– मिलिंद बोकील

‘खासदार-आमदारांच्या मेजवानीला चांदीची थाळी!’ ही ‘लोकसत्ता’मध्ये २५ जून २०२५च्या अंकात, पहिल्या पानावर शीर्षस्थानी प्रसिद्ध झालेली बातमी सर्वांनी वाचली असेल. आपल्या लोकशाहीची सध्या काय विदारक अवस्था आहे याचे स्पष्ट चित्र ही बातमी उभे करते. लोकशाहीविषयी आस्था असल्याने या विषयावर मी पुष्कळ लिहिलेले आहे आणि त्या दृष्टीने या बातमीवरही प्रबंध लिहिता येईल. मात्र हे स्फूट लिहिण्यामागे तो उद्देश नाही. इथे लिहायचे आहे ते या बातमीतून व्यक्त होणाऱ्या मराठी भाषेच्या स्वरूपाबद्दल.

पहिल्यांदा हे स्पष्ट केले पाहिजे की वरील वाक्य हे पूर्णपणे मराठी आहे. अगदी अडाणी माणसालाही त्याचा अर्थ काय ते लगेच समजेल. ही अचूक बातमी छापल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आणि त्यांच्या संबंधित बातमीदारांचे अभिनंदनच केले पाहिजे. पण गंमत अशी की या बातमीतले सर्व शब्द हे मराठी भाषेने काळाच्या ओघात स्वीकारलेले आहेत.

खासदार या शब्दामधील ‘खास’ आणि आमदारमधील ‘आम’ हे दोन्ही मूळचे अरबी शब्द आहेत. ‘खास’ म्हणजे विशेष आणि ‘आम’ म्हणजे सामान्य हा अर्थ बहुतेकांना माहीत असेल. मोगल बादशहांचे दोन दरबार असत – दिवाणे-खास आणि दिवाणे-आम – हेही सगळ्यांना माहीत असेल. या शब्दांना ‘दार’ हा जो प्रत्यय लागला आहे तो मात्र फारसी आहे. ‘दार’ याचा अर्थ ‘बाळगणारा’ किंवा श्रीमंत असा होतो. त्यामुळेच आपल्याकडे जबाबदार, रुबाबदार, जोमदार, जमादार असे शब्द तयार होतात. आता या लोकप्रतिनिधींसाठी हे शब्द मराठीत कसे आणि कधी आले हा एक संशोधनाचा विषय होईल (जाणकारांनी जरूर प्रकाश टाकावा). इतर भाषिक प्रदेशांमध्ये असे शब्द नाहीत. हिंदी-पट्ट्यात अनुक्रमे ‘सांसद’ आणि ‘विधायक’; गुजरातीत ‘संसद-सभ्य’ आणि ‘धारासभ्य’; कन्नडमध्ये ‘संसद’ आणि ‘शासक’; तेलगूमध्ये ‘संसत-सभ्यालू’ आणि ‘विधि-सभ्यालू’, तमिळमध्ये ‘नाडालूमंद्रा उरुप्पीनर’ आणि ‘चट्टमंद्र उरुप्पीनरकल’ असे शब्द आहेत. या शब्दांमध्ये काही मजा नाही. ही मराठीचीच खासीयत आहे की तिने अरबी आणि फारसीमधून हे डौलदार शब्द घेतले आहेत. आता लोकसभेत जाणारा प्रतिनिधी विशेष का? आणि विधानसभेत जाणारा सामान्य का? याचा शोध त्या प्रतिनिधींनीच घ्यावा.

मेजवानी हा शब्द ‘मेजबान’ या शब्दावरून आलेला आहे आणि तो मूळ फारसी शब्द आहे. मेजबान म्हणजेच यजमान. मेजबानाने दिलेली पार्टी म्हणजे मेजवानी. यामध्ये मेज म्हणजे टेबल हे अध्याहृत आहे. हे काही पाटावर किंवा जमिनीवर बसून केलेले जेवण नाही. चांदी हा शब्द मराठीने हिंदीकडून घेतलेला आहे. जुन्या मराठीत चांदी नाही तर या धातूसाठी ‘रुपे’ हा शब्द आहे. ‘अडगुलं मडगुलं, सोन्याचं कडगुलं, रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा’ हे तर फार प्राचीन जोजवगीत आहे. आपले संतकवी ‘सोनेरुपे आम्हा मृत्तिकेसमान’ असं म्हणतात. हिंदीत मात्र ‘ना मांगू सोना-चांदी’ असा शब्दप्रयोग आहे. चांदी हा शब्द ‘चांद’ म्हणजे चंद्रावरून आलेला आहे. हा धातू चंद्राच्या प्रकाशासारखा दिसतो त्यामुळे तसे झाले आहे हे उघड आहे. थाळी आता मराठी झालेली असली तरी ती मुळात हिंदीकडूनच आली आहे. पारंपरिक मराठीत ‘पानं घेतली’ किंवा ‘ताटं वाढली’ असं म्हटलं जात होतं. थाळी लोकप्रिय केली ती मुख्यत: उपाहारगृहांनी. थाळी, कटोरा, लोटा ही हिंदीतील जेवणाची सामग्री. मराठीत ताट, वाटी आणि भांडं किंवा फुलपात्र.

म्हणजे जे शब्द आता पूर्णपणे मराठी वाटतात त्यांचा उद्गम वेगळ्या भाषेतून होऊन मग ते मराठीने आपलेसे केलेले असू शकतात. आता ज्यांना तथाकथित ‘शुद्ध’ मराठीतून बोलायचं असेल ते हे वाक्य कसे म्हणतील? ‘लोकप्रतिनिधींच्या भोजनासाठी रुप्याची ताटं’. किंवा थोडी भेसळ करू दिली तर ‘पुढाऱ्यांच्या जेवणासाठी चांदीची ताटं’. या वाक्यातून वस्तुस्थिती प्रकट झाली तरी वृत्तपत्रातल्या बातमीतून जो बोचरा दंश झाला पाहिजे तो होत नाही. त्या अर्थाने ‘लोकसत्ता’ने केलेली वाक्ययोजना बरोबर आहे. राजकीय पुढाऱ्यांची उधळपट्टी आणि बेफिकिरी त्यातून अचूक व्यक्त होते. मेजवानीमध्ये जो विलास आहे तो जेवणामध्ये नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचे अन्वयार्थ तीन. एक म्हणजे भाषेच्या बाबतीत शुद्ध-अशुद्ध किंवा निर्मळ-प्रदूषित असा विचार करू नये. खरं तर सरमिसळ किंवा भेसळ झालेली जी भाषा असते ती अधिक समर्थ असते. कारण शब्दांचे विविध अर्थ पोहोचवण्यास ती सक्षम असते. भाषेचे जे व्याकरण असते ते जरूर पाळावे, परंतु काळाच्या ओघात तिचे स्वरूप बदलत असते हे विसरू नये. दुसरी गोष्ट, अशी सरमिसळ किंवा देवाणघेवाण ही भाषासक्तीने होत नसते. ती जनसामान्यांच्या पातळीवर सहजपणे होत असते. त्यात शासनयंत्रणेने हस्तक्षेप करायचा नसतो. तिसरी गोष्ट, मराठीसारख्या भाषेने आपण अभिजात आहोत असे मिरवण्यापेक्षा आपण बहुमिश्र (सिंक्रेटिक) आणि आधुनिक आहोत याचा अभिमान धरणे कधीही श्रेयस्कर!