राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘स्वतंत्र झालेल्या देशाचा विकास हा लोकांत सामुदायिकता बाणविल्याशिवाय होत नसतो. ही गोष्ट लक्षात घेऊन गावागावांत संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते. या दृष्टीने तीव्र मतभेद असलेल्या काही गावांत मी एकोप्याचा प्रचार करू लागलो असता, त्यात मला असे आढळून आले की, हा मतभेद राष्ट्राचे हितकर्ते म्हणवणाऱ्या काही पुढाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनीच मुद्दाम निर्माण केला आहे. एकोपा वाढविणे हे वास्तविक ज्यांचे कर्तव्य, त्यांनीच असे तट निर्माण करावेत ही किती नामुष्कीची व भयंकर गोष्ट आहे. त्यांच्या दृष्टीने मतभेद व पक्षद्वेष हे महत्त्वाचे क्षेत्र आहे.’’

‘‘निवडणुकांनंतर पुढाऱ्यांचे मतभेद मिटू शकतील; ते गळय़ात गळेही घालतील; पण जनतेत माजलेले वैर आजन्म राहील की काय, असे वाटते. पूर्वी बंधुभावाने वागणारे लोक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकमेकांचे शत्रू झाले आहेत. एकोप्याने नांदणाऱ्या खेडय़ांच्या निवांत जीवनातही भयंकर गढूळपणा, कटुता व कल्लोळ माजला आहे. अर्थात याची पुढाऱ्यांना पर्वा नाही आणि असणे शक्य तरी कसे आहे? ज्या दिवशी त्यांना राजकारणातून पूर्णपणे मोकळे केले जाईल, तो दिवसच कदाचित तसा निघू शकेल; पण रोग एकदा मूळ धरून बसल्यावर त्यांच्या घराण्याचाच तो दावा ठरत असतो, हेही विसरता येणार नाही.’’

‘‘ग्रामीण जीवनात पेरले गेलेले हे विष फार भयंकर आहे! दुसरी तितकीच वाईट गोष्ट, कायदा करूनही तिकडे डोळेझाक करणे ही आहे. कायद्यातून पळवाट काढून करता येतील तितक्या भानगडी करायच्या आणि प्रसंग जिवावर बेतला की लाच देऊन सुटका करून घ्यायची, हे मोठमोठय़ा लोकांचे आज राखीव क्षेत्र होऊन बसले आहे. मागासलेल्या लोकांवर कायद्याच्या नावाखाली पाहिजे तसा दबाव टाकून त्याचा जास्तीत जास्त फायदा मात्र आपण घ्यायचा, ही साथच सुरू झाली आहे. पार्टी किंवा पक्ष सुरक्षित राहून निवडणुकांमध्ये पाठबळ मिळावे म्हणून, आपल्या पार्टीच्या लोकांच्या अन्यायाकडे डोळेझाक करायची व कायद्याची पर्वा न ठेवता त्यांना पाहिजे ती सवलत द्यायची आणि त्यासाठी खालच्या अधिकाऱ्यांच्या क्षेत्रातही हस्तक्षेप करून पाहिजे त्या गोष्टी करून घ्यायच्या. अडचण आल्यास प्रसंगी कर्तव्यतत्पर अशा अधिकाऱ्यांनाही हाणून पाडायचे; असा शिरस्ता सुरू झाल्याने वशिला व लाचलुचपत यांचेच राज्य सुरू होणे अपरिहार्य आहे.’’

‘‘कायद्याचा वचक कमी झाल्यास त्या राष्ट्रात सावळागोंधळ माजल्याशिवाय कसा राहील? कायदा करणाऱ्यांनीच त्याची पायमल्ली केल्यास खालचे लोकही आपल्यापेक्षा खाली असलेल्या लोकांवर अन्यायाने दबाव का टाकणार नाहीत? आणि अशा रीतीने सर्वत्र बेबंदशाही सुरू झाल्यास त्यात आश्चर्य कशाचे? कायद्याची कक्षा चुकवून आपापले भरमसाट स्वार्थसाधन वैयक्तिक व सांघिक रीतीने छोटे-मोठे लोक आज करताना दिसतात आणि त्यामुळे पदोपदी जनतेची पिळवणूक व मुस्कटदाबी सुरू आहे.’’
राजेश बोबडे