डॉ. उज्ज्वला दळवी

कुत्र्याच्या चाव्यातून, कबुतरांच्या संसर्गातून आजार होऊ शकतात; पण कधी तर आपलीच एखादी पुटकुळी फोडल्याचं निमित्तही पुरतं..

‘‘ते काका प्राण्यांवर प्रेम करतात. पदरमोड करून गल्लीतल्या सगळय़ा भटक्या कुत्र्यांना रोज खाऊ घालतात.’’ तसे अनेक श्वानप्रेमी काका जागोजागी दिसतात. पण त्यांच्यातले क्वचित कुणी त्या बापडय़ा कुत्र्यांना रेबीजची लस द्यायचे कष्ट घेतात. रेबीजचा अर्थच पिसाळणं, वेडंपिसं होणं. तो नसांचा, मेंदूचा आजार आहे. पाणी पाहिलं; वाऱ्याची झुळूक लागली तरी त्यांच्या घशाचे स्नायू करकचून आखडतात; भुंकल्यासारखा मोठा आवाज होतो; असह्य दुखतं. खाणंपिणं अशक्य होतं. मरेपर्यंत फक्त तडफडाट असतो.  माणसांत आणि कुत्र्यांतही रेबीजचा आजार झाला की मृत्यू १०० टक्के ठरलेला असतो. दरवर्षी जगभरातले ६० हजार लोक या आजाराने मरतात. त्यातले ४० टक्के मृत्यू १५ वर्षांखालच्या मुलांचे असतात. अलीकडे केटामीनसारख्या, मेंदू शांतवणाऱ्या औषधांमुळे ते मरण थोडं सुस झालं आहे. पण अद्याप रेबीजवर उपाय नाही. मुलांना आणि काही मोठय़ांनाही रेबीजचं गांभीर्य समजत नाही. लहानशा चाव्याकडे झालेलं दुर्लक्ष जिवावर बेतू शकतं.

चावणारा कुत्रा पिसाळलेला आहे की नाही हे समजणं कठीण असतं. म्हणून कुत्रा चावला की ताबडतोब ती जखम आयोडीनने किंवा साबणपाण्याने किमान १५ मिनिटं धू-धू-धुवावी. त्यानंतर लगेचच व्हायरसशी ताबडतोब झुंजणारं प्रथिन (रेबीज-इम्यूनोग्लोब्युलिन) आणि रेबीजची लस ही दोन्ही इंजेक्शनं घ्यावी. रेबीजची लस पुन्हा तिसऱ्या, सातव्या आणि चौदाव्या दिवशीही घ्यावी. कुठल्याही अतिमहत्त्वाच्या कामासाठी त्यात टंगळमंगळ करू नये. प्रतिकारशक्ती कमी असेल तर अठ्ठाविसाव्या दिवशी चौथा डोसही घ्यावा. प्रतिकारशक्ती टिकवायला रेबीजची लस पुन:पुन्हा घ्यावी लागते. कारणाशिवाय लस घेणं योग्य नाही. म्हणून ती सरसकट सगळय़ांना दिली जात नाही. म्हणून फक्त पशुवैद्यांना; विषाणूंवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना; पशुसंग्रहालयात, जंगलांत काम करणाऱ्या माणसांना नियमितपणे रेबीजची लस दिली जाते. तशीच लस अमेरिकेत भटक्या कुत्र्यांना, रानटी जनावरांना नेमस्तपणे दिली जाते. आता तर त्यांना तशी लस तोंडावाटेही देता येते. त्यामुळे गेल्या ४० वर्षांत तिथला रेबीजचा वार्षिक मृत्युदर ३०० वरून तिनावर आला आहे. तोंडी लस प्रभावी, सोयीची आणि स्वस्त आहे. थायलंडसारख्या विकसनशील देशातही तिचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

 रेबीजचं निदान करायला लागणाऱ्या तपासण्या महाग आहेत आणि सगळीकडे होतही नाहीत. त्यामुळे आपल्याकडच्या अनेक रुग्णांची नोंदही होत नाही. आपल्याकडे मुख्यत्वे सफाई कामगार, खेडय़ापाडय़ांतले लोक आणि लहान मुलं यांना रेबीज होतो. तो टाळण्यासाठी पाळीव कुत्र्यांना तर लस द्यावीच, पण भटक्या कुत्र्यांनाही लस देणं गरजेचं आहे. अन्नदात्या काकांनी लसदातेही बनावं. स्वयंसेवी संस्था, काही पशुप्रेमी लोक ते काम करत आहेतच. त्यांनी त्याचसोबत लोकशिक्षणही केलं तर रेबीजचं गांभीर्य खेडुतांना, गोरगरिबांना समजेल. त्याला सरकारचा हातभार लागला तर कामाला वेग येईल.

