राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या भारतभ्रमणात ग्रामविकासाचा निरंतर ध्यास घेतला. अनेक दिग्गजांनी गुरुकुंज आश्रमात येऊन महाराजांच्या ग्रामविकासाच्या प्रारूपाविषयी जाणून घेतले होते. जपान सरकारनेसुद्धा महाराजांच्या कार्याची दखल घेतली. जपान येथे महाराजांनी १९५५ मध्ये विश्वशांती व विश्वधर्म परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले.

ग्रामविकासाचे कालदर्शी चिंतन व्यक्त करताना महाराज म्हणतात, ‘‘एका मुलाच्या लग्नाला महिनोगणती विचार करून, मुलगी पाहून, मग पत्रिका छापून जुळवाजुळव करूनही शेवटी लग्न होईपर्यंत रुसवेफुगवे सुरूच राहतात. ग्रामाच्या मनोवृत्तींचे संघटन घडवून आणण्यासाठी दोन-चार दिवसांनीच भागत नाही. कार्यकर्त्यांनी वर्ष- सहा महिने तरी लोकांची मने तयार करण्याचे काम केले पाहिजे. तेव्हाच ग्रामजयंती माझ्या इच्छेप्रमाणे थोडी तरी साधेल, असे वाटते. हे मला या देशातील साधूंना, नेत्यांना, वयोवृद्ध, तपोवृद्धांना सरकारी व सहकारी- कर्मचाऱ्यांना अंत:करणपूर्वक सांगावयाचे आहे.’’ महाराज म्हणतात, ‘‘यासाठी श्रीगुरुदेव सेवामंडळ हे या कार्याचे मिशन बनावे असे मला वाटते व त्यासाठीच आम्ही वर्षांतून किमान एक महिना एखादा जिल्हा निवडून त्यातील मागास भाग पाहून त्याच्याकडे सारखे सेवेसाठी यात्रा करीत असतो. अडखळत का होईना जनतेकडून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे, एका प्रयत्नात जनता कामाला कशी लागेल. ती तर समुद्राच्या पाण्यासारखी आहे. पाण्यावर वार मारला की ते क्षणिक हटल्यासारखे वाटते; पण पुन्हा जसेच्या तसेच पाणी होते. यासाठी बांधच पक्का बांधला पाहिजे, नाही तर जनता साधू आला की त्याच्याबरोबर जाते आणि गुंड आला की त्याच्याही बरोबर जाते व साहेब आला की त्यांनाही तसेच वागावेसे वाटते. याने मूलभूत बदल होत नाही. जो काही थोडाफार बदल होईल, त्याला चिकटून राहावे लागते; पण तसे कार्यकर्ते मिळत नाहीत. तेही फार चंचल असतात. त्यांनाही काही दुसरेच प्रलोभन सतावत असते. हे प्रकार ग्रामात चाललेले आहेत.

असे असले तरी ही ग्रामजयंती बरेच जनजागृतीचे कार्य करेल असे मला वाटू लागले आहे. महिनाभरच न राबविता या ग्रामजयंती कार्याचे अस्तित्व जराही ढील न देता वर्षभर सुरू ठेवले पाहिजे तरच ग्रामजयंतीचे उद्दिष्ट साध्य होईल.’’ महाराज ग्रामगीतेत म्हणतात-

नियमांचा मुख्य आधार।
मजबुत पाहीजे निर्धार।।
त्यावरीच उत्कर्षांची मदार।
ऐहिक आणि आध्यात्मिक।।
नाही तरी मानवाने नियम केले।
सर्व जीवन सुरळीत चाले।।
परी एकदा दुर्लक्ष झाले।
की चुकतचि जाते।।

राजेश बोबडे