हॅलोवीनसंस्कृती आपल्याकडच्या नव्या पिढीने आत्मसात केलेली असली, तरी इथल्या जुन्या पिढीला तो भुता-खेताचा, घाबरवण्याचा-घाबरायचा सण असल्याची ब्रिटिश-अमेरिकी चित्रपटांनी ओळख करून दिली. ती ओळख बिलकूल चूक नाही. ‘हॅलोवीन’च्या निमित्ताने ‘गार्डियन’च्या ‘बुक्स’ विभागात समकालीन भयकथा-रहस्यकथा लेखकांना आपापल्या आवडत्या भयकथांवर बोलते करण्यात आले आहे. यात कुणी शर्ली जॅक्सनच्या ‘द समर पीपल’ची महत्ता स्पष्ट केली आहे, तर कुणी डेव्हिड फॉस्टर वॉलेसची अपारंपरिक भय असलेली कुटुंबकथा सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे. काय वाचावे हे ठरविण्यासाठी ही चांगल्या भयकथांची पोतडीच आहे. काही परिच्छेदांमध्ये आपापल्या आवडत्या भय-थरारकथा आणि कादंबऱ्यांचे संदर्भ देणारी ही कव्हर स्टोरी येथे वाचता येईल.

https:// tinyurl.com/yzuh3er7

ब्रिटिशकालीन भारतीय भुतावळ

शंभर वर्षांपूर्वी भारतात प्रकाशित झालेल्या एस. मुखर्जी या लेखकाच्या भूत पुस्तकाची ही ओळख. हे पुस्तक ‘मिस्टर मुखर्जीज घोस्ट्स’ या नावाने जन्माला आले. ब्रिटिश काळातील या लेखकाचा पुढे तपशील किंवा मागमूस उरला नाही. ब्रिटिश प्रकाशन संस्थेच्या प्रयत्नांमुळे २००६ साली या पुस्तकाचा आणि त्यातील गोष्टींचा जीर्णोद्धार झाला. या पुस्तकाच्या पुनर्जन्माची कहाणी तसेच अनेक संदर्भ पुरवणारा हा लेख.

https://tinyurl.com/rd98yj9b

भारतावरचा तिसरा ग्रॅण्टा…

स्वातंत्र्याची पन्नाशी साजरी करीत असताना ‘ग्रॅण्टा’ या ‘प्युअर लिटररी’ मासिकाने १९९७ मध्ये भारतावरचा पहिला अंक (अंक क्रमांक ५७) काढला. त्यानंतर २०१५ साली भारतावरचा दुसरा अंक आला (क्रमांक १३०). आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र मुखपृष्ठावर झळकलेला १७३ वा अंक पुढल्या आठवड्यात ६ नोव्हेंबर रोजी प्रकाशित होतोय. हा अंक भारतावरील आधीच्या दोन्ही अंकाहून अधिक गाजणार यात वाद नाही. मराठी दिवाळी अंकांमध्ये वाचन चाचपड सुरू असताना या अंकाची प्रतदेखील राखून ठेवा. या मासिकाचा गेली दोन वर्षे संपादक असलेल्या थॉमस मीनी यांची खास मुलाखत ‘द नेशन’ने घेतली आहे. मासिकांचे भवितव्य आणि साहित्याचे वाचन वगैरेवरचे खूप संदर्भ यांत आहेत.

https://tinyurl.com/bdh2z9sm