scorecardresearch

Premium

चतु:सूत्र: सृष्टी आणि युवांची जीवनदृष्टी

२०२१ ते २०३१ हे जसे ‘यूथ फ्लरिशिंग’चे दशक असणार आहे, तसेच ते ‘अपरिवर्तनीय ‘क्लायमेट चेंज’ला रोखण्याचे’देखील (शेवटचे) दशक असणार आहे.

environmental conservation environmental protection for confronting climate change
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम

अमृत बंग

हवामान बदलाचा सामना करायचा असेल, तर केवळ दर पावसाळय़ात त्याच त्या खड्डय़ांत रोपटी लावणे पुरेसे नाही. पर्यावरण रक्षण हा जीवनशैलीचा भाग होणे गरजेचे आहे..

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

परवाच जागतिक पर्यावरण दिन होता. खरे तर आता वर्षांतील कुठला तरी एक दिवस पर्यावरण दिन म्हणून निर्देशित करून भागण्यासारखी परिस्थिती नाही. प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येकच दिवस, त्यातील जगणे, नागरिक, ग्राहक, उत्पादक यापैकी कुठल्याही भूमिकेमधील आपले निर्णय आणि वर्तन, हे सर्वच पर्यावरणीयदृष्टय़ा सुसंगत, कमीत कमी नुकसानदायक आणि शक्यतो पर्यावरण संवर्धन करणारे कसे असेल याचा विचार करणे अत्यावश्यक झाले आहे.

‘निर्माण’च्या निमित्ताने विविध तरुण-तरुणींशी झालेल्या संवादात असे आढळले की जागतिक तापमानवाढीबाबत अनेक युवांनी काहीना काही ऐकलेले, वाचलेले असते. मात्र बहुतेकांची समज ही साधारण इयत्ता आठवीच्या दर्जाची असते. कारण त्यानंतर फारसे कोणी काही वाचलेलेच नसते. या विषयाचे गांभीर्य, त्याची व्याप्ती आणि तीव्रता, त्यासंबंधीचे विज्ञान व वस्तुस्थिती, त्वरित कृतीची निकड, कृतीच्या विविध शक्यता व पर्याय, आपल्या वैयक्तिक जगण्यातील निर्णयांची पर्यावरणीय किंमत इ. बद्दल अनेकांना फारच जुजबी माहिती असते. २१व्या शतकातील जगण्याला हवामान बदलाचा आयाम टाळून चालण्यासारखा नाही. त्यादृष्टीने, विशेषत: युवांचा विचार सुरू व्हावा म्हणून काही मुद्दे:

1)हवामान बदल हा प्रौढ अथवा वृद्ध व्यक्तींपेक्षाही तरुणांसाठी अधिक महत्त्वाचा विषय आहे. समजा की एक आगगाडी चालली आहे आणि पुढे दूरवर एक दरी आहे. जे लोक अधेमध्येच उतरणार आहेत त्यांना गाडीचे पुढे जाऊन काय होणार याची फार फिकीर असेलच असे नाही. पण जे लोक गाडी दरीत कोसळायची वेळ येईपर्यंत गाडीत असणार आहेत त्यांच्यासाठी तो जीवन-मरणाचा प्रश्न आहे. गाडीची दिशा, वेग, तिला ब्रेक कसे लावता येतील, दिशा कशी बदलता येईल हे सर्व केवळ काल्पनिक नाही तर अस्तित्वाशी घट्टपणे निगडित प्रश्न आहेत. यांची उत्तरे शोधायची सर्वाधिक गरज, जबाबदारी आणि संधी ही युवांकडेच आहे. हे गांभीर्य आणि निकड ध्यानात घेऊन त्यानुसार आपल्या क्षमतांना आणि ऊर्जेला ध्येयाकडे केंद्रित करणे हे तरुणांसाठी अनिवार्य आहे.

