एल. के. कुलकर्णी, ‘भूगोलकोशा’चे लेखक आणि भूगोलाचे निवृत्त शिक्षक ’

एकही माणूस न गमावता, रक्ताचा थेंबही न सांडता बाजीराव पेशव्यांनी निजामाला त्याच्या एक लाख सैन्यासह शरण आणले. त्यांच्याकडे युद्धभूमीबद्दलचे भौगोलिक ज्ञान नसते, तर हे शक्य झाले असते का?

इतिहास घडवण्यात भौगोलिक ज्ञानाचा किती महत्त्वाचा वाटा असतो, हे पालखेडच्या लढाईत प्रकर्षांने दिसून आले. ही लढाई पेशवे पहिले बाजीराव आणि पहिला निजाम यांच्यात १७२८ मध्ये महाराष्ट्रात पालखेड येथे झाली.

१७२४ मध्ये साखरखेडय़ाच्या लढाईत मोगल सुभेदार मुबारीजखानाचा पराभव करून निजामाने आपले स्वातंत्र्य घोषित केले. स्वत: निजाम हा एक कसलेला योद्धा व सेनापती होता. या लढाईत त्याच्या मदतीला छत्रपती शाहूंनी पेशवे बाजीराव यांना पाठवले होते. त्या मोबदल्यात निजामाने मराठय़ांची सरदेशमुखी व इतर अटी मान्य केल्या. पण पुढे त्याने आपला शब्द फिरवला. कोल्हापूरच्या संभाजीराजे यांची बाजू घेऊन तो शाहू राजांविरुद्ध कारवाया करू लागला. त्यामुळे छत्रपती शाहूंनी निजामाला धडा शिकवण्यास पेशवे बाजीराव यांना पाठवले. १७२७ मध्ये पावसाळय़ानंतर पेशवे बाजीराव निजामाच्या राज्यात आक्रमण करीत निघाले. त्यांच्या पाठलागावर आलेल्या निजामाला हुलकावण्या देत बाजीराव तीन महिने जालना, बुऱ्हाणपूर ते गुजरात असा संचार करीत होते. आणि धापा टाकत निजामाचे एक लाखाचे सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. अखेर त्यांच्यामागे गुजरातेत जाण्याऐवजी निजाम अचानक पुण्याकडे वळला व त्याने पुणे ताब्यात घेतले. आता पेशवे पुण्याकडे धावत येतील अशी त्याची अपेक्षा होती. पण त्याऐवजी बाजीराव पेशवे गुजरातेतून औरंगाबादच्या (संभाजीनगर) दिशेने निघाले. हा निजामाच्या वर्मावर घाव होता. कारण औरंगाबाद ही निजामाची पहिली राजधानी. तो तात्काळ पुणे सोडून औरंगाबादकडे निघाला.

निजामाचे सामथ्र्य त्याच्या तोफखान्यात आहे हे साखरखेडय़ाच्या लढाईच्या वेळी बाजीरावांनी ओळखले होते. त्याचा तोफखाना भारतात प्रसिद्ध होता. सध्याही निजामासोबत ६०० तोफा होत्या. सोबत पायदळ, घोडेस्वार, मजूर, स्वयंपाकी, दासदासी यांचा ताफा होता. अर्थातच या प्रचंड सैन्याला वेगात हालचाल करता येत नसे. बाजीरावांचे सुमारे २५ हजाराचे चपळ घोडदळ होते. आणि दोन अमोघ अस्त्रे होती – भूरचनेचा अचूक वापर आणि वेग. त्याच्या आधारे सापळा रचून त्यांनी निजामावर मात केली.

आपली राजधानी वाचवण्यासाठी निजाम वेगाने औरंगाबादकडे निघाला. पुणे – नगर मार्गे येताना त्याला गोदावरी नदी ओलांडावी लागणार होती. त्याकाळी नगरच्या पुढे तशी योग्य जागा पुणतांब्याला होती. बाजीरावांनी आपल्या हालचाली व वेग असा ठेवला की निजाम बरोबर पुणतांब्याला गोदावरी ओलांडेल. कारण इथेच उत्तर किनाऱ्यावर त्यांनी निजामासाठी सापळा लावला होता. ते ठिकाण होते पालखेड. काही महिन्यांपूर्वीच पुण्याहून लोणी, धामणी, वडझिरे, बोरसर मार्गे पळसखेडकडे (सिंदखेड) जाताना बाजीराव पेशवे या भागातून गेले होते.

गोदावरीच्या उत्तरेस, पुणतांब्यापासून सुमारे २० कि.मी.वर पालखेड हे खेडे सध्या वैजापूर तालुक्यात औरंगाबादच्या नैऋत्येस ६० कि.मी. अंतरावर आहे. त्या काळी त्याच्या उत्तरेस जंगल होते. शिवना नदीची एक उपनदी ( किंवा झरा – सध्या त्याचे नाव बोरीनाला आहे) या गावाच्या पूर्व व आग्नेय दिशेला ३-४ कि. मी अंतरावरून वाहते. या भागातील पाण्याचा हा मुख्य स्रोत होता.

