डॉ. नितीन सखदेव
हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर २०२३ला केलेला हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली सैन्याने गाझा पट्टीवर जोरदार प्रतिहल्ला केला. गाझा शहरावर बॉम्ब हल्ले सुरू झाल्यानंतर तीन आठवड्यांनी ओमर अल-अक्कद या अमेरिकी कादंबरीकार व पत्रकाराने इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात पूर्णपणे विध्वंस झालेल्या गाझाच्या एका ट्विटर-व्हिडीओ पोस्टवर टिप्पणी केली, ‘‘एक दिवस जेव्हा हे बोलणे निर्धोक असेल, जेव्हा ‘या’ कृतीला तिच्या योग्य नावाने संबोधता येईल, जेव्हा कोणत्याही व्यक्तीस त्यासाठी जबाबदार धरणे शक्य नसेल, तेव्हा सगळेजणच म्हणतील- या गोष्टीला आमचा कायम विरोधच होता’’ हे ट्वीट एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी वाचले. त्यावर जोरदार चर्चा झाली. ओमरच्या पत्रकारितेवर बऱ्याच जणांनी धर्मद्वेषातून टीका केली. ‘ओमर नाव असलेल्या व्यक्तीने दहशतवादाविरोधात केलेल्या लिखाणावर विश्वास कसा ठेवायचा?’ अशाही प्रतिक्रिया आल्या. या ट्वीटमधून मांडलेल्या महत्त्वाच्या संदेशातून ‘वन डे एव्हरीवन विल हॅव ऑलवेज बीन अगेन्स्ट धिस’ हे पुस्तक लिहिले गेले. २०२३ च्या हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली सैन्याने केलेला हल्ला व त्यामुळे सुरू असलेला विध्वंस व पडलेला मा
इस्रायलची निर्मिती झाल्यापासूनच त्या देशाचा इतिहास अधूनमधून होणाऱ्या युद्धांनी व्यापलेला आहे. १९४७ च्या नोव्हेंबरात संयुक्त राष्ट्रांनी पॅलेस्टाइनचा अरब व यहुदी (ज्यू) भाग अशा विभाजनाचा प्रस्ताव स्वीकारला. ‘गाझा आणि त्याच्या आसपासचा प्रदेश’ त्यानुसार अरबांना दिला गेला. इस्रायलच्या स्थापनेनंतर लगेच १९४८ मध्ये पहिले अरब- इस्रायल युद्ध झाले. त्याच्या परिणामी, अरबांच्या आधिपत्याखाली असलेल्या गाझा शहराचे अस्तित्व केवळ २५ मैल लांब आणि पाच मैल रुंद अशा पट्टीपुरतेच उरले. हीच ती ‘गाझा पट्टी’. ही पट्टी १९४७ पासून १९६७ पर्यंत इजिप्तच्या आधिपत्याखाली होती. मात्र १९६७ मधील सहा दिवसांच्या युद्धात इस्रायलने त्यावर कब्जा मिळवला व पुढील २५ वर्षे तिथे इस्रायलचेच वर्चस्व राहिले. १९९४ मध्ये झालेल्या ओस्लो करारानुसार इस्रायलने गाझा पट्टीची प्रशासकीय सत्ता यासर अराफत यांच्या नेतृत्वाखालील पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशन (पीएलओ) कडे सोपवली. पण ‘पीएलओ’पेक्षा निराळी चूल मांडणारी हमास संघटना १९८० पासून हिंसक लढ्याचा आग्रह धरत होती, तिने इस्रायलशी तडजोड नाकारली. शांततापूर्ण वाटाघाटीत अडथळा आणून न थांबता, २००० पासून हमासचा हिंसाचार वाढत
हमास ही जरी लष्करी संघटना असली तरी २००७ मध्ये प्रथमच झालेल्या निवडणुकीत त्यांनी गाझा पट्टीत विजय मिळवला. तेव्हापासून आजपर्यंत इस्रायलचे नियंत्रण असूनही गाझा पट्टीत हमासचीच सत्ता आहे. हमास व इस्रायल यांच्यात मैत्री होणे कधीच शक्य नव्हते. या दोन्ही बाजू एकमेकांना हिंसाचार आणि संहारासाठी दोष देत आल्या आहेत. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी केलेला हल्ला आजवरचा सर्वाधिक संहारक, घृणास्पद व निंदनीय होता. त्यात १२८० व्यक्तींची हत्या झाली, २५० लोक ओलीस म्हणून डांबले गेले व ५००० जण जखमी झाले. यानंतर इस्रायलने तात्काळ प्रतिहल्ला केला. इस्रायली सैन्याची केलेली कारवाई वीस महिने झाले तरी चालूच आहे. सुरुवातीला साऱ्या जगाने हमासच्या हल्ल्याचा निषेध केला आणि इस्रायली सरकारच्या प्रतिकाराची पाठराखणच केली; पण आता इतक्या महिन्यांनंतरही या प्रतिकारी हल्ल्याचा शेवट दिसत नाही. गाझा पट्टीचा तेथील रहिवाशांसह नायनाट होताना दिसत आहेच, पण अन्नपुरवठ्याविना मानवनिर्मित दुष्काळ आणि भूकबळींची भीती स्पष्ट होत आहे. त्यामुळे हळूहळू पण निश्चितपणे आंतरराष्ट्रीय जनमत इस्रायलविरोधी होताना दिसत आहे.
