– हरदीप (सिंग) पुरी

राजकीय वारसा हीच नेतृत्वाची अधिमान्यता, अशा चुकीच्या समजुतीचा दुष्परिणाम स्वतंत्र भारतातील राजकारणाने आजवर बराच काळ भोगला आहे. ही अशी गल्लत खरी मानली गेल्यामुळे एका कुटुंबाला आणि एका पक्षाला असे वाटू लागले की ते राज्य करण्यासाठीच जन्माला आले आहेत. याच मानसिकतेमुळे आपल्या देशातील संस्थात्मक चौकट खिळखिळी किंवा पोकळ करून, पुढल्या पिढ्यांचा राजकीय विशेषाधिकार हा जन्मसिद्ध हक्क म्हणून कसा टिकवण्यात आला, हेही आपण पाहिलेले आहे. त्या राजकीय गृहीतकाला आव्हान देणारी आणि गुणवत्ता, जबाबदारी आणि कामगिरीवर आधारलेले राजकारण करणारी नवी राजकीय नीतिमत्ता गेल्या दशकभरात सशक्त होते आहे.

हे लिहिण्याचे तात्कालिक कारण म्हणजे ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने २३ ऑक्टोबर रोजी प्रकाशित केलेल्या ‘वन नेशन- अ फ्यू परिवार्स’ या वृत्तलेखात देशातील नऊ पक्षांमध्ये दुसऱ्या पिढीचे लोकप्रतिनिधी किती याची निव्वळ संख्यात्मक तुलना करून, नऊपैकी (भाजपसह) आठ पक्षांत हे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक, तसेच या आठपैकी काँग्रेससह पाच पक्षांत तर हे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षाही जास्त असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हे आकडे नाकारण्यात अर्थ नाही. पण भाजप आणि अन्य पक्ष यांच्यात फरक असा की, आदली पिढी राजकारणात होती म्हणून आपोआप पुढल्या पिढीने नेतृत्व मान्य करण्याचा प्रकार भाजपमध्ये कधी होत नाही. हा असा पक्ष आहे जिथे संधी स्वत: मिळवावी लागते, जिथे नेतृत्वाचा उदय कुणा घराण्यावर नव्हे तर काम करण्याची धडाडी, त्यासाठी असलेली वचनबद्धता आणि त्यातून मिळणारा लोकांचा विश्वास पाहूनच होत असतो. भाजपमध्ये ‘दुसऱ्या पिढीतले राजकारणी’ जरूर असतील, पण अन्य पक्षांमधल्या नेत्यांमध्ये जसे ‘घराणेशाहीचे वारसदार’ दिसतात, तसे भाजपमध्ये कधीही दिसले नव्हते आणि दिसणार नाहीत. हा फरक मूलभूत आहे. दुसऱ्या पिढीला राजकारणात येण्यास मज्जाव नाही… पण नेतृत्वाच्या निवडीतून राजकीय नीतिमत्ता दाखवून देणारा पक्ष भाजपच आहे.

अन्य पक्षांमध्ये ‘आदल्या पिढीच्या जागाच पुढल्या पिढीने चालवायच्या’ – आणि त्यातही एकाच पिढीने पक्ष हातात ठेवायचा- अशा प्रकारे नेतृत्वावर हक्क सांगितला जात असल्याने अंतर्गत वादसंवादाला जागाच उरत नाही, हे लोकशाहीचेही नुकसान असते. भाजपची राजकीय संस्कृती तशी नाही, हे धडधडीत दिसण्यासारखे आहे- एकविसाव्या शतकात या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद आठ जणांकडे होते- बंगारू लक्ष्मण, जन कृष्णमूर्ती, टी. व्यंकय्या नायडू, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शहा आणि जगतप्रसाद (जे. पी.) नड्डा. यापैकी प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रदेशातून आणि पार्श्वभूमीतून उदयास आले आणि प्रत्येक जण संघटनात्मक कार्याच्या शिस्तीतून वर आले. याच काळात, काँग्रेसचे फक्त तीन अध्यक्ष झाले आहेत, त्यापैकी दोन गांधी होते. सोनिया गांधी यांनी १९ वर्षे हे पद भूषवले आणि आजही, कुटुंबाचा अंतिम निर्णय कायम आहे. निव्वळ संख्यात्मक तुलना करून दोन पक्षांतला गुणात्मक फरक कळणार नाही. उदाहरणार्थ, भाजपकडे आज एकंदर २०७८ आमदार असून त्यापैकी ८४ जण दुसऱ्या पिढीतले आहेत, हे प्रमाण साधारण चार टक्के भरते. काँग्रेसकडे आमदार आहेत एकंदर ८५७, त्यापैकी ७३ जण (सुमारे नऊ टक्के) घराणेशाहीतून आलेले आहेत- ८४ पेक्षा ७३ हा आकडा कमी दिसतो खरा, पण हे प्रमाण कसे आहे? भाजपकडे काँग्रेसपेक्षा सुमारे अडीचपट अधिक आमदार असूनसुद्धा दुसऱ्या पिढीतले आमदार काँग्रेसकडे भाजपपेक्षा दुपटीहून जास्त आहेत!

तेव्हा मुद्दा असा की, निव्वळ संख्या पाहून चालणार नाही. संख्या किती प्रमाणात आहे हेही पाहिले पाहिजे. त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, निव्वळ कुणाची तरी आदली पिढी राजकारणात होती- तीही सत्तेत नसतानाही विशिष्ट विचाराने राजकीय कार्य करत होती, म्हणून घराणेशाहीची ओरड कशी करता येईल? अशा काही जणांचे दुसऱ्या पिढीतले नातलग आज भाजपमध्ये आहेत, त्यांना लोकप्रतिनिधित्वही मिळाले आहे, हा योगायोगच समजायला हवा. त्याउलट, एखाद्याच कुटुंबाने एखाद्या पक्षावर पिढ्यानपिढ्या मालकी गाजवण्याचा प्रकारही आपण गेल्या ७५ वर्षांत अनेकदा, अनेक पक्षांबाबत पाहिलेला आहे. हा परिवारवाद आपण कसा थांबवणार, हा कळीचा प्रश्न आहे.

