राजेश बोबडे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘गीतेतील तत्त्वज्ञान अमूर्त आहे. मानवी जीवनात सुखशांती निर्माण करणारे अमोल तत्त्वज्ञान व व्यवहार यांची सुंदर सांगड या ग्रंथात आढळते. आज जिकडेतिकडे संघर्षांचे वारे वाहत आहेत. गरीब-श्रीमंत, मालक-मजूर, प्रजा व सरकार यातही भांडण जुंपले आहे. संकुचितपणा व स्वार्थी वृत्ती तर इतकी बोकाळली आहे, की एकाचे दुसऱ्याला व दुसऱ्याचे तिसऱ्याला सहन होत नाही. एका पक्षाचे दुसऱ्या पक्षाशी पटत नाही. एका धर्माचे दुसऱ्या धर्माशी जमत नाही, पंथ व पक्षांत भांडणे सुरू आहेत. जातीयता व प्रांतीयतेनेही थैमान सुरू केले आहे. या दूषित भावनेने राष्ट्र रसातळास जात आहे.’’
‘‘लोकांचा पुढाऱ्यांवर विश्वास नाही. पुढारी आपापल्या स्वार्थाची पोळी भाजण्यात मग्न आहेत. काही पुढारी कर्तृत्ववान आहेत. त्यांनी देशाची सेवाही केली आहे. देश चारित्र्याने नटवण्याची कामगिरी त्यांनी बजावली आहे, पण या सेवेबरोबरच त्यांच्या ठिकाणी अहंकार निर्माण झाला आहे. मीच चांगला आणि इतर वाईट ही वृत्ती त्यांच्या अनुयायांत निर्माण झाली आहे. प्रत्येक माणूस उपदेश करण्यातच गर्क झाला आहे. मीही चांगला आणि दुसरेही चांगले या वृत्तीकडे कोणी ढुंकूनही पहात नाही. ही वृत्ती आज निर्माण होण्याची आवश्यकता आहे आणि ती संघर्षांतून निर्माण होईल. ‘अक्ल आती है बशर को ठोकरे खाने के बाद’ या म्हणीप्रमाणे या संघर्षांतूनच क्रांतीची किरणे फाकणार आहेत.’’
‘‘यादवांच्या ठिकाणी अहंकार निर्माण झाल्याबरोबर ते आपल्या संचित कर्माने रसातळाला गेले. तशी स्थिती आपली झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आपण सावध झाले पाहिजे. भगवद्गीता ही भारताला जागी करणारी व जीवन देणारी संजीवनी आहे. श्रीकृष्णासारख्या महात्म्यांनी, रामचंद्रासारख्या राजांनी भारतीय संस्कृतीला भूषविले आहे. जगातील उदात्त तत्त्वज्ञान गीतेत भरले आहे. गीतेत प्रपंच व परमार्थाची सांगड घातली आहे. श्रीकृष्णाने गीतेत सांगितले की ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळी मी दुष्टांचे निर्दालन व सज्जनांचे रक्षण करण्यासाठी अवतार धारण करेन.’’
‘‘लोक असे विचारतात की मग परमेश्वर आता का नाही अवतार घेत? त्यावर एका कवीने मार्मिक उत्तर दिले आहे. कवी म्हणतो ‘भारत में आने के लिये हमे कोई इन्कार नही। पर बुलाने के लिये कोई भी तैय्यार नहीं।।’ मी यावे अशी तुमची इच्छा असेल तर देवकीसारखी माता व अर्जुनासारखे वीर भक्त निर्माण करा. गोपालांना हाताशी धरा. गाईची सेवा करा. गोपिकांचे प्रेम निर्माण करा.आणि हाच गीतेचाही संदेश आहे. राजाला बोलवायचे असले तर अशी सर्व व्यवस्था करावी लागते, तसेच परमेश्वराला बोलवायचे असेल तर वरील सर्व वातावरण निर्माण करावे लागते.’’
