मुख्य धारेतील आंग्ल लेखनामध्ये सध्या लेखिका अधिकाधिक कामुक वर्णनांचा भरणा करीत आहेत. सॅली रूनीपासून मिरांडा जुलै या खूपविक्या लेखिकांसह १९७० ते आजपर्यंत महिलांच्या लिखाणात ‘चावटी’ लिहिण्याचा धाडसीपणा कुठून आला, याची चर्चा करणारा लारा फायगल यांचा खमंग लेख गेल्या आठवड्याच्या गार्डियनच्या ‘बुक्स सेक्शन’मध्ये वाचायला मिळतो. ‘मोअर सेक्स प्लीज, वी आर बुकीश’ या शीर्षकाच्या या लेखामध्ये सोदाहरण दिलेल्या उताऱ्यांतील शब्दगंमती फारच रंजक वाटतील.
पुस्तकनिर्मितीमधला इराण…
जगभरातील पुस्तकनिर्मितीच्या व्यवसायात भारत हा दहाव्या क्रमांकावर असल्याचे विशेष वृत्त या आठवड्यातले. या वृत्तातील आकडेवारी सांगते की भारतात वर्षाला ९० हजारांहून अधिक पुस्तके बाजारात दाखल होतात. आता दचकवणारे वृत्त हे नव्हे की अमेरिका, चीन आणि ब्रिटन पहिल्या तिनांत आहेत. अचंबा वाटणारे हे की, भारतापेक्षा अधिक पुस्तक निर्मिती इराण आणि इंडोनेशियामध्ये होते. चित्रपट महोत्सवांत इराणविषयक भावकल्लोळी सिनेमा पाहून भलतीच समजूत करून घेणाऱ्यांनी या दोन्ही देशातील ग्रंथसमृद्धी आकडेवारीसह पाहून घ्यावी.