ओमर अल-अक्कद हे पत्रकार व लेखक आहेत. इजिप्तमध्ये जन्म, कतारमध्ये बालपण, कुमारवयात कॅनडामध्ये वास्तव्य आणि सध्या अमेरिकेत असा त्यांचा प्रवास. अमेरिकेत अनुभवाला येणारा वंशवाद, परदेशी लोकांबद्दलचा तिरस्कार आणि स्थलांतरितांना मिळणारी दुय्यम वागणूक याचा त्यांच्यावर खूप खोल ठसा उमटला. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ‘टोरांटो मेल’ या दैनिकापासून झाली. तेव्हा अमेरिकेने कथित ‘दहशतवादविरोधी युद्ध’ पुकारले होते. त्यामुळे पुढल्या दशकभरात त्यांनी इराक, अफगाणिस्तान, हुआंतानामो बे येथून वार्तांकन केले. या अनुभवांचा आधार ‘अमेरिकन वॉर’ या कादंबरीला आहे. कादंबरीचे कथानक मात्र काल्पनिक- अमेरिकेत दुसऱ्यांदा नागरी युद्ध घडते आहे, अशा प्रकारचे आहे. या कादंबरीला आंतरराष्ट्रीय लोकप्रियता आणि अनेक पुरस्कार मिळाले.
त्यांच्या ट्वीटची पहिली ओळ, हेच शीर्षक असलेले त्यांचे नवीन पुस्तक म्हणजे उद्वेगाच्या मानसिकतेतही नैतिक तर्कशुद्धता शोधणाऱ्या लेखांची मालिका आहे. यातील दहा प्रकरणांतून, पाश्चिमात्य लोकशाही देशांनी गाझा पट्टीत इस्रायलने केलेल्या अत्याचारांच्या बाबतीत केलेला विसंगत प्रतिसाद मार्मिक, प्रसंगी कठोर शैलीत मांडला गेला आहे. गाझातील लहान मुलांचा मृत्यू कशा वेगवेगळ्या क्रूर पद्धतींनी झाला याबद्दलच्या एकेका हृदयद्रावक अवतरणाने ओमर या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाची सुरुवात करतात. निर्वासित म्हणून त्यांना आलेले वैयक्तिक अनुभव, पश्चिम आशियात युद्ध वार्ताहर म्हणून त्यांनी केलेले काम आणि पॅलेस्टाइनमधून ७ ऑक्टोबरनंतर केलेले ठळक घटनांचे वार्तांकन हे या पुस्तकात आलटूनपालटून येत राहते. हे इतिहासाचे प्रत्यक्ष पुरावे नाहीत, तर गेल्या दीड वर्षातील झालेल्या घटनांचे व त्यांच्यावरचे त्याचे वैयक्तिक चिंतन आहे. त्याच्या कौटुंबिक आठवणी, स्थलांतरांचे वास्तव, परदेशी मुस्लीम असल्याबद्दलचा संशय व त्याचबरोबर पाश्चात्त्य जगताने पॅलेस्टाइन व एकूणच मध्यपूर्वेतील लोकांवर लादलेली युद्धे अशा ताण्याबाण्यांवर हे पुस्तक विणलेले आहे.
