निष्कामतेचे ढोंग स्पष्ट करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘लोक जरा खाऊनपिऊन सुखी झाले की, त्यांना वाटते आपल्याला जर काही करावयाचे असेल तर खुशाल डोळे लावून रोज भजन करत आरामात पडणे व यापुढे फक्त आपली संतती-संपत्ती सांभाळणे बरे. बाकी आपल्यावर काय जबाबदारी आहे? प्रभूचे प्रभू जाणे. त्यानेच हे सर्व विश्व साकार केले आहे आणि त्यालाच याची काळजी आहे. आपल्या केल्याने काय होते? आपण त्याच्या सांगण्याप्रमाणे आपले कर्म करीत राहावे व आपली शेतीवाडी सांभाळावी. फारच झाले तर मी याचा कर्ता- भोक्ता नाही, हे सर्व तोच आमच्याकडून करवून घेतो आणि त्याचीच इच्छा आहे की आम्ही यापुढे घरच्या घरीच पुण्यकर्म करावे. हे सर्व शब्दाने सांगत राहून आपली कोणतीही जबाबदारी न ओळखता नुसते आयुष्य भोगीत असतात.’
कर्मयोगाचे उद्दिष्ट अधिक स्पष्ट करताना महाराज असेही म्हणतात की, ‘माझ्या म्हणण्याचा असा आशय नाही की, आपल्याकडून हरिचिंतन, आपली नित्यक्रमाची उपासना, सामुदायिक प्रार्थना व इतर चित्तशुद्धीकरिता केले जाणारे जपतप घडूच नयेत किंवा प्रभुदर्शन होऊच नये. पण एवढे केल्यानेच आपला उद्धार होईल, यावर माझा मुळीच विश्वास नाही. मी म्हणेन की, अर्जुनाला श्रीकृष्ण- दर्शनानंतर आणि त्याच्याशी असलेल्या अति प्रेमानंतरही तसेच स्वत: नरत्व प्राप्त केल्यानंतरदेखील समाजाची कर्जफेड करावीच लागली, नव्हे- लोकांनी हे ध्यानात ठेवावे म्हणून श्रीकृष्णाला त्याच्याकडून करवून घ्यावी लागली. हा अनासक्तियोगच आहे, हे पटवून द्यावे लागले तसेच सर्वानी या मार्गानेच जावे, हे गीतेच्या आधाराने व्यासांनाही समजावून सांगावे लागले.’
राष्ट्रसंत तुकडोजी यांना प्रत्येक शब्दाचे अर्थ देऊन हेच कर्तव्य सांगावयाचे होते. जसे निव्र्यसनी म्हणजे ज्याच्या व्यसनांनी समाज- धर्मात आणि आपल्या उचित नीतीत बाधा येणार नाही तो. एरव्ही असा अर्थ केला नसता, तर खाणेपिणे, भजन करणे, सत्संगती करणे अथवा परोपकार करणेही व्यसनच समजून त्यापासून अलग राहा, असाही त्याचा अर्थ घेण्यात आला असता. तसेच निरिच्छता म्हणजेही क्षुद्र इच्छा सोडून उदार व उदात्तपणाने युक्त अशी देवाच्या व समाजाच्या सेवेची इच्छा असणे असाच अर्थ घेऊन साधुसंत चालत आहेत. तसे नसते तर त्यांनी असेही म्हटले असते की, ‘‘काय हो राम राम का म्हणता? काय हो, ही लोकांकरिता भीक का मागता? काय हो, रोज भजन करा, समाजाची सेवा करा अशी इच्छा व उपदेश का करता? माणसाने निरिच्छ राहिले पाहिजे.’’ पण तसा त्यांचा भाव मुळीच नाही. ‘निष्काम’ म्हणजे ज्या कामाने- देह-इंद्रियादिकांच्या मोहात पडून त्यांच्यापासून क्षुद्र मोबदला घेण्याच्या भरीस न पडता आपली धारणा असामान्य करून व्यक्तिस्तोमरहित कर्म केले जाईल, अशा सत्कामनेने युक्त, असाच त्यांचा भाव दिसतो.
