नवा समृद्ध भारत निर्माण करण्याचे ध्येय ज्या काळात अनेकांचे होते त्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, या ध्येयात मानवी स्वभावामुळे, संघटनात्मक मर्यादांमुळे कोणते अडथळे येऊ शकतात हेदेखील हेरले होते. ते म्हणतात : कुणाला वाटते धर्माचे अधिष्ठान बरे, तर कुणाला वाटते देशाचे उत्तम. कुणाला वाटते आधी पक्षाची उन्नती हवी, तर कुणाला वाटते जातीची हवी. आणि जरुरी तर सर्वच गोष्टींची असते, त्यामुळे त्या सर्वानाच जोडही मिळू लागते. पण प्रश्न हाच उरतो की हे कार्य गटातटाचे होणार की सर्वाचे? अर्थात काही मोजक्या लोकांच्या ताब्यात गावाने राहावे की गावच्या सर्व लोकांनी सर्वाच्याच हिताचा विचार करावा? स्वार्थाचा मोह बाजूस सारून निष्कपट भावनेने विचार करता सर्वाना जे विचारांती पटेल तेच सर्वाच्या हिताचे होऊ शकते, हा विचार जनतेच्या मनात ज्या दिवशी घर करेल त्याच दिवशी ही सध्याची बजबजपुरी संपून मानव नवे स्वरूप घेईल व नव्याने नवे ग्राम निर्माण करील, ग्रामसेवा हीच ईश्वरसेवा होईल. त्यासाठी पहिले पाऊल असे आहे की, ग्रामाच्या उन्नतीची उत्कंठा ग्रामातील सर्वच लोकांना वाटली पाहिजे व तसा संकल्प ग्रामाच्या बहुसंख्य लोकांनी करावयास पाहिजे. अर्थात त्याबरोबरच ‘माझे व तुझे’ हा भेद विसरून ‘आम्ही सर्वाचे व सर्व आमचे’ असे निश्चयाने मानले पाहिजे.
या ग्रामनिष्ठेलाच मी खरे ‘ग्रामदान’ मानतो, असे सांगून (आचार्य विनोबा भावे यांचा अथवा कुणाचाही टीकास्पद उल्लेख न करता) महाराज म्हणतात, ‘‘लोकांचे तोंडी निश्चय टिकून राहात नाहीत असा समज असल्यामुळेच या संकल्पाला कागदावरील सह्यंची जोड द्यावी लागते. शिवाय ‘ही गोष्ट यांना मंजूर आहे’ असे देशातील सर्व लोकांना व शासन संस्थेलादेखील या रूपाने दाखविता येते, त्यामुळे हे अगत्याचेच आहे. सही झाली की ‘आपण अडकलो’ असे वाटून लोक त्याच दिशेने मग पाऊल टाकू लागतात. हे मानसशास्त्रही त्याच्या पाठीशी आहे. पण एकूण हा सर्व प्रपंच कशासाठी? तर आपले ग्राम उन्नत करण्याचा दृढ संकल्प करण्यासाठीच; मग सर्व पक्ष- पंथांनी एके ठिकाणी जमून निष्पक्षतेने गावाच्या प्रत्येक बाबीचा विचार करून कार्यास का लागू नये? गावाचे जे हित होईल त्यात आपले हित आपोआपच होणार नाही का? यासाठी, ग्रामातील जातिभेद न पाळता आपण सर्व एकाच परिवाराचे लोक आहोत, ही धारणा दृढ करणे जरुरीचे आहे. गाव एक असले तरी कार्ये अनेक आहेत, तसेच लोकांचे स्वभाव व सामथ्र्यही वेगवेगळे आहे. म्हणून, ज्याची जेथे जरुरी असेल तेथे त्याचे महत्त्व व ज्याला जे अवगत असेल तेच त्याचे कार्यक्षेत्र; मान मात्र सर्वाना सारखा, जीवनसुख सर्वाना समान व राहणी सर्वाची अभिन्न; अशी योजना झाली पाहिजे. जसे ग्राम एक तसेच जन एक, त्याचे धन एक व मनही एक, हा विचार जाणत्यांनी सर्वाना पटविला पाहिजे.’’
ग्रामसेवाचि ईश्वरसेवा।
ऐसे समजावोनि जीवा।
गाव सेवेसी तत्पर करावा।
सर्वतोपरी।।
राजेश बोबडे