इंजेक्शन की तोंडी?

‘‘तुमच्या गोल्यांनी ताप-खोकला ग्येला. पन एक सुई मारशाल तर मी पुन्यांदा टणकी व्हयन!’’ कामाच्या बाईला पाच दिवसांच्या औषधपाण्याने बरी केल्यावर त्या पुण्याईचा फुगा तिने एका सुईने फोडला. ‘रामबाणासारखं घुसणारं इंजेक्शन आजाराच्या मर्मावर पोहोचतं,’ असा अनेकांचा गैरसमज असतो.  रुग्णाला उलटय़ा होत असल्या; पोटाचा आजार-ऑपरेशन असलं; गिळायला त्रास असला किंवा तो बेशुद्ध असला तर इंजेक्शनांचा पर्याय बरोबरच असतो. लस, कॅन्सरवरचे काही उपाय, इन्सुलिन वगैरे औषधं ही प्रथिनं असतात. ती तोंडावाटे घेतली तर पचतात; हवी तिथे पोहोचत नाहीत. तसे काही अपवाद सोडले तर अलीकडची बरीचशी प्रभावी औषधं तोंडावाटे घेतली तरी उत्तम काम करतात. तोंडी औषधांना लिव्हरचा चेकनाका लागतो. काही औषधांचा थोडा भाग जकातीसाठी वजा होतो. रक्तात कमी औषध पोहोचतं. म्हणून तोंडी औषधांत तेवढा अधिकचा डोस ठेवलेलाच असतो.  काही औषधं इंजेक्शनाने घेण्यासाठी उगाचच हॉस्पिटलात राहावं लागतं. शिवाय औषधांची इंजेक्शनं बनवताना त्यांच्यावर अधिक प्रक्रिया करावी लागते; ती र्निजतुकही असावी लागतात. देताना सीिरज-सुई-कापूस-स्पिरिट, सुईदात्या डॉक्टर-नर्सची फी आणि दवाखान्यापर्यंतचा जातायेता खर्च यांनी गोळीपेक्षा इंजेक्शन बरंच महाग होतं. ते देताना हयगय झाली तर गळू होणं, जवळच्या नसांना इजा पोहोचणं, एड्स-घातक कावीळ यांच्यासारखी भलती लागण होणं असे अनेक धोके संभवतात. सध्याच्या एड्स-हेपॅटायटिसच्या युगात, विशेषत: लहान मुलांमध्ये अत्यावश्यक असेल तिथेच सुई टोचून घेणं बरं. ‘छिद्रेश्वनर्था बहुलीभवन्ति’ हे ध्यानी असू द्यावं.

रक्तवाहिन्यांच्या मार्गावर..

सुमुखीने नाकावरची तारुण्यपीटिका दाबून फोडली. पंधरवडय़ाने तिचं डोकं असह्य दुखायला लागलं, ताप आला आणि उजवा डोळा तिरळा झाला. डॉक्टरांनी विशिष्ट सीटीस्कॅन करून निदान केलं. तारुण्यपीटिकेतले जंतू मेंदूच्या रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचले होते. नशिबाने तीन जालीम अँटिबायोटिक्स शिरेतून महिनाभर दिल्यावर तिला बरं वाटलं. तरी डोळा तिरळाच राहिला. नाक, भुवईचा-डोळय़ांचा-पापण्यांचा नाकाजवळचा भाग, वरचा ओठ आणि वरच्या, मधल्या दातांची मुळं यांच्याकडून निघणाऱ्या रक्तवाहिन्यांचा मेंदूकडून येणाऱ्या रक्तवाहिन्यांशी संगम होतो. चेहऱ्याच्या त्या भागाकडचे जंतू मेंदूकडच्या रक्तवाहिन्यांत पोहोचू शकतात. म्हणून तेवढय़ा भागातले फोड, तारुण्यपीटिका, गळवं फोडू-नखलू नयेत. त्या भागातली फोड-गळवं आपल्याआपण लगेच बरी होत नसली तर आवर्जून डॉक्टरी इलाज लगेच करावेत.

