बॉलीवूडमध्ये १९९० च्या दशकात, उदारीकरण्याच्या रेट्यात परदेशी स्थायिक झालेल्यांच्या आठवणीत गाण्यांचा पूर आला होता. तेव्हाची संवादाची पद्धत प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव देत नव्हती. आज आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गतही स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. वृद्ध आई-वडील पुण्यात, मुलगा लंडन तर मुलगी बॉस्टन, नवरा सिडनी तर बायको दिल्लीमध्ये! ही चित्रे सामान्य झाली आहेत. तरीही आजच्या लोकप्रिय संस्कृतीमध्ये दुराव्याची गाणी ट्रेंडिंग बनत नाहीत. कारण तंत्रज्ञानाचे बदललेले स्वरूप! व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून एकत्र असल्याचा आभास अनुभवता येतो. तंत्रज्ञान कुटुंबातील जिव्हाळा सांभाळून ठेवण्याचे काम करते. पण याच एकत्र कुटुंबाची वीण उद्ध्वस्त करण्यामागेही या तंत्रज्ञानाचाच हात आहे. एकत्र कुटुंब औद्याोगिकीकरणामुळे शहरात येऊन विभक्त झाले. आता डिजिटल क्रांतीमुळे याच कुटुंबाचे सदस्य विविध देशात काम करतात. पहिली क्रांती म्हणजे शेतीचा शोध, त्यानंतर औद्याोगिकीकरण, दळणवळण क्रांती आणि आता एआय अशा सर्व तंत्र क्रांतींमुळे कुटुंबाची रचना, कर्तव्ये आणि अभिव्यक्ती बदलत आहे. या लेखात तंत्रज्ञान, कुटुंब आणि नातेसंबंधातील बदलामागील राजकारण याचा आढावा घेऊ.

पहिली क्रांती

मुळात टोळ्यांत राहणारा मनुष्य कुटुंब करून राहू लागला, कारण अतिरिक्त उत्पादनाची निर्मिती! उरलेले अन्न, साधनसामग्री ‘आपल्या’ माणसांनी वापरावी, त्यांनीच संपत्तीवर वारसाहक्काने कब्जा मिळवावा यासाठी कुटुंब व्यवस्थेची निर्मिती झाली असे एक प्रवाह सांगतो. पुढे जाऊन अॅरिस्टॉटलने त्याच्या पोलीस म्हणजेच सर्वात प्रगल्भ मानवी राजकीय संस्थेच्या निर्मितीचा सर्वात मूलभूत घटक कुटुंब व्यवस्था असल्याचे सांगितले. त्याने वर्णन केलेले ‘ओइकोस’ (घर किंवा कुटुंब) हे फक्त भावनिक आधार देणारे ठिकाण नव्हते, तर तो कणखर आणि स्वयंपूर्ण आर्थिक घटक होता. त्यात मुख्यत्वे कुटुंब, मालमत्ता आणि गुलाम यांचा समावेश असे. डी. ब्रेंडन नॅगल यांच्या अभ्यासानुसार, ग्रीक ‘ओइकोस’ हे जवळपास नेहमीच शेतीवर आधारित, स्वत:च्या गरजा पूर्ण करणारे संयुक्त उद्याोग असायचे. याच्या उलट, आजची आधुनिक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या अपूर्ण आहेत. त्यामुळे ती केवळ वस्तू वापरणारी आणि वंशवृद्धी करणारी एकके बनली आहेत. ‘ओइकोस’चे मुख्य कार्य म्हणजे ‘पोलीस’ (शहर-राज्य) च्या राजकीय जीवनासाठी आवश्यक भौतिक वस्तू आणि सद्गुणी नागरिक निर्माण करणे. थोडक्यात कुटुंबव्यवस्था ही आभाळातून आलेली दैवी, निसर्गदत्त गोष्ट नाही तर प्रस्थापित राजकीय-आर्थिक व्यवस्थेच्या भरभराटीसाठीची सामाजिक गरज होती. कुटुंबाचे हे विकृतीकरण ही काही नवीन, तंत्रज्ञानामुळे घडणारी गोष्ट नाही, तर राज्याची निर्मिती करण्याच्या सातत्याने सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पाचा तो अविभाज्य भाग आहे. नांगरापासून ते अल्गोरिदमपर्यंतचे तंत्रज्ञान हे नातेसंबंधांवर आधारित गटांकडून केंद्रीकृत राज्याकडे सत्ता हस्तांतरित करण्याच्या या खोलवरच्या प्रक्रियेला गती देणारे केवळ एक साधन आहे.

