अवघ्या २३ वर्षांचा प्राचार्य कसा दिसतो, असा प्रश्न कधीकाळी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना पडला होता. त्याचे अप्रूप वाटले होते. त्यामुळे ते खास या तरुण प्राचार्याला पाहण्यासाठी नाशिकच्या भि.य.क्ष. महाविद्यालयात गेले होते. संबंधितांना भेटल्यानंतर खुद्द कुसुमाग्रजांनी ही बाब कथन करीत त्यांना ‘प्राचार्याचे प्राचार्य व्हा, सारस्वतांचे सारस्वत व्हा,’ अशा शुभेच्छा दिल्या होत्या. हे प्राचार्य होते गोखले शिक्षण संस्थेचे सचिव तथा महासंचालक, शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी. त्यांचे नाशिक येथे नुकतेच निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षांपर्यंत प्राचार्य गोसावी हे त्याच उत्साहाने शिक्षण क्षेत्रात अथकपणे कार्यरत राहिले.

शिक्षण हे विद्यार्थीकेंद्रितच हवे. विद्यार्थ्यांनी नावीन्याची कास धरावी. अभ्यासासोबतच खेळात किंवा आवड असेल त्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवावे. देशाची आणि वैयक्तिक प्रगती ही एकमेकांवर अवलंबून असते. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, असा आग्रह गेल्या पाच दशकांपासून धरणाऱ्या डॉ. गोसावी यांनी अनेक पिढय़ा घडविल्या. या वयातही गोसावी हे विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधायचे, मार्गदर्शन करायचे. अलीकडेच जे.डी.सी. बिटको व्यवस्थापनशास्त्र संस्थेच्या वार्षिक पुरस्कार सोहळय़ात ते सहभागी झाले होते. व्यवस्थापनशास्त्र हा त्यांचा अतिशय आवडता विषय. देशात या विषयावरील अभ्यासक्रम सुरू व्हावा, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यास यश मिळून १९६८ मध्ये दोन वर्षांचा एमबीए अभ्यासक्रम सुरू झाला. व्यवस्थापनाचे शिक्षण विद्यापीठीय पातळीवर देणारा हा पहिला प्रयोग होता. व्यावसायिकता, उद्योजकता, आंतरशाखीय अभ्यासक्रम असे अनेक नवे प्रवाह त्यांनी विद्यापीठीय शिक्षणात आणले. १९८० च्या दशकात संगणकीय शिक्षणाचा पुरस्कार सरांनी केला. संशोधनासाठी प्रोत्साहन देताना उच्च शिक्षणाला उद्योजकतेकडे नेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फलटण हे गोसावी सरांचे मूळ गाव. आईकडून एकनाथांचे नाते आणि वडिलांकडून मिळालेल्या आध्यात्मिक बैठकीतून गोसावी यांच्या कुशाग्र बुद्धी, भाषाकौशल्य आणि स्वतंत्र विचारशक्तीची मशागत झाली. प्राथमिक ते विद्यापीठीय परीक्षांमध्ये सातत्याने प्रथम स्थान राखून स्वप्नवत वाटणाऱ्या अनेक गोष्टी त्यांनी वास्तव्यात आणल्या. पुणे येथे पदव्युत्तर शिक्षणानंतर सनदी सेवा क्षेत्र सोडून गोसावी यांनी शिक्षण क्षेत्राची निवड केली. भि.य.क्ष. महाविद्यालयात प्राचार्य,  पुणे विद्यापीठाचे वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता, व्यवसाय प्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, भारतीय वाणिज्य सभेचे अध्यक्ष अशी अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. वेद, उपनिषद, गीता यांचा गाढा व्यासंग होता. नामवंत लेखक, शास्त्रज्ञ, विचारवंतांना निमंत्रित करीत त्यांनी विद्यार्थ्यांना नवी दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला. २० पेक्षा जास्त पुस्तके, १०० हून अधिक शोधनिबंध, अनेक ग्रंथांचे संपादन केले. आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञांमध्ये गोसावी सरांची गणना झाली. शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. गोखले संस्थेचा विस्तार करीत शिक्षकदेखील उत्तम प्रकारे शिक्षण संस्था सांभाळू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले.