राजेश बोबडे

१९५३ मध्ये स्वातंत्र्याच्या फलनिष्पत्तीवर विवेचन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जनता विशेष सुबुद्ध, सुखी व स्वावलंबी होईल, असे सर्वाना वाटत होते; व त्यासाठी काही उपायही केले गेले आहेत. पण कालौघात प्रत्यक्ष कार्यापेक्षा देखावा व जाहिरातबाजीत विशेष भर पडून लोकहिताच्या योजनांचा बोजवारा उडत गेला, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. पदोपदी पळवाट काढून मोठे काम केल्याचे दृश्य उभे करण्यापेक्षा, प्रामाणिकपणे जनतेची थोडी उन्नती करणेदेखील अत्यंत मोलाचे ठरते, पण या गोष्टींची तळमळ असणारे प्रामाणिक कार्यकर्ते प्रत्येक कार्यक्षेत्रात दुर्मीळ झाल्यासारखेच आहेत. त्यामुळे जनतेच्या जीवनाची पातळी कोणत्याही प्रकारे वर उचलली गेलेली दिसून येत नाही.

जे लोक स्वराज्यापूर्वी फार धनवान होते ते आज अधिक धनवान झाले आहेत, जे दारिद्रय़ात पिचत होते ते त्याहूनही घोर दारिद्रय़ भोगत आहेत. जनतेतील जीवनकलह अधिकाधिक बिकट होत चालला आहे; परंतु अजूनही बुद्धी, शक्ती, सत्ता व संपत्तीने वरिष्ठ असलेले लोक आपल्या स्वार्थाला थोडाबहुत आळा घालून या खाली दबलेल्या जनतेला वर उचलून घेण्याची माणुसकी दाखवायला तयारच नाहीत. मूठभर लोक बुद्धिवान किंवा वैभवशाली झाल्यानेच देशात शांती नांदेल किंवा राष्ट्राची उन्नती होईल, असे मानणे वेडेपणाचे आहे, परंतु इकडे लक्ष कोण देतो? ‘दे दान तो छूटे गिराण’ स्वातंत्र्याचा सूर्योदय होऊनही अशा प्रकारे वेगवेगळय़ा काळय़ाकुट्ट ढगांनी त्याची किरणे मधल्यामध्येच रोखून ठेवली आहेत. स्वराज्याला सुराज्यात किंवा रामराज्यात परिवर्तित करण्यासाठी लोकांनी आपापली जबाबदारी ओळखून त्वरित ग्रामीण उन्नतीच्या मार्गाला लागले पाहिजे आणि देशभर भूमिदानच नव्हे तर धनदान, बुद्धिदान, कलादान तसेच श्रमदानही प्रत्यक्षात आणून ते सफल केले पाहिजे.

द्वावम्भसि निवेष्टव्यो गले बध्वा दृढां शिलाम् ।

धनवन्तमदातारं निर्धनं चातपस्विनम् ।।

संपत्तीदान न देणारा धनिक व कष्ट न करणारा श्रमिक या दोघांनाही बुडवून टाकायला हवे, असा धर्मग्रंथाचा सक्त हुकूम आहे. तेव्हा या दोघांनाही कार्यतत्पर केले पाहिजे. सरकारने कायद्याद्वारे आणि प्रजेने जागृतीद्वारे परस्परांना सहयोगदान दिले पाहिजे व त्याद्वारे कोठेही अन्याय नजरेस येताच तो नियंत्रणकर्त्यांच्या मार्फत सरळ करून घेण्यास तयार असले पाहिजे. अशा प्रकारचे आंदोलन जेव्हा सर्वत्र जोरात सुरू होईल तेव्हा, आतापर्यंत पिचत पडलेल्या सामान्य समाजाच्या जीवनात नवा जोम व नवे तेज संचारेल आणि तसे झाले तरच स्वातंत्र्यकालाचे मोजमाप मिनिटामिनिटाने करण्याची आवड उत्पन्न होऊन त्याच्या मिनिटागणिक पुढे पडणाऱ्या पावलांचा त्याच्या विकासशील कार्याचा अहवाल स्वातंत्र्यदिनी लोक मोठय़ा उत्सुकतेने ऐकतील.’’ महाराज ग्रामगीतेत म्हणतात-

सत्तेने जे कायदे केले।

    त्यांचे फायदे मुजोरांनी घेतले।

आणि दुबळे, भोळे मागेच राहिले।

    ऐसे झाले आजवरी।।