अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात खंडीभर खटले सुरू आहेत. त्यांतील सर्वात गंभीर स्वरूपाच्या खटल्यात परवा त्यांना पाचारण केले गेले. अपेक्षेनुसार ट्रम्प यांनी संबंधित आरोप अमान्य केले. अध्यक्षपदाची कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर व्हाइट हाऊस सोडताना संरक्षण विभागाशी संबंधित अत्यंत गोपनीय कागदपत्रे ट्रम्प यांनी ताब्यात घेतली आणि फ्लोरिडातील स्वत:च्या खासगी निवासस्थानी नेली. तेथेही त्यांनी बेजबाबदारपणे ती कागदपत्रे बिगरसरकारी किंवा खासगी वर्तुळातील मंडळींसमोर सादर केली हा गंभीर आरोप प्रस्तुत खटल्यात ठेवण्यात आला आहे. एकूण ३७ आरोप असून, त्यांपैकी ३१ हेरगिरी कायद्याशी संबंधित आहेत. या गुन्ह्यामध्ये दोषी आढळल्यास २० वर्षांच्या कैदेची तरतूद आहे. परंतु तशी शक्यता कमी आहे अशी खात्री ट्रम्प व त्यांच्या समर्थकांना वाटते. फ्लोरिडातील न्यायालयात उपस्थित राहिले तो दिवस ट्रम्प यांच्यासाठी नेहमीसारखाच होता. भाषणे, प्रचार, निधीसंकलन, मेजवानी वगैरे वगैरे. ही व्यक्ती पुढील वर्षी होत असलेल्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे सर्वात तगडी उमेदवार सध्या तरी ठरते. त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, ट्रम्प विरुद्ध बायडेन अशीच लढत या निवडणुकीत झाल्यास अध्यक्षपदी पुन्हा निवडून येण्याची संधी ट्रम्प यांना आजही जवळपास समान आहे. म्हणजे पुन्हा एकदा निवडणुकीच्या मार्गाने सत्ता हस्तगत केल्यानंतर तेथे विविध प्रकारची टगेगिरी सुरू करायची अशी ही योजना.

तसे झाल्यास ट्रम्प यांच्यावरील विविध खटल्यांचे काय होईल याविषयी अमेरिकेतील कायदेतज्ज्ञ आणि घटनातज्ज्ञांमध्ये खल सुरू आहे. शिवाय अमेरिकी मतदारांमध्ये ट्रम्प यांना आजही असलेला प्रचंड पाठिंबा गृहीत धरल्यास, ‘मला तुरुंगात टाकण्याचा डेमोक्रॅट्सचा कट तुम्हीच हाणून पाडा’ अशा नाटय़मय आर्जवाच्या आधारे ट्रम्प प्रचार करण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. यात जो बायडेन प्रशासनाची पंचाईत अशी, की ते स्वत:, तसेच हिलरी िक्लटन आणि रिपब्लिकन पक्षाचेच माइक पेन्स यांनीही सरकारी गोपनीय कागदपत्रांच्या बाबतीत असाच अजागळपणा दाखवला होता. परंतु त्यांना निव्वळ समज देण्यात आली होती. ‘मग त्यांना वेगळा न्याय आणि ट्रम्प यांना वेगळा न्याय असे का?’ अशा अर्धवट युक्तिवादावर ट्रम्प आणि त्यांचे समर्थक वातावरणनिर्मिती करत आहेत. अशा प्रकारच्या समांतर वास्तवविश्वात नेमकी आणि पूर्ण माहिती जाणून घेण्याची बहुतांची इच्छा नसते. नपेक्षा, ट्रम्प हे अध्यक्ष होते तर बाकीचे तिघे उपाध्यक्ष; ट्रम्प यांनी  गोपनीय कागदपत्रांशी ‘हेतुपुरस्सर’ छेडछाड केली जो गंभीर आरोप ठरतो, बाकीच्यांवर तसे आरोप झालेले नाहीत; हेरगिरीचा आरोप तर आजतागायत एकाही अध्यक्षावर झालेला नाही, वगैरे मुद्दे त्यांच्या वर्तुळात उपस्थित झाले असते.

Amit Shah
Amit Shah Investment: अमित शाह यांच्याकडे कुठल्या कंपनीचे किती शेअर्स आहेत माहीत आहे?
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?

अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने संरक्षण विभागाशी संबंधित कोणती कागदपत्रे अत्यंत संवेदनशील आहेत याविषयीची पुरेपूर कल्पना अध्यक्षपदावरील व्यक्ती कितीही बालबुद्धी असली तरी तिला सातत्याने अवगत करण्याची जबाबदारी तेथील प्रशासनाची असते. ट्रम्प यांनी बचावादाखल सादर केलेली उत्तरे हास्यास्पद आहेत. हे काही नमुने..  ‘प्रचंड प्रमाणात सामानाची बांधाबांध झाली. काय ठेवावे नि काय ठेवू नये हे ठरवण्यासाठी वेळ मिळाला नाही’, किंवा ‘मी अध्यक्षपदावर असताना जी कागदपत्रे माझ्या पाहण्यात, ताब्यात येतील त्यांना गोपनीय वा सार्वजनिक ठरवण्याचा अधिकार माझा. तो माझा अध्यक्षीय अधिकार’.. शिवाय ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमधील कागदपत्रे मायामीत त्यांच्या खासगी प्रासादात नेली, तेथे हजारोंचा दररोजचा राबता असतो. ही कृती अत्यंत बेजबाबदारपणाची होती. पण बेजबाबदारपणाची व्याख्या मुळात जबाबदारीच्या परिप्रेक्ष्यात सुनिश्चित होते. ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांना ‘या’ परिप्रेक्ष्यात यायचेच नाही. त्यांचे विश्व वेगळे आहे. त्यामुळेच निवडणुकीत मतपेटीतून झालेला पराभव त्यांना विरोधी पक्षीयांचा कट वाटतो. कायदेमंडळाच्या वास्तूवर मध्ययुगीन काळाप्रमाणे शस्त्रे घेऊन चाल करून जाणे त्यांना आत्मसन्मानजनक वाटते. डोनाल्ड ट्रम्प यांना आता दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये ते जामिनावर सुटले आहेत. तरी त्यांचा वावर एखाद्या नायकासारखा असतो. दोन्ही खटले आणि पुढे आणखी काही खटले ट्रम्प स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी जमेल तितके वाजवून घेणार हे नक्की. ट्रम्प यांचे पक्षातील विरोधकही विद्यमान दोषारोपपत्राच्या मुद्दय़ावर ट्रम्प यांची पाठराखण करत आहेत. खटले आणि दोषारोपपत्रांनी त्यांची राजकीय कारकीर्द काळवंडण्याऐवजी उजळून निघते आहे! त्यामुळे ते खरोखरीच कायदेशीर अडचणींमध्ये सापडले आहेत का, या प्रश्नाचे उत्तर तूर्त नकारार्थीच द्यावे लागते.