‘क्लासिसिझम’ या संकल्पनेसाठी मराठीत अभिजातवाद हा शब्द वापरला जातो. अभिजात साहित्य, अभिजात भाषा, अभिजात कला, अभिजात मूल्य, अभिजात परंपरा, अभिजात युग… अशा शब्दप्रयोगांमध्ये अभिजात या संकल्पनेच्या अनेकविध अर्थछटा व्यक्त होतात. ‘अभिजातवाद’ प्रामुख्याने सौंदर्यशास्त्रात वापरण्यात येणारी संकल्पना असली तरी ही संकल्पना वैचारिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक पैलूसुद्धा प्रतिबिंबित करते. प्रख्यात फ्रेंच लेखक आँद्रे जिद् (१८६९- १९५१) फ्रेंच अभिजातवादाची व्याख्या विशद करताना लिहितो – ‘‘परिपूर्ण अभिजातवादाला व्यक्तीचा अंत अपेक्षित नसून त्याची शरणागती आणि व्यवस्थाधीनता अपेक्षित असते; ज्याप्रमाणे (अभिजात साहित्यकृतीत) शब्द वाक्याला, वाक्य परिच्छेदाला, परिच्छेद साहित्यकृतीला शरण जातो. त्याअर्थी अभिजातवादी परिपूर्णता साक्षात उतरंडीचा दृष्टान्त असतो’.
अभिजातवादाच्या या व्याख्येत आँद्रे जिद् अभिजातवादी सौंदर्यशास्त्रासह त्याचं आधारभूत तत्त्वज्ञान अधोरेखित करतो, ज्यात व्यक्ती आणि समाजाचं तणावाचं नातं अभिव्यक्त झालं आहे. जणूकाही अभिजातवाद व्यक्तीला गौणत्व बहाल करून व्यवस्थेच्या बळकटीला प्राधान्य मिळवून देतो. मिशेल फुको तर ‘ Madness and Civilisation: the History of Madness in the Classical Age’ आणि ‘ The Order of Things’ सारख्या वैचारिक लिखाणामध्ये पाश्चात्त्य अभिजातवादाचा उल्लेख ‘एपिस्टमी’ या ग्रीक संकल्पनेने करतो. फुकोच्या लिखाणात ‘एपिस्टमी’ म्हणजे ज्ञाननिर्मितीची शक्यता आणि स्वरूप निश्चित करणारी पूर्वप्राप्त चौकट. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या बेफाम, अराजक, अस्थिर, अनिश्चित अशा बारोक काळातल्या ‘बेशिस्त’ आणि ‘स्वैर’ व्यक्तिवादाला शिस्तबद्ध करून विस्कटलेल्या समाजाची घडी बसविण्याची निकड म्हणजे अभिजातवादी ‘एपिस्टमी’चा उदय, असा अर्थ फुकोच्या विश्लेषणात आढळतो!
त्याअर्थी अभिजात युग म्हणजे सर्व गोष्टींना (फ्रेंचमध्ये ‘ Les mots et les choses’) व्याख्यांकित आणि चिन्हांकित करून वर्गीकरण, दस्तऐवजीकरण आणि अधिकृतीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प- जेणेकरून कुणीही आणि काहीही अनामिक अर्थात नियंत्रणाबाहेर राहता कामा नये. फुकोच्या दृष्टीनं अभिजातवाद हे ‘नियंत्रित’ करून ‘शिक्षित’ (फ्रेंच : Surveiller et punir) करण्याचं प्रभावी शास्त्र ठरतं.