2) हवामान बदलाबाबतचे नवीनतम विज्ञान समजून घेत राहणे आवश्यक आहे. ‘ऑल इज वेल सिनारिओज’ किंवा ‘डूम्स डे सिनारिओज’ या दोन्हींच्या पलीकडे जाऊन नेमके वास्तव, उत्तरांच्या संभाव्यता, त्यांची परिणामकारकता व मर्यादा, तसेच संबंधित राजकारण आणि अर्थकारण या विषयी समज विकसित होणे गरजेचे आहे. अगदी वैज्ञानिक जर्नल्समध्ये प्रकाशित होणारे शोधनिबंध वाचणे कदाचित सगळय़ांना शक्य होणार नाही. पण अनेक चांगली पुस्तके आणि माहितीपट आहेत ज्याद्वारे अभ्यासाला सुरुवात करता येईल. मराठीत अतुल देऊळगावकर यांनी या विषयी विपुल लेखन केले आहे. नुकतेच ‘सृष्टिधर्म’ हे कमलाकर साधले यांचे माहितीपूर्ण पुस्तक प्रकाशित झाले. सोबतच इंग्रजीमधील काही सुंदर पुस्तके सुचवायची झाली तर ‘द अनइनहॅबिटेबल अर्थ’ हे डेविड वॉलेस-वेल्स यांचे अप्रतिम पुस्तक, बिल गेट्सचे ‘हाऊ टू अव्हॉईड अ क्लायमेट डिझास्टर’, रामचंद्र गुहा यांचे ‘हाऊ मच शुड अ पर्सन कंझ्यूम’, वक्लाव्ह स्मिल यांचे ‘नंबर्स डोन्ट लाय’ व ‘हाऊ द वल्र्ड रिअली वर्क्‍स’, एलिझाबेथ कोलबर्ट यांचे ‘अंडर अ व्हाईट स्काय’, डिटर हेल्म यांचे ‘नेट झिरो’ या काही पुस्तकांचे अगदी जरूर वाचन करावे. सोबतच अल गोर यांची ‘अ‍ॅन इनकनव्हिनियंट ट्रूथ’, लिओनार्दो डी कॅप्रिओची ‘बिफोर द फ्लड’, डेव्हिड अटेनबरो यांची ‘अ लाइफ ऑन अवर प्लॅनेट’, यान आर्थस-बट्र्रन्ड यांची ‘होम’ असे सुंदर माहितीपटदेखील बघता येतील.      

3)उत्साहाला मोजमापाची आणि सातत्याची जोड देणे आवश्यक आहे. अन्यथा दर पावसाळय़ात त्याच खड्डय़ांमध्ये वृक्षारोपण करणारे अनेक उत्साही युवक गट आपण बघतो. केलेल्या उपक्रमांचे नेमके फलित काय, किती झाडे जगली, त्यांची वाढ कशी आहे, त्यांना योग्य पाणी व खत मिळते आहे का, इ. बाबी पाहाणे व गरजेनुसार सुधारणा करणे आवश्यक आहे. ज्या विद्याशाखेमध्ये आपण शिक्षण घेत असू त्याचा पर्यावरणाशी काय संबंध आहे, इंटर्नशिप, प्रोजेक्ट्स अथवा थिसिस करताना हवामान बदलाच्या मुद्दय़ाला समर्पक विषय निवडता येतील का, हे शोधता येईल. पर्यावरण बदलाच्या प्रश्नाकडे एक व्यापक, गुंतागुंतीची, गहन समस्या सोडविण्याचा सर्जनक्षम अनुभव म्हणून बघण्याची सवय लावून घेता येईल.