या चिंतनातून दोन महत्त्वाचे मुद्दे ओमर मांडतात. पहिला म्हणजे त्यांना हळूहळू झालेले पाश्चात्त्य लोकशाहीबद्दलचे आकलन. एकेकाळी त्यांना असे वाटे की पाश्चात्त्य लोकशाही प्रणाली ही अभेद्या दीपस्तंभासारख्या भक्कम आणि कायमस्वरूपी तत्त्वावर आधारित आहे. पत्रकार म्हणून १९९० व २०००च्या दशकात जगात चाललेल्या वेगवेगळ्या युद्धांवर वार्तांकन करताना हे लक्षात आले की कायदे, तत्त्वे, संकेत, परंपरा हे सगळे सत्ता टिकवण्यासाठी सोयीचे असेल तरच टिकून राहते. ठिकठिकाणी नरसंहार झाले, ते अमेरिका आणि युरोपीय लोकशाही देशांनी दाखवलेल्या नैतिक पोकळपणा आणि निष्क्रियतेमुळेच, हेही त्याच्या लक्षात आले. समांथा पॉवर या अमेरिकी लेखिकेच्या ‘अ प्रॉब्लेम फ्रॉम हेल’ या पुस्तकात रुवांडा, सर्बिया, कुर्दिस्तान आणि इतर ठिकाणी पाश्चात्त्य देशांच्या निष्क्रियतेपायी झालेल्या नरसंहाराची सविस्तर वर्णने आहेत. ओमर अल-अक्कद ठामपणे असेही म्हणतात की पाश्चात्त्यांमध्ये त्यांच्यापासून दूरवर होणाऱ्या हिंसाचाराबद्दल भयंकर असंवेदनशीलता निर्माण झाली आहे… काही माणसांच्या बाबतीत, ‘ती केवळ चिरडण्यासाठीच आहेत’ अशा तऱ्हेची भावना त्यांच्यात येत आहे! जेव्हा त्यांना ही निष्क्र
या पुस्तकातला दुसरा मुद्दा म्हणजे पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांकडून इस्रायलच्या कार्यपद्धतीला अत्यंत हुशारीने दिला जाणारा पाठिंबा. गाझामध्ये घडत असलेल्या घटनांबद्दल जगाला नक्की काय सांगितले जाईल हेही सर्व मंडळी स्वत:च्या सोयीने आणि स्वार्थाप्रमाणे ठरवतात. त्याचा वास्तवाशी फारच थोडा संबंध असतो. माध्यमांकडे बातमी मोघमपणे देण्याचे आणि माहिती अर्धवट देण्याचे विशेषाधिकारही यांच्याचकडे आहेत, हेही ते पुस्तकात नमूद करतात. पाश्चात्त्य वर्तमानपत्रातील मथळ्यांचे ते उदाहरण देतात. ‘संशयित दहशतवाद्याच्या घरावरील छाप्यादरम्यान पॅलेस्टाइनी पत्रकाराच्या डोक्याला गोळी लागली’ असे जेव्हा छापले जाते तेव्हा प्रत्यक्षात, त्या पत्रकाराला ठार मारण्यात आले हे वास्तव का लपवले जाते, असा ओमर यांचा सवाल आहे. पाश्चात्त्य माध्यमे बोटचेपी आणि मवाळ भाषा वापरून गाझामध्ये होणाऱ्या संहाराचे गांभीर्य आणि तीव्रता कमी करताना दिसतात. गाझाचे उपाशी सामान्यजन अन्नाच्या पाकिटांसाठी झगडत असतानाच इस्रायली लष्कराने त्यांच्यावर गोळीबार केल्यामुळे काही निरपराध जीव जातात, तेव्हा ही बातमी लंडनच्या ‘द गार्डियन’मध्ये ‘अन्नपुरवठ्यादरम्यान झालेले मृत्यू’ अशा मथळ्याख