कबुतरांचा ‘स्वर्ग’

कुशामावशींच्या ऐसपैस व्हरांडय़ात दाणे टिपायला बरीच कबुतरं येत. मावशी झोपाळय़ावर बसून त्यांना बघत. आठवडय़ातून एकदा पारू व्हरांडा झाडून त्या कबुतरांची सुकलेली घाण साफ करी. हळूहळू मावशींना आणि पारूलाही धाप लागायला लागली. औषधोपचार बरेच झाले. पण धाप वाढत गेली. साठीच्या मावशी आणि पस्तिशीची पारू, दोघीही  फुप्फुसाच्या आजाराने वारल्या. कबुतरांच्या विष्ठेत त्यांची स्वत:ची, अंगभूत प्रथिनं असतात. सुकलेल्या विष्ठेच्या धुळीबरोबर ती माणसांच्या श्वासात आणि तिथून फुप्फुसांत शिरतात. तिथे त्यांचं मानवी लढाऊ पेशींशी युद्ध होतं. पण जखमा फुप्फुसांना होतात. ‘कबुतरप्रथिनां’चा हल्ला लगेच, पूर्णपणे थांबला तर जखमा भरतात, वण राहात नाही. पण संपर्क सुरूच राहिला तर कबुतरांचे फडफडणारे पंख सतत नवी प्रथिनधूळ झाडतात. फुप्फुसांतलं युद्ध सुरूच राहातं; जखमांच्या वणांनी रक्तवाहिन्या वेढल्या जातात. प्राणवायू-कार्बनडायॉक्साइडची देवाणघेवाण जमेनाशी होते. त्यानंतर कबुतरांचा संपर्क टाळला तरी उशीर झालेला असतो. खोकला-धाप जन्माचे साथीदार बनतात.  प्राणवायूची रसद, स्टेरॉइड्स, इतर जालीम औषधं चालूच ठेवावी  लागतात. तरीही त्यांच्यातले  ३० टक्के रुग्ण जेमतेम पाचच वर्ष जगतात. तो त्रास तरुणांना आणि मुलांनाही होऊ शकतो. कबुतरांच्या विष्ठेत क्लॅमायडिया नावाचे जंतू आणि क्रिप्टोकॉकस नावाची बुरशीसुद्धा असते. ते बुरशी-जंतू कित्येक महिने जिवंत राहतात आणि कित्येक आठवडय़ांपर्यंत रोगांचा प्रसार करतात. त्या विष्ठेतल्या जंतूंमुळे न्यूमोनिया होतो. त्याच्यासोबत डोकेदुखी, जुलाबही सतावतात. त्याचं निदान वेळीच झालं तर सर्वसाधारण माणसांत योग्य अँटिबायोटिक्सनी (टेट्रासायक्लीन, एरिथ्रोमायसिन) तो बरा होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण म्हातारपण, गरोदरपणा, मधुमेह, मोठा आजार-शस्त्रक्रिया वगैरे कुठल्याही कारणाने प्रतिकारशक्ती खालावलेली असली तर मात्र तो आजार जीवघेणा ठरू शकतो. त्याचं नेमकं निदान करणाऱ्या रक्ताच्या तपासण्या काही मोजक्या प्रयोगशाळांतच होतात. त्यामुळे योग्य औषधोपचार झाले तरी रोगाची नोंद होत नाही. कबुतरांच्या विष्ठेतली, धुळीतली बुरशी बहुधा प्रतिकारशक्ती खालावलेल्या माणसांनाच त्रास देते.  तिने मेंदूला सूज येते (मेिनगोएन्केफॅलायटिस). उपचारासाठी महागडी, जालीम औषधं वर्ष-वर्ष घ्यावी लागतात. त्यांचे दुष्परिणामही मोठे असतात. त्या आजाराने जगभरात दरवर्षी सहा लाख मृत्यू होतात. म्हणून घरांच्या, कचेऱ्यांच्या, रुग्णालयांच्या आसपास कबुतरांना शक्यतो थारा देऊ नये. रुग्णालयांच्या गच्च्या, एअर-कंडिशनर्स वगैरेमध्ये कबुतरांनी ठाण मांडलं की ते दुर्बलदारक रोग आधीच आजारी असलेल्या माणसांपर्यंत सहज पोहोचतात. म्हणून आपल्या आजूबाजूला कबुतरांची संख्या वाढू देऊ नये. ‘कबुतरांच्या पंखांच्या वाऱ्यात श्वास घेतला की स्वर्ग लाभतो,’ अशी समजूत आहे आणि ‘स्वर्ग फार लवकर लाभतो,’ हे सत्य आहे.