दुसरी क्रांती

औद्याोगिकीकरणानंतर ग्रामीण लोकसंख्या शहराकडे स्थलांतरित झाल्याने एकत्र कुटुंब लहान झाले. आता, कुटुंबातील सदस्यही काम करणारे झाल्यामुळे, त्यांना उदरनिर्वाहासाठी त्यांच्या कुटुंबाबाहेरील रचना आणि प्रक्रियांवर थेट अवलंबून राहावे लागले. या नवीन आर्थिक असुरक्षिततेमुळे, श्रीमंत आणि गरीब कामगार वर्गामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली, परिणामी समाजात आणि राजकारणात गंभीर तणाव वाढले. पालनकर्त्याची भूमिका बजावण्यामध्ये कुटुंब दोन पावले मागे सरले आणि ती जागा राज्यसंस्थेने घेतली. विसाव्या शतकातील सक्तीचे सार्वजनिक शिक्षण आणि बालकामगार कायदे ही कल्याणकारी धोरणे नवीन औद्याोगिक अर्थव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या सामाजिक समस्या हाताळण्यासाठी तयार केलेला एकच, सुसंगत राजकीय प्रकल्प होता. विखंडित कुटुंब हे केवळ औद्याोगिकीकरणामुळे झालेले नुकसान नव्हते; तर, फिरता आणि वैयक्तिक कामगार वर्ग तयार करण्यासाठी ती औद्याोगिकीकरणाची राजकीय गरज होती. या परिस्थितीत राज्याने नवीन, सार्वत्रिक हमीदार म्हणून आपली भूमिका स्वीकारली. बेरोजगार भत्ता, भविष्यनिर्वाह निधी, निवृत्तीवेतन, विमा अशा योजनांमधून पालनकर्ता ही कुटुंबाची भूमिका राज्याने बळकावली. सक्तीचे शिक्षण नवीन व्यवस्थेसाठी मजूर तयार करू लागले. मुख्यत: बाहेरून अमेरिकेत आलेल्या स्थलांतरित लोकांना नागरिक म्हणून घडवण्याचे काम यातून झाले आणि नैतिक शिस्त लावण्याचे कामही धर्म, चर्च अथवा कुटुंबाकडून राज्यसंस्थेकडे हस्तांतरित झाले.

तिसरी क्रांती

कुटुंब व्यवस्थेला पुढचा तडा गेला तो डिजिटल क्रांतीमुळे! एके ठिकाणी सेवा क्षेत्राच्या प्राबल्यामुळे जागतिक स्थलांतर वाढले तर इंटरनेटच्या अस्तित्वामुळे ऑनलाइन सेवांचे प्रमाण वाढून प्रत्यक्ष स्थलांतरची गरज कमी झाली. एकमेकांतील संवादाचा दुवा बनून डिजिटल तंत्रज्ञान आजी-आजोबा आणि नातवापासून ते पती-पत्नीपर्यंत नात्यांचे भर वाहू लागले. पण त्यापेक्षा विस्मयकारक परिणाम म्हणजे स्वत:चेच स्वत:पासून विलगीकरण! आजकाल कुटुंबातील संवाद अनियमित, अपरिपूर्ण आणि सभोवताल आणि स्क्रीन यांच्यामधील पडद्याने झाकोळलेले आहेत. ही परिस्थिती सध्याच्या पालकत्वाच्याही केंद्रस्थानी दिसून येते. डॉ. कॅथरीन स्टेनर-अडेअर यांनी पालकांच्या या विचलनाला ‘द बिग डिस्कनेक्ट’ असे म्हटले आहे. तंत्रज्ञानाचा कौटुंबिक कार्यावर होणाऱ्या परिणामांच्या एका पद्धतशीर अभ्यासात असे आढळले की हे विचलन सर्वत्र पसरलेले आहे. ७८ टक्के मातांनी सांगितले की मुलांचा गृहपाठ करताना किंवा त्यांना जेवण भरवताना त्यांचे मोबाइल फोनमुळे लक्ष विचलित होते. या वर्तनाचा मुलांच्या आईबद्दलच्या मानसिक प्रतिमांवर परिणाम होतो असे आढळले आहे. यामुळे घराच्या गतिशीलतेत मूलभूत बदल झाला आहे, जिथे पूर्वीचे एकत्रित घराचे घरपण आता केवळ एका खोलीपुरते मर्यादित झाले आहे. याचा राजकीय परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणावर एकाकीपणा. आधुनिक जीवनाची व्याख्या करणाऱ्या या फोन-आधारित अस्तित्वामुळे मानवी स्वभावाचा ‘राजकीय’ भाग कमी होत आहे. कुटुंबातील सामायिक, समान वास्तव आता अल्गोरिदम-नियंत्रित इको चेंबर्सने बदलले आहे.

