डॉ. उज्ज्वला दळवी
पंचाहत्तरीच्या पुढे ज्ञानेंद्रियं मंदावणार, नव्वदीनंतर काळजी घ्यावीच लागणार; पण उपायही आहेतच, याचं भान कुटुंबियांनीही ठेवावं..
‘‘तुम्ही सगळे एकमेकांत कुजबुजता. माझ्यापासून लपवताय काही तरी,’’ उद्वेगाने द्वारकाआजींना हुंदका फुटला. पावसाळय़ात द्वारकाआजींच्या जुन्या खोलीचं छत गळू लागलं म्हणून त्यांची खोली बदलली. तेव्हापासून त्या चिडचिडय़ा, संशयी झाल्या होत्या; त्यांना साध्यासाध्या गोष्टी समजतच नव्हत्या. छताची डागडुजी करून आजींना जुन्या खोलीत नेलं आणि आजी पुन्हा हसऱ्या झाल्या; त्यांची समजसुद्धा आधीच्यासारखी लख्ख झाली. आजी मुला-नातवंडा-पतवंडांत, भरल्या घरात राहत होत्या म्हणून ते सारं वेळच्या वेळी झालं. आजूबाजूला समंजस माणसं नसती तर गैरसमज, आक्रस्ताळेपणा होऊन आजी नैराश्याच्या, बुद्धिमांद्याच्या गर्तेत बुडाल्या असत्या.
पण अलीकडे बरेचसे आई-वडील कुटुंबापासून, मुलांपासून दूरच राहतात. पंचाहत्तरीचे पंडितकाका आणि मेधाताई मुंबईकर. मुलगा प्रद्योत कामानिमित्त दिल्लीत. एकुलत्या एक असलेल्या मेधाताईंचे शंभरीचे वडील नागेशराव पुण्यात. जागा बदलली की ते सैरभैर होतील म्हणून त्यांना पुण्यातच ठेवायचं ठरलं होतं. काका-ताई आपला घरखर्च, बँकेची, टॅक्सची कामं स्वत:च करत. कित्येकदा मुलाचीही गुंतवणुकीची कामं ते करत. गरज लागली तर नातवंडांना सांभाळायला दिल्लीत पोहोचत. नागेश-आजोबांची देखभाल आणि बँकेची-टॅक्सची, गुंतवणुकीची-जमीनजुमल्याची कामं करायचं भाग्यही काका-ताईंनाच लाभलं होतं. ‘सॅन्डविच’ पिढीच्या त्या अतिकर्तृत्ववान प्रतिनिधींना चाँदबिबीसारखा अनेक आघाडय़ांवर म्हातारपणाशी लढा द्यावा लागतो. त्यापायी अनेक गोष्टींचं भान बाळगावं लागतं.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : आरोग्य व्यवस्था सुधारणार कधी?
पंडितकाकांचा प्रद्योत गुणी मुलगा आहे. तो सीसीटीव्हीवरून मुंबई-पुण्याच्या दोन्ही घरांवर पाळत ठेवतो. आई-बाबा थकल्याचं जाणवलं तर डॉक्टरांच्याही कानावर घालतो आणि पंधरवडय़ासाठी पानवलकरकाकूंकडून डबाही मागवतो. महिन्या-दोन महिन्यांतून त्याची दोन्ही घरांत एक फेरी असते. त्या वेळी तो कटाक्षाने तिथली काही कामं करतो.
पंचाहत्तरीनंतर ५० टक्के लोकांना कमी ऐकू येतं. त्यांच्या कानांच्या दोषांवर योग्य उपचार करणं; श्रवणयंत्र वापरायला त्यांना योग्य मदत-मार्गदर्शन करणं गरजेचं असतं. ते मिळालं; ऐकू चांगलं आलं की त्यांना फोनवरून अनेक कामं करता येतात; मुलाबाळांशी संभाषण होतं; एकटेपणा टळतो; गरजेला मदत मागता येते. रस्त्यावरून चालताना मागून येणाऱ्या गाडीचा आवाज ऐकू येतो; जीव वाचतो.
पंचाहत्तरीनंतरच्या सुमारे ९० टक्के लोकांत मोतीिबदू, काचिबदू, नेत्रपटलाचे आजार वगैरेंमुळे दृष्टिदोष असतो आणि सात टक्के लोकांना बहुतांशी दिसत नाही. मग संगणक-मोबाइलवरून सहज होणारी कित्येक कामं शक्य होतात. बहुतेक दृष्टिदोषांवर वैद्यकीय इलाज आहेत. ते वेळीच झाले तरच व्यवहार सुरळीत चालू राहतात.
