आज थोडं विषयांतर करावं लागणार. नाइलाजच आहे. कारण एक दुर्मीळ खगोलीय घटना अगदी उद्याच घडणार आहे. तिची दखल न घेता पुढे जाणं म्हणजे ‘काळाचे गणित’ सोडवताना एखादी महत्त्वाची पायरी गाळल्यासारखं होईल. कोणती खगोलीय घटना? खग्रास चंद्रग्रहण! उद्या चंद्र उगवेल तेव्हा तो एरवी पौर्णिमेला असतो तसा अगदी पूर्ण दिसेल. साधारण रात्री नऊच्या सुमारास तो थोडा झाकोळला जाईल. रात्री दहाच्या सुमारास तो आक्रसू लागेल. मध्यरात्रीच्या आसपास तो पूर्ण झाकला जाईल. रात्री दीडच्या सुमारास तो पूर्ण दिसू लागेल पण झाकोळलेला असेल. आणि रात्री अडीचच्या सुमारास मात्र तो पुन्हा पूर्ण तेजाने विलसू लागेल. हे म्हणजे पौर्णिमा ते अमावास्या ते पौर्णिमा हा सगळा प्रवास फास्ट-फॉरवर्ड पाहण्यासारखं आहे!
चंद्रग्रहणं प्रामुख्याने तीन प्रकारची असतात – खग्रास, खंडग्रास आणि छायाकल्प. खग्रास ग्रहणात चंद्र अजिबात दिसत नाही. खंडग्रास ग्रहणात त्याचा काही भाग दिसत नाही आणि छायाकल्प ग्रहणात मात्र चंद्रबिंब पूर्ण दिसतं पण ते झाकोळलेलं असतं. कित्येकदा खग्रास किंवा खंडग्रास ग्रहण ग्रस्तोदित असतं. म्हणजे उगवतानाचा चंद्राचा काही भाग दिसत नाही अशी अवस्था.
उद्याचं ग्रहण मात्र खग्रास आहे आणि ग्रस्तोदित नाही. हे नुसत्या डोळ्यांनी पाहूनदेखील चालेल. जिज्ञासूंनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. आता हे सगळं थोडं शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेऊ.
अमावास्या म्हणजे सूर्य-चंद्र-पृथ्वी एका रेषेत आणि पौर्णिमा म्हणजे सूर्य-पृथ्वी-चंद्र एका रेषेत हे आपण लहानपणी घोकलेलं असतं. पुढे हेदेखील माहीत असतं की चंद्रग्रहण म्हणजे पृथ्वीच्या सावलीत चंद्र आणि सूर्यग्रहण म्हणजे चंद्राने सूर्य झाकला जाणार. मग प्रश्न असा आहे की दर अमावास्येला सूर्यग्रहण आणि दर पौर्णिमेला चंद्रग्रहण का होत नाही?
कारण चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा ही पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेच्या पातळीत नाही. या दोघांमध्ये साधारण ५ अंशांचा कोन आहे. हे समजून घ्यायचं तर सोबतची आकृती १ पाहा.
आकृतीतल्या पौर्णिमेला सूर्य-पृथ्वी-चंद्र अशीच रचना आहे आणि अमावास्येला सूर्य-चंद्र-पृथ्वी अशी. पण त्या पौर्णिमेला किंवा अमावास्येला चंद्र किंवा सूर्यग्रहण संभवत नाही. कारण पौर्णिमेला पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार नाही आणि अमावास्येला चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये येणार नाही!
तेव्हा, ज्या पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं त्या वेळेस सूर्य-पृथ्वी-चंद्र अशी रचना तर असतेच, शिवाय हे तीनही एकाच प्रतलात असतात. उद्या नेमकं हेच होणार आहे.
आता दुसरा मुद्दा चंद्र आधी झाकोळेल आणि मग आक्रसेल. हे असं का होतं? सोबतची आकृती २ पाहा. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या उपछायेत जातो तेव्हा तो झाकोळलेला दिसतो. पुढे त्याने छायेत प्रवेश केला की तो आक्रसतो, पूर्ण दिसेनासा होतो. परत जेव्हा तो उपछायेत प्रवेशतो तेव्हा तो पुन्हा झाकोळलेला दिसतो. त्यातूनही तो बाहेर पडला की पूर्ण प्रकाशमान दिसू लागतो.
आता शेवटचा मुद्दा. चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा ही पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेला दोन ठिकाणी छेदते. चंद्र उत्तरेकडे जात असताना ती ज्या बिंदूत छेदते त्या बिंदूला ‘राहू’ म्हणतात आणि दुसऱ्या बिंदूला ‘केतू’. आकृती ३ पाहिलीत की हे स्पष्ट होईल. जेव्हा यांपैकी कोणताही छेदनबिंदू पौर्णिमा किंवा अमावास्येला चंद्र किंवा सूर्य यांच्याजवळ असतो तेव्हाच ग्रहण दिसू शकतं. राहू-केतू सूर्य-चंद्राला ग्रासतात ते हे असे!