scorecardresearch

संविधानभान : आम्ही भारताचे लोक!

अनेक देशांची संविधाने ही देवांना, एखाद्या व्यक्तीला, महापुरुषाला अर्पण केली आहेत. भारताच्या संविधान सभेने हे दोन्ही उल्लेख टाळले..

constituent assembly avoided god great man name to dedicate constitution of india
(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता टीम

डॉ. श्रीरंजन आवटे

अनेक देशांची संविधाने ही देवांना, एखाद्या व्यक्तीला, महापुरुषाला अर्पण केली आहेत. भारताच्या संविधान सभेने हे दोन्ही उल्लेख टाळले..

Supreme Court, loksatta editorial, verdic, electoral bonds scheme
अग्रलेख : फिटे अंधाराचे जाळे…
संविधानभान : संविधानाच्या पानापानांवरील ‘प्रेम’
stages of constitution making constituent assembly debates on 22 january 1947
संविधानभान : संविधानाची प्राणप्रतिष्ठा
Dr Babasaheb Ambedkar in Constituent Assembly
संविधानभान: संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संविधानाला अंतिम रूप येत असताना १९४९ मध्ये उद्देशिकेत दुरुस्त्या सुचवल्या जाऊ लागल्या. संविधान सभेचे सदस्य एच. व्ही. कामथ यांनी अशी सूचना केली की संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात ‘इन द नेम ऑफ गॉड’ अशा शब्दांनी असावी अर्थात देवाला अर्पण करणारी अशी उद्देशिका हवी. ही दुरुस्ती सुचवताच पूर्णिमा चौधरी म्हणाल्या, “देवाचा विषय काढून पुन्हा अल्पसंख्य आणि बहुसंख्यांमध्ये वाद नको. मी तुम्हाला विनंती करते की हा विषय संविधानात नको आणि देवावरून मतदान नको.” तरीही कामथ त्यांच्या मुद्द्यावर ठाम होते. त्यावर रोहिणी कुमार चौधरी म्हणाले, “मला वाटते, उद्देशिका देवालाच नाही तर देवीलाही अर्पण करावी.” यावर संविधान सभेत हशा पिकला.

चौधरी म्हणाले, “हा मुद्दा हसण्यावारी घ्यावा असा नाही. मी कामरूप (आसाम) येथे राहतो. आमच्याकडे कामाख्यादेवीचे पूजन केले जाते. आपण ‘वंदे मातरम’ म्हणतो. त्याचा अर्थ काय होतो? तो देवतेसाठीचा धावा आहे.” संविधान सभेत पुन्हा एकदा यावर घमासान चर्चा सुरू झाली.

थानू पिल्लई हे स्वतः आस्तिक होते. असे असूनही ते म्हणाले, “कामथ यांनी सुचवलेली दुरुस्ती जर संमत झाली तर सर्वांनी श्रद्धाळू असले पाहिजे, आस्तिक असले पाहिजे, हे (अप्रत्यक्षपणे) सक्तीचे होणार नाही काय? देवावर विश्वास ठेवायचा की नाही, याचा हक्क व्यक्तीला आहे. तो तिचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे मी स्वतः आस्तिक असूनही या दुरुस्तीला विरोध करतो.” पंडित गोविंद मालवीय यांनी मात्र कामथांना पाठिंबा दिला आणि संविधानाच्या उद्देशिकेत देव हवाच, असा आग्रह धरला.

हेही वाचा >>> संविधानभान : संविधानाची प्राणप्रतिष्ठा

प्रा. शिब्बन लाल सक्सेना यांना तर संविधानाच्या उद्देशिकेत देव आणि महात्मा गांधी दोघे हवे होते. देवाच्या कृपेने आणि गांधींच्या प्रेरणेने आपण हे संविधान स्वीकारतो आहोत, अशी वाक्यरचना त्यांना हवी होती. गांधींचे अनेक अनुयायी संविधान सभेत असूनही या सूचनेलाही विरोध झाला. पं. हृदयनाथ कुंजरु म्हणाले, “संविधानाच्या उद्देशिकेत देवाचा समावेश करणं हे संविधानाच्या आत्म्याशी, आशयाशी विसंगत आहे.” बाबासाहेब आंबेडकरांनीही कामथांनी ही दुरुस्ती पटलावर ठेवू नये, अशी विनंती केली; मात्र कामथ अत्याग्रही होते. अध्यक्ष राजेंद्र प्रसादही यावर नाखूश होते मात्र कामथांच्या आग्रहामुळे दुरुस्ती मतदानासाठी पटलावर ठेवली आणि या मुद्द्यावर मतदान झाले. कामथांच्या सूचनेला अनुमोदन देणारे सदस्य होते ४१ तर विरोध करणारे होते ६८. लोकशाही प्रक्रियेचा अवलंब करून संविधानाच्या उद्देशिकेतून देवाचा समावेश रद्द झाला.

संविधान सभेत देवावर श्रद्धा असणारे अनेक जण होते, मात्र कोणी नास्तिक असेल तरी त्याचा विचार केला पाहिजे, श्रद्धेचे स्वातंत्र्य हा मूलभूत हक्क आहे, याची जाणीव असलेले बहुसंख्य सदस्य होते. गांधींचे अनेक अनुयायी असूनही एका व्यक्तीला संविधान वाहता कामा नये, याची त्यांना जाण होती. त्यामुळे उद्देशिकेत ना गांधींचा उल्लेख आहे, ना देवाचा. जगभरातल्या अनेक देशांची संविधाने ही देवदेवतांना अर्पण केली आहेत. काही ठिकाणी संविधान एखाद्या व्यक्तीला, महापुरुषाला अर्पण केले आहे. भारताच्या संविधान सभेने मात्र हे दोन्ही उल्लेख टाळले.

आपण सुचवलेली घटनादुरुस्ती नाकारली गेल्यानंतर अतिशय उद्वेगाने कामथ म्हणाले, “देवा, वाचव भारताला!” भारत नुसता बचावला नाही तर नव्या सूर्योदयाच्या दिशेने झेपावला. कारण हा देश राम भरोसे राहिला नाही. देश वाचवण्याची जबाबदारी भारतीय लोकांवर आली. आपण आपले संविधान स्वतःप्रत अर्पण केले आणि उद्देशिकेची सुरुवात झाली : आम्ही भारताचे लोक…

poetshriranjan@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Constituent assembly avoided god great man name to dedicate constitution of india zws

First published on: 13-02-2024 at 02:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×