ग्रामजयंतीचा व्यापक व मर्मस्पर्शी अर्थ सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘जो घर दुरुस्त करेल तो गृहस्थी, शेजार दुरुस्त करेल तोच शेजारी, ग्राम दुरुस्त करेल तो पुढारी, राष्ट्राला योग्य मार्गावर नेईल तो सत्ताधारी व जो विश्वाला सूत्रात बांधण्याचा प्रयत्न करेल तो संत, असे आम्ही मानत आलो आहोत. आमची देवाची, धर्माची, संतांची व पुढाऱ्यांची कसोटी ही अशी आहे. जे हे जाणत नाहीत त्यांना सांगावयाचे आहे व जेथे समाज आहे त्यांना सोबत घेऊन पुढे न्यावयाचे आहे. प्रत्येकाच्या कलेचा, भक्तीचा, ज्ञानाचा व सत्तेचा फायदा यासाठी घ्यावयाचा आहे. त्यांना सामूहिक पद्धतीने वेळ काढून कामाला लावावयाचे आहे. यालाच मी ग्रामजयंती मानतो.’’
महाराज म्हणतात, ‘‘काही लोकांपुढे सध्या आपले पूर्वसंस्कार, आपली पूर्वश्रीमंती, आपली पूर्ववर्णाश्रम व्यवस्था व आपले पूर्वीचे मानमरातब असे प्रश्न आहेत. आपली छोटी-छोटी राज्ये व आपला पूर्वीचा संप्रदाय राहावा असे ज्या नेत्यांना वाटते ते आता शक्य नाही व कोणी तसे केले, तर त्यांना जगाच्या सोबत पुढे जाता येणार नाही. मुलाच्या लहानपणची वागणूक तरुणपणात बदलली नाही व त्याला तसाच दिगंबर अवस्थेत ठेवून घरात फिरविला तर बाहेरचे लोक त्याला वेडय़ात काढल्याशिवाय राहणार नाहीत, हे कुणाच्याही लक्षात येण्यासारखे आहे! तसे जनतेला बुद्धीच्या व जगाच्या विशालपणाचे वारे स्पर्शून जात असल्याने आता लहानपणाची व मोठेपणाची व्याख्या घराघरात कळू लागली आहे, तिला दाबून ठेवता येणे शक्य नाही. आता मोठय़ांना आपला खरा मोठेपणाच- जो शास्त्रांनी, तज्ज्ञांनी व संतांनी मानला आहे तो समजून घेतला पाहिजे.
माझ्या घरी दहा हजार एकर जमीन असावी व ती पडीक असली तरी मला कोण काय बोलणार, असे जर कोणी गट व पक्ष करूनही बोलू लागला तरी त्याचा प्रभाव बुद्धिवाद्यांवर पडणे कठीण झाले आहे. आपण समाजाच्या मोठेपणातच आपला मोठेपणा आता विलीन केला पाहिजे. ‘माझी जात मोठी’ म्हणून एकांगी मनोवृत्तीचा तंबोरा फार दूरवर ऐकू येणार नाही व वाजविलाच तर तारा तुटून पडतील असाच हा काळ आहे. लोक तो वाजविण्याचा फार प्रयत्न करीत आहेत; पण तो मांजरीने डोळे मिटून लोणी खाण्यासारखाच आहे. तसे जर देशात कोठे होत असेल तर त्याचे आयुष्य अत्यंत लहान व तोकडे आहे असे समजावे, हे गावाच्या लक्षात येवो व ‘ग्राम’ हा राष्ट्राच्या विशाल मार्गाचा घटक होवो, हीच इच्छा मनासी धरून माझी खंजिरी वाजत आहे व ती तशीच फुटेपर्यंत वाजवली जाणार,’’ असे सांगून ग्रामसुधारणेचा मंत्र ग्रामगीतेत देताना महाराज म्हणतात..
ग्रामसुधारणेचा मूलमंत्र।
सज्जनांनी व्हावे एकत्र।।
संघटना हेचि शक्तीचे सूत्र।
ग्रामराज्य निर्माण करी।।
राजेश बोबडे
