गोल करण्याच्या अलौकिक शैलीने अल्पावधीत हॉकी चाहत्यांच्या मनात स्वत:चे भक्कम स्थान निर्माण करणारा आक्रमक फळीतील खेळाडू म्हणजे ललित उपाध्याय. उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावातून ललितने सुरू केलेला हॉकी प्रवास गाव, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असा पुढे दोन ऑलिम्पिक पदकांपर्यंत विसावला. मर्यादित साधने असूनही ललितचे स्वप्न मोठे- भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे. वेगवान धाव, चेंडू खेळविण्याचे कौशल्य आणि गोल करण्याची अलौकिक शैली यामुळे ललितने आपल्या खेळात झटपट प्रगती केली. तीनशे उंबऱ्यांच्या भगतपूर गावात सरावावर येणाऱ्या मर्यादा आणि घरची हालाखी यामुळे स्टिक म्हणून सुरुवातीला काठी हातात घेण्यापासून ललितला आव्हानाचा सामना करावा लागला होता.
कारकीर्दीला नुकती सुरुवात होत असताना, एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने स्टिंग ऑपरेशन करताना भारतीय हॉकी महासंघाचे तत्कालीन सचिव के. ज्योतिकुमारन यांच्यासमोर मोठ्या प्रायोजकत्वाचा प्रस्ताव ठेवताना आपल्या आवडत्या खेळाडूला संघात स्थान देण्याची अट टाकली. तेव्हा पत्रकाराने ललितचे नाव घेतले. तेव्हा १७ वर्षांच्या ललितला याबाबत काहीच माहीत नव्हते. दुसऱ्याला अडकवण्यासाठी ललितचा बळी देण्यात आला होता. निष्कारण सहन कराव्या लागलेल्या मनस्तापाने ललितने तेव्हाच हॉकी सोडण्याचा निर्णय घेतला होता. तरी शेवटी खेळाडूच तो. हार न मानता त्याने नैराश्यावर मात केली आणि नव्याने उभा राहिला.
या आघातामुळे ललितची मानसकिता कणखर बनली. त्यामुळे पुढे आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटासमोर तो मोठ्या धीराने उभा राहिला. मेहनत आणि सरावातून स्वत:ला घडवत ललितने विश्वचषक स्पर्धेमाधून भारतीय संघात पदार्पण केले. समर्पित भावना हे त्याच्या खेळाचे वैशिष्ट्य होते. कुठल्याही संघासाठी खेळताना त्याने संघहिताला प्राधान्य दिले. त्यामुळेच संघाच्या यशात कायमच त्याचे योगदान महत्त्वाचे राहिले. त्याचा हा प्रवास असाच पुढे ऑलिम्पिक स्पर्धा आणि त्याही पुढे जाऊन दोन ऑलिम्पिक पदकांपर्यंत पोहोचला. टोक्यो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारताच्या पुरुष हॉकी संघाचा तो सदस्य होता. यशस्वी कारकीर्दीच्या शिरपेचात दोन पदकांचा समावेश झाल्यानंतर मात्र ललितच्या कामगिरीला उतरती कळा लागली. भारतीय संघात त्याची निवड झाली, पण अंतिम संघात खेळण्याची संधी त्याला अभावाने मिळू लागली. वरिष्ठ स्तरावर भारतासाठी १८३ सामने खेळून त्याने ६७ गोल केले. सध्या सुरू असलेल्या हॉकी प्रो लीग स्पर्धेतील अपयश चाहत्यांइतकेच त्याला सतावत होते. त्यामुळेच ३१ वर्षीय ललितने लीगमधील अखेरच्या बेल्जियमविरुद्धच्या विजयी कामगिरीने लगोलग आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्तीचा निर्णय घेतला.
ऑलिम्पिकशिवाय २०१६ मध्ये आशियाई चॅम्पियन्स करंडक आणि २०१७ आशिया चषकात भारताच्या विजयात ललितने निर्णायक भूमिका पार पाडली होती. याशिवाय त्याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही पदके जिंकली, ज्यामध्ये २०१७ हॉकी जागतिक लीगच्या अंतिम टप्प्यात कांस्यपदक, २०१८ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत रौप्यपदक, २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक आणि २०१८ आशियाई चॅम्पियन्स करंडकात सुवर्णपदक यांचा समावेश आहे. ललित ‘एफआयएच’ प्रो लीग २०२१-२२ मध्ये तिसऱ्या स्थानी राहणाऱ्या व २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघात सहभागी होता. भारतीय हॉकीतील योगदानासाठी ललितला २०२१ मध्ये अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. अस्लम शेरखान आणि मोहम्मद शाहीद या उत्तर प्रदेशच्या महान हॉकीपटूंच्या बरोबरीने त्याचेही नाव घ्यावे लागेल.