सौंदर्यशास्त्र आणि इतर मानवी व्यवहार यांतले आंतरिक संबंध पाहता अभिजातवादाची चर्चा फक्त सौंदर्यशास्त्रापुरती मर्यादित ठेवता येत नाही. खरं तर, क्लासिसिझम अर्थात अभिजातवाद ही संकल्पना १९व्या शतकात फ्रान्समध्ये, १७व्या शतकातलं फ्रेंच साहित्य, कलाकृती आणि एकूण सामाजिक मानसिकतेचा अन्वयार्थ लावण्यासाठी वापरण्यात आली आहे. प्रस्तुत लेखात फ्रेंच परंपरेतल्या अभिजातवादाची सविस्तर चर्चा करताना अभिजातवाद म्हणजे एकाच वेळी १७व्या शतकातला ठरावीक कालखंड आणि कालातीत सौंदर्यशास्त्रात्मक दृष्टी अशी मांडणी करण्याचा प्रयत्न असेल. कारण बहुतेक सौंदर्यशास्त्रात्मक संकल्पनांप्रमाणे ‘अभिजात’सुद्धा एकाच वेळी विशिष्ट कालखंड आणि शाश्वत वैश्विक जीवनदृष्टीचा निर्देश करते, जी कुठल्याही काळात प्रकट होऊ शकते.
अभिजात युगपूर्व अभिजातता
प्रस्तुत लेखाचा विषय १७ व्या शतकातला अभिजातवाद हा असला तरी तत्पूर्वी ऐतिहासिक वाटचालीत अभिजातता कशासाठी वापरण्यात आली होती, हे समजून घेणं सयुक्तिक ठरेल. ऐतिहासिकदृष्ट्या,
classicus या लॅटिन शब्दाचा अर्थ उच्चभ्रू, अभिजन वर्गाशी ( of first class, order, rank) संबंधित असणारी भाषा, संस्कृती, कला आणि ज्ञानपरंपरा असा होतो. या अर्थछटेत सामाजिक अभिजन वर्गाची अभिरुची अभिजात ठरते. पण कालौघात ‘होमो क्लासिकुस’ या संकल्पनेचा वापर सर्वोत्कृष्ट लेखक, विचारवंत, कलावंतांसाठी वापरण्यात आला; ज्यांना जीवनाविषयी चिरतत्त्व गवसलं होतं आणि ज्यांच्या विचारकृती आणि कलाकृती काळाच्या कसोटीवर उतरल्या.
रनेसॉन्सच्या पुनरुत्थानाच्या प्रक्रियेत ‘सापडलेल्या’ प्राचीन ग्रीक आणि लॅटिन परंपरेला आपोआप अभिजातता प्राप्त झाली. कारण शतकांच्या काळोख्या वाटचालीनंतरही या प्राचीन ज्ञानपरंपरा मूलभूत, चिरकालिक आणि वैश्विक मनुष्यावर भाष्य करतात. रनेसॉन्सच्या मानवतावादी संदर्भात अभ्यासक्रमात स्थान प्राप्त करणाऱ्या, अनुकरणीय वस्तुपाठ वा प्रमाण ठरणाऱ्या- प्राचीन साहित्याला अभिजात साहित्याचा दर्जा प्राप्त झाला. सतराव्या शतकापर्यंत अभिजातता प्राचीन ग्रीक आणि लॅटिन अभिजात परंपरेचं सूचन करते.
