसरांची यादी मागता येईल. बरं, दुसरीकडे मुस्लीमबहुल वस्त्यांना ‘मिनी पाकिस्तान’ म्हटलं जातं, गुन्हेगारीचा अड्डा समजलं जातं, दहशतवाद्यांचं घर मानलं जातं आणि हे उघडउघड बातम्यांतून प्रसृतही केलं जातं. या वस्त्यांकडे कधीच न फिरकणाऱ्या लोकांच्या मनात असे समज घट्ट रुतलेले असतात. माध्यमं जाणीवपूर्वक ते समज बळकट करत असतील तर ते अजिबात खपवून न घेता त्या माध्यमसंस्थांकडे आपण तक्रारी नोंदवल्या पाहिजेत. असे पत्रकार बेदखल कसे होतील हे पाहिलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे, भारतातल्या एका भूप्रदेशाला पाकिस्तान संबोधणं हा देशद्रोह मानला पाहिजे.
शिवाय एखाद्या वाडीवस्तीतला मुस्लीम मोहरमच्या ताजियात उत्सवी मनानं नव्हे, तर दंगाफसाद झाल्यावर समाजच आपल्या सोबतीला येईल या दडपणानं सामील होत असेल तर त्याची भीती प्रतलावर आणली पाहिजे. मुस्लिमांची अशी कुठलीही भीती बहुसंख्याक समाजासाठी भूषणावह नव्हे तर मानहानीची गोष्ट आहे. ती दडवून न ठेवण्याचं धाडस मुस्लिमांना दाखवावं लागेल.
आता मुस्लीम म्हणून हळूहळू का होईना, आपल्याला बहुसंख्यधार्जिण्या, शरणागती पत्करावी लागणाऱ्या, भीतीनं ग्रासलेल्या भूमिकांना सैल करावं लागणार आहे. आपल्या मर्यादांना लांघण्याची धडपड आणि आपल्यावरची बंधनं पुढं रेटण्याचे प्रयास करावे लागणार आहे. आणि आपल्या प्रतिमांची जबाबदारीसुद्धा आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. कारण अपप्रचाराच्या बेबंद मॅरेथॉन आपल्यासाठी रोखायला अन्य कुणी येणार नाहीये. कोई मसीहा नहीं आनेवाला, खुद को ही मसीहा बनना पडेगा. असं स्वावलंबी झालो तरच मुस्लीम समाज स्वत:चं सकारात्मक सक्षम चित्र मांडू शकेल. आणि सकारात्मक चित्र म्हणजे ‘सब चंगा’, ‘फील गुड’, ‘गुडीगुडी’ असा इतका सरधोपट अर्थ काढून स्वत:ची फसगतही थांबवावी लागेल. उलट समाजात रुतून बसलेले पूर्वग्रह, गैरसमज आणि अजेंडे यांना मोडीत काढणारी कथानकं ठामपणे मांडण्याचा सकारात्मक प्रवास गरजेचा आहे. अशा गोष्टी बहुसंख्याक समाजाच्याही निदर्शनास आणून त्यांना सोबत घ्यावं लागणार आहे. सकारात्मक चित्र मांडणं याचा अर्थ अंतर्गत आणि बहिर्गत चुका, दु:खं, अन्याय, भय याबाबत मौन बाळगावं नाही. तर त्या गोष्टी अधिक जोरकसपणे सांगणं आणि जोडीला नवी अस्पिरेशन्स, नव्या प्रेरणा, नवं भान जागवणं.. त्यासाठी आपल्याला अन्य माध्यमांवर अवलंबून न राहता स्वत:लाच ‘माध्यम’ म्हणून घडवावं लागणार आहे.