4) काही दिवसांपूर्वी ‘रिबा’चे (रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स) माजी अध्यक्ष सुनंद प्रसाद हे आमच्याकडे गडचिरोलीला आले होते. पाश्चिमात्य देशांमध्ये सध्या जागतिक तापमानवाढीविषयी असलेली तोकडी कृतिशीलता पाहून ते अस्वस्थ होते. त्यांच्या मते १० वर्षांपूर्वीपर्यंत तिकडे बरीच जागरूकता निर्माण झाली होती. पण त्यानंतर मात्र तेल कंपन्या आणि इतर कॉर्पोरेट हितसंबंध यांनी अगदी सुनियोजितपणे मोहीम उघडून पर्यावरणाचे प्रश्न आणि त्यावर काम करत असलेल्या वैज्ञानिक व कार्यकर्त्यांविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे आता या चळवळीची मोठी पीछेहाट झाली आहे, असे सुनंद यांचे म्हणणे होते. भारतातदेखील असे होऊ घातले आहे का हे आपण तपासत राहायला हवे. विकास हवा असेल तर निसर्गाचा थोडाफार नाश अटळ आहे, असे आजकाल अनेकदा भासवले जाते. युवांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, सुंदर निसर्ग आणि निरोगी पर्यावरण हे सम्यक विकासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. त्याला हानी पोहोचवणारे प्रकल्प, योजना वा कार्यपद्धती या विकासविरोधी आहेत. निवडणुकांमध्येही पर्यावरणीय कृती ज्यांच्या जाहीरनाम्यात अग्रस्थानी आहे अशांना मत देण्याची आता वेळ आली आहे.

5) माझ्या दैनंदिन जगण्यात मी अधिकाधिक पर्यावरण सुसंगत कसा जगू शकतो? तरुण-तरुणी विचारपूर्वक कृती करून आपल्या पर्यावरणीय पाऊलखुणा कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. दुर्दैवाने अनेक ठिकाणी कॉलेज प्रशासनावरील राग व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी घरी जाताना दिवे व पंखे मुद्दाम सुरू ठेवून जातात, गच्चीतील सोलर पॅनल्स फोडले जातात. असले बेजबाबदार वर्तन योग्य नाही हे युवांना उमजले पाहिजे. वसतिगृहांच्या पार्किंगमध्ये अनेकविध आकर्षक (पण वाईट मायलेज असलेल्या) बाईक्स उभ्या असतात. त्यांचा वापर बहुतांश वेळेस एक किलोमीटरच्या परिघात होतो. याऐवजी सायकलने अथवा पायी जाणे हे आता ‘कूल’ समजले पाहिजे. नाहीतर पृथ्वी ‘हॉट’ होणार आहे!

6) सरतेशेवटी हे लक्षात घ्यायला हवे, ‘ज्यादा से ज्यादा पैसा कमाओ और ऐष करो’ अशी चंगळवादी प्रवृत्ती पर्यावरणविघातक आहेच, पण सोबतच ‘नवनवीन गोष्टी, सेवा, अनुभवांवर पैसा खर्च करणारा एक ग्राहक’ एवढीच युवकांची ओळख उरली, तर ती एक मोठी शोकांतिका ठरेल. यापलीकडेही माझ्या अस्तित्वाला काही अर्थ आहे काय, याचा प्रामाणिक शोध युवांनी घेण्याची गरज आहे. निसर्गापासून आणि आपल्या सामुदायिक मुळांपासून फारकत घेतल्याने आलेला एकटेपणा कसा सोसावा हे न कळल्याने अनेक युवक वाढीव उपभोगवादाकडे वळतात. ऊठसूट घरी येणारी पार्सल्स हे त्याचेच द्योतक आहेत. दरवर्षी जगात होणाऱ्या मानवनिर्मित कार्बन उत्सर्जनापैकी आठ टक्के हे सिमेंटच्या उत्पादनांतून होते. मग गरज भागल्यानंतरही नवीन घरे बांधणे वा खरेदी करणे योग्य आहे का? नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी सांगतात, आपली मिळकत जर दहा टक्क्यांनी वाढली तर आपले कार्बन उत्सर्जन नऊ टक्के वाढते. वाढीव मिळकतीचा उपयोग करताना हे कार्बन उत्सर्जन टाळता येईल का?

२०२१ ते २०३१ हे जसे ‘यूथ फ्लरिशिंग’चे दशक असणार आहे, तसेच ते ‘अपरिवर्तनीय ‘क्लायमेट चेंज’ला रोखण्याचे’देखील (शेवटचे) दशक असणार आहे. भारतीय युवा या आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहेत का?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-06-2023 at 05:19 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×