श्रद्धा नेहमी संरक्षण करणाऱ्यांभोवती केंद्रित झालेल्या असतात. मग कोणी प्रत्यक्ष संरक्षण करणारा असेल किंवा संरक्षण करेल अशी मनाची धारणा असेल तिथे माणूस नतमस्तक होतो.
श्रीकृष्णाचं सुदर्शन, श्रीरामाचे धनुष्य, मारुतीची गदा, शंकराचं त्रिशूळ, खंडोबा आणि आई भवानीची तलवार, कोणाच्या हातात खड्ग, तर कोणी चक्रधारी. देवीदेवतांच्या आक्रमक रूपांभोवती आपल्या श्रद्धा. त्यामुळे एखाद्या देवतेच्या हातात एकापेक्षा अधिक शस्त्र असतील तर ते श्रद्धारूप अधिक उजळून येतं. कारण मानसिक पातळीवर आक्रमकता पुजली जाते. ज्यांच्या ठायी अशी आक्रमकता आहे, तोच आपले संरक्षण करील हा मनातील भाव, पुढे तो देशभक्तीशी जोडला जातो आणि तो सैन्यदलास मिळतो. पण लोकदेवतांचे उपासक कोणी शस्त्र उचलून चालवत नाहीत. असे का असेल? तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देते असा आपला दृढ समज आहे, कारण शस्त्र हे विवेकी व्यक्तीच्या हातात द्यायचं असतं. शस्त्र कधी चालवावं आणि ते कधी म्यान करावं याचा विवेक आणि बौद्धिक कौशल्य असणाऱ्यांच्या हाती ते असलं पाहिजे, ही जाणीव समाज म्हणून आपण स्वीकारलेली आहे. त्यातूनच भवानी तलवारीचा प्रसंग मराठी माणसाच्या मनात कायमस्वरूपी कोरला गेला आहे.
हिंस्र प्राण्यांमधील वाघाच्या आक्रमकपणाच्या डौलाचं एवढं आकर्षण की, राजकीय पटावर वाघांचं, बिबट्याचं चित्र मिरवलं जातं. कधी ‘कोण आला रे कोण आला’ अशी घोषणा होते. तर कधी राजकीय पक्ष पँथरने ओळखला जातो. ताकद जशी मिरवली जाते तशीच तिचा वापर कसा करायचा याचा तपशील त्याच्या आयुधांमध्ये दडलेला असतो. म्हणूनच आक्रमक देवतांच्या उपासकांचे नैवेद्याही त्याच प्रकारचे असतात. पंचमहाभूतांना देवता मानून त्याच्या होणाऱ्या पूजा, त्याची प्रतीके आणि श्रद्धास्थानांवर नि:शस्त्र देवतांना तसे फारसे स्थान नाही. ज्यांच्या हातात शस्त्र नसेल त्यांच्या हातात धनसंपत्ती, अशी चित्र कधीपासून रेखाटली जाऊ लागली काय माहीत. पण या वर्गात अपवादचित्र फक्त सरस्वतीचं. या देवतेच्या हातात ना शस्त्र आहे ना धनसंपत्ती. जगण्याच्या आनंदातील कलाप्रकाराची, उपासकांची ही देवता. एका अनवट वाटेने जाताना काही तरी गवसतं. हे गवसणं मनाच्या शिक्षणावर अवलंबून असतं. त्यामुळे सरस्वतीचे उपासक तसे कमीच. माणूस जेव्हा गुहेत प्राण्याची चित्रे काढू लागला तेव्हा कोणाची शिकार करायची याचे ‘टार्गेट’ तो निश्चिती करू लागला. असे ठरवून चित्र काढून शिकार करण्याच्या शिक्षणाला यातुविज्ञा असं म्हटलं जातं. आदिमानव थंडी, ऊन, पाऊस आणि वन्य पशूंपासून संरक्षण मिळावं म्हणून गुहांमध्ये राहू लागला. कधी तरी त्याला अग्नी मिळाला. वणव्यात जळालेल्या जनावरांचे मांस अधिक चविष्ट लागते हे कळाले तेव्हा त्याने अग्नी राखून ठेवायला सुरुवात केली. पुढे हाच अग्नी स्वसंरक्षणार्थ वापरता येतो, हेही त्याला कळाले आणि मग पुढे नाना प्रकारच्या शस्त्रांच्या शोधाचा तो पाया ठरला. जगण्यासाठी शिकार करावी लागते आणि शिकार सोपी व्हावी म्हणून अणकुचीदार दगडापासूनची हत्यारे तयार झाली. अश्मयुगीन हत्यारे हा पुराविद्या विभागात अभ्यासाचा स्वतंत्र भाग आहे. पुढे धातूंचा शोध लागला. आताची शस्त्रे कोणत्या क्षणी, काय होईल आणि त्यावर मात कशी करायची याचा अभ्यास करून बनविली जात आहेत. हत्यारांचं एक वेगळंच जग आहे. वस्तुसंग्रहालयात गेलं की, नाना प्रकारच्या तलवारी, भाले, बरच्या, कट्यारी, चिलखत पाहावयास मिळतात. ही हत्यारं कोण वापरतं, यावर त्यातील कलाकुसर ठरू लागली. हत्यार हे श्रीमंती आणि सत्ता याचं दृश्य रूप बनलं. आजही शक्तीचं दर्शन हे हत्यारांच्या आधारे होतं. अन्यथा आम्हीही अण्वस्त्रधारी आहोत, असं म्हणत कोणी कोणाला धमकावलं नसतं. जगण्याच्या टप्प्यात जेव्हा शक्तिपात होईल अशी भीती निर्माण होते, तेव्हा मानसिक पातळीवर युद्धदेवतांना पुजले जाते. तसा आकार उकार नसलेल्या वेताळाला नवस म्हणून कोंबडं ओवाळून टाकणाऱ्यांनी भोवताल भरला आहे. पण लोक देवतांचं रौद्र रूप तसं मौखिक परंपरेत फारसं येत नाही. शंकराचं रागीट रूप त्याला अपवाद. तांडवनृत्याची वर्णनं आजही केली जातात. शीघ्रकोपी आणि तेवढाच कनवाळू लोकरूढ भाषेतील भोळा सांब असं जटाधारी शंकराचं वर्णन कोणाही भाविकाला श्रद्धेने नतमस्तक व्हायला लावणारं. शांत, संयमी, प्रभू रामचंद्रालाही रामायणाच्या कथेत फक्त एकदाच राग आल्याची नोंद कीर्तनकार सांगतात. रावणाबरोबर युद्धासाठी जाताना समुद्रातून मार्ग निघत नव्हता तेव्हाचा तो प्रसंग. दंतकथा, मिथकं, लोकगीतं, लोकनाट्य, म्हणी, वाक्प्रचार, रूढी, परंपरा, समजुती यातून देवतांच्या रागीटपणाला एक करुणेची झालर असते. युद्धाला नेहमी अशी सहानुभूती लागते. त्यातून युद्धाच्या नीतिशास्त्राचे नियम ठरत असतात. असे नियम आणि नीतिशास्त्र ठरवून त्याचं दिशादर्शन करणारी भारतीयांच्या मनातील देवता म्हणजे श्रीकृष्ण. द्वारकाधीश श्रीकृष्णाचं राजकारण समजावून सांगणारा ‘व्यासांचे शिल्प’ या पुस्तकातील नरहर कुरुंदकरांचा ‘राष्ट्रनिर्माता भगवान श्रीकृष्ण’ लेख युद्धदेवता समजून घेण्यासाठी अधिक उपयोगी ठरणारा, जरासंधाच्या जाचाला वैतागलेल्या द्वारकेतील जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी पांडवांच्या पारड्यात श्रीकृष्णाने टाकलेलं बळ, युद्धशास्त्र दृष्टिकोन सांगणारा. त्यामुळेच ‘श्रीकृष्ण’ ही जगणं शिकविणारी देवता. अगदी युद्ध प्रसंगात श्रीकृष्णाची भूमिका सारथ्याची. खरंतर त्यानेच शस्त्र हाती घेतलं असतं तर महाभारतातील युद्धकालावधी घटला असता. पण हाती सुदर्शन असताना श्रीकृष्णाने ते कधीच सरसकटपणे वापरलं नाही. बहुतांशी शस्त्र असणाऱ्या देवतांनी ज्यांच्यावर शस्त्र