बुद्धीला धार काढायचं काम ज्ञानेंद्रियं करतात. उतारवयात त्यांची साथसोबत सुटली तर नैराश्य घेरतं; बुद्धिमांद्यही येतं. वैद्यकीय मदतीने बहिरेपणावर, दृष्टिदोषांवर मात केली की बँकेची कामं आणि वाणसामानाचे हिशेबही अधिक चांगले जमतात, असं सर्वेक्षणांत दिसलं आहे. दृष्टिदोषामुळे पडझड वाढते; पडझड टाळायला घरात लख्ख उजेड आणि चालण्याच्या मार्गात आधाराला भक्कम दांडय़ा असाव्यात. गुळगुळीत संगमरवरी जमीन; मुडपत्या कडांचे गालिचे; चक्री जिने; अंधारे, वळणदार पॅसेजेस; सैल चपला; पायात घोटाळणारी साडी; आडवं जाणारं मांजर वगैरे लोळवणाऱ्या गनिमांचा वेळीच बंदोबस्त करावा लागतो.
हेही वाचा >>> समोरच्या बाकावरून: पाच राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपची कसोटी!
शिवाय त्या वयात कधी हृदय अनियमित होतं; तर कधी रक्तातल्या पाण्याचं आणि क्षारांचं संतुलन बिघडतं; पटकन उठून उभं राहिलं की रक्तदाब कोसळतो; कधी पायांतली ताकद जाते; सांधे डुगडुगतात, आखडतात; तळपायातून कळ येते; तोल सावरणं जमत नाही.. पडझडीने फ्रॅक्चर होतं; मेंदूला मार लागतो; प्रकृतीची घसरगुंडी सुरू होते. शिवाय ती नैराश्याची, बुद्धिमांद्याची नांदीही असू शकते.
एकदा मेधाताईंचं पोट बिघडलं म्हणून डॉक्टरांनी गोळय़ा दिल्या. ताईंना उलटय़ा झाल्या; डोकं ठणकलं; चेहरा लाल झाला; रक्तदाब एकदम खाली गेला; त्या घेरी येऊन पडल्या. त्या मन:शांतीसाठी अश्वगंधारिष्ट घेत होत्या. ते डॉक्टरांना माहीत नव्हतं. नव्या गोळय़ांशी अरिष्टातल्या अल्कोहोलची मारामारी झाली. म्हणून किमान महिन्यातून एकदा डॉक्टरांची भेट होणं, सगळी औषधं त्यांना दाखवणं आणि दर सहा महिन्यांतून एकदा सर्वांगीण शारीरिक तपासणी आणि रक्ताच्या महत्त्वाच्या चाचण्या करून घेणं गरजेचं असतं.
योग्य व्यायाम नियमितपणे केले तर पायांची ताकद वाढते आणि पडझड घटते. मदतीशिवाय चालू न शकणाऱ्या आजोबांचं जिणं सुकर करायला प्रद्योतने काही खास गोष्टी केल्या. झोपेत उठून होणारी पडझड टाळायला वर-खाली होणाऱ्या रेिलग्जवाला पलंग घेतला. त्याला लागूनच, उंची कमी-जास्त होणारं टेबल ठेवलं. त्याची घडीची फळी उघडून पलंगावर येई; तिच्यावर जेवणखाण ठेवता येई. टेबलावर, आजोबांच्या हाताशी येतील अशी मोठय़ा, ठळक अक्षरांची पोथ्या-पुस्तकं, अक्षरं अजून मोठी करणारी बहिर्गोल िभगं आणि बोलकी पुस्तकंही प्रद्योतने ठेवली. पोटापाण्याची, मनोरंजनाची बसल्याजागी सोय झाली.
गरजेच्या इतर छोटय़ा वस्तूंनाही टेबलाच्या खणांत ठरलेल्या जागी अढळपद दिलं. जमिनीवरून न उचलता मागेपुढे होणारा, न घसरणारा वॉकरही जवळ ठेवला. उंच बैठकवाल्या शौचखुर्चीची खोलीतच सोय केली. खोलीत मोठय़ा, ठळक आकडय़ांचं, टोल्यांचं घडय़ाळ टांगलं. आजोबांचा गोंधळ कमी झाला.