सतराव्या शतकातली अभिजातता
सतराव्या शतकातील अभिजातता विशद करण्याआधी तिचं वैचारिक अधिष्ठान आणि पूरक राजकीय संदर्भ अधोरेखित करणं आवश्यक आहे. याआधी आपण पाहिलं की सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात अराजकता, अस्थिरतेने भरलेली बारोक मानसिकता रने देकार्तच्या लिखाणात पूर्वपक्षाची (कार्डिनल डाऊट) जागा घेते; तर अमूर्त, एकजिनसी, अनैतिहासिक ( transcendental) कार्टेशियन कोजितो उत्तरपक्षाचं अर्थात आधुनिकतेचं अधिष्ठान बनतो. अभिजात सौंदर्यशास्त्राच्या मुळाशीसुद्धा कार्टेशियन तत्त्वज्ञान आहे, असं म्हणता येईल. देकार्त तसंच गॅलिलिओ, पास्काल, निकाला ब्वॉलोसारख्यांच्या तत्त्वज्ञानातला वैश्विकतेचा, वस्तुनिष्ठतेचा शोध, विश्वाविषयीची वैज्ञानिक संकल्पना आणि त्यातलं मनुष्याचं स्थान अभिजातवादी सौंदर्यशास्त्राला प्रभावित करणारं आहे. तत्कालीन वैज्ञानिक आकलनानुसार भौतिक विश्वाचा उलगडा यांत्रिक तत्त्वावर शक्य होता. कार्यकारणभावाच्या कठोर, अपरिवर्तनीय आणि अनिवार्य भौतिकी नियमांचं पालन करणाऱ्या विश्वात मनुष्य बंदी म्हणून जन्माला येतो जिथं त्याला मर्यादित स्वातंत्र्य असतं जे बहुधा हाती लागत नाही! उदा.- बहुपदरी जीवनात असंख्य शक्यतांना समानतेच्या पातळीवर स्वीकारणाऱ्या बारोक मनुष्याकडे स्वातंत्र्यासाठी अवकाश आहे. मात्र अभिजातवादी मनुष्य नियतीवादी ठरतो. अपरिवर्तनीय नियमांनी आखून दिलेली नियती! जाँ रासिनेची पात्रं अशा क्रूर नियतीचे बंदी दिसतात. त्यामुळे मनुष्यानेसुद्धा शाश्वत, अचल, अदृश्य अशा नियमांची दखल घेऊन त्यात बदल करण्याचा अट्टहास धरू नये. थोडक्यात, अभिजातवादात लहरी प्रयोगशीलतेला वाव नसतो. खरं तर, ही तत्त्वज्ञानात्मक भूमिका शिस्तप्रिय कार्डिनल रिशलिअच्या (१५८५- १६४२) राजकारणाला आणि नंतर चौदावा लुईच्या (१६३८- १७१५) निरंकुश राजेशाहीला पूरक ठरते. फ्रान्समध्ये अभिजातवादी साहित्याला बहर चौदावा लुईच्या दीर्घ कारकीर्दीत आला – मोलिएर (१६२२-१६७३), जाँ रासिन (१६३९- १६९९), मादाम द ला फाइएत्त (१६३४- १६९३), निकोलो ब्वॉलो (१६३६- १७११).
परंपरा आणि नवता
अभिजात सौंदर्यशास्त्राचे दोन मूलभूत गुणधर्म म्हणजे बुद्धिवाद आणि कालसिद्ध नियमांच्या चौकटीचं काटेकोर पालन. त्यामुळे अभिजातवाद साहित्य अमूर्ततेकडे झुकणारं आहे. बारोक सौंदर्यशास्त्रात सामाईक आणि वैश्विक संदर्भबिंदूचा अभाव असल्याने सापेक्षतावादाचा अतिरेक दिसून येतो. बारोक सतत वाढीव असल्याने चौकटीबाहेर ओसंडून वाहातं. अभिजातवाद मात्र जे वाढीव दिसतं, जे प्रमाणाबाहेर जातं ते फूटपट्टीने छाटणारा. जणू बारोकच्या थैमानाला पायबंद घालण्यासाठी अभिजातवादी सौंदर्यशास्त्र उदयास आलं असावं.
अभिजातवादात प्राचीन परंपरेच्या अनुकरणावर भर असतो. जिथं नवता आवश्यक आहे तिथं कठोर नियमांचं पालन करून नवता वैश्विकतेला छेद देणार नाही याची काळजी घेतली जाते. खासगी व्यक्तिकेंद्रित तपशील टाळून वैश्विक मनुष्याच्या शोधाला प्राधान्यता दिली जाते.
उदाहरणार्थ, मोलियरची लहरी पात्रं हास्यास्पद ठरतात, कारण ती ‘वैश्विकतेचा’ अव्हेर करून आत्मकेंद्री अपरिवर्तनीय सवयींच्या अधीन असतात. तर रासिनचे नायक टाळता न येणाऱ्या नियतीपुढे असमर्थ ठरतात. वैश्विकतेच्या बाबतीत अनभिज्ञ असणाऱ्या आत्मकेंद्री माणसांच्या विरोधाभासी प्रवृत्तीवर बोट ठेवताना ला रोशफुको नमूद करतो की ‘एका बाजूला मनुष्याची इतरांशी निखळ नातं निर्माण करून संवाद साधण्याची इच्छा असते, तर दुसऱ्या बाजूला त्याचा स्वार्थवाद त्याला स्वत:बाहेर पडू देत नसल्यानं त्याला सतत क्वॉरन्टाइन होऊन जगावं लागतं.’
