‘ईट, प्रे, लव्ह’ या थोराड ज्युलिआ रॉबर्ट्सच्या फारशा न गाजलेल्या सिनेमाआधी वलय होते ते या नावाच्या एलिझाबेथ गिल्बर्टच्या आत्मकथनात्मक पुस्तकाला. त्याही आधी तिची लेखन कारकीर्द ही दणदणीत कथाकार म्हणून. मग पुरुषांच्या मासिकातली (जीक्यू आणि एस्क्वायर) झुंजार महिला पत्रकार म्हणून. ‘ईट, प्रे, लव्ह’ मधील तिची ओघवती निवेदनशैली आहे, तीच तिच्या कथन साहित्यात आणि पत्रकारितेत डोकावलीय. ‘ईट, प्रे, लव्ह’ इतक्या गाजलेल्या नसलेल्या आधीच्या पुस्तकांमध्येही वाचकाला स्तंभित करण्याची ताकद आहे. लेखनाची ही हातोटी आली कुठून? तर कुठल्याही लेखनकौशल्य परजणाऱ्या विद्यापीठांत न गेल्यामुळे, कथात्मक साहित्यात ‘मास्टर्स’ न केल्यामुळे. अमेरिकेतील कोणतेही आघाडीचे अथवा पिछाडीचे १० लेखक घेतले, तर विद्यापीठीय अथवा कथनसाहित्य लिहिण्याचे कसब शिकून आल्याचे दिसतात. त्यांचे लेखन ‘भावस्पर्शी’, ‘सेंद्रिय’,‘पकडून ठेवणारे’ या मूलभूत कसोट्या पार पाडणारे असले, तरी त्यांची शब्दांवरची-वाक्यांवरची हुकूमत ही त्या-त्या लेखनसंस्कार केंद्रांच्या शिकवणीची ठेवण म्हणून सांगता येते. एलिझाबेथ गिल्बर्ट या विद्यापीठीय लेखनपाठांना न जुमानताही गाजलेली लेखिका ठरली.

तिची उमेदवारी घडली ती घरातच. मित्र-मैत्रिणी, शेजारदेखील नसलेल्या आवाढव्य शेतघरामध्ये तिचे शिक्षण झाले. त्या घरात रेडिओ-टीव्ही आदी सुखसंपृक्त किंवा ज्ञानसंपृक्त करणाऱ्या गोष्टीच नव्हत्या. पण पुस्तके मुबलक. त्यामुळे एलिझाबेथ आणि तिच्या बहिणीचे लहानपणापासून दोन-तीन उद्याोग होते. पुस्तकांचा वाटेल तितका फडशा पाडणे, एकमेकांसाठी गोष्टीची हस्तलिखित पुस्तके लिहिणे किंवा नाटके बसवणे. मग वयात म्हणजेच स्वत:च्या पायावर वगैरे उभे राहण्याच्या काळात आल्यानंतर शहरात- माणसांत जायची वेळ आली. तेव्हा बारटेण्डरकीपासून, हॉटेल कारकुनी, खासगी आचारी असले उद्याोग करीत तिने लिखाणाला सुरुवात केली. प्रत्येक अनुभवाला लेखन स्वरूप दिले जात होते आणि मोठमोठ्या मासिकांमध्ये तिचे लेख गाजत होते. गाजण्याचे कारणच इतर लेखकांसारखी ‘विद्यापीठीय’ शैली, भाषा नसणे हे होते. आताही जगभरातील बायका-पुरुष मूळ किंवा भाषांतरित अवस्थेत हे पुस्तक वाचतात, तेव्हा कुठल्याही साचेबद्धतेत अडकलेले लिखाण नसल्यामुळे ते पसंत करतात. ‘द म्यूझ ऑफ द कायोटी अग्ली सलून’ या जीक्यूमध्ये छापून आलेल्या लेखात तिने मॅनहटनजवळील बारमध्ये केलेल्या कामाचे अनुभव लिहिले. हा आत्मकथनात्मक लेख इतका गाजला की त्यावर चित्रपटच बनविण्यात आला. अर्थात चित्रपट प्रेक्षककेंद्री करण्याच्या नादात पार डब्यात गेला. हा लेख मात्र जी.क्यूच्या संकेतस्थळावर अजरामर अवस्थेत राहिलाय. ‘पिलग्रिम’ हा पहिला संग्रह आणि ‘स्टर्न मॅन’ ही कादंबरी कमावलेली भाषाशैली आणि सरधोपटतावजा लेखनासाठी वाचले जातात. ‘ईट, प्रे, लव्ह’ या विश्वव्यापी पुस्तकामुळे हे आधीचे पुस्तकयश झाकोळले गेले असले, तरी तिने दिलेला ‘टेडटॉक’ अजूनही फिरवला जातो. त्यातून होणारे तिचे नवे भक्त आधीच्या ग्रंथरत्नांपर्यंत सुखरूप पोहोचतात. तिचे ‘पंखे’ असलेल्या वाचकांकडून तिच्या लेखनवैशिष्ट्यांचा प्रचार होत असतो आणि अधेमध्ये येणाऱ्या कोणत्याही आत्मकथनात्मकतेचा भलामोठा अंश असलेल्या पुस्तकांवर त्यांची पहिली उडी असते.

तर या चाहत्यांचा पुस्तकावर उडीचा कार्यक्रम पुढच्या आठवड्यासाठी मुक्रर झालाय. मंगळवारी गिल्बर्टचे नवे आत्मचरित्र प्रकाशित होत आहे. ‘ऑल द वे टू द रिव्हर’ नावाचे. लेखन कारकीर्द झळाळत असताना अयशस्वी लग्नानंतर पुन्हा एकदा तिने विवाहाचा निर्णय घेतला. त्यानंतर रेया अलाईस या मैत्रिणीच्या कर्करोगाची माहिती झाल्यानंतर केवळ तिच्या देखभालीकरता दुसऱ्या लग्नाला विराम दिला. या मैत्रिणीचा २०१८ साली मृत्यू झाला. त्यानंतरच्या सहा वर्षांत तणाव, दु:खावर मात करताना या नव्या पुस्तकाचे लिखाण झाले. व्यसनांतून सावरलेल्या या मैत्रिणीशी एलिझाबेथ गिल्बर्ट यांची ओळख २००० सालापासूनची. ती प्रेमात रूपांतरित कशी झाली, पतीशी काडीमोड घेण्यात कशी झाली, शेवटच्या काळात या मैत्रिणीचे वागणे, तिच्याबरोबरचा सहवास यांचे सारे तपशील या आत्मचरित्रात उतरलेत. स्वत:विषयीच्या भल्या नाही, पण बुऱ्या गोष्टींचा बिलकूल आडपडदा न ठेवता सांगितलेले हे आत्मकथन येत्या काही आठवड्यांमध्ये खूपविक्या पुस्तकांच्या गर्दीत बरेच काळ मिरवणार याची खात्री. तूर्त ज्यांना अद्याप ‘ईट, प्रे लव्ह’च्या गुरुत्वाकर्षणात जाता आलेले नाही, त्यांनी या लेखिकेचा ‘टेडटॉक’ पाहावाच. ज्यांना तिच्याविषयी कुतूहल निर्माण झाले असेल, त्यांना ‘गार्डियन’साठी स्वत: गिल्बर्टने संपादित करून पाठवलेला नव्या पुस्तकातील कथेसारखा अंश इथे वाचता येईल.

https://tinyurl.com/49 h9tb5 y