एक राजस्थानी लोकगीत आहे. ‘छोटीसी उमर परणाई ओ बबासा। काइ थारो करयो मे कसूर’. इतक्या कमी वयात माझं लग्न लावून दिलंस बाबा. असा कोणता गुन्हा केला मी तुझा… एका बालिका वधूचं काळीज या गाण्यात उकलत जातं. एवढे दिवस लाडा-कोडात वाढवलंस आणि आता का दूर केलंस. तुझ्या घरी जन्मले, खेळले, आता दुसऱ्याच्या घरी धाडतोस. पुढे तर चालले आहे पण पाऊल मागे पडतंय. काळीज थरथरतंय. मुखावाटे शब्द फुटत नाहीत, पण माझे अश्रूच सगळं सांगत आहेत… शेवटी ही बालिका वधू म्हणते, ‘भेजो तो भेजो सा मर्जी है थारी, सावन मे बुलाइयो जरूर’. हे जुनं लोकगीत. ‘बँडिट क्वीन’ सिनेमाच्या सुरुवातीलाच नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजात इतक्या आर्त स्वरात आहे की, त्यात या बालिका वधूची वेदना गोठून गेलीय असं वाटू लागतं. अशी असंख्य लोकगीतं वेगवेगळ्या बोलींमध्ये आढळतात. सोहर, बिरहा, कजरी, गोदना असे या लोकगीतांचे अनेक प्रकार. काही लोकगीतं कोणत्या ना कोणत्या विधींमध्ये सादर होणारी तर काही श्रमिक समूहांतून आलेली. अनेक लोकगीतं तर थोड्याफार फरकानं वेगवेगळ्या बोलींमध्येही आढळतात. बोलीगणिक त्यांच्या शब्दरचनेत थोडाफार फरक होतो, पण गाभा तोच. आता याच राजस्थानी लोकगीताशी साधर्म्य असणारं वेगळ्या प्रांतातलं ‘काहे को ब्याही बिदेस’ हे आणखी एक लोकगीत आहे. या गीतातही ‘हम तो बाबुल तोरे पिंजरे की मुनिया, हम तो बाबुल तोरी बगिया की कलियां’ असे शब्द येतात… आशय मात्र सारखाच.

अवधी, भोजपुरी, काशिका, ब्रज, बुंदेलखंडी अशा अनेक बोलींतील लोकगीतं मालिनी अवस्थी यांनी गायलेली आहेत. अगदी अलीकडेच त्यांचं एक पुस्तक आलंय. ‘चन्दन किवाड’ या नावाचं. या पुस्तकाची २७ प्रकरणंसुद्धा लोकगीतांच्या शीर्षकाची आहेत. चांदनी छिप जइहो अटरिया, काहे को ब्याहे बिदेस, सैंया मिले लरकईयां, सांवरिया मुफ्त भई बदनाम, तडप तडप जिया जाये, चल हंसा वाही देस, रेलिया बैरन पिया को लिये जाये रे, काहे सतावो मोहे सांवरिया, सारी कमाई गंवाई रसिया, अदालत मे दावा करूंगी रसिया, मेरा बीडा है मजेदार अशी प्रकरणांची नावं आहेत. खरं तर लोकगीतांवर कुणा एकाचा स्वामित्वहक्क नसतो. ती सगळ्या समाजाची असतात. अनेकांच्या ओठांवर असतात. ग्रांथिक अस्तित्वापेक्षा मौखिकता हेच त्यांचं वैशिष्ट्य असतं. ही गाणी सर्वप्रथम कुणाच्या मुखातून आली असतील, कुणाच्या कल्पनाशक्तीनं त्यांना शब्दरूप मिळालं असेल यासारखे प्रश्न मनात पडतात. कदाचित एखाद्यानं निर्माण केलेल्या काही ओळी दुसऱ्यानंही पूर्ण केल्या असतील, क्वचित एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होताना त्यातले काही शब्दही बदलले गेले असतील.