मेधाताईंची पुण्याला फेरी झाली की त्या अनेक खणांच्या डब्यांत (ऑर्गनायझर) आजोबांच्या महिन्याच्या गोळय़ा भरून ठेवत. आजोबांचं वजन, डायपर-रॅश, बद्धकोष्ठ यांची खुशाली घेत; नखं कापत; पाय स्वच्छ करत. शंभरीला त्वचेची डागडुजी तत्परतेने होत नाही. म्हणून मेधाताई आजोबांच्या पाठ- कंबर- टाचांवर लाल- काळे डाग, जखमा नाहीत ना ते बघत. त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी मॉइश्चरायझर नियमितपणे लावायचं कामाच्या माणसांना मुद्दाम सांगत. त्या वयात इन्फेक्शनने ताप येत नाही, पण वागणं सैरभैर होतं. ताई मुद्दाम आजोबांना वेगवेगळे प्रश्न विचारून बुद्धीची चाचणी घेत. आजोबा जाईपर्यंत बुद्धीने तल्लख राहिले.
नागेशआजोबांच्या घरचं वाणसामान, औषधं, घराची बिलं, नोकरांचे पगार वगैरे मेधाताई मोबाइलवरूनच सांभाळत होत्या. कामाची विश्वासू माणसं खात्रीने वेळच्या वेळी पाठवणारी एक उत्तम संस्था त्यांनी गाठली होती. त्यामुळे आजोबांच्या सेवेत खंड पडत नव्हता. सलग महिनाभर एकच काळजीवाहू माणूस राहायची व्यवस्था केल्यामुळे, उवा-ढेकणांची आयातही बंद झाली होती.
वरणभात-मऊ भाजीचा घरगुती डबा लावून सोबत प्रथिनांसाठी सोया- नाचणी- मूग- चणा- गहू- तांदूळ अशा मिश्र रव्याची खीर आणि एक मल्टिव्हिटॅमिन गोळी असा बंदोबस्त होता. रुचिपालट म्हणून मधूनच पास्ता, इडली-डोसा हजर होत. प्रद्योत आला की आजोबांची कवळी तपासून घेई.
कालांतराने काका-ताई ‘जीवनसंध्या सहनिवासा’त राहायला गेले. तिथे निवासी नर्स, डॉक्टर होते; गरजेला अँब्युलन्स होती आणि जवळच मोठं, सुसज्ज रुग्णालय होतं. खोलीत मोजकं सामान, भरपूर हवा-उजेड आणि गरजेपुरत्या स्वयंपाकाची सोय तर होतीच; शिवाय हवं तेव्हा खाली स्वच्छ जेवणघरही होतं. तत्पर काळजीवाहूंची रेलचेल होती. नोकर मिळवणं, टिकवणं; घरातली दुरुस्ती; वीज-पाणी नसणं वगैरे कटकटी नव्हत्या. समवयस्क, समविचारी मित्रांसोबत काव्यशास्त्रविनोदात, खेळांत वेळ उत्तम जाई. कुणाचीही मुलं-नातवंडं भेटायला आली की सगळय़ांच्याच जीवनसंध्येला नवा ताजेपणा येई. कसल्याही जबाबदारीविना, स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेत काका-ताई तिथे आनंदात राहिले.
हेही वाचा >>> खेळ, खेळी खेळिया: पाकिस्तान : क्रिकेटग्रस्त, भारतग्रस्त संस्कृती!
समवयस्क जोडीदाराला म्हातारपणी सांभाळणं सोपं नसतं. केशवतात्यांना डिमेन्शिया झाला होता. ते स्वयंपाकघरात विस्तवाशी-चाकूसुऱ्यांशी खेळत; दार उघडून वाहत्या रस्त्यावर जात. त्यांना घरीच सांभाळणाऱ्या सुमतीकाकींना विरंगुळा-विश्रांती काही उरलंच नाही. त्यांना औदासीन्याने, थकव्याने घेरलं. त्यांचं १० किलो वजन घटलं. शेवटी त्यांनी नाइलाजाने तात्यांना पूर्णपणे सांभाळणाऱ्या, डिमेन्शियाची खास काळजी घेणाऱ्या, योग्य औषधं देणाऱ्या वृद्धाश्रमात ठेवलं. तिथे डॉक्टर- रुग्णालय वगैरे सोयीही होत्याच. तात्या समाधानात राहिले. विश्रांती, योग्य आहार, व्यायाम आणि मानसोपचार यांनी काकूही सावरल्या.
ओंजळीतल्या सांजसावल्या जपताना सर्वांगीण विचार-अभ्यास करावा. ओंजळ अपुरी पडली तर त्यांना योग्य सहनिवासाच्या- वृद्धाश्रमाच्या समर्थ पदरात सोपवावं. त्यात अपराध वाटू नये. सावल्यांची शीतलता टिकेल. त्याचा निर्भेळ आनंद घ्यावा.
लेखिका वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त आहेत.
ujjwalahd9@gmail.com