तरीही ओमर यांनी आशा सोडलेली नाही. लोकांवर मोठ्या प्रमाणावर होणारा अन्याय जेव्हा लक्षात येतो तेव्हा तो थांबवण्यासाठी जगात प्रयत्न होतातच, यावर त्यांचा विश्वास आहे. अमेरिकी सरकारच्या भूमिकांबद्दल अनेक विद्यार्थ्यांनी परदेशात आवाज उठवला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ताकीद देणे, अटक करणे वा त्यांची पदवी रोखणे असे मार्ग अमेरिकी प्रशासनाने योजले, तरीही ते मागे हटले नाहीत. या महिन्याच्या सुरुवातीला संयुक्त राष्ट्रांनी गाझामधील ९० पेक्षा जास्त शाळा व सर्व महाविद्यालये इस्रायलच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाल्यामुळे बंद पडल्याचे मान्य केले आहे. तितकेच हाल गाझा पट्टीतील सर्व २६ रुग्णालयांचेही होताहेत. या परिस्थितीतही रुग्णांना सोडून न जाणाऱ्या गाझातील डॉक्टरांबद्दल ते आदराने लिहितात. ज्या पॅलेस्टिनी लोकांनी तिथेच राहून गाझात घडलेला हिंसाचार बघितला, त्याचे चित्रण करून ते पुरावे जगापुढे मांडले, त्यांचीही गोष्ट ओमर सांगतात. या लोकांच्या असामान्य कामामुळे सामान्य पॅलेस्टाइनी लोकांचे हाल आणि शौर्य जगापुढे येऊ शकले. आता तर ‘गाझा: हाऊ टू सर्व्हाइव्ह अ वॉर झोन’ आणि ‘गाझा: डॉक्टर्स अंडर अटॅक’ हे माहितीपटही अशाच चित्रणातून तयार झाले आ
या पुस्तकावर होणाऱ्या टीकेचा मुख्य मुद्दा असा की, ७ ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्यात ज्यूंची कुटुंबे घरात जिवंत जाळली गेली किंवा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या याबद्दल लेखक काहीच लिहीत नाही! पण या पुस्तकात हमासला दुष्ट व क्रूर संघटना असे वेळोवेळी संबोधणारे ओमर पुस्तकातच असेही म्हणतात की ज्या जगात हमाससारखे गट कार्यरत नाहीत अशा जगात त्यांना राहायला आवडेल.
गाझा पट्टीत घडणाऱ्या सर्व अत्याचारांचा बचाव दोन्ही बाजू ‘जुन्या अत्याचारांचा बदला’ म्हणून करताना दिसतात. पण हे नक्की कधी सुरू झाले असे समजायचे? २०२३ मधील अल अक्सा मशिदीवरचा हल्ला? १९९० मधील हमासची स्थापना? १९६७ मधील सहा दिवसांची लढाई? १९४८ मधील अरब-इस्रायलमधील युद्ध? १९१७ मधला बालफोर जाहीरनामा? की त्याहूनही आधी? ही यादी न संपणारी आहे; पण कुठेतरी थांबायलाच हवे. ‘गतइतिहासातील अत्याचारांचा जाब वर्तमानात विचारायचा’ या तर्काची सरशी आपल्या देशातही घडताना आपण पाहात आहोत. आपल्याला जर भविष्याचा विचार करायचा असेल तर ‘दोन वेगवेगळी पण सुसंगत सत्ये असू शकतात’ हे आपण मान्य केले पाहिजे.
इस्रायलींना ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यापासून ओलीस ठेवलेले आहे, जीवितहानी इस्रायलींचीही झाली आहे, याबद्दल ‘हमास’सारख्या दहशतवादी संघटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतानाच कोणीही, इस्रायलने सतत सुरू ठेवलेले हल्लेसुद्धा चुकीचेच ठरवले पाहिजेत. पॅलेस्टाइनी लोकांनाही तिथे सुरक्षितपणे जगण्याचा आणि मायभूमीचा अभिमान बाळगण्याचा हक्क आहे हे आपण मान्य केले पाहिजे.
वन डे एव्हरीवन विल हॅव ऑलवेज बीन अगेन्स्ट धिस
लेखक : ओमर अल-अक्कद
प्रकाशक : रँडम हाउस, पृष्ठे : १७६ ; किंमत : १३९९ रु.