काहींना वाटेल की मी काँग्रेसलाच लक्ष्य करतो आहे. त्याची गरज नाही. काँग्रेसच्या पलीकडेही, कुटुंबाच्या हातात सत्तेचे केंद्रीकरण अनेक प्रादेशिक पक्षांमध्ये दिसून येते. समाजवादी पक्ष मुलायमसिंह यादव यांच्याकडून अखिलेश यादव यांच्याकडे गेला. राष्ट्रीय जनता दल यादव कुटुंबाच्या अधीन राहिला (एक काळ असाही होता की, बिहार विधानसभेत लालूप्रसाद यादव यांच्याच कुटुंबातील आठ सदस्य होते. आता ही संख्या रोडावून एकवर आली असताना पक्षात कौटुंबिक कलहाचे प्रतिबिंब नव्याने दिसू लागलेले आहे, हा भाग निराळा) . द्रमुक हा तमिळनाडूतला पक्ष एम. करुणानिधी यांच्याकडून एम. के. स्टॅलिन आणि उदयनिधी स्टॅलिन यांच्याकडे गेला. तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक यांच्याभोवती फिरते. सोरेन कुटुंब झारखंड मुक्ती मोर्चावर नियंत्रण ठेवत आहे. ही उदाहरणे नेतृत्वाची नाहीत- कारण नेतृत्व लोकांमधून विकसित व्हायला हवे, ते या पक्षांमध्ये नसून वारशाने मिळालेल्या पदांवरच हे पक्ष चालत आहेत. त्यामुळेच कुटुंब वगळले की पक्ष कोसळतो. भाजप वेगवेगळ्या पद्धतीने, अनेक राज्यांत, लोकांच्या निरनिराळ्या स्तरांत उत्तम कार्य कसे काय करते हे समजून घेण्यासाठी, त्याच्या संस्थात्मक रचनेकडे लक्ष द्यावे लागेल. भाजपची संघटना स्तरित, महाविद्यालयीन आणि मिशन-केंद्रित आहे. कार्यकर्त्यांचे गुण भाजपमध्ये लवकर ओळखले जातात, अशा कार्यकर्त्यांना संरचित कार्यक्रमांद्वारे प्रशिक्षित केले जाते आणि बूथ, मंडल, जिल्हा आणि राज्य पातळीवर जबाबदारीद्वारे त्यांच्या नेतृत्वगुणांची चाचणी केली जाते. प्रत्येक टप्प्यावरील कामगिरी पुढील संधी निश्चित करते. निवडणुकीकडे भाजप हा केवळ जिंकण्याची संधी म्हणून पाहत नाही, तर संघटनकौशल्याच्या, लोकांवर प्रभाव पाडण्याच्या आणि कामगिरी करण्याच्या क्षमतांची परीक्षा म्हणूनही पाहतो. सेवा, शिस्त आणि वितरण हे प्रगतीचे चलन मानणारी व्यवस्था यातून तयार होते.

भाजपचे २०१४ नंतरचे नेतृत्व पहिल्या पिढीचे तर आहेच, पण भारताच्या सामाजिक प्रगतीची खूणही भाजपच्या या नव्या नेतृत्वातून पटते आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साई हे त्या राज्याचे पहिलेवहिले आदिवासी मुख्यमंत्री असोत किंवा भाजपच्या पक्षसंघटनेत वर्षानुवर्षे काम करून आता ओडिशाचे मुख्यमंत्रीपद मिळालेले मोहन मांझी असोत, हरियाणातल्या गरीब घरातले नायब सिंह सैनी असोत की मतदारसंघात तसेच पक्षकार्यात स्वत:ला गाडून घेणारे राजस्थानचे भजनलाल शर्मा असोत… यापैकी कोणाचेही, कोणीही नातेवाईक राजकारणात कधीच नव्हते.

टीकाकार कधीकधी विचारतात की भाजप घराणेशाहीपासून पूर्णपणे मुक्त आहे का? याचे प्रामाणिक उत्तर ‘नाही’ असेच द्यायला हवे कारण कोणताही मोठा लोकशाही पक्ष दुसऱ्या पिढीला राजकारणात येण्यापासून रोखू शकत नाही. खरा प्रश्न – आपल्या देशाला ग्रासणारा प्रश्न- त्याहीपेक्षा वेगळा आहे. ज्यांनी सततच्या कामातून संघटना आणि मतदारांचा विश्वास मिळवला आहे, अशांना डावलून बड्या नेत्यांच्या दुसऱ्या पिढीला केवळ त्यांच्या वंशावळीमुळे पदे मिळावीत काय? – हा तो प्रश्न. भाजपच्या आजवरच्या इतिहासातून असे दिसून येते की कौटुंबिक पार्श्वभूमी ही एक चरित्रात्मक वस्तुस्थिती असू शकते, परंतु भाजपमध्ये नेतृत्वाचा मार्ग प्रत्येकासाठी सारखाच राहतो, कार्यकर्ता ते नेता, कार्यकर्ता ते प्रतिनिधी, प्रतिनिधी ते मंत्री- अशा कामगिरीतून अनेकांनी टाकलेले प्रत्येक पाऊल भाजपला अधिकाधिक लोकप्रिय करणारे ठरते.