थोडक्यात, १७व्या शतकातील अभिजात साहित्यात त्रिकालाबाधित मनुष्याचा शोध दिसतो. बारोकनुसार अंतिम आणि शाश्वत सत्य नसल्यानं सापेक्ष गोष्टींवर प्रेम करणंच हातात असतं. मात्र अभिजातवादी दृश्यं चंचल, परिवर्तनशील वास्तवाच्या मुळाशी जाऊन वैश्विक, एकसंध, समग्रलक्ष्यी सत्याचा शोध घेतात. शाश्वत सत्याची कास धरली तर लहरी सापेक्षतावादापासून सुटका करता येते. त्यामुळे अभिजातवादात ‘ taste for the absolute’ दिसते.
अभिजातवादाचा व्यापक अर्थ
अभिजात सौंदर्यशास्त्राला ‘अपोलोनियन सौंदर्यशास्त्र’ सुद्धा म्हटलं जातं. कारण त्यात शिस्तबद्धता, स्पष्टता, एकसंधता, तार्किकता, संतुलन, सुसंगतता, साधेपणा, स्थिरता, स्वाभाविकता ही लक्षणं आढळतात. अभिजात सौंदर्यशास्त्र मनाच्या चंचल व्यवहाराला शरण जात नाही. उत्कट भावना, मद्याधुंद हेलकावे, अतिरेकी गोष्टींवर कठोर अनुशासन लावलं जातं. अभिजातता ही तटस्थता आणि व्रतस्थता असते. अभिजातवादी भडक भावनांच्या आणि बेगडी भव्यतेच्या वेदीवर सत्याचा बळी देत नाहीत.
‘होमो क्लासिकुस’चा इतिहास संक्षिप्तपणे सांगायचा तर सुरुवातीला उच्चभ्रू अभिजन वर्गाशी असलेला संबंध रनेसॉन्सच्या काळात गळून पडतो. आधुनिक काळात विशेषकरून १९व्या शतकात अभिजाततेला नव्यानं व्याख्यांकित करून वर्गनिरपेक्ष अभिजातता मांडण्यात येते. सतराव्या शतकातलं अभिजातवादी सौंदर्यशास्त्र कालौघात व्यवस्थात्मक जुलूमशाहीचं हत्यार बनून साहित्य, कला, तत्त्वज्ञानाच्या शक्यता संपवतं तेव्हा त्याच्या विरोधात विशेषकरून १९व्या शतकात बंड होतं. अभिजातता म्हणजे फक्त प्रमाणभाषा आणि प्रस्थापित शैली प्रभुत्व हे समीकरण नाकारलं जातं. अभिजातवादाला व्यापक अर्थ प्राप्त होऊन अपोलोसह डायनोसिअसलादेखील मानाचं स्थान प्राप्त होतं. रासिनपेक्षा शेक्सपियर महत्त्वाचा समजला जातो. प्रस्थापित अभिजातवादाच्या विरोधात बंड करणारे व्हिक्टर ह्यूगो आणि स्तेन्दालसारख्यांच्या साहित्याचा अभिजात साहित्य म्हणून अभ्यास केला जातो. त्यामुळे अभिजात साहित्य म्हणजे अशी शाश्वत सांस्कृतिक संपदा जी समग्र सांस्कृतिक व्यवहारासाठी मार्गदर्शक ठरते. अभिजात कलाकृती संदर्भमूल्य म्हणून प्रस्थापित होऊन कालातीत बनते. त्या दृष्टीनं अभिजातवाद अशा बाबींना लागू होतो ज्या काळाला आव्हान देतात… ज्या गतार्थ होत नाहीत.