राजेश बोबडे
भाविकांच्या भक्तीचे उद्दिष्ट व अधिकार विशद करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘जगातील क्षुल्लक गोष्टीतही अडथळे ठरलेलेच असतात, मग भक्तीसारख्या- सदैव सुखाच्या सागरात पाठवणाऱ्या उच्चतम मार्गात किती अडथळे असतील, याचा विचार करा. बरे एवढेही करून शेवटी भक्तीमुळे व्यक्तीचा लाभ नाही तो नाहीच. कारण भक्तीचे ध्येयच मुळात ऐहिक नाही.’ हे स्पष्ट करून महाराज म्हणतात, ‘भक्तीचा उपयोग जर आपल्या दृश्य सुखाकरिताच असता तर संत तुकोबांसारखे भक्तशिरोमणी असे का म्हणाले असते की, देवा! माझ्या सुखाची मला चाड नाही, फक्त तुझे भक्तिप्रेम आणि जनताजनार्दनाची सेवा करू दे, मग मला उपवास पडले तरी चालतील.. त्यांच्या या वचनाचा विचार करता, आपल्या कोणत्याही ऐहिक सुखाकरिता भक्ती नसून, ती समाजाच्या हिताकरिता आणि आत्मिक शांतीकरिताच आहे, असे दिसते. ती शांती जर मान व धन मिळवूनच मिळू शकली असती, तर राजाकडून मिळालेले वैभवही संतांनी का झुगारले असते? असा प्रश्न करून महाराज म्हणतात, एकंदरीत भक्तीकरिता फार मोठाच अधिकार असावा लागतो. ज्यात सर्वश्रेष्ठ गुण वसत नसतील तो वास्तविक मनुष्यच नव्हे आणि जो मनुष्यमात्रांची सर्वागीण उन्नतीकारक सेवा करीत नसेल तो साधूही नव्हे. जो अशा अभ्यासाने साधू किंवा भक्त झाला नसेल, तो देवाला आवडू शकत नाही. जो देवाला आवडत नाही त्याने कितीही भक्ती केली, रामनाम घेत जीव जरी दिला तरी सक्रियतेने जोपर्यंत भक्ती होत नाही तोपर्यंत ती भक्ती पूर्णत्वास जात नाही, असे मला वाटते आणि म्हणूनच मी आपणास असे सुचवू इच्छितो की, भक्ती सोपी आहे, असे म्हणावयाचे असेल तर तुम्हाला तुमच्या दुष्ट मनोवृत्तीशी झगडून तिला सत्कार्यप्रवृत्त करून, देवाच्या कार्यास आपला प्राण पतंगाप्रमाणे हसत देता आला पाहिजे. ही त्यागी अवस्था जेव्हा लाभेल, तेव्हाच आम्ही मालकाचे (ईश्वराचे) आवडते आहोत, असे म्हणता येईल.’ महाराज डोळस भक्तीच्या उपयुक्तातेचे ग्रामगीतेत वर्णन करतात..
अंध दुबळा भाविकपणा।
तो कधीहि न रूचे माझ्या मना।
संतदेवाची निष्क्रिय गर्जना।
करील तो अस्तिक नव्हे॥
आम्ही मुख्यत: कार्यप्रेरक।
चालती आम्हां ऐसे नास्तिक।
ज्यांचा भाव आहे सम्यक।
‘सुखी व्हावे सर्व’ म्हणूनि॥
भलेही तो देव न माने।
परि सर्वा सुख देऊं जाणे।
मानवासि मानवाने।
पूरक व्हावें म्हणूनिया॥