राजकीय विचारवंत हॅना अरेन्ड्ट यांनी २०व्या शतकातील एकतंत्री राजवटींचे विश्लेषण करताना, संघटित एकाकीपणा हे एकतंत्री सरकारचे मूळ आणि दहशतीचा आधार असल्याचे म्हटले होते. त्यांच्या मते, एकतंत्री राजवट लोकांच्या ‘अनुभव आणि विचार’ या दोन्ही क्षमता नष्ट करते. डिजिटलायझेशनचा राजकीय धोका केवळ कुटुंबाचे विघटन हाच नाही; तर, तो एकतंत्री राजवटीपूर्वीची सामाजिक परिस्थिती निर्माण करत आहे. कुटुंबापासून आणि सामायिक, समान वास्तवापासून वेगळा झालेली, विभक्त व्यक्ती ही मोठ्या प्रमाणावर वैचारिक आणि राजकीय नियंत्रणाच्या नवीन स्वरूपासाठी आदर्श नागरिक बनते.

चौथी क्रांती

एआयमुळे आपण आणखी पुढे गेलो. पालकत्व, वृद्धसेवा हे विविध अॅप्समार्फत आउटसोर्स करणे सोपे झाले आहे. त्यातून प्रत्यक्ष जबाबदारीविना जिव्हाळा जोपासण्याचे सुख मिळत आहे. अशा भावनिक ओलाव्याशिवाय वाढलेली पिढी कशी असेल हे अनिश्चित आहे. ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’च्या जमान्यात घरगुती खासगीपणाला पद्धतशीर चूड लावून आपण राज्य-कॉर्पोरेट युतीला घरात आवतण दिले आहे. त्यापेक्षा चिंताजनक बाब म्हणजे एआयचे राजकीय अर्थशास्त्र! अमेरिकेतील औद्याोगिक रोबोट्सच्या वापरावरील संशोधनात २००५ ते २०१६ दरम्यान असे आढळले की रोबोट्सच्या वाढत्या वापरामुळे विवाहाच्या बाजारात पुरुषांचे आर्थिक मूल्य लक्षणीयरीत्या कमी झाले. या काळात विवाहदरांमध्ये घट, घटस्फोट आणि लिव्ह-इनचे वाढलेले प्रमाण, घटलेला जन्मदर आणि विवाहबाह्य जन्मांमध्ये वाढ ही काही निरीक्षणे नोंदवली गेली आहेत.

तंत्रज्ञानाच्या एकापाठोपाठ येणाऱ्या लाटांमुळे कुटुंबाचे होणारे विकृतीकरण आता केवळ एक सुप्त सामाजिक परिणाम राहिलेला नाही. ते आता एकविसाव्या शतकातील राजकीय संघर्षाचे केंद्रस्थान बनत आहे. कुटुंबात व्यक्ती, राज्य आणि तांत्रिक-बाजार व्यवस्थेचे हितसंबंध सर्वात तीव्र स्वरूपात व्यक्त होतात. सार्वजनिक आणि खासगी या सामाजिक-राजकीय संकल्पनांना पुनर्रचित करण्याचे काम कुटुंबात खोलवर घुसलेले तंत्रज्ञान करत आहे. तंत्रज्ञानाच्या रूपात आलेला अरबाचा उंट आधीच घरात घुसला आहे. कुटुंब व्यवस्थेला देखील तडे गेले आहेत. त्याच्या ठिकऱ्या होण्यापासून बचावणे हे आगामी काळापुढचे आव्हान असेल.