राही मासूम रझा यांच्या ‘आधा गाँव’ कादंबरीच्या सुरुवातीला कलकत्ता वगैरे महानगरांमध्ये कामासाठी मजूर जिथून येतात, त्या उत्तर प्रदेशातल्या गाजीपुर भागाचं भावविश्व येतं. अगदी तरुण वयात बेरोजगारीच्या घाण्याला इथली माणसं जुंपली जातात की जणू त्यांनी आपल्या स्वप्नांचं तेल काढावं. मुंबई, कलकत्ता, कानपूर, ढाका या जणू गाजीपूरच्या हद्दी आहेत, दूरदूरपर्यंत जाऊन पोहोचलेल्या… आकाशात फुगा कितीही उंच उडाला तरी एखाद्या लहान पोराच्या हाती कमजोर धाग्याचं दुसरं टोक असावं तसं. पण काही दिवसांनी असं होतं की, बहुतांश लहान मुलांच्या हातातला दोरा निसटून जातो. हे सत्य ‘आधा गाँव’ कादंबरीच्या सुरुवातीलाच अधोरेखित होतं. राही मासूम रझा म्हणतात, खरं विचाराल तर ही गोष्ट अशा फुग्यांची अथवा लहान मुलांची आहे की, ज्यांच्या हाती फक्त तुटलेला दोरा उरलाय आणि ते आपल्या फुग्याच्या शोधात आहेत. दोरा तुटल्याचा त्या फुग्यावर काय परिणाम होईल हेही त्यांना माहीत नाही. नेमकं हे भावविश्व काही लोकगीतात आणखीही वेगळ्या पद्धतीनं शोधता येऊ शकतं.

‘रेलिया बैरन पिया को लिये जाये रे’ हे प्रसिद्ध लोकगीत आहे. उत्तर प्रदेश, बिहार या भागातून कलकत्ता, मुंबई अशा महानगरांमध्ये स्थलांतरित मजुरांचे लोंढे येऊन आदळतात. येताना डोळ्यात छोटी छोटी स्वप्नं असतात. कुणाला गावाकडच्या घरावर छप्पर टाकायचं असतं तर कुणावर बहिणीच्या लग्नाची जबाबदारी असते, एखादा घरातल्या कुणाच्या तरी दुर्धर आजाराखाली दबलेला असतो तर कुणाला मुलाबाळांच्या शिक्षणाची चिंता असते. काही वर्षं इकडे काम करू आणि परत गावी जाऊ अशीही मनाची समजूत काहींनी घातलेली असते. जे मजूर नव्यानं इकडे येतात त्यांच्या पत्नीच्या विरहाची वेदना सांगणारं ‘रेलिया बैरन’ हे गीत आहे. केवळ मालिनी अवस्थीच नव्हे तर अनेक गायिकांनी ते गायलंय. भोजपुरी, अवधी या भाषांची थोडीफार माहिती असणाऱ्यांसाठी हे गाणं नक्कीच ओळखीचं असू शकतं. ज्या रेल्वेद्वारे परप्रांतीय मजूर विस्थापित होतात, गावापासून तुटतात त्या रेल्वेला या गीतातली नायिका वैरीण असं संबोधते. ती माझ्या जोडीदाराला, प्रियकराला माझ्यापासून दूर घेऊन जात आहे. खूप पाऊस यावा. ज्या तिकिटावर तो जाणार आहे ते तिकीट त्यातच भिजून नष्ट व्हावं. ज्या शहरात तो मजुरीसाठी जातोय त्या शहराला तिकडे आग लागावी. ज्या मालकाकडे तो कामाला आहे त्या मालकावर गंडांतर कोसळावं आणि आपल्या जोडीदाराचं जाणंच रहित व्हावं असं काय काय या गाण्यातली नायिका कल्पित असते… पण यातलं काहीही घडत नाही आणि ‘रेल’ नावाची ‘बैरन’ तिच्या जोडीदाराला घेऊन जातेच. अशा लोकगीतांनाही काही संदर्भ असतातच. त्यातल्या काहींचा धागा सापडतो आणि काही अज्ञात राहतात. पंडित रामनरेश त्रिपाठी यांनी ‘कविता कौमुदी’ या ग्रंथात शेकडो लोकगीतांचं संकलन केलं आहे. त्रिपाठींनी १९२५ सालच्या सुमारास गावागावांत भटकंती करून ही लोकगीतं गोळा केली, १९२८ साली प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाची पहिली प्रत त्यांनी महात्मा गांधींना भेट दिली होती. अवध क्षेत्रातल्या सुलतानपूर भागात एका गावातल्या महिलेच्या तोंडून हे गीत त्यांनी पहिल्यांदा ऐकलं अशी नोंद आहे. अशा काही रोचक गोष्टी मालिनी अवस्थी यांच्या ‘चन्दन किवाड’ या पुस्तकातून कळतात.

