ग्रामनिष्ठेशिवाय नवा भारत अशक्य आहे, हे स्पष्ट करून ग्रामनिर्माणातून ग्रामविकासाची वाट जनांस दाखविताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘भारतातील जनतेने लोकसत्ताक राज्याचा अधिकार प्राप्त करून घेतला असला, तरी अजूनही जनतेचे जीवन सुखी झाल्याचे पाहायला मिळत नाही. त्यासाठी एकच मार्ग सर्व पक्ष, पंथ, जाती व धर्माच्या पुढाऱ्यांना दिसू लागला आहे तो म्हणजे, भारताच्या कोटय़वधी लोकांनी ग्रामनिर्माण कार्य करावे व त्यांना सर्वानी सहकार्य द्यावे. असे झाले म्हणजेच, हजारो वर्षांपासून भारताची जी हानी झाली आहे, ती भरून काढणे सोपे जाईल आणि नवा मानव, नवे गाव, नवे शहर व नव्या जगाच्या प्रतिष्ठेला पात्र असा नवा भारत देश निर्माण होईल.
यासाठी सर्वच पक्षांचे लोक आज आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. परंतु त्या प्रयत्नांचे स्वरूप मात्र असे आहे की, कोणी आपल्या जातीची काळजी घेत आहेत तर कोणी आपल्या पक्षाची प्रतिष्ठा सांभाळत आहेत. कोणाला आपल्या पंथाची तळमळ आहे तर कोणी अधिकारपदासाठी धडपडत आहेत. ‘माझ्या आड कोणीच नको’ असे जेव्हा सर्वानाच वाटू लागते, तेव्हा प्रत्येकाची शक्ती परस्परांच्या नाशालाच कारणीभूत ठरते. सर्व बाजूंनी तुफान सुटावे आणि प्रत्येक ठिकाणच्या हवेला वाटावे की माझा मार्ग मोकळा व्हावा, पण मार्ग मात्र सर्वाचाच सर्वानी रोखलेला असावा, अशा वेळी त्या हवेचे उत्तम प्रवाहदेखील त्रासदायक ठरतात. ते तुफान मग हजारो वस्तूंना वर उचलून भोवऱ्यासारखे फिरवून खाली आदळते व त्यांना उद्ध्वस्त करून टाकते. याप्रमाणेच आज पक्ष (राजकीय) – विरोधामुळे आमच्या खेडय़ांचे व शहरांचे झाले आहे, कारण आमच्यात ग्रामनिष्ठा अजून उदय पावलेली नाही. जरा काही समजू लागले की, दुसऱ्याचे समजून घेण्याऐवजी आपलेच इतरांनी ऐकावे असे माणसाला वाटत असते. वास्तविक दुसऱ्याचे आस्थेवाईकपणाने समजून घ्यावे व आपलेदेखील तेवढय़ाच प्रामाणिकपणे सांगावे आणि सर्वानी मिळून सर्वाच्या, पूर्ण ग्रामाच्याच लाभासाठी धडपड करावी. पण ही समजूतदारपणाची अवस्था अजून आपल्या ग्रामाला लाभलेली नाही. निश्चय प्रत्येकाचा कमी-जास्त प्रमाणात असणारच व त्यात प्रत्येकाला त्या-त्याप्रमाणे जोडही मिळत राहणारच. पण त्यात काही उत्तम अनुभवांबरोबर काही चालढकलही दिसून येऊ लागते आणि त्यामुळे काही विभागांचे कार्य गळून पडते. अर्थात माणसाच्या सर्वागीण उन्नतीचा विचार पूर्णत्वाने होत नसल्यामुळे त्याला मग भिन्नपणाचे म्हणजे आकुंचित स्वरूप येते आणि मग बऱ्यातून वाईट फळच प्रगट होते. महाराज ग्रामगीतेत म्हणतात,
गावाची करावी आदर्श व्यवस्था।
म्हणोनी कथिली ग्रामगीता।
ग्रामापासोनी पुढे वाढता।
विश्वव्यापी व्हावे।।
जेथे गावाचाच न कळे धर्म।
तेथे विश्वधर्माचे कैचे वर्म।
हेचि कळावया साधन सुगम।
धरिले गावाचे।।
राजेश बोबडे
