संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दोन्ही संत अमरावती जिल्ह्यातील. दोघांचा स्नेह शेवटपर्यंत अतूट राहिला. तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजनांनी राष्ट्र जागर केला, तर संत गाडगेबाबांनी खराटय़ाने जनतेच्या डोक्यातील वाईट विचार दूर करून प्रबोधन केले. संत गाडगेबाबांची निर्वाणवार्ता महाराजांना समजली तेव्हा तुकडोजी महाराज भुसावळला होते. रेल्वे स्थानकावर उतरले व श्रद्धांजली वाहिली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनी खबर कि सन्त गाडगेबाबा हमको छोड गये।

धडक भरी छातीमें, हमको पलभर तो निह होश रहे।

तुकडय़ादास कहे, हम तेरे पथपर हरदम डटे रहे।।

असे भजन महाराजांनी रेल्वेतच लिहिले. ‘‘मी आल्याशिवाय गाडगेबाबांवर अग्निसंस्कार करू नका’’ अशी तार अमरावतीला पाठविली. २१ डिसेंबरला गाडगेबाबांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.  अमरावती, ऋणमोचन, पंढरपूर, वलगाव यांपैकी कुठे अंत्यसंस्कार करावेत, याबाबत तीव्र मतभेद झाले. डॉ. पंजाबराव देशमुख व डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी तुकडोजी महाराज येईपर्यंत शांत राहण्याचे आवाहन अनुयायांना केले. महाराज आले व म्हणाले, ‘‘गाडगेबाबा आता देहात नाहीत, ते तुमच्या हृदयात आहेत. दहनसामुग्री आणली आहे; तेव्हा इथे- अमरावतीतच अग्निसंस्कार करा व अस्थिकलश भरून कुठेही न्या; हवी तर स्मारकं उभारा. मोठमोठय़ा धर्मशाळा बांधूनही बाबा शेवटपर्यंत झोपडीत राहिले; अंगाला चिंधी नि हातात गाडगे हेच वैभव कायम ठेवले. मनुष्याला याच गोष्टी कीर्तिरूपी अमर करतात.’’

महाराजांचे म्हणणे मान्य करून गाडगेबाबांना तुकडोजी महाराजांच्या हस्ते अग्नी देण्यात आला. त्यांचा ‘गोपाला-गोपाला देवकीनंदन गोपाला’ हा मंत्र लाखो कंठांमधून दुमदुमला.

पुढे संत गाडगे महाराज सेवामंडळ व मिशन या संस्थांमध्ये विभागलेल्या अनुयायांचा वाद विकोपास गेला होता. बाबांच्याच नावावर काही अनुयायांनी सवतासुभा निर्माण करून गाडगेबाबांवर कोर्टकचेरीत उभे राहण्याची पाळी आणली होती. तुकडोजी महाराजांना वाद सोडविण्यासाठी मुंबई येथील काँग्रेस हाऊसमध्ये बोलविण्यात आले. त्या वेळी काँग्रेस हाऊसच्या दारातच बसलेले गाडगेबाबा तुकडोजी महाराजांना म्हणाले ‘‘तुकडोजीबाबा हे सारं तुम्हीच सांभाळा, हे लोक काई मले सुखानं मरू देत नाहीत’’ महाराजांनी त्यांना आश्वस्त केले. पुढे पंढरपूर येथे त्यातील एक अनुयायी महाराजांना म्हणाला ‘‘गाडगेबाबांनी आमच्या मदतीनं संस्था उभारल्या अन् मरता खेपी या संस्था तुम्हाला देऊन टाकायचे म्हणतात, पण आम्ही देणार नाही’’ त्यावर तुकडोजी महाराज म्हणाले ‘‘बाबांनो कोणाच्या संस्था घ्यायला मुळात मीच तयार नाही. मी जे आश्वासन दिले, ते बाबांच्या समाधानासाठी! खरं तर, बाबांचा दृष्टिकोन कायम ठेवून तुम्ही लोकांनीच हा व्याप सांभाळला पाहिजे. सल्ला व मदत मी केव्हाही देईन परंतु बाबांची प्रकृती ठीक नाही; त्यांचं मन मात्र शेवटच्या समयी दुखवू नका!’’

राजेश बोबडे

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintan dhara saint gadgebaba and rashtrasant tukdoji maharaj amravati amy
First published on: 20-12-2023 at 04:00 IST