चालवलं ते सारे आसूर. उतून- मातून वागणाऱ्यांना वठणवीर आणणं आवश्यक असतं. युद्धदेवतांच्या रचना आणि पूजा याचा सहसंबंध आज कितपत लागू आहे? आजही आपल्या सैन्य दलातील विविध तुकड्यांमधील प्रेरणादायी घोषणांची नुसती यादी प्रेरणास्राोत सांगणारी आहे. बिहार रेजिमेंटमध्ये सैनिक ‘बजरंगबली की जय’ म्हणतात. डोगरा तुकडीत ‘ज्वाला माता की जय’, गडवाली रायफल्स ‘बद्री विशाल की जय’, गुरखा रायफलमध्ये ‘जय महाकाली’चा जयघोष होतो. कोणी ‘कालिका माता की जय’ म्हणतात, महाराष्ट्रातला माणूस ‘हर हर महादेव’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा देतो. शिखांमध्ये ‘बोले सो निहाल’ असा जयघोष होतो आणि सैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण होते. जिथे शस्त्रधारी देवतांच्या नाना उपासनापद्धती आहेत तशाच विरक्त आणि त्यागी जगण्याचा संदेश देणाऱ्या नाथ सांप्रदायिकांच्या हातातही त्रिशूळ आहे. एवढी शस्त्र बाळगणाऱ्या देवता असण्याचा अर्थ शौर्याचं पूजन हा तर आहेच. पण जेव्हा जगण्यासाठी हिंस्रा श्वापदांशीच सामना करावा लागत असेल तेव्हा त्यांच्यापासून वाचण्यासाठी एखादं शस्त्र बरोबर असायलाच हवं, असा तो संदेश. आपापल्या समुदायाचं कुलचिन्ह घेऊन लोकदेवतांच्या दर्शनाला येणाऱ्या जाती अजूनही जत्रा – यात्रांमधून दिसतात. ती प्रेरणा सुरक्षिततेच्या कारणातून आणि भीतीतून निर्माण झालेल्या रूढीत आता परावर्तित झाली आहे. विजयासाठी शस्त्रसज्जता लागते. विजयादशमीचे शस्त्रपूजन एवढ्याचसाठी. शत्रूविषयीच्या आणि शत्रुत्वाच्या संकल्पना कालपरत्वे बदलत राहतात. राजकीय पटावर तर त्यात ३६० अंशांचे बदल होतात, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. नि:शस्त्र जगणे भ्याडपणाचे नसते, हे तत्त्वज्ञानही याच भूमीत विकसित झालेले. एका बाजूला शस्त्रधारी देवतांचे पूजन करताना योगाभ्यास करून राग, लोभ, मोह, माया, मत्सर यावर विजय मिळवता येतो हे जीवन तत्त्वज्ञान हिंदू, जैन, बौद्ध उपासकांनी समाजात रुजवले. हिंसा मान्य नसणाऱ्या संप्रदायांनी जगण्याची चौकटच बदलली होती. म्हणूनच अनेक वर्षे ध्यानस्थ असणारे बुद्ध, महावीरांचे शिल्प कोरणाऱ्या कलाकारांनी नि:शस्त्रतेची ताकद मनात कोरून ठेवली आहे.
पण शस्त्रांची ताकद नेहमी वरचढ ठरते. त्यातून तरीही एक रक्तरंजित इतिहास बरोबरीला येतोच. या इतिहासाला आव्हान देणारा एकमेव माणूस जगाच्या पाठीवर होऊन गेला तो म्हणजे महात्मा गांधी. तोही अशा काळात जेव्हा जगभर हुकूमशहांचा बोलबाला होता. हिंसेशिवाय राष्ट्रनिर्माण ही संकल्पना लोकमानसात रुजावी म्हणून सतत कामातून तत्त्वज्ञानाची मांडामांड करणाऱ्यांमधील ते नाव आपण विसरत तर नाही ना, हे सतत तपासून पाहण्याचा काळ आला आहे का? उत्तर होकारार्थीच द्यावे लागेल.
suhas.sardeshmukh@expressindia.com