१९५५ मध्ये जपान येथील विश्वधर्म व विश्वशांती परिषदेचे अध्यक्षपद भूषविल्यावर देशविदेशातील साधुसंतांना तुकडोजी महाराजांच्या कार्याचा परिचय झाला. भारतातील सर्व धर्म-पंथातील सांधुसंतांची  देशव्यापी संघटना उभारून देशातील प्रचंड संख्येतील साधुशक्तीला प्रत्यक्ष जनकल्याणाच्या कामी आणण्याचे महाराजांनी ठरविले आणि १९५६ मध्ये दिल्लीच्या बिर्ला मंदिरात साधुसमाजाची स्थापना केली.

पुढे भारत साधू-समाजाचे तुकडोजी महाराजांच्या  अध्यक्षतेखाली पहिले अधिवेशन हृषीकेश येथे संपन्न झाले. या जनजागृतीसाठी महाराजांनी तीन हजार कोटी तासांचे श्रमदान व पन्नास हजार प्रचारक निर्माण तयार केले. भारत साधूसमाजाच्या ११ कलमी कार्यक्रमात सामाजिक शिक्षण, साक्षरता, सांस्कृतिक शिक्षण, साधूचे शिक्षण, योगासने, प्राकृतिक शिक्षण, भूदान, संपत्तीदान व श्रमदान यांना प्रोत्साहन, मागासलेल्या जमातींची सेवा व साधु-समाजातील उणिवा दूर करणे यांचा समावेश केला.

महाराज भारत साधुसमाजाच्या स्थापनेविषयी म्हणतात, ‘‘जेव्हा असत्य, अन्याय वा अनाचार इतके तीव्र होतात तेव्हा समाजात सत्य कमजोर पडते, ही गोष्ट निश्चित समजावी. त्यासाठी आम्ही समाजातील सर्व सत्यांश एकत्र जुळवले पाहिजेत. सर्व सत्यप्रेमी लोकांना आवाहन करून सत्कार्याची एक आघाडी उघडली पाहिजे. हे कार्य करण्याची जबाबदारी अर्थातच समाजातील सर्व जाणत्या लोकांवर येते. पृथ्वीला पापांचा भार असह्य झाला म्हणजे तिने गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवाजवळ गाऱ्हाणे घालावे व त्याने संतांना जमवून त्यांच्याद्वारे झोपी गेलेल्या देवत्वाला जागवावे, हा प्रघात आपल्या पुराणांतूनही वर्णिलेला आहे. समाजाच्या उन्नतीची जबाबदारी सरकारवर असतेच, पण समाज आणि सरकार या दोघांनाही सन्मार्गगामी बनविण्याची जबाबदारी साधुसंतांवर असते. तेव्हा, आजच्या या भीषण काळात समाजाचा अध:पात थांबवून त्याची सर्वागीण उन्नती करण्यासाठी साधुसंतांनी एकत्र येऊन आपले ब्रीद राखायला नको का?’’

‘‘साधुसंघटनेचा आमचा उद्देश संतांनी संघटितपणाने जगण्याची फळी उभारावी वा जत्था चालवावा असा नाही. त्याचबरोबर, साधुसंतांना एखाद्या बंधनात टाकण्याचाही हेतू नाही. आमचा उद्देश एवढाच आहे की, सर्वानी आत्मनिरीक्षण करून जनतेच्या बाबतीत आपले काय कर्तव्य आहे हे जाणावे आणि वेगवेगळय़ा दिशेने वल्हे न मारता एकाच दिशेने सर्वानी आपआपली शक्ती लावून भारताची ही भोवऱ्यात अडकलेली नाव ध्येयाच्या किनाऱ्याकडे नेण्याचा एकजुटीने प्रयत्न करावा.’’ निष्क्रिय साधुशक्तीबाबत भजनात महाराज म्हणतात-

सब पंडितों की, साधुओं की,

पंथिओं की मौत है।

जाना उन्होंने वर्म निह था, क्या हमारी बात है।।

दुनिया न किसकी है बँधी, क्या हमारी बात है।

तुम रह गये जहाँ के तहाँ, करके तुम्हारा है बली।।

 राजेश बोबडे