फेब्रुवारीच्या मध्यास निजाम पुणतांब्याला येऊन पोहोचला. तोपर्यंत बाजीराव आपल्या सैन्यासह पालखेड परिसरात पोहोचले होते. १७ फेब्रुवारी १७२८ ला स्वत: निजामाने जनाना व काही सैन्यासह गोदावरी ओलांडली. १८ व १९ रोजी उर्वरित बरेच सैन्य, बाजारबुणगे व दासदासी यांनी नदी ओलांडली. या सर्वासह निजामाने अपेक्षेप्रमाणे पालखेड येथे मुक्काम केला. हे सर्व बाजीरावांनी व्यवस्थित पार पडू दिले. आता २० फेब्रुवारीला अशी स्थिती झाली की निजाम व त्याचे बरेच सैन्य ( ज्यात हजारो न लढणारे – दासदासी, मजूर कामगार – होते) गोदावरीच्या उत्तरेला पोहोचले होते, तर तोफखाना आणि मोठी अवजड रसद हे सर्व २०-२५ कि.मी. दूर गोदावरीच्या दक्षिण तीरावर राहिले होते.

२१ फेब्रुवारी रोजी निजामाच्या तोफखान्याने गोदावरी ओलांडण्यास सुरुवात केली. अचानक पश्चिमेकडून येऊन मल्हारराव होळकरांच्या तुकडय़ांनी गोदावरीच्या उत्तर किनाऱ्याची नाकेबंदी केली. निजामाच्या तोफखान्याला गोदावरी नदी ओलांडणे अशक्य झाले व त्याचा निजामाशी संबंध पूर्ण खंडित झाला. तोफखान्यासोबत अवजड रसद असल्याने तीही अडकली. नदीच्या उत्तर, पूर्व व पश्चिम बाजूने पेशव्यांच्या घोडदळाच्या तुकडय़ा घिरटय़ा घालत होत्या. टप्प्यात येताच रसद घेऊन येणारी गाढवे व गाडय़ा उधळून लावली जात. निजामाची कोंडी होण्यास सुरुवात झाली.

आता बाजीरावांनी पुढची खेळी खेळली. निजामाच्या सैन्यासाठी सुरुवातीला आणलेले व पालखेड गावातले अन्न व पाणी दोन तीन दिवसांत संपून गेले. आता निजामाची माणसे पाणी आणण्यासाठी पूर्वेकडील बोरीनाला नदीजवळ येऊ लागताच त्यांच्यावर गोळीबार व बाणांचा वर्षांव सुरू झाला. निजामाच्या लोकांना त्या नदीच्या जवळही येता येईना. हे मात्र कल्पनातीत होते. तोफखाना आणण्यासाठी किंवा पाणी व अन्न आणणाऱ्यांच्या सोबत सैन्य पाठवावे तर मग बाजीरावचे सैन्य आपल्या तळावरच हल्ला करील ही निजामाला भीती होती.

२५ फेब्रुवारीनंतर बाजीरावांनी फास आणखी आवळला. ते फेब्रुवारीचे दिवस होते. पूर्वेकडील ती नदी सोडून गावात व परिसरात कुठेच पाणी नव्हते. निजामाच्या तळावर चारा, अन्न व पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. उपासमार व तहानेमुळे माणसे व जनावरे यांचा जीव जायची पाळी आली. हजारोंचे सैन्य सोबत असूनही निजाम पूर्ण हतबल, शक्तिहीन झाला. २८ फेब्रुवारी रोजी अंतिम प्रयत्न म्हणून निजामाने आपल्या सैन्याला मराठय़ांची फळी फोडून गोदावरीकडे जाण्याचा हुकूम दिला. परंतु तहानभुकेने व्याकूळ व मराठय़ांच्या भीतीने गलितगात्र झालेल्या सैन्याने तो आदेश मानण्यास नकार दिला. आता एकच मार्ग निजामापुढे पुढे शिल्लक होता – संपूर्ण शरणागती. त्याच दिवशी – २८ फेब्रुवारी १७२८ – रोजी निजामाने ऐवजखान आणि चंद्रसेन जाधव यांना सामोपचाराची बोलणी करण्यासाठी बाजीराव पेशव्यांकडे पाठवले. ६ मार्च १७२८ रोजी मुंगी शेवगाव येथे तहावर सह्या झाल्या. या १८ कलमी तहातील १७ कलमे छत्रपती शाहूंना अनुकूल होती. त्यात दक्षिणेतील सहा सुभ्यांची चौथाई व सरदेशमुखी, निजामाने काबीज केलेल्या गावांची मालकी इ. कलमे समाविष्ट होती. निजामाच्या सैन्यास बंदोबस्तात तेथे येण्याच्या परवानगीसह अन्न व पाणी देण्यात आले.

अशा प्रकारे एकही माणूस न गमावता, रक्ताचा थेंबही न सांडता बाजीराव पेशव्यांनी निजामाला त्याच्या एक लाख सैन्यासह शरण आणले. हा पेशवे बाजीरावांनी खेळलेल्या भौगोलिक बुद्धिबळाचा अकल्पित आविष्कार होता. काही जणांनी त्यांचे वर्णन   Heavenly born cavelry leader (स्वर्गीय – ईश्वरदत्त- सेनापती) असे केले.  इंग्लंडचे फिल्ड मार्शल मॉँटगोमेरी (माँटगोमेरी) यांच्या ‘Concise history of warfare (युद्धाचा संक्षिप्त इतिहास )’ या पुस्तकात पालखेडच्या लढाईचे वर्णन ‘युद्धशास्त्रीय डावपेचांचे उत्कृष्ट उदाहरण (masterpeice example)’ या शब्दात केले आहे.

पालखेडच्या लढाईने इतिहासात भौगोलिक ज्ञानाचे महत्त्व निर्विवादपणे सिद्ध केले आणि हेच दाखवून दिले की – ‘जे भूगोल जाणतात तेच इतिहास घडवतात.’