काही लोकगीतांमध्ये कथा गुंफलेल्या असतात. एक अवधी लोकगीत आहे. या गीतातली कथा अशी… राम आणि लक्ष्मण जंगलात शिकारीला गेलेले असतात. रामानं एका हत्तिणीची शिकार केलेली आहे. गजदंत तोडत असतानाच रामाला तहान लागते. जवळपास कुठंच पाणी दिसत नाही. लक्ष्मण जरा उंच जाऊन भोवताली नजर टाकतो. दूरवर एक फुलबाग दिसते. लक्ष्मण एक सुवर्णमुद्रा घेऊन बागेजवळ जातो. त्या बागेची देखभाल करणाऱ्याला सांगतो, ‘ही सुवर्णमुद्रा घे आणि थोडं पाणी घेऊन ये.’ यावर तो माणूस म्हणतो, ‘मी तुम्हाला पाणी देतो, पण तुमच्या हातातलं धनुष्य आणि बाण आधी इथं खाली ठेवा.’ लक्ष्मणाला आश्चर्य वाटतं. पण पाण्याचीही तीव्र गरज असते. लक्ष्मण धनुष्य बाण तिथेच ठेवून देतो. पाणी घेऊन रामाकडे परत येतो. राम विचारतो, ‘लक्ष्मणा, तुझा धनुष्यबाण दिसत नाही?’ त्यावर लक्ष्मणाचं उत्तर असतं, ‘तिथल्या बागेची राखण करणाऱ्यानं सुवर्णमुद्रा घेतली नाही, पण माझ्या हातातला धनुष्यबाण मात्र ठेवून घेतला आणि त्यानंतरच मला पाणी दिलं.’ रामाच्या मनात जिज्ञासा निर्माण होते. दोघेही परत फुलबाग राखणाऱ्या माळ्याकडे धनुष्यबाण मागण्यासाठी जातात. माळ्याचं उत्तर असतं, ‘हे राम… तुम्ही राजाचे सुपुत्र आहात. मी साधा बागकाम करणारा. तुम्ही जंगलात शिकार करता, मी फुलझाडं लावतो. तुम्ही ज्या हत्तिणीला मारलं तिच्याकडे एवढा विवेक होता की तिने (पशू असूनही) आजवर माझी फुलबाग कधीही तुडवली नाही आणि तुम्ही (माणूस असूनही) हत्तिणीला मारता. (हथिनी न रौंदे भइया मोरी फुलवरिया, तू काहे मारथ्या राजा वन कै हथिनिया) माळ्याच्या या उत्तरानंतर राम-लक्ष्मण दोघेही धनुष्यबाण तिथंच ठेवून देतात आणि त्याची क्षमा मागतात. अनेक घटना, प्रसंगांत गुंफून गोष्ट सांगणारं हे एक मोठं लोकगीत आहे. अशा अनेक लोकगीतांचे संदर्भ, समाजजीवनाशी त्यांचा असलेला संबंध, भाषिक कौशल्य आणि परंपरागत शहाणपण यांआधारे लोकांनी रचलेलं कल्पनाविश्व, हा खरं तर शोधाचाच विषय. ‘चन्दन किवाड’ मधून काही अंशी हे कुतूहल पूर्ण होतं.

एक बागकाम करणारा साधा श्रमजीवी माणूस. एवढं महत्त्वाचं सार सांगू पाहतो. हे या लोकगीताचं वेगळेपण. लोकमानस घडवणारी आणि ध्वनित करणारीही अशी असंख्य लोकगीतं विविध बोलींमध्ये आपल्याला आढळून येतात. एक जिवंत असा रसरशीतपणा हे बोलीचं वैशिष्ट्य. अक्षरं लिपीबद्ध होण्याआधीही लोकांच्या ओठांवर अशी गीतं खेळत होतीच. अव्यक्त भाव-भावनांना त्यांनी समर्थ अशा शब्दरूपात आकार दिला.