‘समोरच्याला नाव ठेवण्यात आपणच वस्ताद या समजात आजवर मी होतो, पण गेल्या काही दिवसांतील अकार्यक्षमतेने तो समज पार धुळीस मिळवला आहे. आता कारणे सांगत बसू नका- सलग दोन दिवस एका खोलीत स्वत:ला कोंडून घ्या व ‘इंडिया’ शब्द नसलेले पण त्याच्याशी साधर्म्य असलेले शब्द शोधून द्या.’ विश्वगुरूंचे रागीट स्वरातले हे शब्द ऐकून सल्लागारांच्या चमूचे अवसानच गळाले. कसेबसे ‘यस सर’ म्हणून ते सारे तिथून निघाले. मातृसंस्थेचे प्रेरणास्थान असलेल्या झंडेवाला चौकातील कार्यालयात तरी काही नवीन सुचेल असा विचार करून सारे तिकडे निघाले. बुद्धी तेजोमय व्हावी म्हणून च्यवनप्राश व बदामचे डबे काहींनी सोबत घेतले.
खोलीत स्थानापन्न होताच एकाने ‘भेडिया’ हा शब्द सुचवला. इतर सारे हा काय बरळतो आहे अशा नजरेने त्याच्याकडे बघू लागले. अखेर एका वरिष्ठाने हा शब्द असंसदीय आहे याची जाणीव करून दिली. मग दुसऱ्याने ‘दांडिया’ हा शब्द सांगितला. विरोधकांचा हा समूह दांडिया खेळता खेळता एकमेकांना कधी मारायला सुरुवात करेल याचा नेम नाही असा युक्तिवाद त्याने करताच सारे हसले. यावर विचार करू पण विरोधकांची संभावना करताना प्रत्येक वेळी गुजरातचा आधार घेणे योग्य ठरणार नाही अशी शंका एकाने व्यक्त केली. तिसऱ्याने इंडियन नॅशनल घराणेशाही अलायन्स अर्थात ‘इंगा’ असा पर्याय सुचवला. हा विस्तार योग्य असला तरी याचे संक्षिप्त रूप विश्वगुरूंच्या तोंडी शोभून दिसणार नाही असे मत एकाने मांडले. चौथ्याने ‘यूपीए २०२३’ असा शब्द सांगितला. त्यावर सारेच चिडले. सध्या आपण ‘यूपीए’ याच नावावर भागवत आहोत. त्याला साल जोडले तरी ते दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखेच. त्यामुळे नवे काही तरी शोधा असे वरिष्ठांनी सुचवताच हा शब्द मागे पडला. मग पाचव्याने नितीश, तेजस्वी, पवार, ममता, राहुल, केजरीवाल, स्टॅलीन यांच्या नावातले पहिले अक्षर जोडत ‘एनटीपीएमआरकेएस’ असा भला मोठा पर्याय सुचवला. त्यावर सारेच हसले. हे काय तुला भूमितीचे प्रमेय वाटले की काय असे वरिष्ठांनी सुनावताच पुन्हा सारे विचारात पडले. मग पहिल्याने ‘इंडियन रीजनल पार्टीज अलायन्स’ असे नाव समोर केले.
काँग्रेससुद्धा आता प्रादेशिक पक्ष झालाय असा संदेश यातून देता येईल असा त्याचा युक्तिवाद होता, पण याचे संक्षिप्त रूप उच्चारायला व टोमणा म्हणून मारायला कठीण असे सांगत साऱ्यांनी त्यावर फुली मारली. दुसरा म्हणाला, नावात कुरापत करण्यापेक्षा आपणच ‘भारतीय हिंदूत्ववाद रिस्पेक्टिंग ऑक्झिलिअरी टीम’ अर्थात ‘भारत’ असे आपल्या आघाडीचे नामकरण केले तर! यावर सारेच त्याच्याकडे बघू लागले. आपल्याला निर्देश काय व आपण करतो काय याचे भान बाळगावे असा सल्ला मिळताच तो शांत झाला. तिसरा म्हणाला, मॉडर्न ऑपरेशनल डेव्हलपमेंटल इंडियन अलायन्स अर्थात ‘मोदिया’. साऱ्यांनीच आक्षेप घेतला. आपले गुरू जरी स्वप्रेमात गुंग झाले असले तरी त्यांना याचे संक्षिप्त रूप आवडणार नाही असे म्हणणे पडले. या शब्दाने चांगलीच पंचाईत करून ठेवल्याची जाणीव पुन्हा एकदा सर्वाना झाली. तेवढय़ात चौथा पुन्हा बोलता झाला. मूळ इंडिया हा सलग शब्द आहे. त्यांच्या इंडियात प्रत्येक अक्षरानंतर टिंब टिंब आहे. अशी तुटलेली अक्षरे एकत्र करून हे कसला देश जोडणार असा युक्तिवाद करून विरोधकांची हवा काढून घेता येईल. यावर सारेच चकित झाले. भाषणात वापरण्यासाठी हे ठीक पण पर्यायी शब्दाचे काय, असा प्रश्न वरिष्ठांनी उपस्थित करताच पुन्हा सारे विचारात गढून गेले.